‘चेसिंग द व्हायरस’..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 06:05 AM2020-07-19T06:05:00+5:302020-07-19T06:05:22+5:30

कोरोनाविरुद्धच्या लढय़ात धारावीचे काय होईल, याची सर्वांनाच चिंता होती;  पण प्रतिकूल परिस्थितीतही प्रशासन,  डॉक्टर, परिचारिका, सामाजिक संस्था आणि जागरूक नागरिकांनी एकदिलाने त्याविरुद्ध एल्गार पुकारल्यानं  कोरोनावर नियंत्रण मिळवता आलं.

‘Chasing the virus’ .. The successful fight against corona in Dharavi | ‘चेसिंग द व्हायरस’..

‘चेसिंग द व्हायरस’..

Next
ठळक मुद्देकोरोनाविरुद्धच्या लढय़ाची यशोगाथा

- योगेश बिडवई

अडीच चौरस किलोमीटर क्षेत्र.. साडेपाच लाखांपेक्षा अधिक रहिवासी..  लोकसंख्येची तुलना करता मँचेस्टर व क्षेत्रफळाचा विचार करता हाइड पार्क व किंग्स्टन गार्डनपेक्षाही हा छोटा भाग आहे. लोकसंख्येची घनता दोन लाख 27 हजार 136 प्रतिचौरस किलोमीटर.. येथे दहा बाय दहा चौरस फूट घरात 8-10 लोक राहतात. तळमजल्यावर घर आणि पहिल्या व दुसर्‍या मजल्यावर छोटासा कारखाना. आर्थिक केंद्र असलेल्या आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावीचे हे एक वास्तव. पाश्चात्य जगात आता या भागाची लघुउद्योग व निर्यातीचे केंद्र म्हणूनही ओळख झाली आहे. 
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीही धारावीने कोरोनावर नियंत्रण मिळविल्याने जागतिक आरोग्य संघटनेने धारावीचे विशेष कौतुक केल्यानंतर धारावी पुन्हा चर्चेत आले.
कोरोनाविरुद्धचा हा लढा म्हणजे महापालिका प्रशासन, डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, सामाजिक संस्था, जागरूक नागरिक यांच्या प्रय}ांतून व लोकांच्या सहभागातून मिळविलेले यश आहे. 
मिशन धारावी अंतर्गत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या ‘चेसिंग दी व्हायरस’ मोहिमेला यश मिळाले आहे. धारावीत 
1 एप्रिलला पहिला रुग्ण आढळला. तेथे आतापर्यंत दोन हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळले असून, 80 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. मात्र 16 जुलैची आकडेवारी पाहिल्यानंतर केवळ 13 नवे रुग्ण,  एकूण रुग्णसंख्या 2,428, अँक्टिव्ह रुग्ण केवळ 99 व एकाच दिवसात तब्बल 2080 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने धारावीत कोरोना नियंत्रणात आणण्यात मोठे यश मिळाले आहे.
सर्वांचा सहभाग हे यशामागचे मोठे कारण आहे. महापालिकेसोबत काम करायला 24 खासगी डॉक्टर सेवेसाठी पुढे आले. महापालिकेने त्यांना पीपीई किट, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, मास्क, ग्लोज देऊन घरोघरी तपासणी सुरू केली. 
खासगी डॉक्टरांना क्लिनिक सुरू करण्याचे आवाहन करत त्यांनाही संशयितांची माहिती कळविण्यास सांगितले. त्यांचे क्लिनिक पालिकेने सॅनिटाइझ करून दिले. डॉक्टरांना पीपीई किट देण्यात आले. खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांची सोय करण्यात आली. 
याबरोबरच लोकांची घरे छोटी असल्याने शाळा, मंगल कार्यालये, क्रीडा संकुले इत्यादी ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. या सर्व ठिकाणी नास्ता, जेवणासाठी कम्युनिटी चिकन सुरू करण्यात आले. 24 तास डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले. औषधे, सर्व वैद्यकीय उपकरणांची व्यवस्था करण्यात आली. केवळ 14 दिवसांत ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध असलेले दोनशे बेडचे रुग्णालय उभारण्यात आले. 
जे जे शक्य आहे, ते ते सारे उपाय अवलंबिले गेले. प्रतिबंधित क्षेत्रात कठोर अंमलबजावणी करण्यात आली. केवळ गंभीर रुग्णांना धारावीबाहेरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक धोका असलेला भाग पूर्णपणे सील करण्यात आला. तेथे देखरेखीसाठी ‘कम्युनिटी लीडर’ म्हणजेच ‘कोविडयोद्धे’ नेमण्यात आले. महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्रात मागणीनुसार 25 हजार किराणा सामानाचे किट, जेवणाचे 21 हजार किट पोहोचवण्याचे काम वेळोवेळी केले. त्यामुळे लोक घराबाहेर पडले नाहीत. याशिवाय खासदार, आमदार, नगरसेवक यांनी गरजूंना किराणा सामानाचे किट, जेवणाची पाकिटे मोफत दिली. सर्वांनीच मदतीचा हात पुढे केल्याने कोरोनावर नियंत्रण शक्य झाले. 
कोरोनाविरुद्धच्या या लढय़ात ‘कोरोना योद्धय़ांची कामगिरी अतिशय महत्त्वपूर्ण होती. या मोहिमेत महापालिकेचे तीसपेक्षा जास्त कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. जी-उत्तर विभागातील करनिर्धारण संकलन विभागातील विभाग निरीक्षक; ज्यांच्यावर धारावीत अन्न पाकिटांचे वाटप करण्याची जबाबदारी होती. त्यांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र आपले मनोधैर्य खचू न देता सार्‍यांनीच कोरोनाचा मोठय़ा जिद्दीनं मुकाबला केला, हेच या मोहिमेचं सर्वात मोठं फलित आहे. 

काय आहे धारावी?
- आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी
- 2.5 चौरस किमी क्षेत्रफळ
- लोकसंख्येची घनता : 2,27,136 चौरस किमी
- लघुउद्योग व आंतरराष्ट्रीय निर्यातीचे प्रमुख केंद्र
- पाच हजार जीएसटी नोंदणीकृत उद्योग
- वार्षिक उलाढाल : 100 कोटी डॉलर

कोरोना लढय़ातील आव्हाने
- 80 टक्के  लोकसंख्येकडून सार्वजनिक शौचालयांचा वापर 
- दररोज 450 सार्वजनिक शौचालयांचा वापर
- बहुसंख्य लोक जेवणासाठी हॉटेल किंवा बाहेरच्या खाण्यावर अवलंबून
- दहा बाय दहा चौ. फुटाच्या झोपडीवजा घरात 8-10 जणांचा वावर
- बोळीवजा अंतर्गत रस्ते, तळघर अधिक पहिला व दुसरा मजला अशी घरांची रचना. 
- तळमजल्यावर घर, पहिल्या व दुसर्‍या मजल्यावर छोटा कारखाना
- फिजिकल डिस्टन्सिंगची अशक्यप्राय कसरत
- घरे छोटी असल्याने होम क्वॉरण्टाइनची गैरसोय

महापालिकेचे आक्रमक उपाय
‘चेस द व्हायरस : 4 टी’
ट्रेसिंग (मागोवा)
ट्रॅकिंग (संबंधितांचा शोध घेणे)
टेस्टिंग (चाचणी)
ट्रीटिंग (उपचार)
47,500 घरांतील लोकांची तपासणी
3.6 लाख लोकांचे स्क्रीनिंग
प्राथमिक टप्प्यातच संशयितांचा शोध
त्यांचे तातडीने विलगीकरण
त्यांच्यावर योग्य उपचार
संसर्गाचा वेग केला कमी

असे मिळाले यश
एप्रिल- बरे होण्याचे प्रमाण : 33 टक्के
बाधित आढळले : 491
रुग्णवाढीचा सरासरी दर : 12 टक्के
रुग्ण दुपटीचा सरासरी दर : 18 दिवस
मे- बरे होण्याचे प्रमाण : 43 टक्के
बाधित आढळले : 1216
रुग्णवाढीचा सरासरी दर : 4.3 टक्के
रुग्ण दुपटीचा सरासरी दर : 43 दिवस
जून- बरे होण्याचे प्रमाण : 49 टक्के
बाधित आढळले : 480
रुग्णवाढीचा सरासरी दर : 0.83 टक्के
रुग्ण दुपटीचा सरासरी दर : 108 दिवस
जुलै- बरे होण्याचे प्रमाण : 74 टक्के
बाधित आढळले : 59
रुग्णवाढीचा सरासरी दर : 0.38 टक्के
रुग्ण दुपटीचा सरासरी दर : 430 दिवस

घरोघरी जाऊन तपासणी केल्याने सुरुवातीला रुग्ण वाढले. मात्र त्यांचा नंतर इतरांशी संपर्क येऊ न दिल्याने संसर्ग प्रसाराचा वेग खूपच मंदावला. अन्नधान्य, दूध, भाजीपाल्याचा दैनंदिन पुरवठा करण्यात आला. कोरोना चाचण्यांची संख्या वाढविल्याने व नंतर सर्व उपाययोजना केल्याने हे यश मिळाले.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त (आरोग्य), मुंबई महापालिका 
---------

फिल्डवर काम करणे मोठे आव्हान आहे. संसर्ग वाढू नये याची आम्ही काटेकोर काळजी घेत आहोत. सार्वजनिक शौचालये वेळोवेळी निर्जंतुक केली जातात. सर्वांना निर्जंतुक साधने उपलब्ध करून दिली आहेत. सामाजिक संस्थांचीही यात मोठी मदत झाली. आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्या मेहनतीचे हे यश आहे. 
- किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, जी उत्तर विभाग, मुंबई महापालिका

ybidwai@gmail.com
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत.)
छायाचित्रे : दत्ता खेडेकर, मुंबई

Web Title: ‘Chasing the virus’ .. The successful fight against corona in Dharavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.