छटाडू चंद्रतालच्या वाटांवर..

By admin | Published: September 2, 2016 04:05 PM2016-09-02T16:05:57+5:302016-09-02T16:05:57+5:30

अवघड वाटा चालत हिमालयाचं, त्यातल्या सरोवरांचं दर्शन झालं की मन तृप्त होतं. आणि परमेश्वराच्या चमत्काराकडे आणि साक्षात्काराकडे बघता बघता मान आपोआप खाली झुकते.

Chhatadu On Chandratal Wat .. | छटाडू चंद्रतालच्या वाटांवर..

छटाडू चंद्रतालच्या वाटांवर..

Next
- अनिल नेने

20 जुलैची ती प्रसन्न सकाळ उजाडली! संपूर्ण ट्रेकभर आमच्यावर निसर्गाने खरंच कृपा केली. दिवसभर लख्ख ऊन, अर्ध्या बाहीच्या शर्टावर आणि अर्ध्या चड्डीवर तेसुद्धा हिमालयात आम्ही चालत होतो. किती लख्ख ऊन मला तर चक्क ‘सन बर्न’ झालं, दोन्ही हातावर व तोंडावर ! नाही म्हणायला एकदा चार शिंतोडे आणि वरुणराजाने आपलं अस्तित्व दाखवलं! पण एकूण अप्रतिम हवेत आमचा ट्रेक झाला !
सकाळी उठल्यावर गरम पाण्याने तोंड धुतलं. शौचादि कार्यक्रमासाठी बैठक असलेला वेगळा तंबू जरा दूर अंतरावर नेहमीच उभारला जायचा तो फार सोयीचा होता. झकास पराठ्याची न्याहारी करून आम्ही सर्व जण सज्ज झालो. साधारण १२००० फुटांवर असलेल्या ‘बालुका घेरा’ ह्या ठिकाणी जाण्यासाठी. माझ्यासाठी प्रवास खडतर होता हे दिसतच होतं. पण मनालीपासून ‘राणी’ नदी साथ देत होती. तिच्या वाहत्या पाण्याच्या तालावर मी माझा चालण्याचा ताल धरला होता. पण चालणं अवघड वाटत होतं. कारण हिमालयाने आपलं बदललेलं रूप ! वनराई, हिरवाई केव्हाच मागे राहिली होती. आता मोठमोठे दगड, प्रचंड धोंडे, शिळा ह्यातून मार्ग काढायचा होता. रस्ता किंवा पायवाट तर कुठेच दिसत नव्हती. त्यामुळे चालणं मंदावत होतं. बरोबर श्रीपाद होता, त्याच्याबरोबर चालत राहिलो सतत आठ तास ! ‘बालूका घेरा’ला पोचायला मला आठ तास लागले. पाय बोलायला लागले होते. अगदी थकून गेलो होतो. तेवढ्यात दूरवर आमचे उभे राहत असलेले तंबू बघून हायसं वाटलं. पण तरी झपझप चालण्यासाठी त्राण नव्हतं. एवढ्यात आमचा वाटाड्या (गाइड) माझ्या दिशेने चालत येताना दिसला. माझ्याजवळ आला आणि म्हणाला, पुढे एक छोटी नदी आहे. ती आपल्याला पार करायची आहे. ती पार केली की आपला कॅम्प आलाच. तुम्ही बूट काढा व ट्राऊझर गुडघ्यापर्यंत दुमडा. त्याने माझे बूट घेतले, पाठीवरची बॅग घेतली व म्हणाला, ‘चला..’!
पाण्यात पाय घातले आणि पाय बधीर झाले. पावलांची संवेदनाच गेली इतकं पाणी गार होतं ! कदाचित बर्फाचं पाणीही ह्या पाण्यापेक्षा कोमट असेल ! बाहेर आलो आणि पाय घासत बसलो, पायात जीव आणण्यासाठी. आणि त्या पायात प्राण परत आणण्यासाठी मदत केली, टाळ्या वाजवून माझं स्वागत करणाऱ्या माझ्या डॉक्टर मित्रांनी !
२१ जुलैच्या सकाळने झोप चाळवली. तंबूच्या बाहेर आलो ते मस्त हवेतच. आज ट्रेकचा महत्त्वाचा टप्पा गाठायचा होता... हमटा पास ! सकाळच्या नैमित्तिक गोष्टी न्याहारीसकट उरकल्या आणि हमटा पासच्या दिशेने पावलं वळवली. हमटा पास अदमासे १२।।-१३ हजार फुटांवर आहे. ट्रेकमधील सगळ्यात उंच टप्पा. तेथून मग उतरायला लागायचं होतं. १२ हजार फुटांवरच्या ‘शिआगोरू’ येथे वस्ती करण्यासाठी. ‘राणी’ नदीची आणि मोठमोठ्या शिळांची साथ होतीच. मजल दरमजल करत साधारण सात तासांनंतर थांबलो, ‘हमटा ऋषी’ ह्या फलकापाशी ! हमटा पासमध्ये कोणी हा फलक करून लावला असेल कोण जाणे ! पण फलक वाचल्यावर आंबलेल्या शरीरात उत्साह आला. फलकाशेजारी बसलो विहंगम दृश्य न्याहाळत. आसपास हिमाच्छादित शिखरांनी वेढलेला, भरलेला हिमालय बघून मन प्रसन्न झालं. काही शिखरांवर ताजं बर्फ पडलेलं दिसत होतं. रात्रीच्या थंडीत हे ताजं बर्फ शिखरांवर शिवरलं असावं !
हमटा-जमदग्नी ऋषींना दंडवत घातला.
दर ट्रेकमध्ये चांगला सुखाचा जीव दु:खात घातला तेसुद्धा पैसे खर्च करून! उंचीवर चालण्याचे कष्ट, हाय अल्टिट्यूड सिकनेसना आमंत्रण देऊन बोलावले म्हणून मी स्वत:स सतत शिव्या घालतो. पण ट्रेकच्या सर्वोच्च टप्प्यावर पोचल्यानंतर, ट्रेक संपल्यानंतर वाटतं एव्हरी सिंगल स्टेप फुल आॅफ पेन्स, एव्हरी एफर्ट वाज वर्थ इट! ज्या ठिकाणी जमदग्नी ऋषींनी तपश्चर्या केली होती तेथे पोचल्यानंतर हेच वाटलं, धन्य झालो! श्रीपाद म्हणत होता, ‘काका, आता शिआगोरूपर्यंत झकास उतरत जायचं आहे. त्यामुळे आरामात चला.’ कसला उतार? चढ, उतार होताच. मोठमोठ्या शिळा, दगडधोंडे होतेच! थांबत थांबत सतत दोन तास चालल्यानंतर शिआगोरूच्या कॅम्पमध्ये २-३ तास आधी आलेली डॉक्टर मंडळी माझ्या स्वागतासाठी सिद्ध होती ! वाटत होतं, चला आता चालणं संपलं आहे ! कुठलं काय?
परत सकाळी उठून चालणं होतंच ! २२ जुलैच्या सकाळी ‘छटाडू’ ह्या साधारण ११००० फुटांवर असलेल्या ठिकाणी पोचण्यासाठी आमचा काफिला निघाला. 
आता साथीला ‘चंद्रा’ नदी होती. त्या मानाने चाल बरी होती. हलकी होती. आधीच्या काही दिवसांच्या चालीइतके कष्ट नव्हते. तरीही मला छटाडूला पोचायला पाच तास लागले ! तर इतर जण माझ्या आधी निदान तासभर तरी पोचले होते. 
छटाडूला आमचा ट्रेक संपला होता. म्हणजे पायी चालणं संपलं होतं. आता चंद्रतालला आम्ही मोटारीने जाणार होतो. बाजूने चंद्रा धो धो धावत होती. चंद्रतालला पोहोचेपर्यंत चार-साडेचार वाजले होते. आम्ही परत १००० फूट चढून वर आलो होतो. १२००० फुटांवरील चंद्रतालपासून अर्ध्या-पाऊण तासाच्या पायी अंतरावर ‘चंद्रवागा’ ह्या तंबूच्या रिसॉर्टवर गाड्या पार्क करून आम्ही सर्व जण चंद्रतालकडे निघालो. १।।-२ किलोमीटर चालून आल्यावर जो शांत, अथांग, निळसर जलाशय दिसला त्याला तोड नाही. आम्हास संपूर्ण सरोवर दिसलं नाही कारण सरोवर वळलं होतं. पण जे दिसलं ते विलक्षण होतं. मन लवलवणारं होतं. मी जगातील अनेक पर्वतराजीतील सरोवरं बघितली आहेत. ‘टेट्रा’ पर्वतराजीतील पोलंडमधील झाकोपाने शहराच्या जवळील ‘मरस्की ओको’, ‘कनेडियन रॉकीज’मधील ‘लेक लुईस’, स्वित्झर्लंडमधील ‘लेक थुन’ सारखी अनेक देखणी सरोवरं, तळी बघितली आहेत. पण हिमालयातील तळी बघताना मनात जो एक पावित्र्याचा भाव येतो तसा भाव जगातील एकाहून एकेक अप्रतिम असणारी तळी बघताना आला नाही. कदाचित संस्कारांचा, कदाचित आपलेपणाचा हा भाव असावा !
संध्याकाळची किरणं विस्तीर्ण जलाशयावर पडली होती. एक प्रकारचं गूढ, गंभीर वातावरण तयार झालं होतं. तळ्याजवळच्या एका छोटेखानी टेकडीवर जाऊन मी तळ्याकडे शांतपणे बघत बसलो. बघत असताना मन तृप्त झालं. परमेश्वराच्या चमत्काराकडे आणि साक्षात्काराकडे बघता बघता मान आपोआप खाली झुकली.
२३ जुलैची सकाळ उजाडली आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. एक अविस्मरणीय प्रदक्षिणा पूर्ण झाली. मोटारीतून उतरताना सहज समोरच्या शिखरांकडे लक्ष गेलं. मनोमनी हिमालयास नमस्कार केला तेव्हा हिमालय म्हणाला असेल का - पुनरागमनायचं?

छटाडूच्या प्रवासात मला एक विचित्र अनुभव आला ! चंद्रा नदी सतत चढ चढत वाहते आहे असं दिसायला लागलं ! पाणी नेहमी उतार शोधतं मग आपल्याला पाणी चढावावरून चढताना कसं दिसत आहे? हा आपल्याला भ्रम तर होत नाही ना? का उंचीमुळे आपल्याला ब्रेन ओडेमा तर झाला नाही? नदी तर सारखी चढताना दिसते आहे ! पण पुढे गेल्यानंतर मागे वळून पाहिलं तर तीच नदी उतारावरून भरधाव वेगाने वाहत असताना दिसत होती ! हा काय चमत्कार आहे ते कळत नव्हतं. पण नदीकडे सारखं बघावंसं मात्र वाटत होतं. मला वाटलं मला एकट्यालाच भास होतो आहे. पण नंतर केदार जोशी म्हणाला त्यालाही माझ्यासारखंच दिसत होतं. हे ऐकल्यावर मी ‘नॉर्मल’ आहे हे मला जाणवलं. कारण एका डॉक्टरला माझ्यासारखाच भास होत होता ! हा अनुभव मी कधीही विसरणार नाही!

(लंडनमध्ये वास्तव्याला असलेले लेखक देशोदेशीच्या खाद्ययात्रा आणि पदयात्रांचे 
चाहते आहेत)

AnilNene@aol.com

Web Title: Chhatadu On Chandratal Wat ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.