चंपारणचा लढा

By admin | Published: August 12, 2016 05:45 PM2016-08-12T17:45:43+5:302016-08-12T18:26:49+5:30

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात चंपारणच्या लढ्याचं महत्त्व अपार. गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतातलं हे पहिलं अहिंसक आंदोलन.

Champaran's fight | चंपारणचा लढा

चंपारणचा लढा

Next

- वासंती सोर

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात
चंपारणच्या लढ्याचं महत्त्व अपार.
गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतातलं
हे पहिलं अहिंसक आंदोलन. 
कॉँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय,
वैयक्तिक पातळीवरचा हा सत्याग्रह.
यानंतरच देशपातळीवर 
गांधींजींचं नेतृत्व सर्वमान्य झालं. 
ब्रिटिश शासनाच्या जोखडातून 
मुक्त होण्याच्या तीव्र इच्छेची 
ठिणगी पडली 
तिचं मूळही याच लढ्यात..


बिहारमधील चंपारणचा लढा म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचे पान. त्या काळात जमीनदारांनी आणि ब्रिटिशांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांवर जो अन्याय, जबरदस्ती केली, त्याच्या विरोधातलं हे आंदोलन अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे. 
तिथले बहुसंख्य जमीनदार ब्रिटिश होते आणि इंग्लंडमध्ये निळीला प्रचंड प्रमाणात मागणी होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात केवळ निळीचंच उत्पादन घेण्याची सक्ती करण्यात आली. ही नीळ इंग्लंडमध्ये पाठवून त्यांनी प्रचंड प्रमाणात नफा कमावला, मात्र त्यासाठी गरीब शेतकऱ्यांना त्यांनी वेठीस धरलं. शेतकऱ्यांनी निळीऐवजी दुसरं कुठलं पीक घेतलं तर त्यांना मोठा शेतसारा भरावा लागत असे. अनेक शेतकरी त्यामुळे देशोधडीला लागले. 
नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी महात्मा गांधींनी त्यावेळी ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन उभारलं. गांधीजींचं भारतात केलेलं हे पहिलंच आंदोलन. या आंदोलनात मिळालेल्या यशानंतरच महात्मा गांधींचं नेतृत्व देशपातळीवर स्थापन झालं, म्हणूनही या आंदोलनाचं महत्त्व अपार. 
एप्रिल १९१७ मध्ये चंपारणमधील नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवरील अन्याय निवारणासाठी गांधीजी मुजफ्फरनगरला पोहोचले आणि चंपारणच्या सत्याग्रहाचा प्रारंभ झाला. २०१७ मध्ये त्या लढ्याला १०० वर्षे पूर्ण होतील. हा सत्याग्रह अनेक दृष्टींनी महत्त्वाचा आहे. 
या लढ्याच्या वेळीच ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा गांधीजींच्या मनात निर्माण झाली. तसा उल्लेख गांधीजींनी ब्रिटिश पत्रकार लुई फिशरला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. या लढ्याच्या वेळीच ब्रिटिश शासनाचा अन्यायी आणि अत्याचारी चेहरा त्यांना दिसला आणि स्वातंत्र्याची ऊर्मी त्यांच्या मनात निर्माण झाली.
चंपारण हा हिमालयाच्या पायथ्याशी असलेला नेपाळच्या सीमेलगतचा मागास प्रदेश. भारताची जाऊ द्या, पण आपल्याच बिहारचीही इथल्या शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नव्हती. 
या प्रदेशात जवळजवळ १०० वर्षांपासून निळीची शेती होत होती. शेती ब्रिटिशांच्या मालकीची. शेतकऱ्यांवर त्यांच्या शेतातील १५ टक्के जमिनीवर निळीची शेती करण्याचे बंधन मालकांनी घातले होते. तसा कायदा ब्रिटिश शासनाकडून करवून घेतला होता. निळीच्या शेतात राबण्यातच शेतकऱ्यांचा सारा दिवस खर्च व्हायचा. स्वत:च्या शेतातून पोटापुरते पिकवण्याचीही त्यांना सवड मिळत नसे. बायका-मुलांनाही मालक राबवून घेत. कामात जरा कुचराई केली, मिनिटभराचा जरी विसावा घेतला तरी मालक रक्तबंबाळ होईपर्यंत हंटरने फोडून काढत. शेतकऱ्यांची स्थिती गुलामांसारखीच होती. ब्रिटिश शासनकर्तेही या अनन्वित अत्याचाराकडे काणाडोळा करीत. शेतीच्या ब्रिटिश मालकांना त्यांची साथच होती. 
उपासमार आणि दारिद्र्याने पिचलेले, अज्ञानाच्या खोल खड्ड्यात आकंठ बुडालेले हीन-दीन शेतकरी दाद तरी कोणाकडे आणि कशी मागणार! पिढ्यान्पिढ्या ते हा अन्याय, अनन्वित अत्याचार मुकाट सहन करीत होते. ह्याविषयी कळल्यावर गांधीजींनी चंपारणमध्येच तळ ठोकला. अन्यायाला वाचा फोडली. सत्याग्रही लढा उभारला. अन्यायाच्या कथांच्या नोंदी घेतल्या. ब्रिटिश मालकांना भेटले. त्या प्रदेशातल्या शासनाच्या प्रतिनिधीला भेटले. व्हाईसरायशी संपर्क साधला. अन्यायाचे निवारण करूनच ते चंपारणमधून माघारी आले.
या लढ्याच्या निमित्ताने ब्रिटिश शासनाच्या जोखडातून मुक्त होण्याच्या तीव्र इच्छेची जी ठिणगी पडली तिने साऱ्या भारतीयांमध्ये स्वातंत्र्यकांक्षा चेतवली. ठिणगीने वणव्याचे रूप घेतले. अनेक छोटी-मोठी सत्याग्रही आंदोलने झाली. ३० वर्षांतच, १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. 
भारतात आल्यावर अन्याय, अत्याचाराच्या विरोधातील गांधीजींचा तो पहिला अहिंसक लढा होता. 
गांधीजी १९१५ च्या जानेवारी महिन्यात भारतात आले. पहिल्या वर्षी भारतभर फिरून त्यांनी भारत समजून घेतला. त्यानंतर वर्ष-सव्वा वर्षात चंपारणचा लढा सुरू झाला. ४-२ पुढारी सोडून भारतातील सामान्य लोक गांधीजींना ओळखतही नव्हते. अशा परिस्थितीत गांधीजींनी हा पहिला अहिंसक सत्याग्रह यशस्वी केला. 
कुठल्याही संघटनेशिवाय कॉँग्रेसच्याही मदतीशिवाय, पाठिंब्याशिवाय यशस्वी केलेला तो लढा होता.
अशिक्षित शेतकऱ्यांना कॉँग्रेसचे नावही माहीत नव्हते. कॉँग्रेसचे कार्य माहीत होण्याचा प्रश्नच नव्हता. ब्रिटिश शासक व शेतीचे ब्रिटिश मालक दोघांचाही कॉँग्रेसविषयी अतिशय प्रतिकूल ग्रह होता. कॉँग्रेसच्या नावे लढा उभारून फायद्यापेक्षा तोटाच अधिक होईल, असे गांधीजींना वाटले. मदतीला आलेल्या वकिलांशी विचारविनिमय करून कॉँग्रेसच्या मदतीशिवाय लढा उभारायचा असा निर्णय त्यांनी घेतला. शस्त्रबळ व संघटनेचे सामर्थ्य नसले तरी आत्मबळ आणि सत्य, अहिंसा यावरील अव्यभिचारी निष्ठा यांच्या आधारे अन्यायाचा प्रतिकार करता येतो, याचा वस्तुपाठच या सत्याग्रहाच्या निमित्ताने भारतीयांना मिळाला.
सरकारी आदेशाच्या सविनय अवज्ञेच्या सामर्थ्याचा प्रत्यय याच लढ्याच्या निमित्ताने आला.
सरकारी अधिकाऱ्याने गांधीजींना चंपारण सोडून जाण्याचा लेखी आदेश दिला. गांधीजींनी त्याचे पालन न करता तसे अधिकाऱ्याला कळवले. कोर्टात केस सुरू झाली. गांधीजींनी गुन्हा कबूल केला आणि त्याबद्दलची शिक्षेची मागणी केली. गुन्हा कबूल करण्याचं हे अघटित कोर्टानं कधीच अनुभवलं नव्हतं. ते गोंधळले. काय करावं त्यांना कळेना. शेवटी व्हाईसरायच्या आदेशाने खटला काढून घेण्यात आला.
सविनय अवज्ञेची ही कृती व्यक्तिगत पातळीवर झाली होती. गांधीजींनी एकट्याने केली होती. पुढे १९३० साली मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी कायदेभंगाच्या देशव्यापी आंदोलनाच्या रूपात ती विकसित झाली. या सामर्थ्यापुढे ब्रिटिश शासन हतबल झालं. गांधीजी आणि व्हाईसराय यांच्यात समपातळीवर वाटाघाटी झाल्या. १९३० साली साम्राज्याचा खचत चाललेला पारच उद्ध्वस्त झाला आणि १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.
या सत्याग्रहाला गांधीजींनी सामाजिक आशयाची जोड दिली. ‘आधी सामाजिक की आधी राजकीय?’ हे टिळकयुगातील द्वैत गांधींनी संपवलं. स्वतंत्र भारताची जबाबदारी पेलू शकेल, असा भारतीय समाज घडवणं आवश्यक होतं. त्यामुळे स्वातंत्र्य आंदोलनं आणि समाजपरिवर्तनाचे प्रयत्न एकाचवेळी व्हायला हवेत, असं त्यांना वाटायचं. भारत समजून घेताना त्यांना दिसलं होतं इथल्या जातिगत भेदभावाचं स्वरूप, अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता, अनारोग्य इत्यादि. चंपारण त्याला अपवाद नव्हता. अन्यायनिवारणासोबतच त्यांनी या बाबतीतही काम सुरू केलं. कामाचा प्रारंभ त्यांनी त्यांच्या मदतीसाठी आलेल्या उच्चविद्याविभूषित वकिलांपासूनच केला. त्या प्रत्येकाबरोबर त्यांचे नोकरचाकर, स्वयंपाकी असा मोठा लवाजमा होता. प्रत्येकाचा स्वयंपाक वेगळा व्हायचा. रात्री १२ पर्यंत जेवणं चालायची. गांधीजींनी त्यांच्या वागण्यात शिस्त आणली. एकत्र रसोडा सुरू केला. नोकरचाकरांना सोडचिठ्ठी दिली. खेड्यातल्या लोकांचं शिक्षण, स्वच्छता आणि आरोग्याच्या प्रश्नात लक्ष घातलं. आसपासच्या खेड्यात शाळा सुरू केल्या. स्वच्छता आणि आरोग्याचे धडे दिले.
या सत्याग्रहामुळे शेतकरी अन्याय, अत्याचारापासून मुक्त झाले. २० टक्के शेतावर निळीची लागवड करण्याचा कायदा रद्द झाला. अन्याय्य पद्धतीने फसवणूक करून शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे मालकांकडून परत मिळाले. हे अत्यंत महत्त्वाचं अनुषंगिक फलित होतं. भयग्रस्त, दीन-दुबळा शेतकरी त्यामुळे भयमुक्त झाला. ताठ मानेने जगू लागला. नंतरच्या काळात सर्वसामान्य माणूसही ब्रिटिशांच्या जुलुमाला न भिता त्यांच्यासमोर निधड्या छातीनं उभा राहिला, त्याचं बीज चंपारणच्या या आंदोलनात होतं. त्याचंच रूपांतर नंतर स्वातंत्र्यप्राप्तीत झालं.

Web Title: Champaran's fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.