कम आॅन, हिट मी..

By admin | Published: August 20, 2016 08:50 PM2016-08-20T20:50:23+5:302016-08-20T20:50:23+5:30

समोर दिसणारी प्रत्येक वस्तू तिच्यातील नाद शोधण्याचेआमंत्रण द्यायची... मग ती मी वाजवत बसायचो. अम्माची भांडी, डबे, बादल्या, खराटे.. अक्षरश: काहीही. रियाज वगैरे म्हणाल तर हाच. नादाच्या अनिवार ओढीतून निर्माण झालेला. आणि ती प्रत्येक वस्तू जणू मला म्हणायची..

Come on, hit me .. | कम आॅन, हिट मी..

कम आॅन, हिट मी..

Next
- शिवमणी

जन्माला येणारे प्रत्येक मूल आपले रंगरूप आणि आपली ओळख घेऊन जन्माला येते म्हणे, माझ्या बाबतीत म्हणाल तर मी माझ्याबरोबर माझा नाद घेऊन जन्माला आलोय. ड्रमचा नाद आणि ड्रम वाजवण्याचा नाद. समोर येणारी कोणतीही गोष्ट मला डोळ्यांना दिसते कमी आणि ऐकू येते अधिक...! कानानेच मला तिची ओळख अधिक चांगली होते म्हणा ना..! हातात फुलांचा गुच्छ आला की त्या फुलांच्या सुगंधाबरोबर माझ्या हाताची बोटे त्या फुलांभोवती असलेल्या कागदाला हाताळू लागतात, माझ्याही नकळत. बोटांच्या चिमटीत पकडून कागदाचा पोत बघता-बघता मला जाणवू लागतो त्यातून हलके-हलके उमटणारा नाद. हा चुटचुटणारा आवाज कशाचा? अगदी ओळखीचा... अगदीच ओळखीचा. येस, हा आवाज जंगलात पेट घेत असलेल्या वणव्याचा. जळणाऱ्या कोरड्या गवताचा... अगदी लक्ष देऊन ऐकले तरच कानावर येणारा पण डोळे मिटले तर आसपास नक्की कुठेतरी वणवा पेटतोय असे वाटायला लावणारा...! 
प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा म्हणून अंगभूत नाद असतो आणि समोर दिसणारी वस्तू मला जणू आमंत्रण द्यायची, तिच्यातील नाद शोधण्याचे. ती जणू मला म्हणायची, ‘कम आॅन, हिट मी..’ 
हे वेड मला लागले कधी ठाऊक नाही. हे मात्र नक्की आठवतेय अगदी लहान वयापासून घरात असलेला ड्रम वाजवण्याची मला एक अनिवार ओढ असे. 
माझे वडील एस. एस. आनंदन हे चेन्नईमधील एक मान्यवर आणि अतिशय व्यस्त ड्रमवादक. इलियाराजासारख्या अनेक मान्यवर कलाकारांना साथ करणारे. पण तरी मला मात्र ड्रम वाजवणे जाऊदे, त्याच्याकडे बघण्याचीही परवानगी नव्हती. आपल्या मुलाने शहाण्या मुलाप्रमाणे शाळेत जाऊन, मिळेल त्या पगाराच्या पैशावर पोट भरणारी नोकरी करावी हे मध्यमवर्गीय स्वप्न माझ्या वडिलांना अधिक सुरक्षित वाटत असावे. ड्रमर म्हणून काम करणे हे शब्दश: हातावर पोट घेऊन जगण्यासारखे आणि उद्याची कोणतीच हमी नसलेले. पण वडिलांनी थांबवले तरी माझ्या हातांची ओढ मला स्वस्थ बसू देत नव्हती. मग वडील साथीला गेले की घरात त्यांचा जो कोणता ड्रम असेल तो किंवा जी वस्तू दिसेल ती मी वाजवत बसायचो. अम्माची भांडी, डबे, बादल्या, खराटे अक्षरश: काहीही. रियाज वगैरे म्हणाल तर हाच! नादाच्या अनिवार ओढीतून निर्माण झालेला. एकदा अगदी अपघातानेच वडिलांनी माझे ड्रमवादन ऐकले आणि माझ्या हाताची सफाई बघून ते चकितच झाले. तेव्हा मी जेमतेम पाच-सहा वर्षांचा होतो पण माझ्या वादनातील सफाई वयाच्या मानाने कितीतरी प्रगल्भ दिसत होती. हा हात वयाच्या पलीकडे असलेली ओढ दाखवणारा आहे आणि कुणी थांबवून थांबणारा नाही हे वडिलांना जाणवले आणि मला ड्रम वाजवायची परवानगी मिळाली. माझा अधिकृत रियाज सुरू झाला. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. ड्रम वाजवणे हा माझ्यासाठी रियाज कधीच नव्हता, तर माझ्या जगण्यातील सगळा आनंद होता.
एकदा वडिलांसाठी स्टुडिओमध्ये डबा घेऊन गेलो तेव्हा नोएल ग्रांट या ड्रमरचा ड्रम प्रथम ऐकला आणि थरारलो. आजवर न ऐकलेले असे काही फार वेगळे होते या वादनात. नेमके काय? मीच मला विचारले. मी जे वाद्य वाजवतो त्यात एखादी वेगळी शैली असू शकते असा विचारही कधी आजवर मनात आला नव्हता आणि अशा वेगळ्या शैलीची ओळख होण्याची संधीही. इथे तो वेगळा प्रवाह दिसत होता. त्यातील तंत्र मला समजत नव्हते, पण परिणाम जाणवत होते. वडिलांच्या वादनात पायाला वेग देणारा जोश होता, गती होती. पण रक्ताला उधाण आणणारी झिंग त्यात नव्हती, जी या वादनातून उसळून येत होती. या वेगळ्या शैलीने मला अंतर्मुख केले. स्वत:कडे, माझ्या वादनाकडे चिकित्सेने बघण्याची गरज माझ्यात जागी केली. कलाकाराला केवळ त्या वाद्याची ओढ असणे पुरेसे नाही, त्या वादनाला विचाराची पक्की बैठक हवी आणि नव्या प्रवाहांशी जुळवून घेण्याची लवचिकता. ड्रमर म्हणून जगण्याची एक वेगळी वाट माझ्यासमोर उलगडत होती. या वाद्यातून नव्या संस्कृतीची ओळख होत होती, एका परीने ते माझ्यासाठी नवे शिक्षणच होते. वेगळ्या संस्कृतीची पार्श्वभूमी घेऊन येणाऱ्या कलाकारांचे वादन ऐकणे, त्याकडे डोळसपणे बघणे हे कलाकार म्हणून शहाणे होण्यासाठी आवश्यक आहे, हे मला त्या एका अनुभवाने शिकवले. 
- वडिलांना झालेला अपघात!
या अपघाताने लहानपणीच मला ड्रम वाजवायला उभे राहावे लागले. या क्षणाने मला कितीतरी अशा लोकांपर्यंत नेले जे एरवी फार उशिरा माझ्या आयुष्यात आले असते. त्यात कोण नव्हते? माझ्या प्रत्येक कामाकडे चिकित्सक नजरेने बघणारी संगीतकार एस. पी. बालसुब्रमण्यमसारखी मान्यवर व्यक्ती होती आणि टी. के. मूर्थी, उमयापुरम शिवरामन सारखे ज्येष्ठ गुरू होते, जे मला मृदंग शिकवण्यास कमालीचे उत्सुक होते. पण आता मला काहीही नवे शिकण्यास वेळ नव्हता आणि प्रत्येकासाठी माझे एकच उत्तर होते, ‘मला आता वेळ नाही’. 
अनेक स्टुडिओंमध्ये सुरू असलेली माझी रेकॉर्डिंगची कामे आणि ठिकठिकाणचे सोलो कार्यक्रम, शिवाय बालसुब्रमण्यम यांच्याबरोबर सुरू असलेले दौरे, दिवस कधी संपत होते समजत नव्हते. वडिलांनी खांद्यावर टाकलेली जबाबदारी त्यावेळी जराही उसंत घेऊ देत नव्हती आणि ड्रमरने असेच जगायचे असते असे मला वाटू लागले होते. या काळात फक्त एकच गोष्ट मी कोणतीही सबब न सांगता करीत होतो, चेन्नईमध्ये येणाऱ्या प्रत्येक परदेशी संगीतकाराला मी आवर्जून भेटायला जात असे, आणि तो ड्रमर असेल तर नक्कीच. 
याच निमित्ताने मला इस्तंबूल ओके टेमीस नावाचा ड्रमर भेटला. भारतातील गणेश बिडीवर फिदा असलेला आणि एक वेगळ्याच आकाराचा, कमंडलूसारखा दिसणारा ड्रम आपल्या बरोबर आणणारा. याच टेमीसने माझ्यासाठी इस्तंबूलमधून पाठवलेली भेटवस्तू आणण्याच्या निमित्ताने मी मुंबईत गेलो, जेव्हा मला मुंबई भेटली आणि मुंबईला शिवमणी नावाचा एक ड्रमर...! पण त्याआधी झाकीर नावाच्या जादूगाराला भेटायचे होते, हा झाकीर कोण हा प्रश्न घेऊन.... 
(क्रमश:)

मी अधिक जोमाने शिकावे यासाठी एक दुर्दैवी घटना पुढच्याच वळणावर उभी होती... अर्थात घर आपल्या खांद्यावर तोलून धरणाऱ्या वडिलांना झालेला अपघात आणि तेही त्यांच्या मुठीत कामाच्या अनेक संधी असताना. चालत्या गाडीला एकाएकी ब्रेक लागून सैरभैर होऊन डोळ्यापुढे अंधारी यावी अशी ती अवस्था होती. पण वडील शांत होते. माझ्या पाठीवर हात ठेवीत ते म्हणाले, ‘जा, माझी उणीव भरून काढ. तुला पेलेल ही जबाबदारी...!’ हा त्यांचा आत्मविश्वास होता की मला दिलेला आशीर्वाद? आतापर्यंत हौस म्हणून लोकांपुढे ड्रम वाजवणारा हा मुलगा वयाच्या तेराव्या वर्षी स्टुडिओमध्ये जाऊ लागला. आयुष्य आरपार बदलून टाकणारा हा क्षण होता. 

शब्दांकन
- वन्दना अत्रे

vratre@gmail.com

Web Title: Come on, hit me ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.