चिवचिवाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 06:03 AM2019-06-02T06:03:00+5:302019-06-02T06:05:06+5:30
सुट्टय़ा लागल्या की मुलं काही ना काही उचापती करतातच. पण या मुलांचं काहीतरी वेगळंच ! लाकडी फळ्या, खिळे, हातोडी, करवत असं काय काय त्यांनी गोळा केलं. गच्चीवर ठाकठोक सुरू केली. पैसे कमी पडले तर प्रत्येकानं सुटीत ओळखीच्या काकांकडे नोकरीही केली. एवढा उपद्व्याप त्यांनी केला तरी कशासाठी?
- गौरी पटवर्धन
सोसायटीतल्या मुलांनी सुट्टी लागल्या लागल्या काहीतरी उपद्व्याप करायला सुरुवात केली होती. आधी त्यांनी कुठून कुठून बर्याच लहान-मोठय़ा लाकडी फळ्या गोळा केल्या. त्यावेळी ही मुलं उन्हाळ्यात शेकोटी करणार की काय, अशी मोठय़ा माणसांना भीती वाटली होती. पण मोठी माणसं काही बोलली नाहीत आणि मुलांनीही तसं काही केलं नाही. त्यानंतर मोठी माणसं सुटकेचा नि:श्वास टाकतायत तोच मुलांनी आपापले पॉकेटमनीचे पैसे एकत्न करून त्यातून खिळे, हातोडी, करवत असली हत्यारं आणायला सुरुवात केली. त्यामुळे पालकांना फारच भीती वाटली. पण मोठय़ा मुलांनी ती सगळी हत्यारं लहान मुलांपासून जबाबदारीने दूर ठेवायला सुरु वात केली आणि बरेच दिवस झाले तरी कोणी काही लागल्याची तक्रार घेऊन आलं नाही. मग पालक हळूहळू थोडे रिलॅक्स झाले.
पण पालकांना शांततेने राहू देतील तर ती मुलं कसली? हळूहळू त्यांनी ते सगळं सामान बी विंगच्या गच्चीत हलवलं आणि तिथे ते कुठल्याच मोठय़ा माणसाला येऊ देईनात. बी विंगच्या तिसर्या मजल्यावर राहणार्या लोकांना सारखे मुलांचे खिदळण्याचे, काहीतरी कापल्याचे, ठोकल्याचे आवाज सतत येत राहायचे. त्यामुळे त्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहचली होती. पण मुलांनी मात्न आमचं सीक्रेट आहे असं म्हणून कुठल्याही मोठय़ा माणसाला त्या गच्चीत येऊ दिलं नव्हतं. एवढंच नाही, तर काही दिवसांनी त्यांनी चक्क एक छोटं कुलूप आणून गच्चीच्या दाराला लाऊन टाकलं होतं.
पण हळूहळू त्यांचा गच्चीतला वावर कमी व्हायला लागला. वेळीअवेळी येणारे ठोकण्याचे, कापण्याचे आवाज कमी होत होत थांबून गेले. पण तरी त्यांनी गच्चीच्या दाराचं कुलूप मात्न उघडलेलं नव्हतं. ही मुलं नेमकं काय करतायत याचा कोणाला थांगपत्ता लागेना आणि अशात त्या सगळ्यांनी आपापल्या घरी असं जाहीर केलं की, आम्ही सगळे आता एक महिना कुठेतरी नोकरी करणार आहोत.
हे ऐकल्यावर तर पालकांना चक्कर यायचीच शिल्लक राहिली. कोपर्यावरून भाजी आणून दे म्हटलं तरी वैतागणारी आपली ही गोजिरवाणी मुलं नोकरी करणार? आणि या आठवी-नववीच्या मुलांना कोण देणार नोकर्या? पण बघता बघता त्यातल्या प्रत्येकाने कुठे न कुठे नोकरी मिळवली. कोपर्यावरच्या मेडिकल स्टोअरमध्ये, वाण्याच्या दुकानात, पेपर टाकणार्या काकांकडे.. सगळ्यांनी एक महिना इमाने-इतबारे नोकरी केली आणि ती नोकरी का केली हे त्या महिन्याच्या शेवटाला त्यांच्या पालकांना समजलं.
सगळ्यांनी महिन्याभरात कमावलेले पैसे एकत्न केले आणि अजून प्लायवूड घेऊन आले. आता मात्न सोसायटीतल्या मोठय़ा माणसांना राहवेना. त्यांनी त्या सगळ्यांना एकत्न करून, वेगवेगळं गाठून विचारून बघितलं. पण छे ! कोणीच काही सांगेना. ‘मोठी माणसं त्यांची सगळी सीक्रे ट्स आम्हाला सांगतात का? नाही ना? मग आम्हीपण नाही सांगणार !’ हे एकच उत्तर सगळीकडून मिळायला लागलं.
बी विंगच्या गच्चीतले कापण्याचे, ठोकण्याचे आणि हसण्या-खिदळण्याचे आवाज परत सुरू झाले. पण मुलांनी त्यांची जागा अशी शिताफीने निवडली होती की ए किंवा सी विंगच्या गच्चीतूनसुद्धा ते काय बनवतायत ते दिसायचं नाही. काहीतरी कापतायत आणि काहीतरी खिळ्याने जोडतायेत एवढं मात्न समजायचं. पण ते तर आवाजावरूनच समजत होतं.
शेवटी एकदाचा जून महिना आला. आता ढग आले की मुलांना त्यांचं सामान खाली आणायलाच लागेल आणि मग ते काय करतायत ते आपल्याला दिसेल अशा विचारात मोठी माणसं असताना मुलांनी सेक्रेटरी काकांना विचारलं, ‘सोसायटीची मीटिंग बोलावता येईल का? आम्हाला सगळ्या मोठय़ा माणसांशी काहीतरी बोलायचं आहे.’
एरवी मुलांसाठी कोणी पूर्ण सोसायटीची मीटिंग बोलावली नसती. पण त्यानिमित्ताने मुलं आपल्या डोक्यावर बसून सुट्टीभर काय एवढी ठोकापिटी करत होती ते तरी कळेल म्हणून सगळेजण पटकन तयार झाले. मग मुलं म्हणाली की, आपण बी विंगच्या गच्चीत मीटिंग घेऊया का? मग तर सगळे अजूनच उत्साहाने तयार झाले.
कधी नव्हे ते सगळेजण बरोब्बर वेळेवर मीटिंगला हजर होते. पण मुलांचं सीक्रे ट मात्न अजूनही चादरींखाली झाकलेलं होतं.
अखेर मीटिंग सुरू झाली आणि मुलांची प्रतिनिधी म्हणून सौम्या बोलायला उभी राहिली.
‘आई-बाबा-काका-काकू-आजी-आजोबा.. सगळ्यात आधी तुम्ही कोणी कुलूप तोडून आमचं सीक्रे ट बघितलं नाहीत, आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आम्हाला मनासारखे उद्योग करू दिलेत त्याबद्दल आम्ही तुम्हाला थॅँक यू म्हणतोय. आधी आम्ही हा सगळा उद्योग का केला ते सांगते. सुट्टी लागल्यावर आपण सगळ्यांनी मिळून गावाला पिकनिक काढली होती तेव्हा बालवाडीतील सोहमनं विचारलं होतं, तो कोणता बर्ड आहे? - ती चिमणी होती. तेव्हा आमच्या सगळ्यांच्या एकदम लक्षात आलं की आम्ही तरी चिमण्या बघितल्या आहेत; पण सोहमला तर चिमणी ओळखूपण आली नाही. मग आम्ही ठरवलं की आपण त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी आपापला पॉकेटमनी एकत्न करून, नोकरी करून पैसे कमावून सामान विकत आणून आपल्या प्रत्येकाच्या गॅलरीत टांगण्यासाठी आम्हाला जमली तशी चिमण्यांची घरटी करण्यासाठी खोकी बनवली आहेत. तर तुम्ही सगळे ती तुमच्या गॅलरीमध्ये लावाल का?’
ती बोलत असताना अद्वैतने सगळ्या चादरी बाजूला केल्या. पुढचं वर्षभर सगळ्या मुलांना दोन भाषांमधून शाब्बासकी मिळत होती. माणसांच्या बोलण्यातून आणि घरटी बांधलेल्या चिमण्यांच्या चिवचिवाटातून !.
lpf.internal@gmail.com
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)