मराठी विज्ञान कादंबरीचे शतक
By admin | Published: May 10, 2014 06:08 PM2014-05-10T18:08:42+5:302014-05-10T18:08:42+5:30
विज्ञान कथा-कादंबरी हा एक विलक्षण साहित्यप्रकार आहे. मराठीत त्याची पाऊलवाट तब्बल १00 वर्षांपूर्वी घातली गेली. मात्र, ती जास्त रुळली नाही. वाचकांचा प्रतिसाद मिळाला, तरीही लेखकांची संख्या मात्र र्मयादितच राहिली. शतकी वाटचालीच्या निमित्ताने घेतलेला विज्ञानकथा लेखनाचा अभ्यासपूर्ण मागोवा.
Next
- विनय. र. र.
विज्ञान कथा-कादंबरी हा एक विलक्षण साहित्यप्रकार आहे. मराठीत त्याची पाऊलवाट तब्बल १00 वर्षांपूर्वी घातली गेली. मात्र, ती जास्त रुळली नाही. वाचकांचा प्रतिसाद मिळाला, तरीही लेखकांची संख्या मात्र र्मयादितच राहिली. शतकी वाटचालीच्या निमित्ताने घेतलेला विज्ञानकथा लेखनाचा अभ्यासपूर्ण मागोवा.
बरोबर शंभर वर्षांपूर्वी १९१४ मध्ये मराठी मुलखात एका नव्या साहित्य प्रकाराने जन्म घेतला- विज्ञान कादंबरी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या वर्षी एकाच लेखकाच्या दोन विज्ञान कादंबर्या प्रकाशित झाल्या. वा. म. जोशी यांच्या ‘अप्रकाश किरणांचा दिव्य प्रकाश’ आणि ‘वायलोचन’ या त्या दोन कादंबर्या. अर्थात त्याच्या आधीही विज्ञानविषयक वाड्मयाची हलकीशी झुळूक मराठी माणसाला वाचायला मिळाली होती.
हरिभाऊ आपटे यांनी १८९0मध्ये ‘करमणूक’ नावाचे एक नियतकालिक प्रकाशित केले होते. त्यात पहिल्यांदा विज्ञानविषयक लेखन वाचकांना वाचायला मिळाले. श्रीधर बाळकृष्ण रानडे या रविकिरण मंडळातील साहित्यिकांची ‘तेरेचे हास्य’ नावाची विज्ञानकथाही त्याच सुमारास प्रसिद्ध झाली.
विज्ञान मध्यवर्ती असणारी साहित्यकृती लोकांमधील विज्ञानाबद्दलची उत्सुकता जागी करते, तसेच विज्ञानाबद्दलची भीती काढून टाकण्यासाठीही उपयोगी ठरते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास होण्यास साहाय्यभूत ठरते. आधुनिक जगात विज्ञानाच्या पद्धती वापरून समस्या सोडवण्याची पद्धत रूढ झालेली आहे. विज्ञानकथांच्या वाचनातून विज्ञान विचाराचा प्रसार हस्ते-परहस्ते होत असतो.
विज्ञानकथा अन्य ललितकथेपेक्षा वेगळी असते का? काही लेखकांच्या मते विज्ञानकथा असं वेगळं वर्गीकरण केलं, तर काही कथा विज्ञानकथा ठरतील, मग बाकीच्या कथा काय अविज्ञानकथा आहेत काय? या प्रश्नातला अभिनिवेश हेच सांगतो, की आपण अविज्ञानी आहोत, असं मान्य करायला हे साहित्यिक तयार नसतात. हाच तर्क वापरला, तर काही पुस्तके आरोग्यावरची असतात म्हणजे बाकीची पुस्तके अनारोग्यावरची असतात का काय? त्यामुळे विज्ञानकथा, विज्ञान कादंबरी असे वर्गीकरण करायला काही हरकत नाही; किंबहुना ते त्या-त्या साहित्याचे वैशिष्ट्य आहे, असे ओळखावे.
जगाच्या इतिहासात डोकावलं, तर असं म्हणता येईल, की जगातली पहिली विज्ञानकथा १४८८ मध्ये निर्माण झाली. कथाकार होते- लिओनादरे दा विंची. आणि कथा होती - दि फ्लाईंग मशीन. ज्या वेळी विमान, हेलिकॉप्टरची कोणी कल्पनाही केली नव्हती, पेट्रोल-डिझेलच काय, वाफेवर चालणारी इंजिनेही नव्हती, तेव्हा हे ‘फ्लाईंग मशीन’ लोकांच्या कल्पनांना कुठल्या जगात घेऊन गेले असेल? १८१८ मध्ये मेरी श्ॉलीची ‘फ्रँकेस्टाइन’ ही पहिली विज्ञान कादंबरी म्हणता येईल. रशियाचे आयझ्ॉक असिमॉव, फ्रान्सचे जूल्स वर्ज, अमेरिकेचे फँ्रक हर्बर्ट, एच. जी. वेल्स, रॉबर्ट हेईनलीन, स्तनिस्लाव लॅम, ऑर्थर क्लार्क अशा कितीतरी प्रतिभावंतांनी विज्ञान-वाड्मय निर्माण केले. ‘जे न देखे रवी, ते देखे कवि’ या उक्तीप्रमाणे या सगळ्यांनी कित्येक शास्त्रज्ञांच्या आधी, संशोधकांच्या आधी अनेक प्रकारची उपकरणे, साधने, तत्त्वे आपल्या कल्पनेतून साहित्यात मांडली. या कल्पनांनी पुढे अनेक संशोधकांना प्रेरणा दिल्या.
विज्ञानकथांमध्ये जशा काल्पनिक गोष्टी असतात, तशा अन्य कथांमध्येही अनेक काल्पनिक बाबी असतात. मग परीकथा, जादूकथा आणि विज्ञानकथा यात फरक कोणता? बर्याचशा विज्ञानकथा भविष्यात आपले काय होईल, याचा कल्पनाविस्तार करत असतात. या कल्पनाविस्ताराचे टोक घेऊन आपण टप्प्या-टप्प्याने मागे आलो, तर आपल्याला अखेरीस एका ठिकाणी पोहोचायला मिळते. या ठिकाणी आपल्याला आजच्या जगातलं वास्तव वैज्ञानिक तथ्य आढळतं. या तथ्याच्या पायावर तर्क वापरून पुढचे इमले चढवलेले असतात.
इंग्रजीमध्ये विज्ञानकथांचे दोन प्रकार मानले गेले आहेत. फिक्शन आणि फँटसी. फिक्शन हा ग्रीक शब्द आहे, त्याचा अर्थ आविष्कार, तर फँटसी म्हणजे कल्पित कथा. बंगाली भाषेत फिक्शनला विज्ञान गल्प म्हणतात, तर हिंदीत वैज्ञानिक कहानी. फँटसीला दोन्ही भाषांमध्ये विज्ञानकथा म्हटले जाते. मराठीत मात्र दोन्ही प्रकारांना एकच शब्द म्हणजे विज्ञानकथा हाच वापरतात.
विज्ञानाच्या आधारावर शक्य असणारी शक्यता मध्यवर्ती ठेवूनच कथा गुंफलेली असावी लागते. त्यामुळे— विज्ञानकथेची वाढ होताना एखादे काल्पनिक उपकरण, यान, परग्रहावरचे प्राणी, एलियन्स- हे मध्यवर्ती असल्याचे आढळते. त्याशिवाय विज्ञानकथेत वर्णन केलेले भविष्यकालीन काल्पनिक जग माणसांचेच असेल असे मानले जाते. एखादी कथा पूर्णपणे वैज्ञानिक पायावर असेल, भविष्याचा वेध घेणारी असेल; पण त्यात मध्यवर्ती व्यक्तिरेखा माणसं किंवा मानवी जगणं नसतील, तर त्या कथेला विज्ञानकथा म्हटलं जात नाही. शिवाय ती कथा भविष्याचा वेध घेणारीच असायला हवी, असाही संकेत आहे.
या समजुतीत काही सुधारणा होणे गरजेचे आहे. एकंदर साहित्य-वाड्मयीन प्रकारात विज्ञानकथांचा वाटा तसा कमीच आहे. त्याची दोन कारणं आहेत. एक विज्ञानकथांच्या गाभ्याशी विज्ञान असल्यामुळे त्या कथेचे परीक्षण करण्यासाठी टीका करणार्यांना विज्ञानाची किमान काही माहिती असावी लागते, त्या प्रमाणात माहीतगार टीकाकार उपलब्ध नाहीत. दुसरे म्हणजे विज्ञानकथा प्रभावी होण्यासाठी विज्ञानाचा अभ्यास मुळातून करावा लागतो. तेवढी तयारी दाखवणारे, नवे-उभरते लेखक त्या मानाने कमी आहेत.
आज महाराष्ट्रात विज्ञानविषयक माहिती देणारी पुस्तके प्रकाशित करणारे प्रकाशक चांगल्या संख्येने आहेत. पण केवळ विज्ञानकथा, कादंबर्या, ललित साहित्य आविष्काराला वाहिलेले नियतकालिक महाराष्ट्रात आढळत नाही. दैनिकांच्या साप्ताहिक विज्ञान पुरवण्या असतात; पण त्यात विज्ञानकथा आवर्जून छापल्या जातात, असे नाही. पूर्वी अनंत अंतरकरांचे नवल हे मासिक विज्ञानकथा आवर्जून देत असे. महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळात विज्ञानविषयक ललित साहित्य प्रसिद्ध होतही होते; पण स्वातंत्र्यानंतर त्यात वाढ झाली. द. पा. खांबेटे यांच्या कथा ‘रहस्यरंजन’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या आहेत. दि. बा. मोकाशी यांच्या कथाही प्रसिद्ध होत. भा. रा. भागवत यांच्या कथा गाजल्या. दिवाळी अंकांच्या दीर्घकथांमध्ये कधी-कधी भयकथा कोणती आणि विज्ञानकथा कोणती, असा संभ्रम व्हावा अशा काही कथा प्रसिद्ध झाल्या. नारायण धारप हे त्यासाठी लोकांनी डोक्यावर घेतलेले लेखक. त्याच दरम्यान रत्नाकर मतकरींच्याही अनेक कथा गाजल्या. गजानन क्षीरसागर यांनी लिहिलेल्या विश्वसंचार आणि चंद्रमोहिनी या कथा प्रभावित करणार्या होत्या.
१९७५ नंतरचा काळ मराठी विज्ञानकथा विश्वात मोठा झंझावात उडवून देणारा ठरला. त्यामागे होते प्रख्यात वैज्ञानिक जयंत नारळीकर. अंतराळ विज्ञानाचे अभ्यासक आणि शास्त्रज्ञ. जगमान्य वैज्ञानिक. अणुविज्ञानातील संशोधक बाळ फोंडके यांचेही योगदान मोठे आहे. त्या वेळी आणखी काही लेखक ललित वाड्मयीन कथाकार होते. यात प्रमुख म्हटले तर लक्ष्मण लोंढे, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, अरुण साधू, विश्वेश्वर सावदेकर, ग. कृ . जोशी, डी. व्ही. जहागिरदार अशी अनेक नावे आहेत. विज्ञानकथांच्या क्षेत्रात शुभदा गोगटे, मंदाकिनी गोगटे, नंदिनी थत्ते, मेधाश्री दळवी या महिलांनीही झेंडा रोवला आहे.
गोव्यामध्ये डॉ. अरुण हेबळेकर यांचे योगदानही मोठे आहे. गुणाकार मुळे हे नावही विज्ञान-साहित्यिक म्हणून घ्यायला हवे. अमरावती जिल्ह्यातील सिंधू बुद्रुक गावी जन्मलेल्या मुळे यांचे नाव महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्राबाहेर गाजले. कारण, त्यांनी हिंदी आणि इंग्रजीत साहित्यनिर्मिती करून आपला ठसा उमटवला.
विज्ञान-तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार आणि विज्ञान प्रसार या संस्थेतर्फे दर वर्षी प्रादेशिक भाषांत विज्ञान लेखनविषयक कार्यशाळा घेतल्या जातात. त्यातून विविध भाषांमध्ये चाललेल्या प्रयत्नांची देवाण-घेवाण होते. मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने गेली ४0 वर्षे ‘विज्ञान रंजन कथा स्पर्धा’ घेऊन नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन दिले जाते.
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागातर्फेही - विज्ञानकथालेखन कार्यशाळा घेतल्या जातात. त्यात विज्ञानाच्या एखाद्या विषयाची सखोल माहिती दिली जाते. त्यात कथाबीज कसे शोधावे, ते कसे वाढवावे आणि त्यातून ‘विज्ञानकथा’ कशी तयार करावी, हे या कार्यशाळेत सांगितले जाते. या कथांचे सादरीकरण करण्याचाही एक कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने घेण्यात आला. यंदा ४ मे २0१४ रोजी अशी कार्यशाळा झाली. त्यात चोवीस नवोदित लेखकांनी भाग घेतला होता. मराठी मुलुखात विज्ञानकथांच्या माध्यमातून विज्ञान प्रसार करण्याचे काम मराठी विज्ञान परिषद अशा प्रकारे करत आहे.
साहित्य क्षेत्रातल्या लोकांनीही विज्ञानकथेकडे वळावे, लोकांच्या परंपरेतून, म्हणी-वाक्प्रचार, रीतीरिवाज यातून दिसणारं ज्ञान-वास्तव सर्वांसमोर यावं, असाही प्रयत्न मराठी विज्ञान परिषद आपल्या नियमित चालणार्या कामांमधून करीत आली आहे.
(लेखक मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत.)