चैतन्ययात्रा

By admin | Published: January 2, 2016 02:39 PM2016-01-02T14:39:42+5:302016-01-02T14:39:42+5:30

पाडगावकरांनी स्वच्छंदाची पारंबी कधी सोडली नाही. आपल्याला मिळालेलं आनंददान मुक्त हस्तानं सा:यांना वाटून दिलं. आपल्याच मनातील भावनांच्या चलत् चित्राचा अनुभव वाचकांनीही घेतला. दशके बदलली, प्रयोगशीलतेला नवा काळ मिळाला; पण त्यांच्या इवल्याशा दाढीमागचा ‘मंगेश’ मात्र कायम राहिला.

Chaitanya Yatra | चैतन्ययात्रा

चैतन्ययात्रा

Next

- स्वानंद बेदरकर

 
मध्यमवर्गीय माणसाच्या मनात ज्या अनेकविध भावभावना होत्या त्या सगळ्यांना काव्यरूप देऊन आविष्कृत करण्याचे मोठे काम पाडगावकरांच्या नावावर जाते. त्या भावभावनांमध्ये त्यांनी भर घातली, त्याचा अन्वयार्थ काढला, त्यातून काही बोधामृत देण्याचा प्रयत्न केला असे घडले नाही. फक्त आहे त्याच भावनेला त्यांनी क्रियाशील केले; पण त्यात जे उज्‍जवल सौंदर्यवादाचे दर्शन घडते ते खास पाडगावकरांचे आहे. प्रेमकविता, निसर्गकविता यामध्ये सामान्यत: स्पष्ट फरक केला जातो. पाडगावकरांचे प्रेम निसर्गाच्या अनुषंगाने फुलते. त्यामुळे त्यात अद्वैत निर्माण झाल्याचे आपण त्यांच्या असंख्य कवितांमधून अनुभवले. आत्मगत कविता, समूहपर कविता आणि सौंदर्यवादी कविता असे साधारणत: आपल्याकडे कवितेचे भाग केले जातात. 
 
 
 
मराठी कवितेच्या अंगणातले मंगेश पाडगावकर नावाचे प्राजक्ताचे झाड कोसळले. त्यांच्या जाण्याने कवितेबद्दलच्या अनेक गोष्टी मनात उगवून आल्या. पाडगावकरांनी आयुष्यभर जे काव्याकाश रंगवले त्याच्याकडे पाहताना एक व्यापक जीवनजाणीव पाडगावकरांनी मुखर केल्याचे जाणवत राहिले. त्यामुळे लोकाश्रयी असणारे पाडगावकर हे इतर कवींमध्ये वेगळे उठून दिसतात. त्यांच्या कवितेचे बीज ते बहरलेला वृक्ष या संपूर्ण प्रवासात विलक्षण सौंदर्यशक्ती दिसते म्हणून पाडगावकर हे प्रामुख्याने सौंदर्यवादी कवी या अर्थानेच मनात घर करून राहतात. त्यांना ‘आनंदयात्री’ अशी उपाधी लावली गेली. प्राचार्य राम शेवाळकर यांनी त्यांच्या प्रतिभेचा आणि कवितेचा गौरव करताना म्हटले होते की, ‘अवसेच्या अंधा:या रात्री प्रतिभेचा दिवा घेऊन फिरणारा आनंदयात्री म्हणजे मंगेश पाडगावकर.’ - या गौरवातील प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे दडलेला अर्थ जेव्हा आपण निगुतीने पाहु जातो तेव्हा पाडगावकरांनी नेमके काय केले याचा साकल्याने उलगडा होतो.
पाडगावकर हे सौंदर्यवादात बसणारे होते. कोणताही अनुभव असो, तो साक्षात करण्यापेक्षा रंजक आणि सुखद करण्यात त्यांची कविता बहरत गेली; त्यामुळे ती अधिक सोपी होत राहिली. वाचकाला आपल्याच मनातील भावना आपण वाचतो आहोत असा एखाद्या चलत्चित्रसारखा अनुभव पाडगावकरांनी दिला म्हणून ते लोकजीवनाचे कवी ठरले. ही त्यांची दर्पणवादी भूमिका त्यांनी कधी सोडली नाही म्हणून दशके बदलली, प्रयोगशीलतेला नवा काळ मिळाला; पण त्यांच्या इवल्याशा दाढीमागचा ‘मंगेश’ मात्र कायम राहिला. कोणतीही भावप्रतिती त्यांनी वज्र्य मानली नाही, पूजेपासून शृंगारार्पयत सगळेच विषय त्यांनी हातावेगळे केले. त्यात अमंगलही होते, भयही होते, तशीच कुरूपतासुद्धा; मात्र यात कुठेही त्यांचा पाय घसरला नाही. अत्यंत सफाईदारपणो, आखीवरेखीवपणो त्यांनी अनात्मपरतेकडे जाणारी कविता लिहिली. म्हणूनच मोहकता, रसरशीतपणा आणि चैतन्य यांचे स्वतंत्र आविष्कार पाडगावकरांच्या कवितेचे बलस्थान ठरले. भोग आणि उपभोग यामधील अत्यंत धूसर अशी सीमारेषा पाडगावकरांच्या किलकिल्या नजरेला कायम दिसत राहिली. त्यामुळे कोणतीही गल्लत न करता मांगल्याच्याच अनुषंगाने ते त्याचा आविष्कार करीत राहिले.
अनात्मपर कवितेला साधारणपणो वारा जसे वाहील तसे तोंड देण्याचा स्वभाव अंगीकारावा लागतो. त्यात भूमिका फारशा येत नाहीत. तसे काहीसे पाडगावकरांचे झाले; पण तरीही त्यांनी पहिल्या कवितेपासून शेवटच्या कवितेर्पयत धरून ठेवलेली स्वच्छंदाची पारंबी कधी सोडली नाही. त्यामुळे जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर पाडगावकरांची भेट होते. त्यामुळे प्रत्येक पिढीला ते आपलेसे वाटत गेले. त्यांच्या एकूण काव्यशक्तीकडे पाहिले तर लक्षात येते, की येशू ािस्त, गांधी आणि टागोर हे त्यांच्या जीवनाचे आदर्श होते, तर तांबे, बोरकर आणि कुसुमाग्रज हे कवितेतले. यांचा प्रभाव पाडगावकरांच्या व्यक्तिगत जीवन जगण्यात आणि कविता लिहिण्यात दोन्हीकडे पडलेला दिसतो. म्हणूनच त्यांचा पहिला कवितासंग्रह हा कुसुमाग्रज आणि बोरकरांच्या अनुनयाने भारलेला आणि भरलेला आहे. 
‘जिप्सी’ या कवितासंग्रहात मात्र आपल्याला पाडगावकरांच्या स्वतंत्रतेचे अनोखे दर्शन होते. धक्कातंत्रचा अवलंब त्यांनी आपल्या कवितेत कधीही केला नाही, अनेकार्थाची वतरुळवलये त्यांच्या कवितेत कधी भिरभिरली नाहीत. वाचकाला अपेक्षित असणारा भाग हे त्यांच्या कवितेचे प्रधान वैशिष्टय़ ठरले. विपुल कविता लेखनामुळे कवितेतील उपप्रकारांचे प्रयोग त्यांनी नक्कीच केले, मग त्यात छंद, मुक्तछंद, गेय, गझल, चारोळी असे सगळेच भाग आलेत. शहरात राहिल्यामुळे आधुनिक कवितेतले काही कंगोरे त्यांनी आपल्या प्रतिमांमध्ये आणले; पण मूळ स्वभाव मात्र हलू दिला नाही. वाचकांच्या आणि काही काळानंतर श्रोत्यांच्या मानसिकतेचे आकलन झालेले पाडगावकर लय-नादबद्ध शब्दकळा पेरीत राहिले. त्यांची कविता ही कायम प्रतिमा आणि प्रतीकांच्या भाषेमध्ये बोलत राहिली. त्यामुळे विविध संवेदनांचे हुबेहूब भावाविष्करण त्यांना साधू शकले. रंगरेषा, स्पर्श, गंध, रस आणि नाद या  सगळ्यांचा समुच्चय हा पाडगावकरांच्या कवितेत झालेला दिसतो. त्यामुळे त्यांची कविता संकेतनिष्ठ स्वरूपाची गोळीबंद रचना झाली. तांबे, बोरकर यांचा सौंदर्यवाद त्यांनी जरूर उचलला; पण त्यांच्या नायिकांनी उंच टाचांचे बूट घातले, रंगीबेरंगी फुलांचे गजरे माळले, मूळ संकल्पनेला पाडगावकरांनी पुढे नेले. हे सगळे करीत असताना मैत्रीण, प्रेयसी आणि पत्नी या तीन नात्यांची गुंफणफेर त्यांच्या कवितांना कायम राहिली.
नवकाव्याची लाट जोमाने आली. मर्ढेकर, मुक्तिबोध आणि करंदीकर यांची कविता अनेक अंगांनी बहरली, प्रयोगशीलतेने नटली, पाडगावकरांवर मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. किंचित स्वरूपात त्यांनी करंदीकरांशी स्पर्धा जरूर केली; पण बोरकरांसारखा प्रभाव त्यांच्या कवितेवर कुणाचाही पडला नाही. कुसुमाग्रजांना जरी त्यांनी गुरुस्थानी मानले होते, तरी त्यांची अगिAकाव्याची परंपरा पाडगावकरांनी मुळीच चालवली नाही. परंपरेने दिलेले महन्मंगलतेचे स्तोत्र त्यांनी नव्या प्रत्येक पिढीर्पयत पोहोचवले म्हणून ते ‘आनंदयात्री’ या पदास प्राप्त झाले. पाडगावकरांच्या नावावर आणखी एक महत्त्वाची नोंद करावी लागेल, ती आहे गीतकाव्याची. आपल्याकडे कविता, गीतकाव्य आणि गीत असे प्रकार केले जातात. त्यामध्ये कवी म्हणूनही पाडगावकरांचा गौरव होतो आणि गीतकार म्हणूनही. याचे कारण या दोन्हीही प्रकारात जी विलक्षण समज आहे ती पाडगावकरांच्या एकूणच साहित्यविश्वात प्रकट झालेली दिसते. कविता हा भाग तर सर्वानाच माहिती आहे; पण गीतकाव्य आणि गीत यातली तफावत समजणो आणि ती आपल्याही नकळत कवितेत येत राहणो हे पाडगावकरांच्या प्रतिभेचे वैशिष्टय़ होते. 
पाडगावकर आणखी एका गोष्टीमुळे लक्षात राहतील, ते म्हणजे त्यांची बालकविता. भोलानाथसारखी अजरामर कविता लिहिणा:या या आजोबांच्या खोलीत आता धुकं दाटलं आहे. त्यामुळे येणारी मुकेपणाची भावना नक्कीच मोठी आहे. ते कायम म्हणत की ‘विठ्ठल’ या शब्दातील ‘ठ्ठ’ या अक्षरातले जे अद्वैत आहे ते माङया कवितेत टिकून राहो आणि ती सर्वात मोठी शक्ती त्यांच्या बालकवितेत अवतरलेली दिसते. बालकविता ही नाजूक, हळुवार तरीही गुदगुल्या करणारी आणि गडबड माजवणारी असावी लागते. अनेकांच्या बालकविता यातील एकच एक भावधागा पकडून प्रकटलेल्या दिसतात. पाडगावकर मात्र नाजूकही होतात, हळुवारही बोलतात, गुदगुल्या तर करतातच करतात; पण गडबड माजविण्याचे बालसुलभ भाव ते आपल्या कवितेतून निसटू देत नाहीत. पाडगावकरांच्या या सगळ्या चैतन्यगामी अशा लेखनप्रवासाकडे पाहिले की विषय कोणताही असो, आशय काहीही प्रकटो, त्यांची सौंदर्याची कुपी कधी हरवली नाही. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे’ असे चौफेर आनंदाची अनुभूती देणारे पाडगावकर चैतन्ययात्री ठरले. हेच आनंददान त्यांनी सरस्वतीकडे मागितले, ते त्यांना मिळाले आणि ते त्यांनी आपल्या सा:यांना वाटूनही दिले. देणो ‘मंगेशा’चे यापेक्षा दुसरे ते काय?
 
swanand.bedarkar@gmail.com

Web Title: Chaitanya Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.