देवदूतांच्या सहवासात
By admin | Published: June 22, 2014 01:29 PM2014-06-22T13:29:53+5:302014-06-22T13:29:53+5:30
शिक्षक व शाळा हे कायमच टीकेचे लक्ष्य होत असतात. बर्याचदा त्यात तथ्यही असते; मात्र या अंधारातही काही प्रकाशदीप तेवत असतात. प्रेरणा घ्यावी, आदर्श घ्यावा, असे बरेच काही तिथे वसत असते.
Next
प्रा. डॉ. द. ता. भोसले
शिक्षक व शाळा हे कायमच टीकेचे लक्ष्य होत असतात. बर्याचदा त्यात तथ्यही असते;
मात्र या अंधारातही काही प्रकाशदीप तेवत असतात. प्रेरणा घ्यावी, आदर्श घ्यावा, असे बरेच काही तिथे वसत असते.
-------------
माझ्या एका जवळच्या नातेवाइकाकडे जाण्याचा योग आला. तो एका माध्यमिक शाळेत शिक्षक आहे. त्याची आईही त्याच शाळेत नोकरी करते. त्याची आई म्हणजे माझ्या आईची भाची. तिची नुकतीच हृदयावरील मोठी शस्त्रक्रिया झालेली. तिला आता घरी आणल्याचे समजले म्हणून भेटण्यासाठी तिच्या गावी गेलो. तिची शाळा, गावाचा घनगर्द झाडीचा परिसर आणि ते गाव यांत चार दिवस कसे गेले, समजले नाही. खूप काही बघायला मिळाले, खूप काही शिकायला मिळाले. एखादे विद्यालय कसे उपक्रमशील असते, मुलांना कसे घडविते आणि त्या घडविण्यात तेथील शिक्षक किती मनापासून सहभागी होतात त्याचा एक अपवादात्मक अनुभव घ्यायला मिळाला. शाळा हे देवालय आहे. तिथला विद्यार्थी हा मूर्तीसमान आहे आणि शिक्षक हा साधक-उपासक आहे. याचे एक मनोज्ञ दर्शन त्या चार दिवसांत घडले अन् शिक्षक हा व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांच्या शाश्वत व सर्वांगीण अभ्युदयासाठी असलेला एक सर्वश्रेष्ठ शिल्पकार आहे, याची खात्री पटली. याची अनुभूती घेतली.
मी सायंकाळी त्यांच्या घरी पोहोचतो न पोहोचतो तोच एक लोभस प्रसंग पाहावयास मिळाला. शाळा सुटल्यावर आपल्या ‘बाईंना’ भेटायला त्यांच्या वर्गातील आठ-दहा मुले-मुली आली. आपल्या बाईंचे ऑपरेशन झाले म्हणून तीन-चार मुलांच्या हातात त्यांनी स्वत:च बनविलेले पुष्पगुच्छ होते. दोन-तीन स्वत:च तयार केलेली देखणी अन् अर्थपूर्ण भेटकार्डे आणली होती. तर, दोघांच्या हातात त्यांनी लिहिलेल्या बाईंवरील कविता होत्या. एकाने आपल्या बाईंना भेट देण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी आणली होती. सर्वांनी मोठय़ा आपुलकीने भेटी दिल्या, नमस्कार केला, लवकर बरे व्हा व वर्गावर या, असा आग्रह धरला आणि कमालीच्या तृप्त मनाने-जणू एखाद्या देवतेचे दर्शन घेऊन तृप्त झालेल्या मनाने ते निघून गेले. त्यानंतर त्यांच्या शाळेतील काही सहशिक्षक आले. त्यांनीही आस्थेने विचारपूस केली. माझ्या या नातेवाइकाने आजाराची आणि ऑपरेशनची त्यांना विस्ताराने माहिती दिली आणि जाताना त्यांनी आग्रह केला, की तुम्ही फक्त शाळेत येऊन बसा, तुमचे तास आम्ही घेतो. तुमची सारी कामे आम्ही करतो. शाळेत आल्यानेच तुमची तब्येत लवकर सुधारेल. तुमच्या विद्यार्थ्यांचा फुललेला चेहरा पाहिला आणि त्यांचा किलबिलाट ऐकला, की तुम्हाला टॉनिक घेण्याची गरजच भासणार नाही. या संवाद आणि सूचनेमुळे बाई खळखळून हसल्या. नंतर एका दिवशी या माझ्या नातेवाइकाबरोबर त्यांच्या शाळेत गेलो. गच्च वनराईच्या ओंजळीत विसावलेली ही शाळा पाहताच थक्क झालो. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ जाताच आश्चर्याचा पुन्हा एक गोड धक्का बसला. शाळेसमोरचे सारे पटांगण काही विद्यार्थी आणि शिक्षक स्वच्छ करीत होते. हे पुण्यकर्म एकेक वर्ग आणि त्यांच्या शिक्षकांनी एकेका दिवसासाठी वाटून घेतले होते. श्रम हीच खरी ईश्वराची पूजा आहे, हे या शिक्षकांनी कृतीने दाखवून दिले होते. दुसर्या कुठल्या तरी एका वर्गातील मुले आणि शिक्षक झाडांना आणि कुंड्यांना पाणी घालत होते.
शेजारीच छोटीशी एक रोपवाटिका दिसली. तिथेही काही मुले व शिक्षक रोपांना पाणी देणे, खत घालणे, फवारणी करणे, रोपांची जागा बदलणे या कामात व्यग्र होते. एका शिक्षकाने मला सांगितले, की या परिसरातील सारी झाडे आमच्या मुलांनी व शिक्षकांनी लावली आहेत, जोपासली आहेत. आम्ही प्रत्येक मुलाला रोपे लावण्याचे व जोपासण्याचे प्रशिक्षण देतो आणि प्रत्येकाला तीन रोपे लावायला सांगतो. एक त्याने स्वत:च्या घरासमोर लावण्यासाठी, दुसरे शाळेला भेट देण्यासाठी आणि तिसरे विकून त्याचे पैसे घेण्यासाठी त्यांच्या रोपांची विक्री शाळाच करते. रोपवाटिकेसाठी लागणारे साहित्य शाळा पुरविते. रोपांच्या विक्रीतून हा खर्च केला जातो. मुलाने लावलेल्या रोपाचे पैसे त्याला दिले जातात. त्यासाठी शाळेतच मुलांसाठी छोटीशी बॅँक सुरू केली आहे.
श्रमदेवतेची उपासना संपल्यानंतर प्रार्थना झाली. त्यामध्ये राष्ट्रगीत होते; शिवाय पसायदान होते. नंतर एका शिक्षकाने एका थोर पुरुषाच्या चरित्रातील प्रसंग गोष्टीरूपाने सांगितला. त्यातून आपोआप एक संस्कार रुजविला गेला. त्यानंतर दुसर्या एका शिक्षकाने आजच्या दैनिकात आलेल्या महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचे वाचन केले. त्यांचे वेगळेपण स्पष्ट केले. शिवाय, बातमीत आलेली गावे कोणत्या राज्यांत, देशांत आहेत, हेही स्पष्ट केले. हे सारे ऐकताना मी भारावून गेलो. आपल्या मुलांना वर्तमानाची ओळख व्हावी, जगाची ओळख व्हावी आणि महत्त्वाच्या घडामोडी समजाव्यात, यासाठी राबविलेला हा उपक्रम होता. मला या शिक्षकांचे कौतुक वाटले. जिथे माझ्यासारख्याला रायचूर आणि रायपूर यांची ठिकाणे माहीत नाहीत, हुबळी आणि हुगळीतला फरक कळत नाही, जामनेर आणि जामखेड यांची ओळख नाही; तिथे लहान मुलांना भूगोल शिकविण्याची, इतिहास सांगण्याची पद्धत मोठी नवलपूर्ण वाटली. आपल्या संस्कृतीने मातापित्यांनंतर गुरूला देवत्व का दिले असावे, हे या त्यागी, सेवाभावी, उत्साही आणि ज्ञानप्रिय शिक्षकांकडे पाहिल्यावरच मनोमन पटले. माझ्या मनात विचार आला, या सर्वांना या शाळाबाह्य कामासाठी एक तास तरी आधी यावे लागले असावे आणि तेही रोजच्या रोज.
त्या शाळेत जवळ जवळ दुपारच्या सुटीपर्यंत मी भटकत होतो. कुठे गडबड नव्हती, गोंधळ नव्हता. प्रत्येक शिक्षक तासाला वेळेवर जाई. आपला विषय तल्लीन होऊन शिकवी. नवे शैक्षणिक प्रयोग व पद्धतीचा अवलंब करून तास घेई. एकही विद्यार्थी तास बुडवून बाहेर भटकताना दिसला नाही. व्हरांड्यातून फेरफटका मारताना मला आरोग्य, समाजसेवा, राष्ट्रप्रेम, थोर विभूती, संस्कार निदर्शक संदेशचित्रे भिंतीवर लावलेली दिसली. शाळेला ज्ञानमंदिर का म्हणतात, याची प्रचिती आली.
मधल्या सुटीत चहाच्या निमित्ताने सारे शिक्षक एकत्र आल्यावर मी शाळेचे कौतुक करीत असताना मला उपमुख्याध्यापक म्हणाले, ‘‘सर आमच्या शाळेचा प्रत्येक शिक्षक आदर्श आहे. पुरस्कार मिळायच्या पात्रतेचा आहे. हे आमचे शिक्षक नुसते पाठय़पुस्तक शिकवत नाहीत; ते जगण्याचं पुस्तकच शिकवतात. मोठय़ा सुटीत व रविवारी आमचे शिक्षक मुलांना मातीकाम शिकवतात. कागदाची चित्रे शिकवतात. आमचे विद्यार्थी आकाशकंदील तयार करून विकतात. तो पैसा कागद-पेन-पेन्सीलसाठी वापरतात. आमचे शिक्षक पाने, फांद्या आणि चित्रांच्या मदतीने झाडांची ओळख करून देतात. जिथे मोठय़ांनासुद्धा वड, पिंपळ, पिंपरणी यांच्या पानांतला फरक कळत नाही, तिथे आमची मुले तो ओळखतात. नाट्य, नृत्य, अभिनय, निबंध, वक्तृत्व यांच्या आम्ही स्पर्धा घेतो. भेटकार्डे आणि पणत्या तयार करतो. शेतातील उभ्या उसापासून पोत्यात पडणार्या साखरेपर्यंत घडामोडी कळण्यासाठी मुलांना साखर कारखाना दाखवतो.
आम्ही निसर्गाच्या मदतीनं निसर्गाची ओळख घडवतो. यातून मिळणारा आनंद खरोखर श्रेष्ठ असतो.’’ यावर मी फक्त एवढेच म्हणालो, ‘‘तुम्ही ज्ञानदूत आहात, आनंददूत आहात अन् देवदूतही आहात. ‘केवळ मास्तर’ नाही!’’
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व
निवृत्त प्राचार्य आहेत.)