मुलांनाही आहेत हक्क आणि अधिकार
By admin | Published: June 7, 2014 07:13 PM2014-06-07T19:13:11+5:302014-06-07T19:13:11+5:30
बालकामगार हा समाजजीवनावरचा कलंकच आहे. त्या विरोधात कायदे केले गेले, तरी त्याची अंमलबजावणी होत नाही व समाजातूनही त्याकडे कधी गांभीर्याने पाहिले जात नाही. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त (१२ जून) या कायद्याची करून दिलेली ओळख.
Next
नकुल काटे
आपल्या समाजामध्ये मुलांचे हक्क, अधिकार हे शब्दच आपल्या समाजातील लोकांच्या पचनी पडत नाहीत. मुलंच ती, त्यांना कसली आली आहे अक्कल? त्यांना कसले आलेत डोंबल्याचे हक्क नि अधिकार? आम्ही लहान होतो, तेव्हा कुठे होते आम्हाला हक्क नि अधिकार? तरीही आम्ही झालोच की लहानाचे मोठे! आमचे काय बिघडले? अशा काहीशा प्रतिक्रिया आपल्याला नेहमीच मुलांचा विषय निघाला, की कानावर पडतात. पण, तुम्हाला माहितीय, मुलांनादेखील अधिकार, हक्क असतात? आजही आपल्या समाजाला या मुलांच्या हक्कांची पुरेशी माहिती नाही, किंबहुना अजिबातच नाही, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. बर्याच मोठय़ा माणसांना मुलांचा दिवस म्हणून फक्त १४ नोव्हेंबर म्हणजेच पंडित नेहरू यांचा जन्मदिवस हा ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो. याशिवाय मुलांसाठीचे काही दिवस आपल्या वर्षाच्या ३६५ दिवसांमध्ये असतात, याबाबत फारशी कल्पना नसते.
परंतु, १४ नोव्हेंबर बालदिन, २0 डिसेंबर हा बाल हक्क दिन, २४ जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून आपल्या देशात साजरा केला जातो.
तसेच, १२ जून हा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. थोडंसं मुलांच्या अधिकाराच्या इतिहासाकडे जर आपण मागे वळून पाहिलं, तर आपल्या लक्षात येईल की, मुलांना हक्क मिळावेत याकरिता १९२0पासून प्रयत्न केले गेलेले आहेत. पहिल्या महायुद्धानंतर जगातील अनेक देशांची खूप मोठय़ा प्रमाणावर वाताहत झाली. अनेक मुलं अनाथ व पोरकी झाली. मुलांवर नाना प्रकारचे अत्याचार झाले. त्यानंतर १९२0मध्ये ‘लीग ऑफ नेशन्स’ नावाच्या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना झाली. या आंतरराष्ट्रीय मंचावर १९२४मध्ये अल्गान्टीन जेब या एका ब्रिटिश महिलेने मुलांच्या हक्कांचे पाच कलमी पत्रक मांडले व ते मंजूरही झाले. त्यानंतर जवळजवळ ३५ वर्षांनी म्हणजेच १९५९मध्ये मुलांच्या हक्कांची सनद संयुक्त राष्ट्र परिषदेकडे मांडली गेली व तीदेखील मंजूर झाली. त्यानंतर १९८९मध्ये संयुक्त राष्ट्र परिषदेने मंजूर केलेली संहिता जास्त विस्तृत आहे. त्यामध्ये विविध परिस्थितीत असणार्या मुलांचा विचार करण्यात आलेला आहे. या मुलांच्या हक्कावर २0 डिसेंबर १९९२ रोजी भारत सरकारने सही करून संयुक्त राष्ट्र परिषदेने सांगितलेले सर्व बाल हक्क मान्य केलेले आहेत व आम्ही आमच्या देशातील 0 ते १८ वयोगटातील सर्व मुलांना कोणाताही भेदभाव न करता ते देऊ, असे लिखित आश्वासन संयुक्त राष्ट्र परिषदेला दिलेले आहे.
बालकामगार म्हणजे नेमकं कोण?
कोणतंही मूल जेव्हा अशा कामामध्ये व्यस्त राहत असेल, की ज्यामुळे त्याच्या शारीरिक, मानसिक वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होऊन त्याचा शारीरिक व मानसिक विकास होण्यास अडथळा निर्माण होत असेल, तर तो बालकामगार आहे वा ती बालमजुरी आहे. बर्याचदा कुटुंबातील मजूर या कामाच्या स्तरांमध्ये अनेकदा मुलंदेखील कुटुंबाला आर्थिक हातभार म्हणून काम करतात. त्यामुळे मुलांच्या शारीरिक, सामाजिक व मानसिक वाढीवर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशी मुलंदेखील बालकामगारच आहेत.
मुलाने केलेले कोणतेही काम ज्यातून त्या मुलाला, त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला, संस्थेला, आस्थापनेला कोणताही आर्थिक लाभ होईल, याला बालश्रम म्हणता येईल.
बालमजुरीची कारणं
१गरिबी
२बेरोजगारी
३घरातील इतर मोठय़ा सभासदांना मिळणारे तुटपुंजे उत्पन्न
४कामाच्या निमित्ताने पालकांचे होणारे स्थानांतरण
५परंपरा व रूढी, चालीरीती
६पालकांमध्ये शिक्षणाचा अभाव
७अक्षम शासकीय योजना आणि त्याचे नियोजन
८मुलांच्या प्रश्नांकडे बघण्याची शासनाची उदासीन वृत्ती
९कायद्याचे पालन करण्याचा अभाव
१0घरातील वादविवादाला कंटाळून अनेक मुलं घर सोडून घरातून पळून जातात व जगण्याकरिता बालकामगार म्हणून काम करतात.
बालकामगारांची मुक्तता का करायची?
कोणतही 0 ते १८ वयोगटातील काम करणारे मूल हे दोषी व अपराधी नसून, त्याला कामावर ठेवणारी व्यक्ती ही खर्या अर्थाने अपराधी व दोषी आहे.
लहान मुलं ही कोणत्याही अन्यायाला व शोषणाला सहज बळी पडणारी असतात.
लहान मुलांच्या संघटना नसल्याने त्यांना स्वत:चा आवाज नसतो.
मूल लहान वयातच काम करत असल्याने त्याचा वाईट परिणाम त्याच्या शारीरिक, सामाजिक व मानसिक
वाढीवर होतो.
सर्वच मुलांचा सर्वच वेळ हा आनंदात, खेळण्यात, बागडण्यात व शिक्षणात, त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता जायला हवाय; पण परिस्थिती फार वेगळीच आहे.
पुष्कळशी मुलं ही धोकादायक वातावरणात, धोकादायक उद्योगात, अतिशय वाईट परिस्थितीत काम करतात.
मुलांना त्यांचे अधिकार त्यांना मिळवून देण्याकरिता.
बालकामगारविषयक तक्रार..
कोणतीही व्यक्ती बालकामगाराबाबत तक्रार देऊ शकते.
कोणतीही स्वयंसेवी संस्था / संघटना, बालकामगाराचे नातेवाईक, स्वत: बालकामगार, त्याचे मित्र, मैत्रिणी, हितचिंतक असे कोणीही त्या मुलाला/ मुलीला या बालमजुरीच्या अनिष्ट प्रथेतून कायमचं मुक्त करण्याकरिता पोलिसांकडे, कामगार विभागाकडे, त्याचप्रमाणे ज्या यंत्रणा मुलांकरिता काम करतात, अशा कोणत्याही यंत्रणेकडे तक्रार करू शकतात. उदा. पोलीस, कोणताही सरकारी कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेवक, ग्रामपंचायत, ग्रामपंचायत सदस्य, मुलांसाठी काम करणारी निमशासकीय यंत्रणा - बाल कल्याण समिती यांपैकी कोणाकडेही आपल्याला तक्रार करता येते.
बालकामगाराबाबत तक्रार देणार्या व्यक्तीला जर त्याचे नाव गोपनीय ठेवायचे असेल, तर त्याला/ तिला तो अधिकार आहे. म्हणजेच बालकामगाराबाबत तक्रार देणारी व्यक्ती किंवा बालकामगाराविषयी माहिती देणारी व्यक्ती जर त्याची/ तिची इच्छा असेल, तरच तक्रार किंवा माहिती देणारी व्यक्ती म्हटली जाईल. त्या व्यक्तीने संबंधित बालकामगाराबाबतची माहिती देताना कोठे बालकामगार काम करतो आहे, त्या ठिकाणाचा सविस्तर पत्ता व मालकाची माहिती संबंधित अधिकार्यांना लेखी स्वरूपात द्यावी व स्वत: तक्रार नोंदवावी.
तक्रार मिळाल्यानंतर संबंधितांनी सदरील तक्रार २४ तासांच्या आत तक्रारीची माहिती कामगार विभागाला व पोलिसांना कळवावी.
पोलिसांनी करावयाची प्रक्रिया..
तक्रार दिलेल्या ठिकाणी बालकामगार आढळून आल्यास जागेवरच काम करणार्या मुलांना मुक्त करावे व त्याबाबत घटनास्थळाचा पंचनामा करावा व त्या पंचनाम्यावर मुलांना मुक्त करण्यासाठी आलेल्या कामगार विभागाच्या अधिकार्यांच्या, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा, त्याचप्रमाणे जर तक्रारदार उपस्थित असल्यास त्यांच्या स्वाक्षर्या वा त्यांच्या नावाची नोंद करून घ्यावी.
तक्रार मिळाल्यानंतर पुढील २४ तासांच्या आत संबंधित पोलीस ठाण्याने बालकामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा १९८६ व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २000नुसार पुढील कार्यवाही करून कामाच्या ठिकाणाहून बालकामगाराची मुक्तता करावी व मालकाच्या अटकेची कार्यवाही करावी.
वय वर्षे १८पर्यंत बालकामगार मिळून आल्यास त्यातील वय वर्षे १४पर्यंतच्या बालकामगारांबाबतची (एफ.आय.आर.) बालकामगार विभागाचे अधिकारी नोंदवतील, तर १४ वर्षे ते १८ वर्षेपर्यंतच्या मुलांसंदर्भातील (एफ.आय.आर.) कोणताही जागरूक नागरिक, तक्रारदार वा स्वयंसेवी संस्थांचा कोणताही प्रतिनिधी नोंदवेल.
बालमजुरांना कामावर ठेवणार्या प्रमुख मालकाविरुद्ध अटकेची त्वरित कारवाई करून भारतीय दंड संहिता कलम ३३१, ३७0, ३७४ व ३४नुसार व बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २000च्या कलम २३, २४ व २६नुसार गुन्हा दाखल करावा व पुढील योग्य ती कार्यवाही करावी.
दाखल गुन्ह्याचा योग्य प्रकारे तपास करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करावे.
बालकामगार जर परराज्यातील असेल, तर त्याची सामाजिक सुरक्षा विभागामार्फत सुरक्षितपणे त्याच्या पालकांकडे रवानगी करावी.
सदरील कायद्यांनुसार, कार्यवाही करताना कामातून सूटका केलेल्या मुलाच्या / मुलीच्या वयाचा मुद्दा उपस्थित झाल्यास त्याची/ तिची सक्षम वैद्यकीय अधिकार्याकडून तपासणी करून वय निश्चित करावे.
तक्रारीनुसार नमूद केलेल्या जागी जर त्या दिवशी बालकामगार आढळला नाही, तरीही मालकाची संपूर्ण चौकशी व फिर्याद नोंदवावी व येथे बालकामगार काम करत नाहीत, याची सत्यप्रत मालकाकडून घेण्यात यावी.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तक्रार केलेल्या जागी जर मुलं असतील, पण ती त्या क्षणी काम करत नसतील, तर त्यांना बालकामगार म्हणूनच गृहीत धरावे व पुढील कायर्वाही करावी.
(लेखक बालकामगारविरोधी चळवळीत सक्रिय आहेत.)