मुलींनीच पाणी का भरायचं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 06:03 AM2019-06-16T06:03:00+5:302019-06-16T06:05:07+5:30
यावर्षी उन्हाळा सुरू व्हायच्या आधीच गावात पाण्याचा टॅँकर सुरू झाला. त्याचा परिणाम झाला शाळेवर. शाळेतील मुलींची उपस्थिती कमी झाली. या मुली दिवसरात्न कळश्या-हंडे घेऊन फिरत होत्या. एरवी मुलामुलींची असणारी ती शाळा जणू फक्त मुलांचीच होऊन गेली. नववीच्या मुलांना हे फार खटकलं आणि त्यांनी एक वेगळाच प्रयोग केला.
- गौरी पटवर्धन
उन्हाळा सुरू व्हायच्या आधीच त्यांच्या गावाला टॅँकर लागला. पण टॅँकर यायचा आठवड्यातून दोन वेळा. उरलेले दिवस लांब लांब जाऊन पाणी आणायचं काम सुरू झालं होतं. वर्गातल्या सगळ्यांची आई, मावशी, ताई, वहिनी रोज सकाळी उठल्या की घाईने सकाळपुरत्या भाकरी थापायच्या आणि हंडे-कळश्या घेऊन पाणी शोधायला जायच्या, त्या पोरं शाळेत जाईपर्यंत तेच काम करायच्या.
त्यांचं गाव होतंच दुष्काळी भागातलं.. त्यामुळे टॅँकर, पाण्यासाठी रोज हंडे घेऊन रानोमाळ फिरणार्या बायाबापड्या हे दृश्य वर्षातून चार महिने तरी दिसायचंच. त्यात यावर्षी दुष्काळामुळे फेब्रुवारीपासूनच हे सुरू झालं होतं. पण करणार काय? आपल्या गावात दुष्काळ असतोच असं म्हणून मोठय़ांनी केव्हाच परिस्थिती बदलण्याची आशा सोडून दिलेली.
पण यावेळी नववीच्या वर्गातल्या मुलांचं मात्न वेगळंच प्लॅनिंग सुरू होतं. झालं असं, की त्यांच्या शाळेने एका मोठय़ा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांना बक्षीस मिळायची खात्नी होती. कारण त्यांच्या वर्गातली सुनीता दरवर्षी वक्तृत्व स्पर्धेचं बक्षीस घेऊन यायचीच. मात्न यावर्षी सुनीताला वक्तृत्व स्पर्धेची तयारी करायला किंवा त्यात भाग घ्यायला वेळच नव्हता. इतकी वर्षं लहान आणि हुशार म्हणून तिला घरच्यांनी कधी पाणी आणायच्या कामाला लावलं नव्हतं. पण यावर्षी परिस्थिती वेगळी होती. तिसरी चौथीपासूनच्या मुली दिवसरात्न छोट्या कळश्या घेऊन फिरत होत्या. एरवी मुलामुलींची असणारी ती छोटीशी शाळा जणू फक्त मुलांची होऊन गेली होती. आणि नेमकं हेच नववीच्या वर्गातल्या मुलांना आवडत नव्हतं.
त्यांना मूल्यशिक्षणाच्या तासाला, शाळेत येऊन गेलेल्या अनेक पाहुण्यांनी, चार वेळा बदललेल्या प्रत्येक शिक्षकाने स्री-पुरु ष समानतेबद्दल शिकवलं होतं. पण इथे तर सगळ्या मुली पाणी शोधायला आणि सगळी मुलं शाळेत अशी परिस्थिती झाली होती आणि त्याबद्दल कोणी काही बोलायला तयार नव्हतं.
नववीच्या वर्गातल्या मुलांनी त्याबद्दल काहीतरी करायचं ठरवलं. पण करणार काय? नववीच्या वर्गात तर सगळी मिळून दहा मुलं होती. मग त्यांनी आठवीच्या मुलांनाही त्यांच्या चर्चेत घेतलं. मग सातवीची मुलं आली, मग सहावी, पाचवी करत करत पार चौथीपर्यंतची मुलं त्यांच्या प्लॅनमध्ये सामील झाली.
बघता बघता ठरलेला दिवस उजाडला. आणि त्या दिवशी त्या गावातली शाळेत जाणारी चौथीच्या पुढची सगळी मुलं आपापल्या घरी आईवडिलांशी वाद घालताना दिसायला लागली. आईवडिलांचं म्हणणं होतं, की आता परीक्षा जवळ आल्या आहेत, तर अभ्यास करा. मुलांचं म्हणणं होतं, की फक्त मुलींनी पाणी आणायचं, फक्त मुलींची शाळा बुडणार हे काही बरोबर नाही. आम्हीपण पाणी आणायला जातो म्हणजे अध्र्या वेळात पाणी आणून होईल, मग आम्हीपण शाळेत जाऊ आणि मुलीपण शाळेत जातील.
मुलांचा युक्तिवाद त्यांच्या बाजूने बिनतोड होता, गावातल्या मोठय़ांच्या दृष्टीने त्याला काही अर्थ नव्हता. पण मुलं काही केल्या ऐकायलाच तयार नव्हती. घराघरात वादविवाद चालू होते. शेवटी मोठी माणसं म्हणाली, जाऊदे त्यांना पाणी आणायला. दोन दिवस जातील, तो उत्साह संपला की जातील परत शाळेत. आणि मग सुरू झाला एक नवीन प्रयोग.. शाळेतल्या मुलांनी आणि मुलींनी मिळून केलेला.
चार दिवस शाळेतल्या प्रत्येकाने आपापल्या घरचं पाणी भरल्यावर मग शाळेतल्या सगळ्या मुलांनी मिळून मीटिंग घेतली. आणि ठरवलं की शाळेच्या मागच्या मोकळ्या रखरखीत जागेत झाडं लावायची. कारण झाडं नसली की दुष्काळ पडतो आणि दुष्काळ पडला की झाडांना पाणी मिळत नाही हे दुष्टचक्र त्यांना शाळेत शिकवलेलं होतं. पण गावात पाण्याचे एवढे हाल असताना झाडांना पाणी कोण देईल? शेवटी असं ठरलं की उद्यापासून प्रत्येकाने दोन भांडी पाणी शाळेत घेऊन यायचं. आणि ते झाडांना घालायचं.
इतका वेळ त्यांच्या शाळेतले शिक्षक या सगळ्या उपक्रमाकडे दुरून कौतुकाने बघत होते. मुलांना इतक्या महत्त्वाच्या विषयाची जाणीव होऊन ते आपणहून काहीतरी मार्ग काढतायत म्हटल्यावर त्यात आपण पडू नये हे त्यांना माहिती होतं. पण आता मात्न त्यांच्या लक्षात आलं, की आपण मध्ये पडलो नाही तर मुलांचे खूप कष्ट वाया जातील. कारण ऐन दुष्काळी भागात, प्रचंड उन्हात, उन्हाळ्याच्या तोंडावर लावलेली छोटी रोपं उन्हाळ्यात जगणं कठीण आहे. शिवाय त्यांना हेही माहिती होतं की मुलं भलती कुठलीतरी झाडं लावून ठेवतील ज्यांचा तसा काही उपयोग होणार नाही. पण त्यांना हेही माहिती होतं, की मुलांना त्यांच्या प्लॅनमध्ये मोठय़ा माणसांनी लुडबुड केलेली अजिबात आवडत नाही. आणि म्हणूनच त्यांनी शाळेत एक छोटासा कार्यक्र म आयोजित केला. त्यात मुलांच्या पालकांनाही बोलावलं. त्या कार्यक्र माला तालुक्याहून कोणीतरी पाहुणे आले होते. पण ते कोण होते ते मुलांना माहिती नव्हतं.
कार्यक्र म सुरू झाला. वक्त्यांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘सगळ्यात आधी मी तुमच्या शाळेतल्या सगळ्या मुलांचं मनापासून कौतुक करतो. बहुतेक ठिकाणी आपण फक्त बायकांना पाणी आणायचं काम करताना बघतो. पण तुमच्या शाळेतल्या मुलांनी वर्गातल्या मुलींचं शिक्षण बंद होऊ नये म्हणून पाणी आणायची थोडी जबाबदारी अंगावर घेतली. याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमच्यासारख्या मुलांमुळेच उद्याचा समाज जास्त चांगला असणार आहे. त्याचबरोबर मला या गोष्टीचं कौतुक करावंसं वाटतं, की सगळं जग तहान लागली की विहीर खणायचा विचार करत असताना तुम्ही मात्न उद्याचा विचार आज करताय. पुढच्या वर्षी दुष्काळ पडू नये म्हणून यावर्षी प्रयत्न करताय. इतक्या लहान वयात आयुष्याचा इतका छान विचार करणारी मुलं मी आजवर कधी बघितलेलीच नव्हती. म्हणूनच तुमचे हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी माझ्या बाजूने जे करणं शक्य आहे ते मी करणार आहे. मी स्वत: सरकारी रोपवाटिकेत नोकरी करतो. त्यामुळे तुमच्या भागात कुठली झाडं लावायची, ती कधी लावायची, त्यांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देईन. त्याचबरोबर ती सगळी रोपं मी माझ्या खर्चाने तुम्हाला इथे आणून देईन.’ असं आश्वासन देऊन पुन: सगळ्या मुलांचं कौतुक करून पाहुणे खाली बसले तेव्हा कार्यक्र माला आलेले अर्धे पालक मुलांच्या पाठीशी उभे राहिले होते. कारण त्यांच्या हे लक्षात आलं होतं, की पुढच्या संकटाची चाहूल आधी पुढच्या पिढीला लागली आहे आणि संकट निवारणासाठी लागणारी इच्छाशक्तीही त्यांच्याचकडे आहे !.
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)
lpf.internal@gmail.com