झोपडीतील सूर्यासाठी जिल्हाधिकारी बनले दिवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:34 AM2019-08-18T11:34:30+5:302019-08-18T11:34:48+5:30

सूरज देवानंद डांगे हा यवतमाळ तालुक्यातील बोरगाव या छोट्याशा खेड्यातील मुलगा. वडील रोजमजुरी करणारे. घर म्हणजे झोपडीच. गरिबाघरी जन्मास आलेला सूरज तसा हुशार होता.

collector becomes sun for his life ... | झोपडीतील सूर्यासाठी जिल्हाधिकारी बनले दिवा...

झोपडीतील सूर्यासाठी जिल्हाधिकारी बनले दिवा...

Next

ऑनलाईन लोकमत
अविनाश साबापुरे
यवतमाळ
ही कहाणी सुरू होते २००७ सालापासून. तेव्हा डॉ. हर्षदीप कांबळे यवतमाळात जिल्हाधिकारी होते. प्रशासनावर पकड ठेवण्यासोबतच सामाजिक समस्यांचे भान जपणारे अधिकारी ही त्यांची ओळख. त्यांच्या पुढाकारातून यवतमाळात ‘समतापर्व’ हा विचारांचा उत्सव दरवर्षी साजरा केला जात आहे. प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी संपृक्त झालेल्या या उत्सवात एकदा छोटासा ‘सूरज’ उगवला. पण गरिबीच्या अंधाराने त्याचे तेज झाकोळलेले होते. समतापर्वात या सूरजला संवेदनशील ‘हर्षदीपा’चा स्पर्श झाला अन् परिवर्तन घडले.
सूरज देवानंद डांगे हा यवतमाळ तालुक्यातील बोरगाव या छोट्याशा खेड्यातील मुलगा. वडील रोजमजुरी करणारे. घर म्हणजे झोपडीच. गरिबाघरी जन्मास आलेला सूरज तसा हुशार होता. जिल्हा परिषदेच्या शाळेत कसेबसे शिक्षण सुरू झाले. शाळेतील शिक्षक अशोक राऊत यांनी सूरजची बुद्धिमत्ता हेरली, त्याला प्रोत्साहित केले. पण आयुष्याचे सोने होण्यासाठी एका संधीची गरज असते. ती संधी येतपर्यंत धीर धरावा लागतो. एक दिवस ती संधी आली. यवतमाळात ‘समतापर्वा’चे आयोजन झाले. वेगवेगळ्या कार्यक्रमांसोबतच वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आली. विषय होता भारताचे संविधान. सूरजने त्यात भाग घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रमाण मानून सूरज बोलला. या एका भाषणाने डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सूरजमधला ‘सूर्य’ ओळखला. सूरजला स्पर्धेत पहिला क्रमांक आला. झोपडीतील या मुलाच्या पाठीवर थेट जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुकाची थाप दिली. पण कोरडे कौतुक करून थांबणारे डॉ. कांबळे नव्हते. त्यांनी पारितोषिक तर दिलेच, पण या लेकराला आपल्या बंगल्यावर रीतसर स्नेहभोजनाचे निमंत्रणही दिले. त्यावेळी छोटासा सूरज म्हणाला होता, ‘सर मला मोठे व्हायचे आहे.’ अन् डॉ. कांबळेंनीही त्याला ‘मी तुझ्यासोबत आहे’ अशा शब्दात आश्वस्त केले.
तेथून सुरू झाला सूरजचा उर्ध्वगामी प्रवास. काही दिवसातच बेलोरा (ता. घाटंजी) येथील जवाहर नवोदय विद्यालयात सूरजची निवड झाली. दहावीची परीक्षा प्राविण्यासह उत्तीर्ण केल्यावर सूरजला हैदराबादच्या नारायणा महाविद्यालयात आयआयटी जेईईसाठी पाठविण्यात आले. त्यासाठीही डॉ. कांबळे यांनी आर्थिक मदत केली. आयआयटी केल्यानंतर आता एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एमएस करण्यासाठी सूरजला अमेरिकेला जायचे होते. पुन्हा परिस्थिती आडवी आली. पण त्याने पुन्हा डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सूरजला थेट मुंबईत बोलावून घेतले. अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात शिकण्याचा जो काही खर्च असेल तो करण्याची हमी दिली. प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करत सूरजला परदेशी जाण्याची परवानगी, पासपोर्ट व इतर गोष्टी करून दिल्या. आणि ९ आॅगस्ट या क्रांतिदिनी सूरज उच्च शिक्षणासाठी अमेरिकेकडे झेपावला.

Web Title: collector becomes sun for his life ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.