कार्बनचे पाय!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 06:00 AM2019-05-05T06:00:00+5:302019-05-05T06:00:05+5:30
आपापल्या घरात कोण, किती प्रदुषण करतं, कार्बन फूटप्रिंट किती आहे, हे शोधून काढायचं आणि त्यासाठी प्रयत्न करायचे हे मुलांनी ठरवूनच टाकलं होतं. त्यासाठी त्यांनी एक ‘अफलातून’ प्रयोगही करायचं ठरवलं. ऐनवेळी तो ‘प्रयोग’ फसला, म्हणून बरं, पण त्यानंतर मात्र मुलांनी खरोखरच त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.
- गौरी पटवर्धन
‘खायला काय करू रे तुम्हाला? आरुषच्या वडिलांचा आवाज ऐकून आरु ष आणि त्याचे चौथीतून पाचवीत गेलेले, तसेच घरी खेळायला आलेले मित्न-मैत्रिणी एकदम गप्प झाले. एरवी कदाचित आरु षच्या वडिलांचं त्याकडे इतकं लक्ष गेलं नसतं; पण ते अचानक गप्प झाले आणि मग एकदम बोलायला लागले,
‘काहीपण चालेल..
‘हो हो.. बिस्कीटपण चालेल!’
‘आम्हाला फार भूक नाहीये.’
असं काय वाट्टेल ते एकदम बोलायला लागले. आरुष त्या सगळ्यांना थांबवत म्हणाला, ‘खरंच बाबा.. काहीपण चालेल. आम्ही येतो ना जरा वेळात..’
‘हो काका, पाच मिनिटांत येतो..’
एवढं झाल्यावर मात्न आरु षच्या वडिलांना संशय आला. ते म्हणाले,
‘का रे? काही महत्त्वाचं करताय का? काही चर्चा चालू होती का?’
‘अं? नाही नाही!’
‘आम्ही गेमबद्दल बोलत होतो.’
‘आणि परीक्षेबद्दल..’
‘परत उलटसुलट उत्तरं यायला लागल्यावर आरुषच्या वडिलांच्या लक्षात आलं की, त्यांचं काहीतरी सीक्रे ट प्लॅनिंग चालू होतं आणि ते आपल्याला कधी न कधी कळेलच असा विचार करून ते ‘बरं बरं’ म्हणत तिथून निघाले. ते तिकडून गेल्याची खात्नी पटल्यावर सगळ्यांची चर्चा परत सुरू झाली. त्यातलं एक वाक्य आरुषच्या वडिलांच्या कानावर पडलं आणि ते घाबरून आहे तिथेच थांबले. कारण सबा म्हणत होती,
‘अरे पर हम ऐसा करेंगे तो पुरा घर काला हो जायेगा और हमें डांट पडेगी’
‘नुसती डांट नाही, मारपण खायला लागेल..’ अस्मी म्हणाली.
‘अगं, पण कार्बन काळा असतो यात आपली काय चूक आहे?’ सोहम म्हणाला.
‘बरोबर आहे.’ आरुष म्हणाला, ‘मोठी माणसं रागावली तरी चालेल; पण आपण हा प्रयोग केलाच पाहिजे. नाहीतर आपल्यामुळे पर्यावरणाचं किती नुकसान होतं ते आपल्याला कसं कळेल?’
‘ये भी बात सही है.. पर हम गिनेंगे क्या?’
‘क्या मतलब? पावलं मोजायची..’ सोहम म्हणाला.
‘सगळ्यांची???’ अस्मी म्हणाली.
‘हो मग!’ आरु षच्या बोलण्यात फारच आत्मविश्वास होता. ‘त्याशिवाय आपल्या सगळ्या घरामुळे किती नुकसान होतंय ते कसं कळणार?’
‘हम्म्म..’ सगळी मुलं बहुदा विचार करत थांबली. मग सोहम म्हणाला,
‘ए चला. नाहीतर काका परत येतील बोलवायला.’
हे वाक्य कानावर पडेपर्यंत आरुषचे वडील होते तिथेच थांबून हे सगळं ऐकत होते. त्यांना मुलांचा प्लॅन नीट काही कळला नाही; पण त्यांना एक गोष्ट समजली होती की मुलं असं काहीतरी प्लॅन करतायत की त्यामुळे त्या चौघांच्या घरात काळ्या रंगाची पावलं उमटणार होती आणि मग ही मुलं ती पावलं मोजून काहीतरी ठरवणार होती.
बापरे ! त्यांना कल्पनेनेच घाम फुटला. कारण मुलं घर काळं करणार आणि ते स्वच्छ करायचं काम आपल्या गळ्यात येणार हे त्यांना अनुभवाने माहिती होतं. पण हा प्रकार कसा थांबवावा ते त्यांना कळेना. कारण मुलांनी त्यांना काहीच सांगितलेलं नव्हतं आणि असं मध्येच विचारलं तर मुलं आपल्याला त्यांच्या सीक्रेटमध्ये घेत नाहीत हे त्यांना माहिती होतं. म्हणून मग त्यांनी वेगळी आयडिया करायची ठरवली.
मुलांना खायला दिल्यावर त्यांनी हळूच एक खडा टाकून बघितला आणि म्हणाले,
‘उद्या आपण बार्बेक्यू करूया का?’
‘म्हणजे?’ मुलांच्या चेहर्यावर मोठं प्रश्नचिन्ह होतं.
‘म्हणजे कोळशाची शेगडी लावायची आणि त्यावर खाण्याच्या गोष्टी, भाज्या वगैरे भाजायच्या. मजा येते खूप.’
‘हो हो..’ सगळी मुलं एका आवाजात ओरडली. या प्रकारात किती धमाल येईल ते त्यांना लक्षात आलं. पण आरु ष म्हणाला, ‘पण आपल्याकडे कोळसा कुठे आहे?’
‘आत्ता नाहीये, पण आपण आज संध्याकाळी जाऊन घेऊन येऊ शकतो.’
एवढं बोलून ते म्हणाले, ‘तुम्ही ठरवा काय ते, मी जरा एक फोन करून येतो.’ असं म्हणून ते भिंतीच्या पलीकडे जाऊन उभे राहिले. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मुलं कोळसा आणायच्या कल्पनेने फारच एक्साईट झाली होती. आणलेल्या कोळशापैकी थोड्या कोळशाची पावडर करून आपलं काम सोपं होईल असं त्यांना वाटत होतं. त्यांची चर्चा जोरात सुरू असताना आरु षचे वडील परत आत आले आणि सहज त्या चर्चेत सहभागी होत म्हणाले,
‘कोळशाने काय मोजायचं म्हणालात?’
‘अहो काका आपले पाय काळे करायचे आणि मग पावलं मोजायची..’
‘हो का? पण कशासाठी?’
‘अहो बाबा..’ आरु ष त्यांना समजावून सांगण्याच्या स्वरात म्हणाला, ‘आपली पावलं कार्बनमध्ये बुडवून मोजली ना, की आपल्यामुळे पर्यावरणाच किती नुकसान होतंय ते समजतं.’
‘उसको कार्बन फूटप्रिंट बोलते है’
‘अच्छा..!’ आत्ता त्यांच्या लक्षात आलं की प्रकार काय आहे. मग मुलांना जरा खोदून विचारल्यावर लक्षात आलं की कोणालाच काही नीट माहिती नव्हतं. पण त्यांना कार्बन फूटप्रिंट हा शब्द भारी वाटला होता आणि त्यानुसार आपणही आपले कार्बन फूटप्रिंट म्हणजे पायाला कार्बन लावून चाललेली पावलं मोजावीत असा त्यांचा प्लॅन होता!
मग आरु षच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की, त्यांनी कार्बन फूटप्रिंटचा लावलेला अर्थ सपशेल चुकलेला आहे. कार्बन फूटप्रिंट म्हणजे आपण रोजच्या जगण्यात जी यंत्नं वापरतो किंवा इतर अशा गोष्टी करतो त्यातून किती कार्बन डायऑक्साइड किंवा कार्बनमोनॉक्साइड हवेत सोडला जातो ते मोजणं. कारण त्यामुळे तापमानात वाढ होते. मग त्या सगळ्यांनी मिळून आपल्या कुठल्या वागण्यातून हे कार्बन उत्सर्जन होतं त्या गोष्टी शोधल्या आणि त्यांची यादी चांगलीच मोठी झाली.
पेट्रोल, डिझेल, फ्रीज, एसी, विजेवर चालणार्या सगळ्या गोष्टी, शेकोटी असं करत करत शेवटी आपण श्वासोच्छ्वास करतो त्यातून पण आपण कार्बन डायऑक्साइड हवेत सोडतो असा निष्कर्ष त्यांनी काढला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की, या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकत नाही; पण त्यातल्या काही गोष्टी आपण कमी करू शकतो. उदाहरणार्थ पेट्रोल, डिझेल, एसी यांचा वापर कमी करणं. विजेवर चालणार्या वस्तू वापरत नसताना बटन आठवणीने बंद करण इत्यादि. मग आरु षच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की, आपण केलेलं पर्यावरणाचं नुकसान भरून काढण्याची सगळ्यात सोपी युक्ती म्हणजे झाडं लावणं. त्यामुळे सगळ्यांनी पाच मोठी झाडं लावायची आणि दहावी होईपर्यंत त्यांना पाणी घालायचं असं ठरलं.
आरु षच्या वडिलांनी घरभर काळे पाय उमटण्याचं संकट घालवलं खर; पण पृथ्वीवरचे माणसाने उमटवलेले कार्बन डायऑक्साइडचे पाय पुसण्याचं काम मात्न आरु ष आणि त्याचे मित्नमैत्निणीच करणार आहेत, झाडं लावून!
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)
lpf.internal@gmail.com