ए, आवाज नाय पायजे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:55 AM2019-09-09T11:55:26+5:302019-09-09T11:55:36+5:30
सोसायटीच्या मागच्या वस्तीतल्या मंडळाच्या डिजेचा सगळ्यांना त्रास होत होता. कांबळे आजींना तर थेट अँडमिटच करावं लागलं. आता त्या वस्तीतल्या मुलांना कोण सांगणार, आवाज कमी करा म्हणून? कारण ती पोरं फारच डेंजर होती. शेवटी लहान मुलांनीच पुढाकार घेतला आणि ते गेले मंडळाच्या अध्यक्षाकडे. आणि काय आश्चर्य, एका झटक्यात त्यानं ऐकलं. कार्यकर्त्यांनाही बजावलं..
- गौरी पटवर्धन
‘काय झालं?’ - प्रतीकनं घाबरून विचारलं. ‘अँम्ब्युलन्स का आली होती?’
प्रतीक आठवीत होता. त्याच्या आजोबांना हार्टचा त्नास होता. त्यांना यापूर्वी एकदा असं अँडमिट केलेलं होतं. आणि आज प्रतीक शाळेतून सायकलवर घरी येत असताना त्याला सोसायटीच्या दारातून एक अँम्ब्युलन्स बाहेर जाताना दिसली. त्यामुळे साहजिकच त्याला आजोबांची काळजी वाटली. त्यानं सायकल लावली तेव्हा त्यांच्या समोर राहणार्या काकू त्याला दिसल्या. त्यांना त्यानं विचारलं.
काकू म्हणाल्या, ‘आजोबांना काही नाही झालेलं; पण तिसर्या मजल्यावरच्या कांबळे आजींना छातीत धडधडायला लागलं, म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत.’
आपल्या आजोबांना काही नाही झालं याने प्रतीक रिलॅक्स होत नाही, तेवढय़ात त्याला कांबळे आजींचा नातू दिसला. तो सातवीत होता. त्याला आई नव्हती, त्यामुळे त्याची आजीच त्याच्यासाठी आईसारखी होती. तो असा दिसत होता की त्याला कुठल्याही क्षणी रडू आलं असतं. आजींना दवाखान्यात नेण्याच्या गडबडीत त्याच्याकडे कोणी लक्षच दिलं नव्हतं. प्रतीकने त्याला आपल्याबरोबर घरी नेलं. प्रतीकच्या आईबाबांशी बोलल्यावर मनोजही थोडा रिलॅक्स झाला.
कांबळे आजींना अचानक काय झालं असं विचारल्यावर तो म्हणाला,
‘अचानक नाही झालं. तिला डीज्जेचा त्नास होतो.’
‘अरे सगळ्यांनाच होतो. म्हणून तर यावर्षी आपण सोसायटीत हळू आवाजात गाणी लावायचं ठरवलं ना.’ प्रतीकचे वडील म्हणाले.
‘हो काका, पण आमची मागची खिडकी जिकडे आहे ना, तिकडून खूप आवाज येतो. आपल्या सोसायटीच्या मागच्या बाजूला जी वस्ती आहे ना, तिथले लोक त्यांच्या गणपतीसमोर मोठय़ाने गाणी लावतात. तेव्हापासून तिला त्नास होतच होता.’
‘तिथे फार मोठय़ा आवाजात गाणी लावतात हे खरंय. आपलं घर पुढच्या बाजूला आहे म्हणून आपल्याला त्याचा त्नास होत नाही. पण परवा त्या बाजूला राहणारे सोनावणे आजोबा पण म्हणत होते की तिकडे संध्याकाळी खूप आवाज करतात म्हणून.’ प्रतीकचे आजोबा म्हणाले.
‘मग आपण त्यांना जाऊन सांगूया ना, की आवाज थोडा कमी करा म्हणून.’ प्रतीक म्हणाला.
‘नको रे बाबा..’ प्रतीकची आई म्हणाली, ‘कशी दिसतात ती मुलं. काही ऐकून घेतील असं वाटतच नाही.’
‘असं कसं? ते फक्त खूप रंगीत कपडे घालतात आणि केस वेडेवाकडे कापतात म्हणून तुला असं वाटतंय.’ प्रतीकचे बाबा म्हणाले.
‘अरे हो, पण त्यांना जाऊन सांगणार कोण?’ प्रतीकचे आजोबा म्हणाले.
‘मी सांगतो ना.’ प्रतीक म्हणाला.
‘थांब, तू नको जाऊस.’ आई म्हणाली.
‘का?’
‘कारण तू लहान आहेस अजून.’
‘मग काय झालं? ते तरी कुठे फार मोठे आहेत. मी आठवीत आहे, ते दहावी- अकरावीच्या वयाचे आहेत.’ असं म्हणून प्रतीक उठलाच. ‘शिवाय माझा शाळेतला एक मित्न पण तिथे राहातो. तो त्या मुलांना ओळखत असेल.’
मनोजही त्याच्या पाठोपाठ उठला, ‘मी पण येतो.’
प्रतीकचे आईबाबा आणि आजोबा काही बोलायच्या आत दोघं उठले आणि सोसायटीच्या मागच्या बाजूच्या वस्तीत गेले. प्रतीकच्या वर्गातला विशाल त्या वस्तीत राहायचा. प्रतीक आणि मनोज थेट विशालच्या घरी गेले. तिथे इतक्या जोरात गाणी लावलेली होती की त्या दोघांना आपापसात काही बोलताच येईना. कोण काय बोलतंय तेच कोणाला कळेना. विशाल बिचारा गेल्या गेल्या अभ्यासाची पुस्तकं काढून बसला होता. कारण गणपती संपल्यावर त्यांची चाचणी परीक्षा होती; पण त्या गाण्यांच्या आवाजात त्याला काही अभ्यास सुचत नव्हता. तोही त्या आवाजामुळे रडकुंडीला आला होता. शेवटी प्रतीक, मनोज आणि विशाल त्या आवाजापासून खूप लांब गेल्यावर त्यांना आपापसात बोलता यायला लागलं.
विशाल म्हणाला, ‘आमच्या वस्तीतपण कोणाला आवडत नाही येवढय़ा मोठय़ा आवाजात गाणी लावलेली; पण त्या गणपती मंडळाचे कार्यकर्ते आहेत ना, ते कोणाचंच काही ऐकत नाहीत. आमच्या वस्तीत पण छोटी बाळं आहेत, म्हातारी माणसं आहेत. त्यांना आवाजाचा खूप त्नास होतो. शाळेत आणि कॉलेजला जाणार्या कोणाचाच अभ्यास होत नाही. पण करणार काय?’
शेवटी प्रतीकच्या सांगण्यावरून विशाल त्याला मंडळाच्या अध्यक्षाकडे घेऊन गेला. तो अध्यक्ष जेमतेम अठरा वर्षांचा होता. पण त्याचा अवतार असा होता, की कोणी त्याच्याशी फार बोलायला गेलंच नसतं. सोनेरी रंगवलेले केस, एका कानात बाळी, लाल शर्टची तीन बटणं उघडी टाकलेली, आत जाळीचा बनियन आणि तोंडात गुटख्याची पुडी. त्याच्याकडे बघितल्यावर प्रतीकला असं वाटलं, की आपण याला कुठेतरी बघितलं आहे. पण कुठे बघितलंय तेच त्याला आठवेना.
पण प्रतीकला बघितल्यावर तो मुलगाच म्हणाला, ‘काय रे? तू इकडे कुठे???’
प्रतीकला कळेना की तो आपल्याला कसा काय ओळखतो. पण तरी त्याने सांगायला सुरुवात केली. पण तिथे इतक्या मोठय़ा आवाजात गाणी लावलेली होती की त्या मंडळाच्या अध्यक्षालाच बोललेलं काही ऐकू येईना. शेवटी त्याने एका कार्यकर्त्याला सांगून आवाज कमी केला. मग प्रतीकने त्याला सांगितलं, की मोठय़ा आवाजात गाणी लावल्यामुळे कसा सगळ्यांना त्नास होतो. विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही आणि शेवटी कांबळे आजींना कसं अँडमिट करायला लागलं तेही सांगितलं. त्यावर मंडळाचा अध्यक्ष काहीच बोलला नाही. मग प्रतीक म्हणाला, ‘माझ्या आजोबांना पण आवाजाचा त्नास होतो. तुम्ही अशीच मोठय़ाने गाणी वाजवलीत तर त्यांना पण अँडमिट करायला लागेल.’
मंडळाच्या अध्यक्षाने जरा विचार केला आणि त्याच्या कार्यकर्त्याला सांगितलं, ‘मन्या.. आता आपल्या गान्यांचा आवाज येकदम कमी ठेवायचा.’
‘भाऊ पन..’ मन्या काही बोलणार एवढय़ात अध्यक्ष म्हणाला, ‘मी सांगतो तेवढं ऐकायचं. जास्त शहाणपणा नाय पायजे.’
प्रतीक त्याच्याकडे आश्चर्याने बघतच राहिला. त्याला दोन प्रश्न पडले होते. पहिलं म्हणजे हा मुलगा कोण होता, आणि दुसरं म्हणजे त्याने आपलं का ऐकलं?’
मनोज आणि विशालचा एकूण पवित्ना असा होता, की आपलं काम झालंय ना, मग इथून पटकन निघावं. पण प्रतीक काही हलेना. शेवटी त्याने त्या कार्यकर्त्याला विचारलं,
‘तुम्ही माझं म्हणणं इतकं पटकन कसं काय ऐकलंत? आणि तुम्ही मला कसे काय ओळखता?’
‘मी तुला नाही ओळखत.. तुझ्या आजोबांना ओळखतो. चार वर्षांपूर्वी माझी आई आजारी पडली. तिला औषधाला पैशे नव्हते. मी तुमच्या सोसायटीत खूप जणांकडे पैशे मागितले. फक्त तुझ्या आजोबांनी पैशे दिले आणि तिला मी दवाखान्यात नेलं. तुझ्या आजोबांना मी कधीच त्नास देणार नाही.’ आणि मग जरा वेळ थांबून म्हणाला, ‘मी तुमच्याकडे आलो तवा तू खूप बारका होतास. आणि मी तुझ्यायेवडा होतो.’
आणि मग तो एकदम म्हणाला, ‘चला फुटा आता हिकडून. काय अभ्यास करायचा तो करा जा.’ आणि तो स्वत: तिकडून निघून गेला.
प्रतीक आणि मनोज घरी येत होते तेव्हा प्रतीकच्या मनात आलं, ‘आजोबांना सांगितलं पाहिजे, एकदा त्याच्याशी बोलायला. कदाचित आजोबा बोलले तर त्याला आपलं म्हणणं तरी कळेल.’
आपले आजोबा भारी आहेत हे त्याला माहिती होतं, पण इतके भारी आहेत हे त्याला आत्ताच समजलं होतं!.
lpf.internal@gmail.com
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)