पुन्हा राम..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 06:04 AM2018-12-02T06:04:00+5:302018-12-02T06:05:10+5:30
राम मंदिर उभारण्याकरिता कायदा करा, अशी आरोळी ठोकली गेल्यानंतरही मुस्लीम समाजात कुठलीच प्रतिक्रिया उठलेली नाही. मुस्लीम समाजाने अशीच शांतता राखली आणि हिंदूंमधील कनिष्ठ मध्यमवर्गाने तोंड फिरवले, तर राम मंदिराच्या नावाने डांगोरा पिटणाऱ्यांचा मुखभंग होईल.
- संदीप प्रधान
उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून मुंबईत रोजगाराकरिता आलेल्या रामकृपाल याने रविवारी सकाळी आपल्या शेजाऱ्याच्या घरातील दूरदर्शन संचाला हार चढवला. रामायण मालिकेत राम-रावण युद्धाचा प्रसंग त्या दिवशी दाखवला जाणार होता. पडद्यावर प्रभू रामचंद्र दिसताच रामकृपालनं डोळे घट्ट मिटले आणि ‘सियावर रामचंद्र की जय’चा जयघोष केला. त्या वितभर लांबीच्या खोलीत गच्च बसलेल्या प्रेक्षकांनी रामनामाचा जयघोष केला.
- हे १९८७ सालातील दृश्य होते.
त्यानंतर, गावागावांत व शहरांत अयोध्येत राम मंदिराकरिता शिलान्यास करण्याकरिता विटा आणल्या गेल्या, तेव्हा रामकृपालने रांगेत उभे राहून विटांचे दर्शन घेतले होते. भाजपाचे लोहपुरुष लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली राम रथयात्रा १९९० मध्ये निघाली, तेव्हा रामकृपाल त्यामध्ये सहभागी होण्याकरिता आतुर झाला होता. मात्र, हातावर पोट असल्याने त्याने आपल्या इच्छेला मुरड घातली.
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडली गेली, तेव्हा रामकृपालचा आनंद गगनात मावत नव्हता. आता रामलल्लाचे भव्यदिव्य मंदिर उभे राहणार, या कल्पनेने तो सुखावला. त्यानंतरच्या भीषण दंगलीत तो काम करत असलेली लॉण्ड्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यावर तो गावी निघून गेला.
- रामकृपालची ही कथा हेच सांगते की, तब्बल सहा वर्षांच्या परिश्रमपूर्वक निर्माण केलेल्या वातावरणानंतर अशा लक्षावधी रामकृपाल यांच्या मनावर राम मंदिराचा मुद्दा बिंबवण्यात रा.स्व. संघ, विहिंप, बजरंग दल आणि भाजपाला यश आले होते.
आता या पार्श्वभूमीवर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन केलेली शरयू नदीची व राम मंदिरातील आरती, विहिंपच्या साधूसंतांनी धर्मसंसदेत केलेला निर्धार किंवा हुंकार, सरसंघचालक मोहन भागवत यांनी भरसभेत केलेली गर्जना याचा विचार केला, तर ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस व नव्वदच्या दशकाच्या प्रारंभी राम मंदिराच्या नावे पेटलेला (खरे तर पेटवलेला) वणवा आता पुन्हा पेटवणे कठीण वाटते. २६ वर्षांपूर्वीच्या त्याच मुद्द्यावरून पुन्हा नव्याने रण पेटवायला ते काही इन्स्टंट फूड नाही.
उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेला रामकृपाल जेव्हा राम मंदिर आंदोलनाकडे आकर्षित झाला, तेव्हा त्याच्या गावाकडे अत्यंत विदारक परिस्थिती होती. मात्र, मुंबईतही तो काही स्वर्गसुख अनुभवत नव्हता. झोपडपट्टीतील कोंदट खोलीत तो १० ते १२ लोकांबरोबर दिवस काढत होता. बाटलीभर घासलेटकरिता त्याला आठआठ तास रांगेत उभे राहावे लागत होते. मोजक्याच घरांत दूरदर्शन संच होते. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचे मनोरंजन महागडे होते. गावाला फोन लावायचा, तर पोस्टात जाऊन ट्रंककॉल लावावा लागत होता. मात्र, आता परिस्थिती कमालीची बदलली आहे. रामकृपालचा नातू स्मार्ट फोन घेऊन फिरतो. फॅशन स्ट्रीटवर खरेदी केलेले त्याचे कपडे ब्रॅण्डेड कपड्यांच्या तोंडात मारतील इतके आकर्षक असतात. तो सोशल मीडियावर सक्रिय आहेच. अलीकडेच त्याने बुलेट खरेदी केली असून त्याच्या पाठीमागे दररोज नवी छोकरी असते.
तेव्हा या रामकृपालच्या नातवाचे मन चेतवायला जुना अग्नी कसा पुरा पडणार?
नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत आर्थिक व जातीयदृष्ट्या मागासवर्गाला विकासाचे स्वप्न दाखवले होते. देशातील काँग्रेस ही भ्रष्ट असून तिच्या भ्रष्टाचारामुळे तुम्ही गरीब राहिला आहात, हे त्या समाजाच्या मनावर ठसवण्यात मोदी यशस्वी झाले. परिणामी, समाजातील वेगवेगळ्या जातीसमूहातील कनिष्ठ मध्यमवर्गीय व गोरगरीब यांनी मोदींना मते दिली. गेल्या चार वर्षांत लोकांच्या अपेक्षा जेवढ्या वाढवल्या, त्या तुलनेत ‘अच्छे दिन’ आले नाहीत. सर्वसाधारणपणे कुठलेही स्थिर सरकार जेवढे काम करू शकते, तेवढेच मोदी सरकारने केले आहे. भ्रष्टाचार कमी झालेला नाही. स्थानिक पातळीवर तलाठी, पोलीस पाटील वगैरे यांच्या खाबूगिरीचा अनुभव लोक घेत आहेत. शिवाय, राफेलमुळे संशयाचे वादळ घोंघावत आहे, ते वेगळेच. त्यामुळे मोदींना मते देणाऱ्या त्या वर्गाचा भ्रमनिरास झाला आहे. चार वर्षांपूर्वी जशी लाट मतपेटीतून उसळली, तशी ती उसळली नाही, तर पर्याय काय, याच विवंचनेतून घाईघाईने राम मंदिराचा मुद्दा तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रातील भाजपा सरकारच्या कार्यकाळात गोमांसापासून शबरीमालापर्यंत अनेक मुद्द्यांवरून हिंदुत्ववादी वातावरण तापवले गेले आहे. मात्र, राम मंदिराचा मुद्दा त्या वातावरणाला अणकुचीदार करील इतका काळ या सरकारच्या व समाजमन चेतवण्याचा प्रयत्न करणाºया पक्ष-संघटनांच्या हातात नाही.
मुंबईत जेव्हा दंगे झाले,तेव्हाच्या विखाराने भरलेले अनेक अनुभव त्याकाळात सक्रिय असलेल्या प्रत्येक पत्रकाराकडे असतात. माझ्याही गाठीशी आहेत. रेल्वेगाडीत समोरासमोर बसलेल्या दोन मुलांपैकी एकाने दुसºयाच्या कानांकडे पाहत त्याला ‘तू मुस्लिम आहेस का?’ असे विचारले होते. त्यावर, त्या तरुणाने आपण हिंदू असल्याचे स्पष्ट करताच मग ‘तुझे कान का टोचलेले नाही?’- असा प्रतिप्रश्न त्या समोरच्या तरुणाने केला... रस्त्यावर उभ्या असलेल्या एकाने एका व्यक्तीकडे विडी पेटवण्याकरिता माचिस मागितली. विडी पेटवल्यानंतर आपण एका हिंदूकडून माचिस घेतल्याचे लक्षात येताच, त्या मुस्लिमाने माचिस त्या व्यक्तीच्या दिशेने भिरकावली व विडी चपलेखाली चिरडली.
१९९२-९३ च्या दंगलीने लोकांच्या मनात इतका विखार भरला होता.आज ती परिस्थिती उरलेली नाही कारण रोजच्या जगण्याचे संदर्भच बदलून गेलेले आहेत. सोशल मीडियामुळे लोकांचा एकच विषय, व्यक्ती, मुद्दा यावर खिळून राहण्याचा कालावधी झपाट्याने कमी झाल्याने कालपर्यंत जे डोक्यावर घेतले, ते आज पायदळी तुडवायला लोक मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रातील मालिकांचे टीआरपी चढतात व घसरतात. एकाच सुपरस्टारचा एक चित्रपट हिट गेला, तर पुढचा फ्लॉप जातो. एक मात्र आहे. लोकांच्या हाती आलेले अफवा पसरवण्याचे स्वस्त साधन. पूर्वी ते नव्हते. सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर हा पोर्न पाहणे आणि जातीय-धार्मिक विद्वेष पसरवण्याकरिता केला जातो, असे संशोधन सांगते. त्यातल्या विद्वेषाचा वणवा किती झपाट्याने पसरू शकतो, याचे चटके देशाने अलीकडेच सोसलेले आहेत. येत्या काळात कदाचित, तसे व्हिडीओ पाठवून समाजमन चेतवण्याचा घृणास्पद प्रयत्न केला जाऊ शकतो. परंतु, सध्या वेगवेगळ्या आरक्षणांच्या लढ्यामुळे आपल्याला उच्च शिक्षण व सरकारी नोकºया मिळून आपल्या जीवनात सुवर्णपहाट उगवेल, असा विश्वास वेगवेगळ्या जातीसमूहातील तरुणांना वाटतो, तसा तो राम मंदिर उभारल्याने होईल, असे वाटण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्यावर ठाकरे यांच्या अयोध्याभेटीनंतर आणि भागवत यांच्या गर्जनेनंतरही बर्फ साठल्यासारखी स्थिती आहे. राम मंदिर उभारण्याकरिता कायदा करा, अशी आरोळी ठोकली गेल्यानंतरही मुस्लिम समाजात कुठलीच प्रतिक्रिया उठलेली नाही. हे त्या समाजाचे राजकीय शहाणपण आहे की, गोमांसाच्या मुद्द्यावरून आलेल्या कटू अनुभवानंतर बहुमताच्या सरकारशी संघर्ष टाळण्याची अपरिहार्यता आहे, ते स्पष्ट झालेले नाही. मात्र, मुस्लिम समाजाने अशीच शांतता बाळगली आणि हिंदूंमधील कनिष्ठ मध्यमवर्ग व खालच्या जातींनी मंदिर मुद्द्याकडे तोंड फिरवले, तर राम मंदिराच्या नावाने डांगोरा पिटणाऱ्यांचा मुखभंग होईल.
राम मंदिर व्हावे; पण...
४देशाने १९९१ मध्ये खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर निर्माण झालेला उच्च मध्यमवर्ग हा संधिसाधू आहे. त्याला स्वत:च्या शरीराला तोशीष न लागता राम मंदिर उभे राहावे, असे वाटते. त्यामुळे त्याला या मुद्द्यावर छेडले तर तो मंदिर हवेच, असे बोलतो. मात्र, त्याकरिता कारसेवा करण्याची किंवा वेळप्रसंगी हातात दगड उचलण्याची त्याची इच्छा नाही. म्हणजे राम मंदिर आंदोलनाच्या कुडीत प्राण फुंकायला जावा, अशी भाजपा व संघ परिवाराची इच्छा असेल, तर त्याकरिता मोदींच्या ‘अच्छे दिन’ला भुललेला व सध्या भ्रमनिरास झालेला कनिष्ठ मध्यमवर्ग व गोरगरीब वर्ग पेटून उठायला हवा. सध्या तो पेटताना दिसत नाही. रामाचा उंच पुतळा उभारण्याच्या घोषणेने किंवा राम मंदिराकरिता कायदा करण्याच्या पोकळ घोषणांनी तो चेतणार नाही. शिवाय, कनिष्ठ वर्गातील लोक हे वरिष्ठ वर्गाचे अनुकरण करत असल्याने या आंदोलनाला वरिष्ठ वर्गाचा कसा पाठिंबा मिळतो, याकडेही हा वर्ग लक्ष ठेवून आहे.
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वरिष्ठ सहायक संपादक आहेत.)
sandip.pradhan@lokmat.com