संघर्षशील

By admin | Published: June 7, 2014 07:10 PM2014-06-07T19:10:00+5:302014-06-07T19:10:00+5:30

गोपीनाथ मुंडे नावाचं रसायन अविरत संघर्षांतून तयार झालं होतं. संघर्षशील राहणं हा जणू त्यांचा स्थायीभावच झाला होता. मात्र, सतत वादळं अंगावर येऊनही ते कधी खचले नाहीत, नाउमेद झाले नाहीत. उलट त्या वादळाचं स्वागत करण्याची दिलदार वृत्ती ते अंगी बाळगून होते. मुंडे यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या निकटवर्तीयाने जागवलेल्या आठवणी.

Conflicting | संघर्षशील

संघर्षशील

Next

 केशव उपाध्ये

 
केशव, तुला सांगतो,  कायम लक्षात ठेव मी सहकाराचं काम करीन, साखर कारखान्यांचं राजकारण करेन, पण ज्या विचारात मी मोठा झालो त्याला दगा देणार नाही. भाजपाच्या झेंड्यातच मी मरण पत्करेन,’’ हे साधारणत: चार वर्षांपूर्वी मुंडेंचं विधान होतं माझ्याशी बोलताना.  मला हे आठवलं ज्यावेळी केंद्रीय कार्यालयामध्ये मुंडे यांचं पार्थिव ठेवलं होतं. मरतानासुद्धा त्यांनी आपला शब्द खरा केला.
प्रसंग त्या वेळचा होता, जेव्हा गोपीनाथ मुंडे हे नाराज होऊन काँग्रेसमध्ये जात असल्याच्या वावड्या येत होत्या. दिवसभर वृत्तवाहिन्या अशा आशयाच्या बातम्या देत होत्या. मला फोन करणार्‍या प्रत्येकाला मी विश्‍वास देत होतो, साहेब कधीच पक्षाबाहेर जाणार नाहीत.  बातम्यांचा महापूर आलेला. मुंडे अमुक करत आहेत, मुंडे संपर्काच्या बाहेर आहेत, मुंडे फलाण्या नेत्याला भेटले, अशा बातम्या येत होत्या. कायम माझ्या संपर्कात असणारे मुंडे हे काही तास मलाही नॉट रिचेबल झाले होते. अचानक रात्री माझा मोबाईल खणखणला आणि दिवसभराच्या अपडेट सांगत असताना मी त्यांना प्रश्न विचारला, ‘‘साहेब खरं काय..’’ त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर होतं,  मी वाढलो इथेच आणि मरणार पण इथेच. जरासुद्धा विचलित होऊ नकोस, बातम्यांवर जाऊ नकोस, तुझ्याशी मी खोटं बोलणार नाही आणि माझ्यावर प्रेम करणार्‍या लाखो लोकांचा मी विश्‍वासघात नाही करणार.
आजच्या राजकारणी नेत्यांमध्ये स्वार्थासाठी पक्ष बदलण्याच्या पाश्‍वर्भूमीवर विचारांसाठी कायम राहणारा हा नेता विरळाच म्हणावा लागेल. ‘‘ज्या विचाराने, पक्षाने मला इथपर्यंत आणलं, त्या विचाराला, पक्षाला दगा देणार नाही,’’ हे त्यांचं विधान त्यांच्यातील निष्ठेचा एक वेगळा पैलू दाखवणारं होतं.
खरंतर माझा आणि मुंडेंचा गेली १२ वर्षे एक जिवंत संवाद होता, जो मंगळवारी संपला. गेल्या दहा वर्षांत तर एक दिवस असा नसेल, की आम्ही बोललो नाही. म्हणायला गेलं तर ते साहेब आणि मी सामान्य कार्यकर्ता. पण, नकळत आमच्यात एक बंधन तयार झालं होतं. त्यांची विचार करण्याची पद्धत मला माहीत झाली होती, त्यांनाही मला फार सांगावं लागायचं नाही.
मुंडेंची अनेक रूपे मी जवळून पाहिली आहेत. संघर्षशाली मुंडे, जिद्दी मुंडे, गंभीर परिस्थितीत क्षणात वातावरण पालटवणारे मुंडे, वास्तवाची जाण असणारे मुंडे, मैत्री जपणारे मुंडे, सामाजिक प्रश्नांवर तळमळीने बोलणारे मुंडे, लोकांना प्रेरित करणारे मुंडे आणि आपल्या नातवाशी खेळताना तितकेच लहान होणारे मुंडे.
खरंतर मुंडे नावाचं रसायन अजब होतं. मला नेहमी प्रश्न पडे, की अफाट जिद्द आणि संघर्षाची प्रवृत्ती ते कुठून आणतात. केवळ साडेचार वर्षे मुंडे सत्तेत होते आणि तो काळ वगळला, तर सातत्याने विरोधी नेता म्हणून ते राहिले. पण त्यांचा रुबाब, त्यांच्या भोवती असणारी गर्दी ही सत्तेतील महत्त्वाची पदे भूषवणार्‍याच्या नशिबी पण आली नसेल.
पराकोटीचे निराशेचे प्रसंग त्यांच्यावर आलेले मी पाहिलेत. शिवसेनेतून नारायण राणे बाहेर पडल्यानंतर विरोधी पक्षनेते पद त्यांना मिळणार, हे नक्की झालं होतं. दुपारी १२ वाजता आम्ही विधानसभेत पोहोचलो. २.३0 पर्यंत अनेक पत्रकारांनी, अधिकार्‍यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि दुपारी अचानक चित्र बदललं. विधानसभा अध्यक्षांनी मुंडेंचं नाव जाहीर केलं नाही. किती बाका प्रसंग होता. मुंडे प्रसंगाला सामोरे गेले, पत्रकारांच्या सरबत्तीला सामोरे गेले. विधानसभा अध्यक्षांवर कोणतीही टीका न करता त्यांनी निर्णय स्वीकारला.
हे एक वानगीदाखल सांगितले. पण असे कितीतरी निर्णय त्यांच्या मनाविरुद्ध होत होते, पण मुंडे त्यातून उभे राहिले. अगदी हसत ठामपणे. २00९ साली महाराष्ट्र विधानसभेत युतीला बहुमत मिळणार नाही, हे निकालादिवशी दुपारी स्पष्ट झाले. आम्ही कार्यकर्ते निराश होतो. प्रदेश कार्यालयात मुंडे यांचं आगमन झालं आणि आमची निराशा पाहून म्हणाले, ‘‘आपण कधी सत्तेत होतो?  आपल्याला तर विरोधी पक्षाची सवय आहे, चला कामाला लागू, लोकांमध्ये परत जाऊ.’’
संघर्ष आणि जिद्द याचं दुसरं नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे. परिस्थिती, राजकीय विरोधक या सगळ्यांनी सर्व बाजूंनी मुंडे यांची अनेकदा नाकेबंदी केली, पण हार मानतील ते मुंडे कसले. बीडमध्ये तर शरद पवार आणि अजित पवार यांनी मुंडे यांना पराभूत करण्याचा चंग बांधला. त्यांच्याजवळच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांनी आमिष दाखवून दूर नेलं.  शेवटी तर मुंडे यांचं घर फोडलं. घर फोडल्याची आपल्याच स्वकीयांनी आपल्याला दिलेली वागणूक मात्र मुंडे यांना जिव्हारी लागली होती. ज्यांना भरभरून दिलं त्यांनीच असा डाव मांडावा, हे त्यांना फार मोठं दु:ख होतं.
मुंडे यांनी कार्यकर्त्याला उभं केलं. सामान्य कार्यकर्त्याला ताकद दिली, त्यांना मानसन्मान मिळवून दिले. कितीतरी नावं सांगता येतील, मुंडे यांनी डोक्यावर हात ठेवला आणि त्या कार्यकर्त्याला प्रतिष्ठेचं, पदाचं आवरण मिळालं. पण हाच कार्यकर्ता जो मुंडेंमुळे मोठा झाला तो जेव्हा मुंडेंवर टीका करीत दूर जायचा तेव्हा खरे मुंडे अस्वस्थ व्हायचे. काय माझ्या मिठात कमी आहे, हे कळत नाही, असे अनेक वेळा मला बोलायचे. दिवसभर ते सर्वांना सामोरे जायचे. मात्र, रात्री १२ ते २ या वेळेत अस्वस्थ साहेबांचा फोन यायचा आणि मग त्यांचं मन ते मोकळं करण्याचा प्रयत्न करायचे. ते बोलू लागले, की घड्याळ विसरायचो. 
अनेक वेळा जागावाटपात स्थानिक कार्यकर्ता नाराज व्हायचा, पण व्यापक हितासाठी असे निर्णय घ्यावे लागत असतात. पक्षातले निर्णय हे सामूहिकपणे घेतले जातात. पण तरीही - ‘‘हो मी हा निर्णय घेतला आहे. निर्णय कटू आहे, पण घेणे भाग आहे,’’ हे ते सांगत. गुहागरची विनय नातूंची जागा शिवसेनेला सोडावी लागली. त्यानंतर गुहागरचे शेकडो कार्यकर्ते संतप्त होऊन मुंबईला आले. या सगळ्या कार्यकर्त्यांनी मुंबई भाजपा कार्यालयात मुंडेंना घेराव घातला. चिडलेल्या कार्यकर्त्यांनी अत्यंत संतप्त शब्दांत आपल्या भावना मोकळ्या करून दिल्या. मुंडेंनी सर्वांचं शांतपणे ऐकून घेतलं. विनय नातूंवर अन्याय झाला, हे त्यांनी मान्य केलं. ऐकून घेणं हा त्यांचा मोठा गुण होता. प्रत्येकाचं ते ऐकून घेत. समाजाशी जोडली गेलेली नाळ आणि सामाजिक तळमळ हे दोन गुण ही त्यांची प्रेरणास्रोत होती. निवडणुकीतील पराभवाने ते कधी खचले नाहीत आणि विजयाने त्यांनी कधी उन्माद दाखविला नाही. इतकं सारं विरुद्ध असूनही तुम्ही कायम हसतमुख असता, निराशा कधीच दिसत नाही, असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. त्या वेळी ते म्हणाले होते, ‘‘हा समाज जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी कधीच निराश होणार नाही. पदं येतील जातील, सत्ता येईल अथवा न येईल, पण या सर्वसामान्य, दीनदुबळ्यांमध्ये माझ्याबद्दल जी आस्था आहे, ते माझं खरं अढळ स्थान आहे.’’
अंत्यविधीला जमलेला पाच लाखांहून अधिक समाज त्यांच्या याच विधानाची प्रचिती देत होता. मुंडे गेले, अचानक गेले, पण आमच्यासाठी सोडून गेले त्यांची जिद्द, प्रतिकूल परिस्थितीतील संघर्ष आणि सामाजिक तळमळीचं भांडार. यातलं थोडं जरी आम्हाला आमच्यात भिनवता आलं, तरी आम्ही भाग्यवान समजू स्वत:ला..
(लेखक महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ता आहेत.)

Web Title: Conflicting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.