शहाणं करणारा रेडिओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 08:28 AM2018-05-06T08:28:22+5:302018-05-06T08:28:22+5:30
जत तालुक्यातल्या जालिहाळ बुद्रुक परिसराचा कायापालट घडवण्यासाठी झटणाºया ‘येरळावाणी ९१.२ एफएम’ या कम्युनिटी रेडिओचा अफलातून प्रयोग
- श्रीनिवास नागे
सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याचा पूर्वभाग. जत शहरापासून चाळीस किलोमीटरवर जालिहाळ बुद्रुक. दुष्काळ पाचवीला पूजलेला. दारिद्र्य, अशिक्षितपणा, निरक्षरता, बेरोजगारी फणा काढून उभे! हे सगळं आता गावकऱ्यांनीच बदलायला घेतलंय. - आणि त्यासाठीचं माध्यम आहे रेडिओ !
संखपासून पाच किलोमीटरवरच्या बोºयाळ वस्तीवर जाऊन पाहा. पोरींना का शिकवावं, बायांनी ‘पिशव्या’ का काढू नयेत, शेतात कुठलं पीक लावावं... - हे सगळं रेडिओच्या सल्ल्यानं चालतंय! आणि ते सांगणारेबी गावातलेच! वाड्या-वस्त्यांवरल्या बायाबापड्याही स्टुडिओत जाऊन कानाला हेडफोन लावून माईकवर फडाफडा बोलतात, कॉम्प्युटरची बटनं दाबून रेडिओ चालवतात...
सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याचा पूर्वभाग. जत शहरापासून चाळीस किलोमीटरवरचा दुर्गम भागातला जालिहाळ बुद्रुकचा परिसर. दुष्काळ पाचवीला पूजलेला. दारिद्र्य, अशिक्षितपणा, निरक्षरता, बेरोजगारी हे इथले महत्त्वाचे प्रश्न. राजकीय आणि प्रशासकीय औदासीन्य तर नेहमीचंच. उण्यापुºया दहा-पंधरा किलोमीटरवर कर्नाटकची सीमा. गावं महाराष्ट्रात; पण कानडीबहुल. विकासाचा मुख्य प्रवाह त्यांच्यापासून कोसो मैल दूर! या भागात सर्रास बालविवाह उरकले जायचे. काही वर्षांपूर्वी पोरीचं लग्न लहानपणीच सख्ख्या मामाशी लावून देण्याचं पक्कं ठरवणारे अशिक्षित आई-बाप आज मात्र म्हणतात, ‘पोरगीला शिकवून शिकलेलाच नवरा करून देणार बघा!’
***
दोनवेळच्या खाण्याची ददात असणाºया बाईच्या पोटाला खंडीभर पोरं, त्यात ती अशिक्षित, कुढलेली. त्यामुळं लहानग्यांचं कुपोषण ठरलेलंच. काहीजणी सततच्या बाळंतपणात अडकलेल्या, तर काहीजणी वेळेआधीच गर्भाशयाच्या पिशव्या काढून बसणाºया. आता बायांना कळायला लागलंय, गर्भार असताना काय काळजी घ्यायची, कुपोषण कसं थांबवायचं आणि ‘आॅपरेशन’ कधी करायचं ते!
***
आता इथला भूमिपुत्र दुष्काळाला टक्कर देत फोंड्या माळावर द्राक्ष, डाळिंबबागांसोबत ड्रॅगन फ्रूटसारखी शेतीही करू लागलाय! कॉन्ट्रॅक्ट शेतीतून माळरानावरच्या शेवगा, लाल भोपळ्याच्या उत्पादनात उतरू लागलाय. आणि हो... जेमतेम आठवीपर्यंत शिकणारी पोरं-पोरी आता पदवीनंतर व्यवसाय कौशल्याचे धडे घेऊन शहरात जाऊन पंधरा-वीस हजार रुपये कमवू लागलीत.
***
हा बदल केवळ गेल्या पाच वर्षांतला. ‘येरळावाणी’ नावाच्या कम्युनिटी रेडिओच्या प्रयत्नांतून साकारलेला. सहा वर्षांपूर्वी म्हणजे ३१ जुलै २०११ रोजी सांगलीतल्या येरळा प्रोजेक्ट्स सोसायटीनं जत पूर्व भागातल्या जालिहाळ बुद्रुक इथं ‘येरळावाणी ९१.२ एफएम’ या कम्युनिटी रेडिओची मुहूर्तमेढ रोवली. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या हस्ते उद्घाटन झालं. येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी या ‘एनजीओ’चे प्रमुख एन.व्ही. देशपांडे यांची ही भन्नाट संकल्पना. त्यांना मोठी साथ मिळते अपर्णा कुंटे यांची. त्या रिसोर्सेस आणि रिसर्च टीमच्या प्रमुख, तर उदय गोडबोले प्रमुख कार्यक्रम अधिकारी आहेत.
खरं तर ‘येरळा’नं १९९८ पासून जत तालुक्यातल्या पूर्व भागातल्या २२ गावांच्या विकासासाठी काम करण्यास सुरुवात केली होती. त्यातूनच शिक्षण, शेती, आरोग्य, महिला विकास अशा विषयांवर उद्बोधक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेता यावेत, यासाठी ‘येरळावाणी’ची निर्मिती झाली.
एन. व्ही. देशपांडे सांगतात, ‘येरळा’चं काम, विकासाचे मुद्दे लोकांच्या कानावर जाण्यासाठी ‘येरळावाणी’ सुरू झाली. लोकहिताच्या कामांचा प्रचार आणि प्रसार कार्यकर्त्यांमार्फत व्हायचा; पण त्यातून काहीतरी सुटून जायचं. त्यातूनच मग कम्युनिटी रेडिओचं सुचलं. अर्ज केला, परवाना मिळाला. स्टुडिओ, टॉवर, ट्रान्समिटर, संगणक यासाठी ‘आत्मा’नं हात दिला.
रेडिओचा निर्णय झाला; पण प्रश्न होता दर्जाचा. कारण इथल्या लोकांनी रेडिओ स्वीकारण्याआड अडथळा होता भाषेपासून स्थानिक आवाजापर्यंतचा. कानडी आणि मराठी तेही तिथला ‘टिपिकल’ हेल काढून बोलणारी, संवाद साधणारी टीम हवी होती. मग शोध सुरू झाला. त्यातून चुणचुणीत टीम मिळाली. त्यांना तयार करण्यात आलं. कार्यक्रमांत लोकांना सहभागी करून घ्यायचं, दररोज त्यांच्या गरजांचे विषय घ्यायचे म्हणजे स्टुडिओ तिथंच उभारणं क्रमप्राप्त होतं. कारण जत पूर्वभाग सांगली शहरापासून दीडशे किलोमीटरवर ! जालिहाळ बुद्रुक इथं संस्थेचा कॅम्प्स होताच. त्यामुळं तिथंच एक स्टुडिओ उभारण्याचं ठरलं. कार्यक्रमांचं स्वरूप, रूपरेषा ठरवणं, एडिटिंग-रेकॉर्डिंगवर हात फिरवणं, कार्यक्रमांना आवश्यक त्या पूरक गोष्टी पुरवणं, सांगली-मिरज परिसरातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन देणं, त्यांचा सहभाग घेणं यासाठी मात्र सांगलीत दुसरा स्टुडिओ उभारला गेला. सगळी मिळून १२-१३ जणांची टीम. त्यात सफाईदार कानडी बोलणारे पाचजण.
आता २२ गावांमध्ये ‘येरळा’ काम करते; पण ८० गावांतले जवळपास ८० हजारांवर श्रोते ‘येरळावाणी’नं मिळवलेत. या मागास गावांतील लोकांशी संवाद साधून त्यांच्या वैयक्तिक विकासाला प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांचा सार्वजनिक विकासातील सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. रेडिओवरच्या कार्यक्रमांचं स्वरूप तसंच असतं. सततच्या दुष्काळामुळं आलेलं नैराश्य दूर करण्यासाठी काहीसे मनोरंजक कार्यक्रम, शेती, युवक, महिला सबलीकरण, हवामान, आरोग्य, शिक्षणविषयक कार्यक्रमांचा त्यात समावेश असतो. तोट्यात जाणाºया शेतीला पर्याय म्हणून नोकरी, स्वयंरोजगार याबाबतच्या मार्गदर्शनावर अलीकडे जादा भर दिला जातोय. विशेष म्हणजे या कार्यक्रमांत लोकांनाच सहभागी करून घेऊन त्यांना हवं तसं व्यक्त होण्यास सांगितलं जातं.
सुरुवातीपासूनच सगळे कार्यक्रम कानडी-मराठीत होतात. त्यावरची सगळी चर्चा तिथल्या बोली भाषेत ! कानडीमिश्रित मराठी आणि मागासलेपणाचा न्यूनगंड चिकटल्यानं तिथल्या लोकांना बोलतं करणं कौशल्याचं होतं. त्यासाठी तिथलीच टीम निवडल्यानं काम सोपं झालं. आज बिनधास्त बोलणारी टीम तर तयार झालीच; पण कार्यक्रमांत भाग घेणारेही बिनदिक्कत बोलू लागलेत, मनातलं काहीबाही स्पष्टपणे सांगू लागलेत. स्टुडिओतली टीम तंत्रज्ञानात तरबेज झालीच, पण वाड्या-वस्त्यांवरल्या बायाबापड्याही स्टुडिओत जाऊन कानाला हेडफोन लावून माईकवर फडाफडा बोलू लागल्या, कॉम्प्युटरची बटनं दाबून रेडिओ चालवू लागल्या ! मराठी कानावर पडल्यावर कावºया-बावºया होणाºया कानडी बायका रेडिओ ऐकून मराठी बोलू लागल्या!!
आधी श्रोते मिळवण्याची धडपड होती. त्यासाठी ‘येरळावाणी’नं हजारभर रेडिओ सेट वाटले. गाडीवर बॅनर लावून प्रचार केला. नंतर मोबाइलनं प्रचाराचं काम चोख पार पाडलं. रेडिओ ऐकून माणसं ‘शहाणी’ झाल्याचं बघायचं असेल तर या भागात जावं. रेडिओवरून सांगितलं गेलं आणि माणसांच्या कृतीत बदल झाला. या माळरानावर साप, विंचू मुबलक. ते चावल्यावर आधी हमखास वैदूकडं नेलं जायचं. आता रेडिओवरचा सल्ला ऐकून सजगता वाढल्यानं थेट आरोग्य केंद्राचा, डॉक्टरचा रस्ता धरला जातोय. आरोग्याच्या प्रश्नांवर ‘येरळावाणी’नं चार वर्ष काम केलं. डॉक्टरांच्या सल्ल्यांचा सातत्यानं ‘डोस’ दिला. आता आरोग्याच्या, शेतीच्या, शिक्षणाच्या प्रश्नांवर काहीजण तर ‘येरळावाणी’त फोन करून विचारतात, कुठं जाऊ, काय करू म्हणून ! त्यामुळं ‘आशा’ वर्कर्सच्या कामालाही हातभार लागतोय. रेडिओवरचा सल्ला, कार्यक्रम ऐकून क्षयरोगावर योग्य उपचारांसाठी आरोग्य कर्मचाºयांकडं रांग लागू लागली. त्यामुळं इथलं क्षयरोग्यांचं प्रमाण पाच-दहा टक्क्यांवर आलंय.
आता बायकांना तंत्रज्ञानाची शिकवणीही सुरू झालीय. काही दिवसांपर्यंत या बायकांना मिक्सरचा वापरही करायचं कळत नव्हतं. तिथं आता त्यांना घरात लागणाºया इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधलं बरचसं कळू लागलंय. बायकांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण याबाबत गावागावात, घरोघरी जाऊन समजावणं शक्य नव्हतं. अशावेळी कम्युनिटी रेडिओ उपयोगाला आला. या प्रश्नांवर संवादात्मक कार्यक्रम, नभोनाट्य रचली गेली. काही कार्यक्रमांत तर असं जिणं अनुभवणाºयांना सामावून घेतलं गेलं. विधवा-परित्यक्त्यांना सामाजिक पत वाढवण्यासाठी बळ दिलं गेलं... मानसिकतेतला हा बदल हीच या कम्युनिटी रेडिओची फलश्रुती.
या भागात भूमिहीन, अल्पभूधारक शेतमजूर तर दिसतातच; पण चाळीस-पन्नास एकरावर रान असूनही पाणी नसल्यानं दुसºया शेतात राबायला, पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोड करायला जाणाºयांची संख्याही मुबलक. दरवर्षी उसाच्या गळीत हंगामात इथल्या ५० ते ५५ टक्के लोकवस्तीचं स्थलांतर होतं. आधल्या वर्षी टोळीच्या मालकाकडून उचल घ्यायची आणि पुढच्या वर्षी ऊसतोडीला जाऊन ती फेडायची, हे दुष्टचक्र मागं लागलेलं. विशेष म्हणजे दुष्काळ पडला की इथं पोरांची लग्नं पटापट होतात. कारण ऊसतोडीसाठी त्याला आयती जोडीदारीण मिळते ! अशा ऊसतोड मजुरांना, अल्पभूधारकांना रेडिओनं ऊर्जा दिली. पाणी-पीक व्यवस्थापनापासून मार्केटिंगपर्यंतच्या टिप्स मिळाल्या.
या भागात भूमिहीन, अल्पभूधारक शेतमजूर तर दिसतातच; पण चाळीस-पन्नास एकरावर रान असूनही पाणी नसल्यानं दुसऱ्या शेतात राबायला, पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोड करायला जाणाºयांची संख्याही मुबलक. दरवर्षी उसाच्या गळीत हंगामात इथल्या ५० ते ५५ टक्के लोकवस्तीचं स्थलांतर होतं. आधल्या वर्षी टोळीच्या मालकाकडून उचल घ्यायची आणि पुढच्या वर्षी ऊसतोडीला जाऊन ती फेडायची, हे दुष्टचक्र मागं लागलेलं. विशेष म्हणजे दुष्काळ पडला की इथं पोरांची लग्नं पटापट होतात. कारण ऊसतोडीसाठी त्याला आयती जोडीदारीण मिळते ! अशा ऊसतोड मजुरांना, अल्पभूधारकांना रेडिओनं ऊर्जा दिली. पाणी-पीक व्यवस्थापनापासून मार्केटिंगपर्यंतच्या टिप्स मिळाल्या. ‘हॉर्टिकल्चर’चे धडे दिले. नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली.
सततच्या दुष्काळाला टक्कर देण्यासाठी शेतीवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी या रेडिओनं ठरवलं. प्रबोधन केलं. तसे कार्यक्रम आखले. दहावी-बारावी शिकलेल्या पोरांना कौशल्य प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. पोरांना जत, सांगली, मिरजेतल्या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळवून दिले. आता त्यातली पोरं शहरात नोकºया करू लागलीत. पोरीबाळी अंगणवाड्यांचं ‘ट्रेनिंग’ घेऊन काम करू लागल्यात. आधी घरातला थोरला पोरगा आठवीपर्यंतच शिकायचा. कारण पुढं शिकून नोकरीसाठी शहरात गेल्यावर शेतीकडं कुणी बघायचं, ही बापाला भीती. त्यामुळं आठवीनंतर त्याला शाळेतून काढून शेतीत गुंतवलं जायचं. आता तिशी-चाळिशीतली पिढी पोराबाळांच्या शिक्षणाबाबत सजग बनलीय, पोरांचं शिक्षण उसनवार करून पूर्ण करू लागलीय.
***
हे थक्क करणारं अचाट काम पाहण्यासाठी आपण पोहोचतो, संखपासून पाच किलोमीटरवरच्या बोºयाळ वस्तीवर. तिथं कुडाच्या खोपटात भारती बिराजदार राहतात. गाव आसंगी तुर्क. शिक्षण ‘एफवाय’पर्यंत झालेलं. भारतीताई गाव सोडून नवºयासोबत इथं येऊन राहिल्यात. माहेर कर्नाटक. शिलाईकाम येत होतंच. नवºयाच्या मित्रानं या दोघांना रेडिओ दिला आणि त्या रेडिओच्या रूपानं भारतीतार्इंना हितगूज साधायला कुणीतरी मिळालं. ‘येरळावाणी’ ऐकता-ऐकता त्या फॅशनेबल कपडे शिवायला लागल्या. आज त्यांच्याकडं लग्नसमारंभासाठी महिलांच्या कपड्यांचे गठ्ठे येऊन पडतात ! विरंगुळ्यासाठी त्यांनी रेडिओवरच्या प्रश्नमंजूषेत भाग घेतला. दिलेल्या नंबरवर संपर्क साधला आणि बघता बघता त्या रेडिओवरील पाहुण्या होऊन गेल्या. आरोग्य, आहार, कृषी, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालनावरील कार्यक्रम त्या केवळ ऐकतच नाहीत, तर त्यात भागही घेतात. दर महिन्याला स्टुडिओत जातातच. आधी त्या भ्यायच्या... ती भीती गेली आणि ‘कॉन्फिडन्स’ आला. कसं बोलायचं, कसं रहायचं हे रेडिओनं शिकवल्याचं त्या सांगतात. आसपासच्या बायकांना घेऊन एकत्रित रेडिओ ऐकल्यानं वस्ती सुधारलीय. या वस्तीवर घराघरात ‘टॉयलेट’चा वापर होतोय.
याच वस्तीवरची ज्योती डोळ्ळी ही बाविशीतली तरुणी. सावळा वर्ण; पण तरतरीत चेहरा. आई-बापाशी भांडून जिद्दीनं बी. एस्सी.पर्यंत शिकलीय. आठवीनंतर संख, जतला जाऊन शिक्षण घेतलंय तिनं. आता एमपीएससी, यूपीएससीचा अभ्यास करतेय. चुलीवर भाकरी थापतानाही रेडिओवरचे सामान्यज्ञानावरचे कार्यक्रम न चुकता ऐकते. त्यात भागही घेते. नोकरी लागल्यानंतरच लग्न करणार, हा निश्चय. इतका धीटपणा कसा आला, असं विचारल्यावर सांगते, ‘या रेडिओमुळं आलाय तो...’
संखमधला उदय कुलकर्णी हा तरणाबांड पोरगा सांगतो, आम्ही शेतकरी. सोबत मोबाइल दुरुस्तीचं दुकान टाकलंय. तीन वर्षांपूर्वी रेडिओवरचा सल्ला ऐकून भावानं मिरची लावली आणि फायदा झाला. तेव्हापासून सल्ला ऐकूनच शेती करतोय. लावण, औषध फवारणीपासून काढणीपर्यंत तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळतंय. भाऊ शेतीपंपाचा स्वीच मोबाइलवरून आॅपरेट करतोय... उदय घडाघडा सांगत असतो. त्यामागं असते, निखळ अप्रूप आणि निवळशार आपुलकी...
खंडनाळचे महादेव सोपान पवार. वय ४५. शिक्षण चौथीपर्यंत; पण प्रगतिशील शेतकरी. दोन एकर पेरू, पाच एकर राजेवाडी चिक्कूची बाग, तरारून आलेलं तूर, भूईमूग, सूर्यफुलाचं रान, सिरोही जातीच्या तिसेक शेळ्या आणि पन्नासवर गिरिराज कोंबड्यांचे मालक. चार वर्षांपासून रेडिओ ऐकू लागले. बांधावरचा सल्ला घरबसल्या घेऊ लागले. ठिबक सिंचनाचे फायदे, लसीकरण, रोगराई, औषधं कळत गेली. त्यातून बाग फुलवली, शेळ्या-कोंबड्यांचा घाट घातला. आता स्वत:च इतरांना सल्ला देतात. जवळपास पाणी नव्हतं, तेव्हा ‘येरळावाणी’च्या सल्ल्यातून टँकरनं पाणी देऊन बाग जगवली. नंतर माहिती घेऊन शेततळी काढली. सेंद्रिय आणि लेंडीखतावर भर. मधल्या काळात रेडिओच्या टीमसोबत हैदराबाग परिसरात जाऊन दुष्काळी शेतीचा अभ्यासही करून आलेत. पंचायतराज व्यवस्थेवरील कार्यक्रम ऐकून आता ते या भागातले ‘की पर्सन’ बनलेत ! रेडिओवर काही ऐकलं की, आसपासच्या सगळ्यांना सांगतात. जिथं संवादही होऊ शकत नाही, तिथं सुसंवाद तर लांबच. अशावेळी रेडिओ फायद्याचा ठरतो. तो ऐकून शहाणे बनलेले ‘की पर्सन’ इथं उपयोगाला येतात...
पांडोझरीच्या सुरावती दत्तात्रय गडदे रेडिओमुळं अंगणवाडीसेविका बनल्यात. शिक्षण दहावी. ‘जागर तिच्या आरोग्याचा’ कार्यक्रम ऐकला आणि त्यांना बाईचं आरोग्य कळू लागलं. गरोदर असताना नियमित तपासणी, चौरस आहार याचं महत्त्व समजलं आणि ते सुरावतींनी आचरणात आणलं. नंतर त्यांनी स्वत:च आरोग्यविषयक कार्यक्रम केले. तेरा माणसांचं कुटुंब सांभाळणाºया सुरावतींची वाणी एकदम स्वच्छ. खणखणीत मराठी आणि तेही धीटपणानं बोलतात. शेती आतबट्ट्यात आली की, शेजारणीनं ‘देव डब घातल्यानंच’ नुकसान झाल्याची अंधश्रद्धा या भागात होती. पण रेडिओनं त्यामागची कारणं दाखवून देऊन विज्ञानवादी बनवलं. त्यावर सुरावती यांनी स्वत:च अंधश्रद्धा निर्मूलनावरील कार्यक्रम तयार करून ऐकवले. सुरावती यांचं लग्न लहानपणीच ठरलेलं; पण पोटाला असलेल्या दोन लेकींना पूर्ण शिकवूनच लग्नाचं बघायचं, असं त्यांनी घरात सगळ्यांना बजावून सांगितलंय.
तिकोंडीच्या ‘आशा’ वर्कर असलेल्या अलका जाधव आणि महादेवी सावंत यांचे अनुभव तर भन्नाटच. लहान वयात बायकांची ‘पिशवी’ काढण्याविरोधात त्यांनी प्रबोधनाची चळवळच उभी केलीय. स्वत:च्या आरोग्याचंच कळत नसलेल्या बायका लहान वयात गर्भार राहिल्यानं पुढं बाळांच्या संगोपनाचं कसं बघणार? त्यावर या दोघींनी ‘लग्न लहान वयात झालं, तरी १८ वर्षांपर्यंत आईकडंच थांबा’, असा सल्ला द्यायला सुरुवात झाली. मग पोरी शिक्षण संपेपर्यंत तरी माहेरी राहू लागल्या... किशोरवयीन मुली, गरोदर, स्तनदा मातांचं आरोग्य कसं सांभाळावं, याचं शास्त्रशुद्ध शिक्षणच बायकांना मिळालं. अलका जाधव यांनी स्वत:च्या लेकीला ‘येरळावाणी’च्या मदतीनं कौशल्य विकासाच्या कोर्सला पाठवलं. पाठबळ दिलं. ती आता थेट विदर्भातल्या अमरावतीत जाऊन नोकरी करतेय.
जतपासून ४० किलोमीटरवरच्या दरीबडचीतली राजश्री मोर्डी आर.जे. बनलीय. सांगलीतल्या स्टुडिओतून कानडी आणि मराठीतून गप्पा मारत श्रोत्यांना रेडिओसमोर खिळवून ठेवते. मुलाखती घेते, एडिटिंगही करते. एकदम तेजतर्रार बोलणं. तिचा आत्मविश्वास सगळं काही सांगून जातो.
***
महाराष्ट्राच्या कोपºयातल्या गावात हे काही आगळं घडतंय याचं श्रेय ‘येरळावाणी’चं. कल्पकता हा ‘येरळावाणी’चा जणू स्थायिभावच ! २०१४-१५ मध्ये ‘लढा दुष्काळाशी’ या कल्पक कार्यक्रमाला शेती आणि पर्यावरण विभागातील सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाचा राष्टÑीय पातळीवरचा पहिला पुरस्कार मिळालाय.
पण या प्रयत्नाचे खरे पुरस्कार या गावातल्या गावागावात फिरताना भेटतात. तिथल्या बदलत्या माणसांच्या रूपाने. ते अनुभवूनच तर हे लिहितो आहे...
(लेखक ‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीचे प्रमुख आहेत)
कम्युनिटी रेडिओ म्हणजे काय?
मुख्य प्रवाहातल्या व्यावसायिक रेडिओ या माध्यमात विकासाविषयक कार्यक्रमांना अलीकडं अत्यंत कमी जागा मिळतेय. त्यामुळं जिथं प्रसारमाध्यमांचं अवकाश मर्यादित असतं, तिथं कम्युनिटी रेडिओ ही संकल्पना राबवण्यास वाव मिळतो. विशिष्ट भागातल्या लोकांसाठी ही रेडिओ केंद्रं काम करत असतात. तिथल्या लोकांच्या गरजा, समस्या-उपाय, विकासाच्या संकल्पनांची माहिती याबाबतचे कार्यक्रम प्रसारित केले जातातच, शिवाय लोकांच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आणि वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठीही हे केंद्र कार्यरत असतं. संबंधित भागातल्या लोकांचा विकासातील सहभाग वाढावा आणि त्यांना सर्वांगीण विकासाची संधी मिळावी, हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो.
कम्युनिटी रेडिओ चालतात कसे?
कम्युनिटी रेडिओ सुरू करण्यासाठी कोणीही केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण विभागाकडं अर्ज करू शकतो. व्यक्तिगत पातळीवर किंवा एनजीओंच्या माध्यमातून ही रेडिओ स्टेशन्स चालविली जातात. या रेडिओ केंद्रांचा कारभार जेमतेम दोन-तीन जण मिळून एखाद्या खोलीतूनही चालवू शकतात. एफएम रेडिओ चॅनल्सवर दिवसभर मनोरंजन आणि गाण्यांचा रतीब असतो. मात्र कम्युनिटी रेडिओ व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून चालवले जात नाहीत. व्यावसायिक रेडिओंना १० किलोवॅट्सचे, तर कम्युनिटी रेडिओंना केवळ ५० वॅट्सचे ट्रान्समिटर आवश्यक असतात. कम्युनिटी रेडिओंच्या प्रक्षेपणाच्या वेळा व कालावधी वेगवेगळा असतो. चार तासांपासून १६ तासांपर्यंत त्यांचं प्रक्षेपण चालतं. साधारणपणे १८ ते ३५ किलोमीटरचा परीघ हा त्यांचा टप्पा असतो. तथापि त्याबाहेरही काही अंतरापर्यंत त्यांचं प्रक्षेपण ऐकू येतं.