स्वच्छ नदी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 04:02 PM2019-06-10T16:02:04+5:302019-06-10T16:03:14+5:30
सगळी मुलं स्पोर्ट्स कॅम्पला गेली होती. सगळ्या अँक्टिव्हिटीज त्यांनी आनंदानं केल्या; पण पोहणं आवडत असूनही नदीवर जायला सगळ्यांनी नकार दिला. त्याऐवजी त्यांनी वसा घेतला तो आपापल्या भागातील नदी स्वच्छतेचा.
- गौरी पटवर्धन
जंगल बूट्स स्पोर्ट्स कॅम्पला गेलेल्या सगळ्या तीस मुलांचा मस्त ग्रुप झाला होता. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून जरी मुलं आलेली असली तरी त्या सगळ्यांना त्या दहा दिवसांच्या कॅम्पला फारच मजा आली होती. पहिला दिवस एकमेकांची ओळख होण्यात गेला. पण दुसर्या दिवसापासून आठव्या दिवसापर्यंत सगळ्यांनी प्रत्येक अँक्टिव्हिटी मिळून एन्जॉय केली होती. ट्रेकिंग, रॉक क्लायम्बिंग, रॅपलिंग, व्हॅली क्र ॉसिंग, मॅप रीडिंगपासून ते जंगलात जाऊन चूल पेटवून स्वयंपाक करण्यापर्यंत सगळं मुलांनी उत्साहाने केलं होतं. त्यांचा एवढा उत्साह बघूनच आयोजकांनी इतके दिवस कॅम्पमध्ये नसलेली एक अँक्टिव्हिटी अँड केली होती, रिव्हर राफ्टिंगची.
तीस मुलांसाठी रिव्हर राफ्टिंगची सोय करण्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली होती. एवढी मुलं कॅम्प साइटपासून नदीपर्यंत नेण्यासाठी गाड्या अरेंज केल्या होत्या, तेवढय़ा बोट्स, शिकवणारी तज्ज्ञ माणसं, लाइफ जॅकेट्स. आणि हे सगळं त्यांनी केलं कारण त्यांच्या आजवरच्या अनुभवातली ही सगळ्यात उत्साही मुलांची बॅच होती.
सगळी तयारी करून सलीलदादाने मुलांना 8 तारखेला रात्नी शेकोटीपाशी गोळा केलं आणि जाहीर केलं,
‘तुम्हा सगळ्यांचा गेल्या आठ दिवसातला उत्साह बघून आम्ही सगळ्यांनी तुमच्यासाठी एक स्पेशल अँक्टिव्हिटी अरेंज केली आहे. उद्या सकाळी आपण उठलो की नदीवर जायचं. तिथे जाऊन आधी आपण बोटिंग करायचं, राफ्टिंग शिकायचं आणि मग ब्रेकफास्ट करून नदीत भरपूर वेळ पोहायचं !’
एवढं बोलून तो अपेक्षेने मुलांकडे बघत राहिला. त्याला वाटलं होतं, की मुलं खूश होऊन आरडाओरडा करतील. पण झालं भलतंच ! त्याच्या या सांगण्यानंतर एकदम शांतता पसरली. सगळी मुलं एकमेकांकडे बघायला लागली. कॅम्प घेणार्या ताईदादांना काही कळेना. त्यांनी जरा वेळ वाट बघून विचारलं, ‘का रे सगळे गप्प? काय झालं?’
सगळी मुलं एकमेकांकडे बघायला लागली. कोणीच काही बोलेना म्हटल्यावर पाचवीतून सहावीत गेलेली आर्या म्हणाली,
‘मला नाही जायचं नदीत पोहायला.’
‘मलापण नाही जायचं..’
‘मलापण नाही.’
‘मीपण नाही जाणार.’
‘इकडे स्विमिंगपूल नाहीये का?’
‘आपण वेगळं काहीतरी करूया ना!’
सगळ्या मुलांना शांत करून ताई-दादा म्हणाले, ‘तुम्हाला नको असेल तर आपण हा प्रोग्रॅम कॅन्सल करूया. पण तुम्हाला नदीत का जायचं नाहीये ते तरी सांगा!’
परत मुलं एकमेकांकडे बघायला लागली. शेवटी प्रथम म्हणाला, ‘कारण नदीला घाण वास येतो.’
‘हो दादा. आमच्या इथल्या नदीला पण घाण वास येतो.’
‘आम्हाला तर नदीत कोणी पाय पण बुडवू देत नाही. कारण आमच्या नदीत पोहायला गेलं ना, तर अंगाची खूप आग होते.’
‘आमच्या शहरातली नदी तर ग्राउण्डसारखीच दिसते. त्यात पाणीच नसतं.’
‘आमच्या नदीत इतक्या वेली वाढलेल्या असतात की त्यावरून चालत जाता येईल असं वाटतं.’
‘आणि ना, मोठी माणसं काही काही कारण सांगून आम्हाला नदीवर नेतात; पण तिथे काहीच गंमत नसते.’
‘म्हणून आम्हाला नदीवर जायचं नाहीये.’
‘आपण स्विमिंग टॅँकवर जाऊ.’
‘किंवा इथेच काहीतरी मज्जा करू.’
मुलांचं सगळं म्हणणं ऐकल्यावर ताई-दादा एकमेकांकडे बघायला लागले. कारण मुलं सांगत होती ती सगळी कारणं शंभर टक्के खरी होती. खरं सांगायचं तर त्यांनीपण यातल्या अनेक अडचणी सोडवून नदी शोधली होती. कुठेतरी नदीला पाणी नव्हतं, कुठेतरी प्रचंड प्रमाणात जलवनस्पती वाढलेल्या होत्या, कुठे कारखान्यांचं रासायनिक पाणी नदीत सोडलेलं होतं, तर कुठे साचलेल्या पाण्याचा चमत्कारिक वास येत होता. ताई-दादांनी खूप फिरून यातलं काहीही नसलेला, स्वच्छ वाहत्या पाण्याचा प्रवाह असलेला नदीचा भाग शोधून काढला होता. त्यांनी ठरवलं, की अँक्टिव्हिटी जाऊदे; पण निदान या निमित्ताने मुलांना स्वच्छ, छान नदी तरी दाखवूया.
त्यांनी मुलांना सांगितलं की, आपल्याला उद्या जायचंच आहे. मुलं दुसर्या दिवशी काहीशी नाराजीनेच नदीवर गेली. आणि बघतात तर काय? समोरची नदी वाहत्या पाण्याने भरलेली होती, त्यात पाय बुडवल्यावर काही आग होत नव्हती आणि तिथे काही घाण वासपण येत नव्हता.
त्यातल्या काही मुलांनी कधीतरी अशी छान नदी बघितलेली होती. पण बाकीच्या मुलांना मात्न नदी छानपण असते हेच कधी माहिती नव्हतं. मुलांनी मग मनापासून ती अँक्टिव्हिटी एन्जॉय केली. पण ब्रेकफास्ट करायला बसल्यावर त्यातली जरा मोठी मुलं होती ती ताई-दादांना म्हणाली, ‘ही नदी जर छान असू शकते, तर आमची नदी का नाही?’
‘हो ना. आमची नदी छान असेल तर आम्हाला नेहेमी तिथे पोहायला जाता येईल.’
ताई-दादा म्हणाले, ‘तुमची नदीपण अशी छान होऊ शकते. पण त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. ही नदी चांगली आहे, कारण इथे काही लोकांनी ती अशी छान राहावी यासाठी प्रयत्न केले आहेत.’
मुलांना पुढच्या अँक्टिव्हिटीपेक्षा आपली नदी कशी चांगली राखायची हे समजून घेण्यात जास्त इंटरेस्ट होता. कारण त्यांच्या गावाची नदी चांगली झाली, तर त्यांना नेहेमीच तिथे पोहायला जाता आलं असत. पण लहान मुलं काय करू शकतात हे त्यांना माहिती नव्हतं.
ताई-दादांनी त्यांना सांगितलं की, घरी गेलात की आजूबाजूच्या अजून लहान मुलांना गोळा करा. तुमच्या गावच्या महानगरपालिकेच्या अधिकार्यांना पत्न लिहा. त्या पत्नाची पोहच पावती घ्या. नदी स्वच्छ ठेवणं हे नागरिकांचं काम तर आहेच; पण ती प्रशासनाची जबाबदारी आहे. नदीत घाण वास येत असेल, नदीत कारखान्याचं पाणी सोडत असतील तर त्यासाठी आपण तक्र ार करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही तक्र ार लहान, शाळेत जाणारी मुलंसुद्धा करू शकतात.
त्या समर कॅम्पमधून घरी जाताना मुलांनी सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी नेल्या.. एक म्हणजे अनुभव आणि दुसरं म्हणजे जबाबदारीची जाणीव.. आता ती मुलं त्यांच्या त्यांच्या गावातली नदी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला पत्न लिहिणार आहेत. तुम्हाला कशी वाटतीये आयडिया???
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)
lpf.internal@gmail.com