कागदी पिशव्यांचा कारखाना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 06:03 AM2019-10-27T06:03:00+5:302019-10-27T06:05:06+5:30

दिवाळीचा फराळ देण्या-घेण्यासाठी  अनेक जण प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरतात. त्यानं पर्यावरणाची हानी होते. मग काय करायचं?. मुलांनी एक भला मोठा प्रकल्पच हाती घेतला. आपापल्या घरातले रद्दी पेपर त्यांनी गोळा केले,  डिंक आणला, हँडल्स बनवायला सुतळ्या आणल्या  आणि गच्चीत त्यांचा उद्योग सुरू झाला.  आख्ख्या सोसायटीला त्याचा फायदा झाला!

Children's initiative to reduce plastic carry bag use in Diwali -Paper bag factory! | कागदी पिशव्यांचा कारखाना!

कागदी पिशव्यांचा कारखाना!

googlenewsNext
ठळक मुद्देधड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धन
‘यावर्षी आपण एकदम भारी दिवाळी करू.’ 
- चौथीतली किमया उत्साहाने म्हणाली. सगळ्यांच्या शाळेला सुट्या लागल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या सोसायटीतला त्यांचा सात जणांचा ग्रुप हल्ली सकाळी अंघोळ आणि नास्ता झाला की गच्चीत जमायचा. मग तिथून जे काही खेळायचं ठरेल त्याप्रमाणे पार्किंगमध्ये, गच्चीत किंवा कोणाच्या तरी घरी सगळे जमायचे, ते थेट कोणाच्या तरी घरून जेवणासाठी हाका ऐकू येईपर्यंत. सगळे जमल्यावर किमयाने उत्साहाने दिवाळीचं प्लॅनिंग करायला घेतलं होतं.
‘ऑफ कोर्स!’ पाचवीतील रिधान म्हणाला. आपली दिवाळी म्हटल्यावर ती भारीच असणार.
‘पण, म्हणजे आपण करायचं काय?’ तिसरीतल्या सृष्टीला मोठाच प्रश्न पडला होता.
‘आपण ना, अजिबात फटाके आणायचे आणि उडवायचे नाहीत.’ दुसरीतल्या विवानने त्याचं मत मांडलं. आम्हाला शाळेत शिकवलंय की फटाक्यांना सगळे प्राणी खूप घाबरतात आणि त्यांना फटाक्यांमुळे चटकेपण बसतात.’
त्यावर किमया आणि रिधानने त्याला असा लूक दिला की हा किती बावळट मुलगा आहे. त्यामुळे काहीसा चिडून तो म्हणाला,
‘‘अरे खरंच. आमच्या शाळेत टीचरनी सांगितलंय.’
‘अरे.’ रिधानच्या चेहर्‍यावर अजूनही तेच भाव होते. पण तो समजावून सांगण्याच्या सुरात म्हणाला, ‘फटाके तर नाहीच फोडायचे. ते तर ठरलेलंच आहे. त्यात काय सांगायचं?’
‘हो ना.’ आता किमयापण म्हणाली, ‘आपण त्यापेक्षाही भारी दिवाळी करू.’
‘पण कशी?’ सृष्टीने परत तोच प्रश्न विचारला, ‘ते तर कोणी सांगतच नाहीये.’
‘तेच तर ठरवायचंय ना.’
‘कोणाकडे काही आयडिया असतील तर सांगा. आपण काहीतरी भारी करूया या दिवाळीत.’
‘आपण प्लॅस्टिक नको वापरूया.’
‘ते तर वापरायचंच नसतं. त्यात दिवाळी स्पेशल काय आहे?’
‘अरे, दिवाळीत सगळे जण खूप शॉपिंग करतात ना, तर आपण कुठेच प्लॅस्टिकच्या पिशव्या नाही घ्यायच्या.’ किमयाने सुचवलं.
‘माझी आई नाही ऐकणार.’ सृष्टी म्हणाली. 
‘का???’ बाकी सगळ्यांनी एका आवाजात विचारलं. 
प्लॅस्टिक वापरायला नको हे सगळ्यांचे पालक घरी सांगायचे. अशावेळी आई कशी काय ऐकणार नाही तेच त्यांना कळेना. 
‘आई म्हणते की त्या सगळ्या पिशव्या नंतर फराळ घालून द्यायला कामी येतात.’
‘म्हणजे?’
‘अरे, तिला फराळाचे सगळे पदार्थ कोणाकोणाला द्यायचे असतात ना, त्यासाठी तिला त्या पिशव्या लागतात.’
‘माझ्यापण आईला लागतात.’ विवानपण म्हणाला.
‘तशा तर माझ्यापण आईला लागतात.’ रिधान विचार करत म्हणाला. 
‘माझ्यापण आईला लागतात.’ किमया म्हणाली, ‘पण आपल्याला शाळेत काय सांगितलं? की फक्त सवय आहे म्हणून आपण अनेक ठिकाणी प्लॅस्टिक वापरत राहतो. तो प्लॅस्टिकचा वापर कमी करायचा असेल तर आपल्याला काहीतरी भारी आयडिया शोधावी लागते.’
‘मग आपण पण शोधूया आयडिया.’ सृष्टी म्हणाली.
‘मी आईला सांगतो की आपण कोणालाच फराळ द्यायचा नाही. सगळ्यांना घरीच बोलावू.’ विवान म्हणाला.
‘अरे.’ किमया कसाबसा पेशन्स ठेवत म्हणाली, ‘असं कसं काय सांगता येईल? आणि सांगून तरी कोणी ऐकेल का?’
‘आणि आपण फराळ नाही दिला तर बाकीचे पण आपल्याला फराळ देणार नाहीत.’ सृष्टी काळजीत पडली, ‘आणि माझ्या आत्याच्या करंज्या आवडतात मला.’
‘मला पण आवडतात, माझ्या आत्याच्या करंज्या.’ विवान म्हणाला. तो सृष्टीच्या शेजारच्याच घरात राहायचा आणि ते दोघं कायमच एकमेकांच्या घरी खेळत असायचे आणि जिथे असतील तिथेच जेवायचे. त्यामुळे सृष्टीची आत्या फार भारी करंज्या करते हे त्याला माहिती होतं. मग सगळ्यांनाच त्यांचे कोणते नातेवाईक कुठला चांगला पदार्थ करून पाठवतात ते आठवलं आणि मग आईला असं कोणीच सांगायचं नाही हे आपोआपच ठरलं; पण मग करायचं काय?
सगळे डोकं  खाजवत बसलेले असताना किमया अचानक म्हणाली, ‘अरे फराळ द्यायला पाहिजे हे बरोबर आहे, पण तो प्लॅस्टिकच्याच पिशवीत दिला पाहिजे असं कुठेय? आपण कागदी पिशव्या बनवू.’
‘आणि घड्या घालून कागदाची खोकीपण बनवू. माझ्या ताईला येतात.’ रिधान म्हणाला. ‘ती शिकवेल आपल्याला.’
आणि मग चौघंही जण अचानक उठले आणि सुरू झाला एक भला मोठा प्रकल्प. त्यांनी आपापल्या घरी जाऊन जुने रद्दी पेपर गोळा केले, डिंक आणला, हँडल्स बनवायला सुतळ्या आणल्या आणि गच्चीत त्यांचा पिशव्या बनवायचा कारखाना सुरू झाला. पहिले दोन दिवस कोणी काही विचारलं नाही. पण तिसर्‍याही दिवशी मुलं उठून गच्चीत गेली म्हटल्यावर सृष्टीचे वडील ते काय करताहेत ते बघायला आले. मग मुलांनी त्यांना सगळी आयडिया समजावून सांगितली. ते बघितल्यावर तिच्या वडिलांनी त्यांना अजून छान पक्के कागद आणून दिले. मग त्यांनी सोसायटीतल्या मोठय़ा माणसांना गोळा केलं. सगळ्यांनी मिळून संपूर्ण सोसायटीला पुरतील एवढी खोकी आणि पिशव्या बनवल्या.
त्या दिवाळीत त्यांच्या सोसायटीत एकही प्लॅस्टिकची पिशवी आत आली नाही, आणि बाहेरही गेली नाही!
lpf.internal@gmail.com
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)

Web Title: Children's initiative to reduce plastic carry bag use in Diwali -Paper bag factory!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.