‘पाणी’दार काम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 06:04 AM2019-08-25T06:04:00+5:302019-08-25T06:05:10+5:30
राजेशचं कोणीच ऐकलं नाही. शेवटी त्यानं एकट्यानंच सुरुवात केली. कुदळ घेतली, फावडं घेतलं. त्याला 15 बाय 15 फुटाचा खोल खड्डा खणायचा होता. त्याची मेहनत बघून आधी त्याचे शिक्षक मदतीला धावले. मग इतर विद्यार्थीही आले. येणार्या वर्षांची बेगमी त्या खड्डय़ात असणार होती!
- गौरी पटवर्धन
‘पण पाऊस पडल्यावर कशाला करायचं ते?’ रार्जशीला अगदी गंभीरपणे प्रश्न पडला होता.
‘पावसाचा आणि त्याचा काय संबंध?’ राजेशला पण तितक्याच गंभीरपणे प्रश्न पडला होता.
‘नाही कसा? आपण हे काम का करायचं म्हणत होतो? - आपल्याला उन्हाळ्यात पाणी मिळत नाही म्हणून; पण आता तर वरून एवढं बदाबदा पाणी पडतंय की पार आपलं गाव वाहून जायची पाळी आली, मग कशाला हा उद्योग करायचा? त्यापेक्षा आपण दुसरं काहीतरी काम करू ना?’
‘रार्जशीचं म्हणणं मला बरोबर वाटतंय.’ - महेश म्हणाला, ‘आपण ना, पावसामुळे होणारं नुकसान थांबविण्यासाठी काहीतरी काम करूया.’
‘मलापण असंच वाटतंय.’- रार्जशी म्हणाली, ‘आपली शाळा गळते आहे ते थांबवायला काहीतरी करूया.’
‘ते करायलाच पाहिजे आहे’ राजेश विचार करत म्हणाला, ‘पण आपण आधी केलेला प्लॅन जास्त भारी आहे. आणि जास्त गरजेचापण आहे.’
‘‘हो तो प्लॅन जास्त भारी आहे; पण आता त्याची गरजच नाहीये ना’ - रार्जशी हटवादी सुरात म्हणाली, ‘एवढा पाऊस पडल्यानंतर पाणी मिळण्यासाठी कशाला काम करायचं?’
राजेशला तिचं म्हणणं काही केल्या पटेना, पण त्याला त्याचं म्हणणं नीट मांडताही येईना. झालं होतं असं, की त्यांच्या शाळेतल्या सरांनी त्यांच्या शाळेतल्या मुलांसाठी स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत ज्याला इच्छा असेल त्याने भाग घ्यायचा होता. स्पर्धा अशी होती की त्यांची शाळा आदर्श शाळा होण्यासाठी प्रत्येकाने त्याला सुचेल, जमेल ते करायचं होतं. आणि ते काम वर्षभरात कधीही केलं तरी चालणार होतं. प्रत्येक इयत्तेतल्या उत्साही मुलांनी स्पर्धेत भाग घेतला होता. तसंच आठवीतल्या रार्जशी, राजेश आणि महेशनेपण एक गट बनवून नाव नोंदवलं होतं.
गट बनवला तेव्हा त्यांनी ठरवलं होतं की आपण उन्हाळ्यातला पाणीप्रश्न सोडविण्यासाठी काहीतरी करूया. पण काय करायचं ते ठरेपर्यंत पावसाळा सुरू झाला होता. आणि यावर्षी त्यांच्या गावाला भरपूर पाऊस झाला होता. हवामानखात्याचा अंदाज होता की अजून उरलेल्या पावसाळ्यातपण छान पाऊस होईल. त्यामुळे गावात माणसं खुश होती. यावर्षी पीक चांगलं होईल असं चिन्ह दिसत होतं. मग अशा वेळेला उन्हाळ्यातला पाणीप्रश्न सोडविण्यासाठी काहीतरी करायचं हे रार्जशीला अगदीच निरुपयोगी वाटत होतं. महेशलापण तिचं म्हणणं पटत होतं. राजेशला वेगळं म्हणायचं होतं; पण ती ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी असं ठरलं की रार्जशी आणि महेश वेगळा गट करतील आणि राजेश एकटाच त्याचा प्रकल्प पूर्ण करेल.
त्याप्रमाणे रार्जशी आणि महेशने शाळेचं गळणारं छप्पर दुरु स्त करण्यासाठी काय करता येईल याचा विचार सुरू केला. पण त्यांना सुचलेले सगळेच उपाय फार महागडे होते. म्हणजे वॉटरप्रूफिंग करायचं, घोटाई करायची किंवा अगदी वर ताडपत्नी टाकायची तरीसुद्धा त्याला बरेच पैसे लागणार होते. त्यामुळे त्यांचा प्रकल्प कितीही महत्त्वाचा असला तरी तो काही पुढे सरकेना.
इकडे राजेशने मात्न पावसाने उघाडी दिल्याबरोब्बर कामाला सुरु वात केली. त्याच्या प्रकल्पाला कुठल्याही महागड्या वस्तूंची गरज नव्हती. त्याला फक्त टिकाव, फावडं आणि घमेलं लागणार होतं. कारण त्याचा प्रकल्प होता तो शोषखड्डा तयार करण्याचा. त्याने गेलं वर्षभर नियमितपणे वर्तमानपत्न वाचलं होतं. त्यातून त्याला फार महत्त्वाची माहिती मिळाली होती. त्याला जे समजलं होतं त्यातला पहिला भाग असा की आपण बोअरिंग करून जे पाणी बाहेर काढतो त्यामुळे भूजलाची पातळी खाली जाते. दुसरं म्हणजे पावसाचं पाणी जर अडवून जिरवलं नाही तर ते नुसतंच वाहून जातं, त्यातला फार थोडा भाग जमिनीत मुरतो. आणि तिसरं म्हणजे जिथे पावसाचं पाणी आपोआप जातं, तिथे जर का शोषखड्डा बनवला तर त्यातून पाणी जमिनीत मुरतं आणि जमिनीखालच्या पाण्याची पातळी वाढते. ती वाढली की बोअरला आणि हापशीला लौकर पाणी येतं. ते वाचल्यापासून त्याने ठरवलं होतं की आपण आपल्या शाळेच्या आवारात असा शोषखड्डा करायचाच. आता जरी भरपूर पाऊस असला तरी पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यात पुन्हा गावाला टँकर लागणारच हे त्याला माहिती होतं.
त्याने उताराची, शाळेच्या कम्पाउण्डला लागून असलेली जागा निश्चित केली. तिथे पेपरात वाचल्याप्रमाणे चुन्याच्या फक्कीने पंधरा फूट व्यासाचा गोल काढून घेतला आणि खणायला सुरु वात केली. त्याने सुरु वात तर उत्साहात केली; पण पहिला दिवस संपता संपता त्याच्या हातून फार थोडं खणून झालं होतं. दुसर्या दिवशी त्याचे खांदे आणि हात भरून आले होते. कारण असं खणायचं कष्टाचं काम त्याने कधीच केलेलं नव्हतं. पण आपण हा प्रकल्प करायचाच आणि यशस्वी करायचा असं ठरवून त्याने दुसर्याही दिवशी चिकाटीने काम केलं. एव्हाना संपूर्ण शाळेला समजलं होतं, की राजेश एकटाच वेड्यासारखा मोठ्ठा खड्डा खणतो आहे. तिसर्या दिवशी सगळी शाळा गंमत बघायला येऊन उभी राहिली. मग शाळेतल्या आणि गावातल्या काही टवाळ मुलांनी त्याची टिंगल करायला सुरुवात केली. एवढं करून पाचव्या दिवसापर्यंत त्याने संपूर्ण गोलाचा खड्डा जेमतेम एक फूट खणला होता. त्याला किमान पंधरा फूट खोल खड्डा करायचा होता. त्याच्या हे लक्षात आलं होतं, की त्याला एकट्याला हे काम करणं अशक्य होतं; पण आता त्याला ते सोडून देणंही शक्य नव्हतं.
सहाव्या दिवशी राजेश उठला तोच रडवेला होऊन. या सगळ्या मेहनतीने त्याचं अंग भयंकर दुखायला लागलं होतं. पण तरी सगळी हिंमत एकवटून तो शाळेत गेला आणि बघतो तर काय? ज्यांनी स्पर्धा आयोजित केली होती ते त्याचे सर पॅण्ट आणि शर्टच्या बाह्या दुमडून टिकाव, फावडं, घमेलं घेऊन त्याचा खड्डा खणत होते. ते बघून राजेश दमलेला असला तरी पळत पळत शाळेत पोहोचला आणि सरांना म्हणाला,
‘सर तुम्ही कशाला करताय?’
सर शर्टच्या बाहीला घाम पुसत म्हणाले, ‘कारण या शोषखड्डय़ात जमा होणारं आणि मुरणारं पाणी पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यात माझ्याही उपयोगी येणार आहे. त्यामुळे त्यासाठी मी काम केलंच पाहिजे.’
हे ऐकल्यावर इतके दिवस आजूबाजूला उभं राहून नुसती गंमत बघणारी बरीच मुलं मदतीला आली. मुलांनी खड्डा खणला म्हटल्यावर ग्रामपंचायतीने त्यात ट्रॅक्टरने दगड आणि कच आणून टाकला. सरांची स्पर्धा पार पडली. त्यासाठी त्यांनी बक्षिसंही दिली; पण त्या स्पर्धेचा निर्विवाद विजेता राजेश होता! कारण त्याच्या प्रकल्पामुळे केवळ त्याची शाळाच नाही तर त्याचं गावही आदर्श गाव ठरलं होतं!
lpf.internal@gmail.com
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)