चीनची कुटिल नीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 06:03 AM2020-07-19T06:03:00+5:302020-07-19T06:05:12+5:30

भारतात 80 कोटी स्मार्टफोन आहेत.  त्यावर अनेकांनी चिनी अँप्स डाऊनलोड केले आहेत.  अनेकांकडे चिनी मोबाइल आणि संगणकही आहेत.  या माध्यमातून सायबर हल्ले शक्य आहेत. आपली संगणकीय प्रणाली, मोबाइल  बंद पाडणंही त्यांना अवघड नाही. जे अँप्स आता बंद केले आहेत त्या माध्यमातूनही  वेगळ्या प्रकारची हेरगिरी केली जात होती.  प्रत्यक्ष आणि सायबर युद्धाबाबत भारताला फारच जागरूक राहावे लागणार आहे.

China's crooked policies | चीनची कुटिल नीती

चीनची कुटिल नीती

Next
ठळक मुद्देचीनकडून आपल्या महत्त्वाच्या उद्योगधंद्यांमध्ये, महत्त्वाच्या बँकांमध्ये, महत्त्वाच्या संरक्षक विषयक केंद्रांमध्ये किंवा तत्सम अन्य महत्त्वाच्या संस्थांमध्ये जी महत्त्वाची माहिती आहे ती मिळवण्याचा प्रय} आहे.

- सुनील माने

देशभरामध्ये संगणकीय प्रणालीद्वारे आपले व्यवसाय आणि दैनंदिन व्यवहार मोठय़ा प्रमाणात सुरू झाले आहेत. ते सुरक्षित राहण्यासाठी एक व्यवस्था उभी करावी लागते. ही व्यवस्था शासकीय यंत्रणा, कंपन्या, संस्थांनी करावी, त्याचवेळी वैयक्तिक पातळीवर आपणही करावी हे अपेक्षित आहे. म्हणजे बँकेसंबंधित विचार करता, बँकेने ऑनलाइन व्यवहार सुरक्षित ठेवण्याची काटेकोर गरज आहे, त्याचवेळी वैयक्तिक पातळीवर आपणही खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी एक व्यवस्था काम करते. ही सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्यासाठी फायरवॉल आणि संरक्षण प्रणाली बसवल्या जातात. जेणेकरून आपली संवेदनशील व गोपनीय माहिती, आर्थिक व्यवहारांची माहिती किंवा बँकेच्या संबंधित आपले व्यवहार, याशिवाय आपली अन्य माहिती सुरक्षित राहावी हा उद्देश असतो. संगणक अथवा मोबाइलच्या माध्यमातून माहितीची देवाण-घेवाण करत असताना अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो ज्या नंतर व्यापक घात करण्याएवढय़ा प्रमाणावर वाढत जातात.
गलवान खोर्‍यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचे टिकटॉकसह काही महत्त्वाचे अँप्स; जे भारतात वापरले जात होते त्यांच्यावर सरकारने बंदी घातली. डिसेंबर 2017 मध्ये आपल्या संरक्षण मंत्रालयाने यातीलच 42 अँपवर बंदी घातली होती. त्यानुसार संरक्षण विभागातील कर्मचार्‍यांनी ते तेव्हापासूनच वापरण्यावर बंदी आहे. हे अँप वापरकर्त्याच्या फोनमधील सिस्टीममध्ये जाऊन हेरगिरी करत होते. म्हणजेच या अँपद्वारे संबंधित व्यक्तींचे संदेश, व्यवहार यांसह सर्व माहिती जमा करून चीनच्या सर्व्हरला आणि त्यांच्या माहिती केंद्राला पाठवली जात होती, अशी माहिती आपल्याला मिळाली आहे.
जगभरामध्ये संगणकीय प्रणालींच्या सुरक्षेसाठी एक शासकीय व्यवस्था केलेली असते तिला ‘सर्ट’ (सीइआरटी) म्हणून ओळखले जाते. आपल्या देशात कम्प्युटर इर्मजन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया (सर्टइन) या नावाने ती कार्यरत आहे. ही दिल्लीत केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अख्त्यारित काम करते. ही संस्था देशाची सर्व सायबर सुरक्षा व्यवस्था बघते. कोणते अँप चुकीचे आहेत? कोण फिशिंग अटॅक करताहेत? कोण मालवेअर पाठवतेय? यावर लक्ष ठेवून सर्वांना सावध करण्याचे काम ही संस्था करते. त्यानुसारच अँपसंदर्भातील घडामोडींवर लक्ष ठेवून त्यावर आपली संवेदनशील माहिती शत्रू राष्ट्राला, गुन्हेगारांना, हॅकर्सना मिळू नये याची खबरदारी घेते.
भारतात 80 कोटी स्मार्टफोन वापरले जातात. त्यातील अनेकांनी चीनचे हे अँप्स डाऊनलोड केले आहेत. त्याचबरोबरीने चीनमधून आलेले संगणक आणि मोबाइल वापरण्याचे प्रमाणही आपल्याकडे खूप मोठं आहे. संघर्षात आपले जवान शौर्याने सीमेवर तोंड देतील, त्याचप्रमाणे आपल्यालाही सतर्क  राहून देशाची अंतर्गत व्यवस्था सुरक्षित ठेवावी लागेल. कारण अँप्स आणि संगणकामधून आपण जे डाऊनलोड करून ठेवलं आहे ती माहिती शत्रूराष्ट्राकडे जाते. याची आत्ता आणि भविष्यातही काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्याकडे ‘गुगल क्रोम’ हे अँप्लिकेशन आपण सर्च इंजिन म्हणून वापरतो. गुगलचेच हे अँप्लिकेशन कॉपी केले जाते. या कॉपी केलेल्या अँप्लिकेशनवर आपण जी माहिती शोधतो ती पुरवली जाते; पण त्याचप्रमाणे हे अँप्लिकेशन हॅक करून आणि त्याच्यातून काही व्हायरस पाठवला जातो. या माध्यमातून मोबाइलचे, संगणकाचे स्क्रीनशॉट्स काढले जातात, त्याच्या कुकीज तयार केल्या जातात; ज्यायोगे तुमचे पासवर्ड, तुमची इतर माहिती जमा केली जाते आणि ही माहिती त्यांच्या सर्व्हरला आणि त्यांच्या माहिती केंद्राकडे (डेटा सेंटर) पाठवली जाते. यामधून सायबर हल्ले होतात आणि सर्व व्यवस्था बिघडवली जाते ‘सर्टइन’ने याच महिन्यात आपल्याला हा इशारा दिला आहे. 
आपली संगणकीय प्रणाली, आपले मोबाइल जर त्यांना बंद करायचे असतील तर हे त्यांना अवघड नाही. जे अँप्स आता बंद केले आहेत त्या माध्यमातून तुम्ही काय टाइप करताय हे समजून घेतले जात होते आणि या माध्यमातून वेगळ्या प्रकारची हेरगिरी केली जात होती. या माध्यमातून चीन आपल्याबरोबर एक वेगळं युद्ध करायच्या प्रय}ात आहे. म्हणजे सीमेवर, सीमावादाच्या विषयात तर आहेच; पण व्यापाराच्या अनुषंगाने बाजारपेठेवर कब्जा करण्याच्या दृष्टीने, व्यवसाय ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या क्षेत्रात चीन मोठी घुसखोरी करत आहे. 
हे जर रोखायचे असेल किंवा कमी करायचे असेल तर आपल्याला काही गोष्टी सक्रियपणे कराव्या लागतील. आता चीनकडून आपल्या महत्त्वाच्या उद्योगधंद्यांमध्ये, महत्त्वाच्या बँकांमध्ये, महत्त्वाच्या संरक्षक विषयक केंद्रांमध्ये किंवा तत्सम अन्य महत्त्वाच्या संस्थांमध्ये जी महत्त्वाची माहिती आहे ती मिळवण्याचा प्रय} आहे. ज्यांना या संस्थांचे ई-मेल पाहता येतात, ज्यांनी यातील काही महत्त्वाची माहिती डाऊनलोड करून ठेवली आहे, अशा काही महत्त्वाच्या व्यक्तींवर सायबर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. चीन त्यांच्याबरोबरच उत्तर कोरियामधूनही अशा प्रकारचे हल्ले घडवून आणत आहे. उत्तर कोरिया आणि चीनमधून लोकांना प्रलोभन देणारे फसवे मेल (फिशिंग मेल) तयार करून पाठवले जात आहेत. अशाप्रकारचा संदेश अथवा मेल उघडल्यानंतर त्यांनी पाठवलेला व्हायरस आपल्यासंबंधी सगळी माहिती काढायला आणि सिस्टीम खराब करायला सुरुवात करतो. या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत.
आणखी एक प्रकार फोफावत आहे तो म्हणजे व्हेलिंग हल्ला किंवा ‘व्हेल फिशिंग’चा. यामध्ये एखाद्या कंपनीत काम करणार्‍या व्यक्तीला मुख्य अधिकार्‍याच्या नावे ई-मेल पाठवला जातो. मुख्याधिकारी मेलद्वारे एखाद्या विषयाची माहिती त्वरित मागतो असे भासवले जाते. या परिस्थितीमध्ये प्रमुखाने मागितलेली माहिती देणे आपण टाळू शकत नाही म्हणून हा मेल उघडल्यानंतर त्यामधील सर्व व्हायरस आपल्या संगणकामधील अथवा मोबाइलमधील महत्त्वाची माहिती जमा करून ती शत्रूला पाठवली जाते किंवा ती माहिती खराब केली जाते. यात एवढा गंभीर धोका आहे की आपण वेळीच काळजी नाही घेतली तर, आपल्याला ते युद्ध आणि हे युद्ध फार जोरदार पद्धतीने लढावे लागेल. 
(पूर्वार्ध)
mane.sunil@gmail.com
(लेखक हे वरिष्ठ पत्रकार, व्यूहरचनाकार तसेच काही कंपन्यांचे संचालक व आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत.)

Web Title: China's crooked policies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.