तक्रार-साधना

By Admin | Published: January 31, 2015 06:30 PM2015-01-31T18:30:44+5:302015-01-31T18:30:44+5:30

केंजी मियाझावा हा एक जपानी कवी! त्याचं एक वाक्य असं. ‘आपण आपल्या दु:खाला मिठी मारावी आणि आपल्या प्रवासासाठी त्याचंच पेट्रोल वापरावं.. वुई मस्ट एम्ब्रेस अवर पेन अँण्ड यूज इट अँज फ्युएल फॉर अवर जर्नी!’

Complaint-sadhana | तक्रार-साधना

तक्रार-साधना

googlenewsNext

धनंजय जोशी

केंजी मियाझावा हा एक जपानी कवी! त्याचं एक वाक्य असं. ‘आपण आपल्या दु:खाला मिठी मारावी आणि आपल्या प्रवासासाठी त्याचंच पेट्रोल वापरावं.. वुई मस्ट एम्ब्रेस अवर पेन अँण्ड यूज इट अँज फ्युएल फॉर अवर जर्नी!’
आयुष्यात आपण अनेक अनुभव घेतो. काही सुखाचे, काही दु:खाचे! पण दु:ख म्हणजे काय?
आपल्याला वाटतं, दु:ख म्हणजे वेदना किंवा व्यथा! खरं तर आपण स्वत:च्याच दु:खाकडे बघितलं तर लगेच सापडेल त्याचा खरा अर्थ. दु:ख म्हणजे न संपणारं, प्रत्येक अनुभवामध्ये सापडणारं ‘असमाधान’!
बुद्धानं असं नाही सांगितलं की, आयुष्य म्हणजे फक्त दु:ख किंवा असमाधान! आयुष्य हे आनंदित अनुभव किंवा नको असलेल्या अनुभवाचे रसायन! मग बुद्ध आपल्या शिकवणीमध्ये दु:खाबद्दल का बरं बोलत राहिला? कारण असं की, ज्या गोष्टींपासून आपल्याला सुटका हवी त्या गोष्टीशी आपली ओळख तर हवी? 
दु:खापासून मुक्ती मिळणं म्हणजे काय? मियाझावा म्हणतो, त्यापासून मुक्ती मिळण्याआधी त्याला आधी मिठी मारा! मी हे पहिल्यांदा वाचलं तेव्हा वाटलं, ‘किती खरं आहे हे!’ आपल्या आयुष्यात जेव्हा-जेव्हा मनासारखं घडत नाही तेव्हा आपल्याला काय वाटतं?
- ‘असमाधान!’ हे असमाधान कुठून येतं? आपण स्वत:च बघावं! भाजीत मीठ कमी झालं का? शेजार्‍याचा कुत्रा रात्री भुंकतो कशाला? आज इतका उकाडा कशाला? माझ्या आयुष्याला काही अर्थ आहे की, नाही?
मोठे प्रश्न किंवा लहान प्रश्न ! ‘असमाधान’ सारखंच! त्याच्यासाठी एक साधी साधना! मी त्याला ‘तक्रार साधना’ म्हणतो. आपण ही साधना स्वत: करावी किंवा दुसर्‍या साधकाबरोबर करावी! दोघांनी (स्वत:सह) ध्यानासाठी बसावं! प्रथम पंधरा मिनिटं तरी मौन पाळावं! नंतर एकानं म्हणावं (आपल्याला जे वाटतं तसं..!) ‘ही, खोली खूप गरम आहे!’
बरोबरच्या साधकानं तेव्हा नुसतं म्हणावं, ‘तक्रार!’ मग काही वेळानं तुम्ही, ‘छे, आज अगदी ध्यान लागत नाही! उगाचच किती आवाज इकडे-तिकडे!’ 
सह-साधक-‘तक्रार!’
तुम्ही आणखी काही वेळाने, ‘गॅस सिलिंडर येणार होता तो आलाच नाही लेकाचा!’
सह-साधक (मोठय़ानं)-‘तक्रार!’ 
आपण प्रत्येक छोट्या-मोठय़ा गोष्टींमध्ये किती असमाधानी असतो ते समजून घेण्यासाठी ही तक्रार साधना खूप उपयोगी पडते. असमाधान आपोआप विरघळून जातं! जे समोर होईल ते हसून बघण्याची कला आपल्याला सापडून जाते.
(लेखक साधक आणि झेन अभ्यासक आहेत.)

Web Title: Complaint-sadhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.