घरातला उत्तर ध्रुव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 06:04 AM2019-03-10T06:04:00+5:302019-03-10T06:05:07+5:30
शाळेत एका अभ्यासकानं विद्यार्थ्यांना सांगितलं, तापमानवाढीमुळे दोन्ही धु्रवांवरचं बर्फ वितळतं आहे. त्यामुळे पूर येतील, माणसं मरतील. यावर नव्या पिढीनं काहीतरी करणं आवश्यक आहे. मुलांनी विचार केला, उत्तर ध्रुवावर तर जाता येत नाही, तेवढा बर्फही कुठे नाही. मग काय करायचं? त्यांनी आपली आयडिया लढवली..
- गौरी पटवर्धन
संध्याकाळी आई किल्लीने दार उघडून घरात आली आणि पचाक! आधी घरातल्या अंधारात तिला काही कळेचना, की हा काय प्रकार आहे? पण आपल्या पायाशी पाणी आहे हे लक्षात येऊन तिने हातातल्या भाजीच्या पिशव्या जड असूनही हातातच ठेवल्या. कसाबसा हात वर करून दिवा लावला. आणि तिला समोर जे दृश्य दिसलं त्याने ती हताश होऊन मटकन सोफ्यावर बसली. हॉलमध्ये पाणी आलं होतं आणि त्याने सतरंजी भिजली होती.
आधी आईला वाटलं की चुकून कुठला तरी नळ चालू राहिलाय. पण नळ चालू असल्याचा आवाज येत नव्हता आणि तेवढं पाणी आलेलं नव्हतं. मग हे पाणी आलं कुठून? आईची चिडचिड झाली. बिचारी दिवसभर नोकरी करून घरी आली तर घरात हा सगळा राडा!
पाच मिनिटं बसून राहिल्यावर तिने ठरवलं की जे काही नुकसान व्हायचं ते होऊन गेलेलं आहे. त्यामुळे आपण आधी मस्त एक कप चहा पिऊ आणि मग घर आवरायचं काय ते बघू. म्हणून तिने हातातल्या पिशव्या हॉलमधल्या सोफ्यावर तशाच ठेवल्या आणि चहाचं आधण ठेवलं. आल्याचा वास घरभर पसरला. वासाने खुश होऊन तिने फ्रीजमधून दूध काढून चहात घातलं आणि चहा नासला! कारण दूध नासलेलं होतं. आता मात्र आईचं खरंच डोकं फिरलं. दूध का नासलं असेल? काही पडलं का दुधात? अशी शंका येऊन तिने फ्रीज उघडला तेव्हा तिच्या लक्षात आलं की फ्रीज बंद पडला होता. त्यांचा फ्रीज जुना होता. त्याला दर काही दिवसांनी डीफ्रॉस्ट करायला लागायचं. आणि त्यात काही गडबड झाली तर फ्रीजरमधलं बर्फवितळून असं पाणी बाहेर यायचं; पण आत्ता फ्रीज का बंद पडलाय, असा प्रश्न मनात येता येताच तिला त्याचं उत्तर मिळालं, कोणीतरी फ्रीजचा मेन स्विच बंद केला होता; आणि त्या फ्रीजच्या शेजारी आणून ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या खुर्चीवरून तो कोणी बंद केला असेल याचा अंदाज बांधणं फार काही अवघड नव्हतं. त्यामुळे आईने शांतपणे फ्रीज चालू केला, रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी केली आणि ती आदित्यची, तिच्या सहावीतल्या मुलाची वाट बघत बसली. घरातल्या पसाऱ्याला तिने हातही लावला नाही.
आदित्य नेहमीप्रमाणे आठ वाजता खेळून घरी आला आणि त्याचा पाय ओल्यात पडला. पण त्याने त्याची फारशी दखल घेतली नाही. आज शाळेत जे शिकवलं ते आईला सांगणं फार महत्त्वाचं होतं. त्याने आईला सांगायला सुरुवात केली.
‘आई तुला माहितीये का, आज शाळेत काय झालं?’
त्याच्या उत्साहावरून आईच्या लक्षात आलं की आदित्यसाहेब फ्रीज प्रकार पूर्ण विसरलेले आहेत. तिला त्याचा हिरमोड करावासा वाटेना. त्यामुळे तिने त्याला विचारलं की काय झालं? तो म्हणाला,
‘अगं, आज ना, आमच्या शाळेत एक शास्त्रज्ञ आजी आल्या होत्या. तुला माहितीये का? त्या अंटार्टिकावर जाऊन आल्या आहेत. त्या तिथे काहीतरी प्रयोग करायच्या. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, की सध्या जगात फार ग्लोबल वॉर्मिंग होतंय.’
‘जगात फार ग्लोबल वॉर्मिंग होतंय - असं म्हणाल्या त्या?’
‘तसं नाही म्हणाल्या गं त्या. पण त्यांनी आम्हाला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय ते सांगितलं. आज आम्हाला कळलं ते. तुला माहितीये का ग्लोबल वॉर्मिंग काय असतं ते?’
त्याचा उत्साह वाढवायला आई म्हणाली, ‘तसं माहितीये, पण तू सांग नीट समजावून.’
‘हां!’ आदित्यला तेच पाहिजे होतं, ‘अगं, सध्या जगात सगळीकडे झाडं कापतात ना, आणि खूप प्लॅस्टिक वापरतात ना, त्यामुळे सगळ्या पृथ्वीच्या तापमानात वाढ होते आहे. आणि त्यामुळे दोन्ही ध्रुवांवरचा बर्फवितळतो आहे. आणि असा जर का बर्फ वितळत राहिला ना, तर समुद्राची पातळी वाढेल, सगळीकडे पूर येतील, खूप प्राणी मरतील. आणि तुला माहितीये का? माणसं पण मरतील. त्या म्हणाल्या की आधीच्या पिढीने खूप चुका केल्या आहेत आणि त्या सगळ्या आम्हाला दुरुस्त करायला लागणार आहेत. आणि हे सगळं होऊ नये म्हणून खूप काम करायला लागणार आहे. कसलं डेंजर आहे ना आई हे?’
‘हो ना’
‘आणि तुला माहितीये का? त्या म्हणाल्या की मी सांगते म्हणून विश्वास ठेऊ नका. प्रत्येक गोष्टीवर स्वत: प्रयोग करून बघायचे आणि स्वत:चे स्वत: निष्कर्ष काढायचे.’
‘मग?’
‘मग निष्ठाने त्यांना विचारलं की आम्ही कसं उत्तर ध्रुवावर जाऊन प्रयोग करणार? आम्हाला कोण पाठवेल? तर त्या म्हणाल्या की जेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रयोग करता येत नाही, तेव्हा तशीच परिस्थिती असलेला लहान नमुना घ्यायचा आणि त्यावर प्रयोग करून बघायचा. आता तुम्ही विचार करा की तुम्हाला काय करता येईल?’
‘अच्छा मग काय झालं?’
‘मग माझ्या एकदम लक्षात आलं, की आपल्याला बर्फ तर फक्त फ्रीजमध्ये दिसतो. मग फ्रीजमधला बर्फ वितळला तर काय होईल ते तर आपण बघू शकतो ना’ आणि एवढं बोलून तो ताडकन उठला आणि म्हणाला, ‘ओह शिट! आई मी दुपारी शाळेतून आल्यावर फ्रीज बंद केला आणि खेळायला जाताना चालू करायला विसरलो.’ मग त्याच्या लक्षात आलं, की मगाशी आपण घरात आल्या आल्या पायाला ओलं लागलं होतं ते फ्रीजचंच पाणी असणार. मग त्याला हळूहळू ओट्यावर नासलेल्या दुधाचा चहा दिसला. आणि त्याच्या लक्षात आलं की आपण मेजर घोळ घातलेला आहे. तरी नशीब त्यांचं घर लहान असल्यामुळे त्या पाण्याला पसरायला स्वयंपाकघर आणि हॉल सोडून कुठे जागा मिळालेली नव्हती आणि बरंचसं पाणी सतरंजीने शोषून घेतलेलं होतं.
आई शांतपणे म्हणाली, ‘मग आता झाला का तुझा प्रयोग करून?’
‘घरभर पसरलेल्या पाण्याकडे बघून आदित्य म्हणाला, ‘हो.’
‘मग निष्कर्ष काय निघाला?’
‘हेच आपलं की म्हणजे बर्फवितळला की पाणी होतं आणि खूप बर्फ वितळला की खूप पाणी होतं’
‘आणि?’
‘आणि काही नाही.’
‘मी सांगू का अजून एक निष्कर्ष?’ आदित्यने नुसतीच मान हलवली.
‘अर्धा दिवस फ्रीज बंद राहिला तर अन्न खराब होतं, तर जगातलं सगळं बर्फ वितळलं तर होणारे परिणाम भयंकर असतील यात काही शंका नाही.’
‘त्यामुळे त्या शास्त्रज्ञ आजींनी सांगितलेली एक गोष्ट बरोबर होती की आमच्या पिढीने पर्यावरणाच्या बाबतीत खूप चुका केल्या आणि त्या सुधारण्यासाठी तुमच्या पिढीला खूप काम करायला लागणार आहे; पण त्या एक गोष्ट सांगायची विसरल्या’
‘काय?’
‘हेच, की तुमच्या पिढीने घरात केलेला पसारा आवरायला पण तुम्हालाच खूप काम करायला लागणार आहे.’
आणि मग दहा मिनिटांनी शक्य तेवढं पाणी फडक्याने टिपून घेऊन बादलीत पिळून गोळा करताना आदित्य मनात म्हणत होता, ‘ग्लोबल वॉर्मिंगसाठी इतक्या लगेच काम करायला लागेल असं वाटलं नव्हतं शाळेतून येतांना’
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे)