सर्कस
By Admin | Published: June 17, 2016 05:08 PM2016-06-17T17:08:28+5:302016-06-17T17:55:29+5:30
भारतातल्या पहिल्यावहिल्या सर्कसची गोष्ट ही खरी तर आपली, साऱ्या भारतीयांचीच गोष्ट आहे, स्वत:ला सिद्ध करण्याच्या आपल्यातल्या अस्वस्थ अतृप्त प्रबळ इच्छाशक्तीची गोष्ट आहे.
सुधारक ओलवे
भारतातल्या पहिल्यावहिल्या सर्कसची गोष्ट ही खरी तर आपली, साऱ्या भारतीयांचीच गोष्ट आहे, स्वत:ला सिद्ध करण्याच्या आपल्यातल्या अस्वस्थ अतृप्त प्रबळ इच्छाशक्तीची गोष्ट आहे.
ही गोष्ट आहे फार पूर्वीची, १८८० च्या सुमाराची. कुर्दुवाडीच्या राजांच्या तबेल्यात घोड्यांना प्रशिक्षण देण्याचं काम अंकलकोपचे विष्णुपंत छत्रे करीत असत. एकदा ते राजांबरोबर इटालियन सर्कस पाहायला मुंबईला (त्याकाळचे बॉम्बे) गेले होते. तिथले कलाकार, त्यांची चपळाई, त्यातला अतीव वेग हे सारं पाहून ते दोघं थक्क झाले. असा काही खेळ त्यांनी पूर्वी कधीच पाहिलेला नव्हता. या साऱ्याचं त्यांना मनस्वी कौतुक वाटलं होतं. पण ते कौतुक, ते अप्रुप फार वेळ टिकलं नाही. सर्कसचे संचालक असलेले विल्यम चिरीनी त्यांना भेटले आणि ते संचालक म्हणाले की, अजून दहा वर्षे तरी भारतीयांना अशी सर्कस उभी करता येणार नाही, जमणारच नाही त्यांना! विष्णुपंत छत्रे यांना हे वाक्य चांगलंच झोंबलं. आणि त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. त्यानंतर त्यांनी अनेक महिने सराव केला, सर्कशीतले खेळ समजून, शिकून घेत तयारी केली आणि २० मार्च १८८० रोजी काही निवडक, आमंत्रित लोकांसमोर पहिलीवहिली सर्कस पेश केली. तिचंच नाव ‘ग्रॅण्ड इंडियन सर्कस’.
दस्तुरखुद्द कुर्दवाडीच्या राजांसमोर हा पहिला खेळ झाला. आणि त्या खेळात छत्रेंच्या पत्नींनीही आपली कला सादर केली. जंगली प्राण्यांना प्रशिक्षण देऊन सर्कशीत खेळ तर त्यांनी केलेच; पण सर्कशीतल्या झुल्यांवर झुलणाऱ्या कलाकारांत एक त्याही होत्या. इथून सुरू झालेला भारतीय सर्कसचा हा प्रवास त्यात आपल्याकडच्या प्राचीन युद्धकलांसह विदेशी कसरतीही सहभागी होत गेल्या.
या सर्कसविषयी मला भयंकर कुतूहल होतं. लहानपणी कधी सर्कस पाहिल्याचं मला आठवत नाही. पण विशीत असताना माझं कुटुंब मुंबईत आलं आणि मी सर्कस पाहायला गेलो.
कोमट मंद प्रकाशातल्या त्या धूळभरल्या तंबूत पहिल्यांदा सर्कस पाहिली तेव्हा मी लहान मुलासारखा अप्रुपानं सारं डोळ्यात गच्चं साठवत होतो. माझ्याकडे तेव्हा छोटुसा फिल्मवाला कॅमेरा होता, काही वेगळं, नवं, त्याक्षणी अद्भुत वाटलेलं मी त्या कॅमेऱ्यात टिपत होतो.
सर्कशीतल्या झुल्यांवर झुलणारे कलाकार आकाशातल्या पक्ष्यांसारखे उडताहेत, वाघसिंहाशी रिंगमास्टर बोलताहेत आणि हे हिंस्त्र प्राणी त्याप्रमाणं वागताहेत, हत्ती स्टुलावर उभं राहण्याचा, तोल सांभाळण्याचा प्रयत्न करतोय.. हे सारं पाहून मी चकित झालो होतो. रॅम्बो सर्कस, बॉँबे सर्कस, एम्पायर सर्कस, द गेट रशियन सर्कस या साऱ्या सर्कशी त्याकाळी शहरातल्या बड्या मैदानांवर डेरे टाकत आणि लोक त्या सर्कशी पाहायला तुफान गर्दी करत असत.
मी कधी कधी सर्कशीचे दिवसाला तीन तीन शो पाहत असे. सर्कशीत खेळ खेळणाऱ्या काहींशी मी दोस्तीही केली होती. सर्कशीत जोकर म्हणून काम करणारे बुटके, ‘मौत का कुआ’मध्ये तुफान वेगानं गाडी चालवणारे ड्रायव्हर यांच्याशी माझी गट्टी जमली होती. त्यांच्यातले काही चेहरे मला अजून धूसर आठवतात. पण आताशा हे सर्कसवाले चेहरे फारसे कुठे दिसत नाहीत, भेटत नाहीत.
लहान मुलांकडून होणारे खेळ, जंगली प्राणी यांच्या सहभागावर बंदी यासह कायदे अधिक कडक होत गेले आणि सर्कसचे खेळ बंदच होऊ लागले. असं वाटत होतं की, सर्कस हा प्रकारच आता लयाला जाईल. तसं थोडं झालंही; पण सर्कसने यातूनही उभं राहण्याचे प्रयत्न केलेच.
सर्कस हा शब्दच जादूई आहे. तीन तास चालणारे खेळ, रंगांची रेलचेल हे सारं फक्त त्या स्टेजवर घडत नाही, तर ते तुमच्या आत कुठंतरी घडतं.
सर्कस तुमच्यातलं लहान मूल जागं करतं. आता हे सारं लिहितानाही मला सर्कशीतला तो सारा जादूई माहोल आठवून प्रसन्न वाटतंय. हे फोटो १८ वर्षांपूर्वीचे आहेत, पण आजही ते पाहून एकेकाळच्या साऱ्या अप्रुपाच्या आठवणी आनंदानं फेर धरतात.
सर्कस हे एक गिमिक आहे असं अनेकांना वाटतं. पण मला वाटतं, रोजच्या नियमित त्याच त्या आयुष्यात सर्कस आश्चर्याचा शिडकाव करते. त्या धुळकट तंबूत, स्वत: झगमगाटात हसरे, नाचरे जोकर्स कधी स्टुलवरून पडतात, एकमेकांवर आपटतात आणि हसत उठून उभे राहतात. प्रेक्षक त्यांच्यासोबत हसतात. हे सारं काय आहे?
जगण्याचं जे तत्त्वज्ञान पुस्तकं आणि तत्त्ववेत्ते सांगतात तोच हा, हसत जगण्याची कला सांगणारा विचार! सर्कस एकच सांगते की, आपलं आयुष्य आपण जादूई करायला हवं. ‘मेरा नाम जोकर’मधला राज कपूर म्हणतो तसं, ‘जिना यहॉँ, मरना यहॉँ, इसके सिवा जाना कहॉँ’..
पुढच्या वेळी आलीच तुमच्या गावात सर्कस तर ती पाहायला नक्की जा. सोबत मुलांना, मित्रांना, कुटुंबाला घेऊन जा! आणि ती जादू थोडी तरी अनुभवाच..