शताब्दी लोकमान्यतेची
By admin | Published: October 25, 2014 01:59 PM2014-10-25T13:59:35+5:302014-10-25T13:59:35+5:30
सोलापूरचे नाव महाराष्ट्रात आणि देशविदेशात प्रसिद्ध करणारे ‘दाते पंचांग’ १00 वर्षांची परंपरा जोपासत आज लोकमान्य झाले आहे. मुहूर्ताचे शुभाशुभ काळ ठरविणार्या या लोकप्रिय दाते पंचांगाच्या वाटचालीचा हा मागोवा.
Next
- पं. विजय जकातदार
भारतीय संस्कृती ही जगातील सर्वांत प्राचीन संस्कृतींपैकी एक मानली जाते. अशा या प्राचीन काळापासून सुरू असलेल्या आणि आजही समाजात तितकेच महत्त्व असलेल्या खूपच थोड्या परंपरा आपल्याला दिसतात. भारतीय कालगणना सांगणारी आणि भारताच्या सामाजिक, आर्थिक जडणघडणीचा महत्त्वाचा भाग असलेली परंपरा म्हणजे पंचांगाची परंपरा. पंचांग म्हटले, की पहिले नाव डोळ्यांसमोर येते ते दाते पंचांगाचे.
कोणतेही गाव विशिष्ट गोष्टीसाठी प्रसिद्ध असते. तसे सोलापूर हे चादरीसाठी आणि दाते पंचांगासाठीही प्रसिद्ध आहे. विशेषत: सोलापूरकर परगावी गेल्यावर वरील गोष्टीचे प्रत्यंतर येते. सोलापूरचे नाव महाराष्ट्रात आणि देशविदेशांत प्रसिद्ध करणारे दाते पंचांग १00 वर्षांची परंपरा जोपासत आज लोकमान्य झाले आहे. सन १९0६मध्ये लोकमान्य टिळकांनी ज्योतिष परिषदेत ‘पंचांग हा आकाशाचा आरसा आहे. पंचांगातील गणित आकाशात दिसले पाहिजे,’ असे वक्तव्य केले होते.
त्या काळी पंचांगामध्ये एकवाक्यता नव्हती. मतभिन्नता होती. गणित एकच असताना फरक का? या जिज्ञासेपोटी लक्ष्मण गोपाळ ऊर्फ नाना दाते यांनी पंचांगाचे गणित तयार करून शके १८३८ म्हणजे इ. स. १९१६-१७ या वर्षीचे पाहिले दाते पंचांग प्रसिद्ध केले. त्यानंतर १९४६-४७पासून धुंडिराजशास्त्री दाते हे पंचांगाच्या कामात पूर्णपणे मदत करू लागले. दाते पंचांगाचे रूपांतर वृक्षामध्ये होण्यासाठी अण्णा दाते यांचे योगदान फार मोलाचे ठरले. दिवसेंदिवस पंचांगाचा खप वाढत चालला आणि ज्योतिषांना व पंचांगाचा अभ्यास करणार्यांना दाते पंचांग हे ‘रेफरन्स बुक’ म्हणून उपयोगी पडू लागले. महाराष्ट्रात ‘पंचांग म्हणजे दाते पंचांग’ हे समीकरण झाले आहे. याचा परिणाम म्हणून भारत सरकारने कॅलेंडर रिफॉर्म कमिटीवर अण्णा दाते यांना सदस्य करून घेतले. तसेच, भारत सरकारच्या राष्ट्रीय पंचांगाच्या मराठी आवृत्तीचे कामही दाते पंचांगाकडे आले. ‘जन्मभूमी’ या गुजराथी पंचांगाचे धर्मशास्त्र व मुहूर्ताचे काम आजही दाते पंचांगकर्ते यांच्याकडून केले जाते. दाते पंचांगाची कीर्ती सर्व देशभर होऊ लागली आणि दाते पंचांग मराठी भाषेत असले तरी कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि परदेशांतसुद्धा मराठी भाषक असलेला माणूस दाते पंचांग घेऊ लागला.
याशिवाय, अण्णा दाते हे पंचांग, धर्मशास्त्र या विषयांवर गावोगावी व्याख्याने देत असत. व्याख्यानाच्या शेवटच्या दिवशी शंकासमाधानाचा कार्यक्रम असे. त्यामुळे वक्ता व श्रोते यांच्यामध्ये जवळीक निर्माण होत असे. शंकासमाधानाच्या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन पंचांगातसुद्धा शंकासमाधान सदर सुरू केल्याने ज्योतिषांबरोबर सर्वसामान्यांनासुद्धा दाते पंचांगाबाबत जवळीक निर्माण झाली आणि दाते पंचांगाचे संवर्धन होण्यास मदत झाली. पंचांगाच्या कामात अण्णांना त्यांचे लहान भाऊ श्रीधरपंत यांचे मोलाचे साह्य होते. आजही महाराष्ट्रात ८-१0 पंचांगे आहेत; परंतु लोकांना नेमके काय हवे आहे ते जाणून तशा प्रकारच्या सुधारणा पंचांगात वेळोवेळी करण्याकडे श्रीधरपंत दाते यांचा कटाक्ष होता. त्यामुळे दाते पंचांगाने आपले वेगळेपण जनमानसात ठसविले.
आज संगणकाच्या युगात पंचांगाचे गणित करणे खूपच सोपे झाले आहे. पूर्वीच्या काळी हेच गणित करताना खूप कष्ट पडत होते आणि आता हेच गणित संगणकाच्या साह्याने सूक्ष्म पद्धतीने, कमी वेळात व अचूक असे करता येते. पूर्वी पंचांगाचा उपयोग त्या गावच्या पंचक्रोशीपर्यंत होत असे. आज सोलापूरचे दाते पंचांग संपूर्ण महाराष्ट्रात आणि जवळ-जवळ सर्व भारतात जाते. दाते पंचांगाने नवीन संगणक युगात संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्व जगात प्रवेश केला आहे. पंचांग ही संकल्पना भारतीयांची आहे. आज कँलेडरच्या युगात ही पंचांगाची संस्कृती टिकविण्याचे कार्य दाते पंचांग परंपरेने करीत आहे. इंग्रजी तारखांचे कँलेडर जरी असले तरी त्या कॅलेंडरमध्ये दिलेले सण, व्रते, उत्सव, सूर्योदयास्त, चंद्रोदय यांची माहिती पंचांग गणिताशिवाय देता येत नाही. कारण, कालगणना व कालनिर्देश करणे हे पंचांगाचे प्रमुख कार्य आहे. पाच अंगांनी युक्त असे ते पंचांग. तिथी-वार-नक्षत्र-योग-करण ही पाच अंगे कालनिर्देश करतात. सूर्य व चंद्र यांच्या गतीमुळे ही पाच अंगे निर्माण होतात. त्यावरून मुहूर्ताचे शुभाशुभ काळ ठरविता येतात. कोणतेही कार्य करताना मुहूर्त पाहण्याची आपली भारतीयांची परंपरा आहे. त्यासाठी पंचांगाचा उपयोग मोठय़ा प्रमाणात केला जातो. याशिवाय कुलाचाराची माहिती, उपयुक्त शास्त्रार्थ, शंकासमाधान, व्रतवैकल्यांसंबंधी माहिती, पावसाचे भविष्य, अशी बरीच माहिती पंचांगात दिलेली असल्याने सर्व क्षेत्रांतील जिज्ञासूंना पंचांगाचा उपयोग होत असतो. इसवी २000पर्यंत दाते पंचांगाच्या फक्त मराठी आवृत्तीचेच प्रकाशन होत होते; त्यांनतर मोहन दाते आणि विनय दाते यांनी सहजपणे पंचांगाची माहिती लोकांना कळावी या हेतूने कोठेही चटकन पंचांग जवळ असावे म्हणून ‘दिनविशेष’ या नावाचे छोटे पंचांग (खिशात मावणारे) प्रकाशित केले असून, त्या छोट्या पंचांगाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच, कॅलेंडरसारखे भिंतीवरील पंचांग काढण्याची योजना कार्यान्वित करून २00६पासून कॅलेंडर आणि पंचांग यांचा सुरेख संगम असलेली दिनदर्शिका प्रकाशित करण्यास सुरुवात केली आहे. नवीन अभ्यासकांना जुनी पंचांगे मिळत नसल्याने सन १९३९पासून २00९पर्यंतची पंचांगे पाच-पाच वर्षांच्या संचस्वरूपात नवीन पद्धतीने प्रकाशित करण्याचे मोठे कार्य केल्याने ज्योतिषांना खूपच मोठी मदत झाली आहे. तसेच, १२ वर्षांपासून कन्नड भाषेतून ते पंचांग प्रसिद्ध करीत असून, कन्नड पंचांगालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ४ वर्षांपासून हिंदी भाषेमधील पंचांग प्रसिद्ध केले असून, त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर दाते पंचांग लोकप्रिय होईल, असा विश्वास वाटतो. भारतातील व्यवसाय आणि त्यामधील उलाढाल ही धार्मिक सण-उत्सव-यात्रा यांवर अवलंबून आहे; त्यामुळे सांस्कृतिक-सामाजिक-आर्थिक जडणघडणीमध्ये पंचांगाचे मोलाचे मार्गदर्शन होत असल्याने पंचांगाचे महत्त्व अबाधित राहणार आहे. आणि पंचांग म्हटले, की सोलापूरचे दाते पंचांग असे समीकरण असल्याने दाते पंचांगामुळे सोलापूरचे नाव जगाच्या नकाशात ठळकपणे राहणार आहे. जवळ जवळ गेली ३५ वर्षे दाते पंचांगाचे काम मोहन दाते व अण्णांचे पुतणे विनय दाते पाहत आहेत. दाते पंचांग परिवाराचे प्रमुख असलेले मोहन दाते यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच ज्योतिष या क्षेत्रांतील कार्याचा गौरव म्हणून भाग्यसंकेत परिवाराचा मानाचा ‘म. दा. भट पुरस्कार’ फक्त त्यांना मिळालेला आहे. तसेच, दिल्ली येथील कुन्दकुन्द भारती संस्थेचा मानाचा असा ‘आचार्य भद्रबाहु पुरस्कार’ देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. काही वर्षांपासून मोहन दाते यांचे चिरंजीव ओंकार दाते म्हणजे पंचांग क्षेत्रातील दात्यांची चौथी पिढी या कार्यात मदत करीत आहे.
(लेखक फलज्योतिष अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत.)