मैदानी खेळाची दशा आणि दिशा
By admin | Published: October 18, 2014 02:28 PM2014-10-18T14:28:25+5:302014-10-18T14:28:25+5:30
आशियायी स्पर्धांमध्ये भारताच्या पुरुष व महिला दोन्ही संघांनी सुवर्णपदकावर मोहोर उमटवली, ही अर्थातच अभिमानाची बाब. मिळालेले यश टिकवणे हे मात्र आणखी मोठे आव्हान असते. या क्षेत्रातील नव्या आव्हानांचा वेध घेता हे स्थान टिकवून ठेवण्यासाठीच खरा कस लागणार हे उघड आहे.
Next
- विश्वास चरणकर
गेल्या महिन्यात इंचियोन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाने पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात सुवर्णपदक जिंकले. या विजयामुळे भारतीय कबड्डीच्या इतिहासात आणखी एका सुवर्णक्षणाची नोंद झाली.
कबड्डी हा भारताच्या मातीतील खेळ आहे. भारताने ही जगाला दिलेली देणगी आहे. त्यामुळे या खेळात आपली ‘मास्टरी’ असणे स्वाभाविक आहे, पण ही मास्टरी आणखी किती दिवस टिकणार? हा प्रश्न या निमित्ताने आला आहे. कारण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुरवातीच्या काही मिनिटात इराणने ज्या पध्दतीने भारताला जेरीस आणले होते, ते पाहता या प्रश्नाचे गांभिर्य लक्षात येते.
हॉकीमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, तीच आता कबड्डीमध्ये होवू पहात आहे. कबड्डुीची आपण जगाला ओळख करुन दिली. आज आपण नंबर वन आहोत, पण यापुढेही राहू याची काय शाश्वती? राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सलग ३४ वर्षे महाराष्ट्राचा झेंडा फडकत होता. १९३६च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने प्रदर्शनिय सामना खेळून जगाला या खेळाची ओळख करुन दिली. मध्यम चणी, लवचिक आणि तितकीच चपळ असणारी महाराष्ट्रीय माणसाची अंगकाठी या खेळासाठी बनली आहे, असे वाटते. ही नैसर्गिक देणगीच महाराष्ट्राला या खेळात अव्वल बनवित होती.
महाराष्ट्रातील गावोगावी, गल्लोगल्ली ही कबड्डीचे संघ निर्माण झाले होते. पण उत्तर भारतीय खेळाडूंनी या खेळात रस घ्यायला सुरवात केली आणि महाराष्ट्राचे ग्रह बदलले. उत्तर भारतीय गडी हा अंगापिंडाने मजबूत, उंचीला ताडमाड आणि ताकदीला रेड्यासारखा. या खेळाडूंनी कबड्डीचे तंत्र आत्मसात केले आणि लवकरच कबड्डीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली.
महाराष्ट्रीय खेळाडू या खेळाकडे फारच संकुचित वृत्तीने पाहतो. शाळेत असताना बोर्डाच्या परिक्षेत नापास झालो तर २५ गुण मिळावेत म्हणून कबड्डी खेळणारा खेळाडू शाळेबरोबरच कबड्डीही मागे टाकून जातो. त्यातूनही कोणी जर पुढे आलाच तर त्याचे लक्ष्य शिवछत्रपती पुरस्कार मिळविणे इथंपर्यंतच र्मयादित राहतं. या उलट आज उत्तर भारतात विशेषत: हरियानामध्ये वडील मुलग्याला सांगतात, ‘बेटा, तुझे इंडिया के लिए खेलना है, और अर्जुन अँवार्ड लेना है।’ विस्तीर्ण पसरेल्या शेतातील घराजवळ कबड्डीचे मैदान तयार केले जाते. घरातील सर्व मुले येथे कबड्डी खेळताना दिसतील. आज हरीयानात पानिपत, सोनिपत, रोहटक आणि भिवानी अशी चार साईची प्रशिक्षण केंद्रे आहेत. या चारही केंद्रामध्ये मॅट उपलब्ध आहे. तेथे वर्षभर कबड्डीचा सराव केला जातो. आपल्याकडे मात्र फक्त स्पर्धेला मॅट मिळते. वर्षभर मातीत सराव करणारे खेळाडू स्पर्धेत मॅटवर कसे टिकतील? याचा विचार केला जात नाही.
महाराष्ट्रातील कबड्डील नवचैतन्य आणावयाचे असेल तर गावागावातील मंडळ संस्कृती पुन्हा जिवंत केली पाहिजे. गाव तेथे मंडळ आणि मंडळ तेथे मॅट अशी सोय झाली तर महाराष्ट्राच्या खेळाडूंचा झेंडा पुन्हा डौलाने फडकण्यास हरकत नाही.
आज कोणतीही राष्ट्रीय मोठी स्पर्धा असो तेथे हरियाणाचे निम्मे खेळाडू वेगळय़ा संघातून खेळत असतात. भारताच्या राष्ट्रीय संघात उत्तर भारतीयांचे प्रमाण जास्त असते. त्यांनी कुस्ती जगतात आपला दबदबा निर्माण केला आहे. पण उत्तर भारतीय खेळाडू आणि इराणी खेळाडू यांची शरीरयष्टी एकाच धाटणीची. प्रश्न फक्त होता फक्त कौशल्याचा. ते त्यांना आता चांगले आत्मसात केले आहे. त्यामुळे ते वेगाने प्रगती करीत आहेत. या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारताने आत्ताच सतर्क व्हायला हवे.
(लेखक लोकमत कोल्हापूर आवृत्तीमध्ये
वरिष्ठ उपसंपादक आहेत.)