पिल्लू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 06:01 AM2019-04-28T06:01:00+5:302019-04-28T06:05:02+5:30
त्या दिवशी भटक्या कुत्र्यांना पकडून नेण्यासाठी महापालिकेची एक गाडी आली होती. सोसायटीतली आणि दिसतील तेवढी कुत्री त्यांनी पकडली आणि पिंजर्यात टाकली. आईला पकडून नेल्यामुळं एक पिल्लू मात्र आईला शोधत पाऊसपाण्यात भिजून अगदी केविलवाणं झालं होतं. त्याला तसंच कसं सोडायचं? मीरानं त्याची काळजी घेतली. त्याला पाळलं. ते आता सगळ्यांचं दोस्त झालं आहे. अगदी खडूस आज्जीचंसुद्धा!
- गौरी पटवर्धन
क्यांव क्यांव..
पकड पकड.
भो भो
अरे अरे, तिकडे तिकडे..
गर्र्र्र्र्र्र!
धपाक
क्यांव क्यांव क्यांव क्यांव!
उन्हाळ्याची सुटी संपता संपता रविवारी दुपारी मयांक आणि मीरा सोसायटीच्या पार्किंगमध्ये, डी विंगच्या मागच्या बाजूला असलेल्या पंपहाउसच्या बाजूला सायकली लावून गप्पा मारत होते. तेवढय़ात त्यांना सोसायटीच्या मेन गेटकडून जोरात आरडाओरडा ऐकू आला. दोघांनी आहे तशाच सायकली काढल्या आणि जोरात पेडल मारत सोसायटीच्या मेन गेटपाशी पोहोचले, तर मागे जाळी असलेली भटक्या कुत्र्यांना पकडून नेणारी एक गाडी आलेली होती. त्यांनी सोसायटीतली आणि आजूबाजूला दिसणारी सगळी गावठी भटकी कुत्नी पकडायला सुरुवात केलेली होती. काही कुत्नी पकडून पिंजर्यात टाकलेली होती, काहींना महापालिकेचे कर्मचारी अंगावर जाळी टाकून पकडत होते आणि काही कुत्नी पळून जात होती. काही कुत्नी घाबरून रडत-ओरडत होती, तर काही चिडून पकडायला आलेल्या माणसांवर गुरगुरत होती, भुंकत होती. अंगावर धावून येणार्या कुत्र्यांच्या गळ्याला दोरीचा फास लावून ते पकडत होते. सगळीकडे नुसता गोंधळ चालला होता.
‘अरे हे काय???’ मयांक आणि मीराला काही कळेचना. ते थोडे पुढे जाणार तेवढय़ात मागून मोठय़ा मिश्या असलेले एक काका आले आणि त्या दोघांना म्हणाले,
‘ए पोरांनो ! चला पळा इथून. ही रस्त्यावरची कुत्नी कोणालाही चावू शकतात. त्यात आत्ता तर त्यांचा काही भरोसा नाही.’
‘अहो काका, पण...’ मीरा काहीतरी सांगायला गेली, पण ते काका काही ऐकायच्या मूडमध्ये नव्हते. त्यांनी आणि तिथे असलेल्या इतर मोठय़ा माणसांनी त्या दोघांना तिकडून निघून जायला लावलं. ते दोघं कदाचित थांबून राहिलेही असते, पण तेवढय़ात महापालिकेची माणसं, सापडली तेवढी कुत्नी पिंजर्यात भरून त्यांची गाडी घेऊन तिथून निघून गेली.
या सगळ्या प्रकाराने मयांक आणि मीरा दोघांनाही सॉलिड धक्का बसला होता. आपल्या सोसायटीच्या परिसरात राहणारी, खाऊ मिळेल या आशेने कचर्याच्या गाडीमागे फिरणारी, आपल्या ओळखीची कुत्नी अशी मध्येच पकडून का नेली असतील हेच त्यांना कळत नव्हतं. कारण ती कुत्नी कोणाला चावायची नाहीत. उलट रात्नीच्या वेळी अनोळखी माणसं सोसायटीत आली तर हीच कुत्नी त्यांच्या अंगावर भुंकायची.
ते दोघं सायकली लावून आपापसात बोलत त्यांच्या पंपहाउसकडच्या बसायच्या जागेकडे चालले होते, तेवढय़ात त्यांना सी विंगच्या उघड्या खिडकीतून खडूस आजींच्या बोलण्याचा आवाज आला. त्या खडूस आजोबांना म्हणत होत्या, ‘गेली एकदाची सगळी कुतरडी. मेल्यांनी रात्नभर भुंकून उच्छाद मांडला होता. दाराबाहेर ठेवलेला केराचा डबा उलटवून जायची.’
‘तक्र ार केली म्हणजे काय? करणारच ना! आधीच ही कुतरडी त्नास देतात, त्यात ते बी विंगमधले लोक त्यांना खायला घालतात.’
खडूस आजोबा बोलत बोलत खिडकीपाशी यायला लागले म्हणून मीरा आणि मयांक घाईघाईने तिथून निघाले. पण हा दुष्टपणा खडूस आजी-आजोबांनी केला आहे हे मात्न त्यांना नीट कळलं होतं.
पुढे जाऊन मयांक म्हणाला, ‘म्हणूनच त्यांना खडूस म्हणतात.’
‘नाहीतर काय!’
मीरा म्हणाली, ‘कुत्नी भुंकतात म्हणून त्यांना पकडून दिलं त्यांनी.’
‘पण कुत्नी आपल्यावर कुठे भुंकतात? ती तर चोरांवर भुंकतात.’
‘हो, पण त्यांना कळायला पाहिजे ना! आता त्यांच्याच घरात चोर यायला पाहिजे.’ - मीरा म्हणाली. पण आता आपापसात बोलून काहीच होण्यासारखं नव्हतं. त्यामुळे ते दोघं मूड ऑफ होऊन खेळ अर्धा टाकून घरी गेले.
मीराची आई सकाळीच तिला सांगून कुठेतरी कामासाठी गेली होती. ती रात्नीच येणार होती. तिचे वडीलही गावाला गेले होते. त्यामुळे मीराने घरी गेल्याबरोबर कार्टून्स लावली; पण तिला त्यातही मजा येईना. मगाच्या कुत्र्यांचं रडणं-ओरडणं तिच्या डोक्यातून जातच नव्हतं. शेवटी टीव्ही बंद करून सरळ मयांककडे खेळायला जावं असा तिने विचार केला तर पाऊस पडायला लागला. इतका वेळ बाहेर ढग दाटून आलेले तिच्या लक्षातच आले नव्हते. उन्हाळ्यात छत्नी कुठे उचलून ठेवलीये ते तिला माहिती नव्हतं. त्यामुळे मग ती चिडचिड करत टीव्ही बघत, कॉम्प्युटरवर गेम्स खेळत घरीच बसली. असाच केव्हातरी अंधार होऊन गेला. अजून आई आलेली नव्हती.
मीराचं घर तळमजल्यावर होतं. त्यामुळे दाराबाहेरचा दिवा लावायला ती दारापाशी गेली तर तिला बाहेरून बारीक आवाजात ‘कुई कुई’ आवाज आला. तिने दिवा लावून बाहेर बघितलं, तर कुत्र्याचं एक छोटं भिजलेलं पिल्लू तिच्या घराच्या पायपुसण्यावर गरीब चेहर्याने बसलेलं होतं.
‘अरे! हे इथे कुठून आलं?’ मीराने बाहेर येऊन इकडे तिकडे बघितलं. पण आजूबाजूला कुठेच त्याची आई दिसेना. मग मीराच्या एकदम लक्षात आलं, की मगाशी महापालिकावाल्यांनी बहुतेक त्या पिलाच्या आईला पकडून नेलं असणार. त्याला बिचार्याला आई सोडून काहीच माहिती नसणार. आणि आई सापडत नाही म्हटल्यावर बिचारं पावसातून आईला शोधत फिरत असणार. त्याला आता चांगलीच भूक लागली असणार.
‘बिचारं गं..’ मीरा अगदी कळवळली. तिची आई तिला सांगून एक दिवस कामासाठी बाहेर गेली होती तर तिला दिवसातून शंभरवेळा आईची आठवण आली होती. या पिलाच्या आईला तर पकडून नेलं होतं आणि ते त्या बिचार्याला कळतसुद्धा नव्हतं. ते अजूनपण आईलाच शोधत होतं.
मीराने न राहवून त्या पिलाला घरात घेतलं. एक जुनं फडकं शोधून त्याला स्वच्छ पुसून कोरडं केलं. मग एका वाटीत त्याला अर्धी पोळी आणि अर्धी वाटी दूध कुस्करून दिलं. त्याने ते लगेच चुटुक-चुटुक खाऊन टाकलं आणि मग एक मोठ्ठी जांभई दिली. आता त्याचं काय करावं ते मीराला कळेना. कारण ते दमलं होतं आणि त्याला झोप आलेली होती हे तिला दिसतच होतं. तिला असं वाटत होतं की त्या पिलाला घरी ठेवून घ्यावं. पण त्यात अडचण अशी होती की मीराच्या आईबाबांना घरात कुत्नं आलेलं अजिबात आवडायचं नाही. पण बाहेर पाऊस पडून सगळीकडे ओलं झालेलं असताना, गार हवा सुटलेली असताना आणि मुख्य म्हणजे त्या पिलाची आई हरवलेली असताना त्याला परत पावसात बाहेर काढून देणं मीराला शक्यच नव्हतं. काय ते तिला लौकर ठरवायला हवं होतं. कारण तिची आई आता केव्हाही घरी आली असती.
शेवटी मीराने एक आयडिया करायचं ठरवलं. तिने हॉलमधल्या लोखंडी पलंगाखाली रद्दी कागद आणि जुने कपडे घालून एक गादी तयार केली आणि त्या पिलाला त्यावर ठेवून दिलं. दिवसभराच्या दगदगीने दमलेलं ते बिचारं पिल्लू मऊ उबदार गादी मिळाल्याबरोबर दोन मिनिटात झोपून गेलं. मग मीराने त्याच्या बाजूला चपला, काहीतरी सामान भरलेल्या पिशव्या असं सामान लावून ते पिल्लू लपवून टाकलं. हा सगळा उद्योग करून तिने जेमतेम हात धुतले आणि तेवढय़ात आई आली.
आई आल्यावर आधी दोघींनी दिवसभर काय केलं याच्या गप्पा मारून झाल्या, जेवण झालं आणि मग झोपायची वेळ झाली. आईने दोघींची गादी घातली आणि दोघीजणी आता झोपणार एवढय़ात हॉलमधून ‘कुई कुई’ आवाज यायला लागला. आईला कळेना, हा काय आवाज आहे. मीराला कळलं की पिल्लू उठलंय, पण ती काही बोलली नाही. शेवटी तो कुई कुई आवाज करत उठून चालत चालत त्यांच्या बेडरूमपर्यंत आलं आणि पिलाने तिथे येऊन मीरा आणि तिच्या आईच्या समोरच त्यांच्या खोलीत शी केली. ते बघून मीरा घाईघाईने उठली आणि तिने ती सगळी घाण सुपल्यात भरून बाहेर टाकून दिली. सुपलं धुतलं, फरशी धुतली. हे सगळं होईपर्यंत पिल्लू मीराच्या मागे मागे फिरत होतं आणि आई शांतपणे मीराकडे बघत होती. शेवटी मीरा परत येऊन बसल्यावर आई म्हणाली, ‘हा काय प्रकार आहे, आता तरी सांगणार आहेस का?’
‘अगं आई, दुपारी ना..’ असं म्हणून मीराने दुपारी कशी महापालिकेची गाडी आली, त्यांनी कुत्नी पकडून नेली, त्यांना खडूस आजी-आजोबांनी बोलावलं होतं, मग ते पिल्लू कसं त्याच्या आईला शोधत होतं, ते कसं भिजलं होतं वगैरे रंगवून रंगवून सांगितलं. आणि मग म्हणाली, ‘आता तूच सांग आई.. असं कसं त्या पिलाला पावसात बाहेर काढणार? तू तरी काढलं असतंस का?’
‘हो पण आता पाऊस थांबलाय. आता ते जाऊ शकतं बाहेर.’
‘अग आई, पण ते केवढं छोटं आहे..’
‘आपलं घर पण छोटं आहे. इथे आपण कुत्नं पाळू शकत नाही. आपण हे या आधी खूपवेळा बोललोय.’
विषय सगळा नेहमीच्या ट्रॅकवर जायला लागला. मग शेवटी मीरा म्हणाली,
‘आपण घरात कुत्नं पाळू शकत नाही; पण घराबाहेर तर पाळू शकतो ना?’
‘म्हणजे???’
‘म्हणजे आपण त्याला बाहेर बसायला एक जागा करून देऊ. बाहेर खायला घालू. ते शी आणि शू करायला पण बाहेर जाईल. पण प्लीज त्याला हाकलून नको ना द्यायला.. ते किती छोटं आहे आई..’ मीरा अगदी रडकुंडीला आली होती. शेवटी मीराचा चेहरा आणि त्या पिलाची आनंदाने सतत हलणारी शेपूट पाहून आईने हा पर्याय मान्य केला.
आणि मग पिल्लू नावाच ते पिल्लू मोठा कुत्ना होईपर्यंत त्याच सोसायटीत राहिलं. सगळ्यांशी त्याची छान मैत्नी झाली, अगदी खडूस आजींशीसुद्धा! कारण पिल्लू मोठा होईपर्यंत त्यांना कमी ऐकू यायला लागलं होतं, त्यामुळे त्याच्या भुंकण्याचा त्यांना मुळी त्नासच होईनासा झाला. अजूनही तुम्ही त्या सोसायटीत गेलात, तर ए विंगच्या बाहेर तुम्हाला ‘पिल्लू’ बसलेला दिसेल.
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)
lpf.internal@gmail.com