भारतीय आकाशातली चिनी आतषबाजी! घटनेमागचं नेमकं रहस्य काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 09:41 AM2022-04-10T09:41:18+5:302022-04-10T09:42:15+5:30

महाराष्ट्रातील जालना, अकोला, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांत; तसेच मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातल्या काही भागांतून आकाशातून पेटत्या वस्तू पडताना दिसल्या. अचानक घडलेल्या या आतषबाजीमुळे चर्चांना उधाण आलं, काय आहे या वस्तू मागचे रहस्य.....

Chinese fireworks in Indian skies! What is the secret behind the incident? Find out ... | भारतीय आकाशातली चिनी आतषबाजी! घटनेमागचं नेमकं रहस्य काय? जाणून घ्या...

भारतीय आकाशातली चिनी आतषबाजी! घटनेमागचं नेमकं रहस्य काय? जाणून घ्या...

Next

- हेमंत लागवणकर
(विज्ञान प्रसारक,
hemantlagvankar@gmail.com)

कोरोनामुळे लावावे लागलेले निर्बंध राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून हटवले आणि नव वर्षदिनी स्वागतयात्रा आयोजित करण्यासाठी परवानगी मिळाली. तयारीसाठी वेळ कमी होता, पण उत्साह आणि जल्लोषाला कमतरता नव्हती. अर्थात, नव वर्षाच्या आदल्या रात्री शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी यंदा झाली नाही. मात्र गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री साडेसात-आठच्या सुमारास काही ठिकाणी नयनरम्य आतषबाजी आकाशात काही जणांनी अनुभवली. 
रात्रीच्या काळोखात अचानक, अत्यंत प्रकाशमान वस्तू आकाशातून वेगाने खाली येत असल्याचं जालना, अकोला, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यात; तसंच मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातल्या काही भागातून दिसलं. काही मिनिटांतच या आतषबाजीचं चित्रण सोशल मिडियावर व्हायरल झालं. अचानक घडलेल्या आकाशातल्या या आतषबाजीमुळे चर्चांना उधाण आलं; काही जणांना हे भलतंच थ्रिलिंग वाटलं तर काही जण हा नजारा बघून भयभीत झाले. अनेक तर्क-वितर्क करायला सुरुवात झाली. काहींना हा उल्कापात वाटला तर काहींनी परग्रहावरून येणाऱ्या या तबकड्या आहेत, असं कवित्व केलं. राज्यातल्या खगोल वैज्ञानिकांकडे, अभ्यासकांकडे विचारणा सुरु झाल्या. त्यातल्या काहींनी निकामी झालेला कृत्रिम उपग्रह कोसळला असावा, अशी भीती व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या लाडबोरी इथं सापडलेल्या अवशेषांच्या निरीक्षणावरून ते न्यूझीलंडमधून प्रक्षेपित उपग्रह प्रक्षेपकाचे निकामी भाग असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला गेला. 
अवकाशातली एखादी वस्तू जेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात प्रवेश करते तेव्हा ती सुमारे ताशी दीड ते दोन लाख किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने खाली यायला सुरुवात होते. अत्यंत वेगाने खाली येणाऱ्या या वस्तूचं हवेबरोबर घर्षण होऊन मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होते आणि ही वस्तू पेट घेते. जर हा उल्कापात असेल तर त्यापासून निघणारा प्रकाश लाल किंवा हिरव्या रंगाचा दिसतो. पण जर ही वस्तू पोलाद, अॅल्युमिनियम अशा धातूंपासून बनलेली असेल तर आकाशातून खाली येताना त्यातून पांढऱ्या रंगाचा प्रकाश बाहेर पडताना दिसतो. गुढीपाडव्याच्या रात्रीदेखील आकाशातून खाली येताना या वस्तूंमधून पांढऱ्या रंगाचा प्रकाश बाहेर पडत असल्याने हे अवशेष कृत्रिम उपग्रहाचे असल्याचं स्पष्ट झालं. 
भारतीय अवकाश संशोधन संस्था, अर्थात, ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी याविषयी खुलासा केला आहे. त्यांच्या मते, शनिवारी अवकाशातून कृत्रिम उपग्रहाचे चार अवशेष पृथ्वीच्या वातावरणात येण्याची सूचना देण्यात आली होती. या चार अवशेषांमध्ये चीनी उपग्रह प्रक्षेपकाचे अवशेष, अमेरिकेच्या आणि लहान अवशेषांचा समावेश असेल, असं सांगण्यात आलं होतं. हे अवशेष साधारण दुपारच्या वेळेत पृथ्वीच्या वातावरणात शिरतील असा अंदाज सुरुवातीला वर्तवण्यात आला होता; पण नंतर वैज्ञानिकांनी नंतरच्या वेळेचा अंदाज दिला. 
वैज्ञानिकांनी दिलेल्या अंदाजानुसार स्टारलिंक १८३१ उपग्रहाचे अवशेष अटलांटिक महासागरात कोसळले; तर कॉसमॉस-इरिडीयम उपग्रहांच्या टकरीमुळे निर्माण झालेले अवशेष इतके लहान होते की जमिनीवर पोहोचण्यापूर्वीच ते जळून खाक झाले. चीनी उपग्रह प्रक्षेपकाचे अवशेष मात्र वातावरणात शिरून आपल्या भूभागावर कोसळले.
उपग्रहांचे अवशेष पृथ्वीवर कोसळण्याच्या घटना दुर्मिळ नव्हेत. चार दशकांपूर्वी, म्हणजे, १९७९ साली स्कायलॅबचे अवशेष हिंदी महासागरात कोसळले होते. आज तीस हजारांपेक्षा जास्त कृत्रिम उपग्रह अवकाशात आहेत आणि त्यापैकी सुमारे तीन हजार उपग्रह निकामी झाले आहेत. त्यामुळे अवकाशातला हा कचरा पृथ्वीतलावर येण्याच्या सर्रास घडतात आणि भविष्यातही घडतील. मात्र, प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचा माग आपल्याला आधीच काढता येतो, हेही तितकंच खरं आहे.

Web Title: Chinese fireworks in Indian skies! What is the secret behind the incident? Find out ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.