पौर्णिमेच्या अफाट चांदण्यातला चंद्रनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 06:00 AM2021-01-10T06:00:00+5:302021-01-10T06:00:07+5:30

‘जो पहले कभी नाही बजाया ऐसा कुछ नया आज बजाओ...’ - सरोदवादक अली अकबर खांसाहेब यांना सी. एन. जोशी यांनी विनंती केली आणि आजवर कधीच न वाजलेली एका नव्या रागाची धून आकाराला आली. त्या रागाच्या जन्माची ही सुरेल गोष्ट..

Chandranandan.. When the melody of a new raga comes into shape .. | पौर्णिमेच्या अफाट चांदण्यातला चंद्रनंदन

पौर्णिमेच्या अफाट चांदण्यातला चंद्रनंदन

Next
ठळक मुद्देतीन मिनिटांच्या धूनने हजारो रसिकांना अक्षरशः बेहाल केले. अशाच काही घायाळ रसिकांनी एका मैफलीत चंद्रनंदन वाजवण्याची फरमाइश खांसाहेबांना केली आणि खांसाहेब चमकले.

- वंदना अत्रे

‘जो पहले कभी नाही बजाया ऐसा कुछ नया आज बजाओ...’ एचएमव्ही कंपनीत रेकॉर्डिंगसाठी आलेले जेमतेम विसेक वर्षांचे तरुण सरोदवादक अली अकबर खांसाहेब यांना सी. एन. जोशी म्हणाले. जोशी संगीताचे चांगलेच जाणकार; पण तरीही ‘कुछ नया बजाओ’ हे त्यांचे म्हणणे मात्र अली अकबर यांना फारसे रुचले नाही. बाबांनी, अल्लाउद्दीन खांसाहेबांनी निर्माण केलेल्या अफाट संगीताची पुरती ओळखसुद्धा अजून रसिकांना झाली नसताना ते वैभव बाजूला ढकलून हा नव्या काहीचा अट्टहास कशाला..? क्षणभरच त्यांनी बाबांचे स्मरण केले आणि दहा मिनिटांनंतर म्हणाले, ‘चला, मी तयार आहे...’ रेकॉर्डिंग रूमच्या काचबंद, जणू निर्वात अशा शांततेत त्यांनी सरोदच्या तारा छेडल्या आणि धून आकार घेऊ लागली. आजवर कधीच न वाजलेली एका नव्या रागाची धून. त्यात मालकंस-चंद्रकंसची स्पष्ट छाया होती; पण नंद-कौसी कानडाचा पदरवही ऐकू येत होता. अर्थात हे सगळे राग होते पार्श्वभागी, माइकसमोर सरोदच्या तारांमधून जे झिरपत होते ते मात्र अगदी स्वतंत्र होते, आजवर अस्पर्शित असलेले. केवळ काही मिनिटांचीच धून होती ती. ती संपवून खांसाहेब बाहेर आले. वातावरण निःशब्द.

काही सेकंदांनंतर जोशींनी विचारले, ‘रागाचे नाव काय लिहायचे?’

खां साहेब म्हणाले, ‘सांगतो...’

खोलीतून बाहेर पडता-पडता त्यांना नाव सुचले, चंद्रनंदन! चंद्राचे सौंदर्य. ती रेकॉर्ड तुफान खपली. तीन मिनिटांच्या धूनने हजारो रसिकांना अक्षरशः बेहाल केले. अशाच काही घायाळ रसिकांनी एका मैफलीत चंद्रनंदन वाजवण्याची फरमाइश खांसाहेबांना केली आणि खांसाहेब चमकले. त्या दिवशी रेकॉर्डिंग रूममध्येच अवचित जन्माला आलेला आणि नंतर विस्मरणात गेलेला चंद्रनंदन. कसे होते त्याचे रूप आणि भाव? काय सुचवायचे, सांगायचे होते त्याला? त्या क्षणी सगळे कोरे दिसत होते, रिकामे..! जन्माला येऊन उपेक्षित राहिलेला तो राग. त्याची ती एकाकी धून वाढ खुंटलेल्या हतबल मुलाप्रमाणे त्या क्षणी खांसाहेबांना तिच्या जन्माबद्दल आणि भविष्याबद्दल जाब विचारत होती...!

अस्वस्थ खांसाहेब त्यानंतर पाच वर्षं अखंड विचार करीत होते तो चंद्रनंदनचा. हे नाव उच्चारताच काय येते डोळ्यासमोर? कोणत्या भावनिक प्रदेशात रमतो हा राग? आणि कोणता रंग आनंदाने मिरवतो हा आपल्या अंगा-खांद्यावर? संस्कृतीमध्ये कुठे असतील नेमकी त्याची मुळे? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे मागत होता तो. या प्रत्येक प्रश्नाच्या खोलात उतरत जाणे कधीतरी थकवून टाकत होते; पण उत्तर मिळाल्यावर दिसणारी पुढची वाट त्या रागाच्या जवळ घेऊन जात होती.

भारतीय संगीतात एखाद्या रागाची निर्मिती हा काही वर्षे चालणारा प्रवास असतो. राग म्हणजे त्याचा स्वभाव आला, त्याची देवता आली, त्याचा ऋतू, प्रहर आणि त्यासोबत भावनेचा एक अथांग प्रदेश. उल्लंघता येणार नाही अशा त्याच्या मर्यादा आणि इंद्रियजन्य अनुभव हाही हवाच. संगीताची अनेक वर्षं साधना करूनसुद्धा कलाकारांना स्वरांचे काही प्रदेश अज्ञातच राहिलेले असतात. या पाच वर्षांच्या काळात खांसाहेब त्या आजवर कधीच भेट न दिलेल्या अज्ञात प्रदेशाच्या वाटा तुडवत होते आणि शोधत होते चार भिन्न-भिन्न रागाचे थोडे-थोडे ऋण घेऊन सहज जन्माला आलेल्या एका नव्या रागाचा नायक, देवता.

चंद्रनंदन म्हटल्यावर त्यांना दिसू लागले पौर्णिमेचे अफाट चांदणे अंगावर घेऊन पहुडलेले एक स्तब्ध जग. गूढ. पुरतेपणी कधीच हाताशी न लागणाऱ्या कृष्णासारखे. हा श्यामल कृष्ण म्हणजे चंद्रनंदन. हुरहूर लावणारे पौर्णिमेचे चांदणे म्हणजे चंद्रनंदन.

खां साहेब आणि पंडित निखिल बॅनर्जी हे एकाच गुरुचे; पण अगदी भिन्न शैली असणारे वादक. चंद्रनंदन राग जेव्हा हे दोघे एकाच व्यासपीठावर बसून वाजवताना दिसतात तेव्हा एका भल्या मोठ्या कॅनव्हासवर वेगवेगळ्या वाटा- वळणांनी जाणारा चंद्रनंदन आपल्याला दिसतो. ‘कुछ नया बजाओ’ या तीन शब्दांमधील अमर्याद ताकद जाणवून डोळे कृतज्ञ भावाने भरून येतात...

(लेखिका संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

vratre@gmail.com

Web Title: Chandranandan.. When the melody of a new raga comes into shape ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.