‘संवाद’ सुरू राहावा म्हणून..
By admin | Published: October 17, 2015 03:18 PM2015-10-17T15:18:17+5:302015-10-17T15:18:17+5:30
टय़ुनिशियात 2011 मध्ये लोकशाही क्रांतीची ठिणगी पेटली. शांतीचे प्रयत्न करणा:या तिथल्या चार संघटनांनी देशासाठी एक राज्यघटना तयार करायला लावली, विळ्या-भोपळ्याचं सख्य असलेल्या सत्ताधारी पक्षांना एकत्रं बसवलं, त्यांची मनं वळवली. या ‘चौकडी’कडे काहीच नाही. बाबा-पुता करून सगळ्यांना एकत्र आणणं, ‘संवाद’ घडवणं एवढंच तिचं काम. त्याच प्रयत्नांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
Next
>- निळू दामले
2016 च्या नोबेल शांतता पारितोषिकाच्या रांगेत पोप, अँगेला मर्केल आणि इराणचा न्युक्लियर कार्यक्रम थांबवणारे मुत्सद्दी उभे होते. पोपनी जगभरचे गरीब आणि वादळात सापडलेल्या 1.2 अब्ज कॅथलिकांना सुकून देण्याचा प्रयत्न केला होता. मर्केल यांनी लाखो असहाय्य अरब निर्वासितांना आपल्या देशात वसवायचं आश्वासन दिलं. इराणला अणुबॉम्बपासून दूर नेलं अमेरिकन-इराणी मुत्सद्दय़ांनी.
या सा:यांना दूर सारून अगदीच अनपेक्षित ‘टय़ुनिशियन राष्ट्रीय संवाद चौकडी’ला शांततेचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं. या चौकडीत जनरल ट्रेड युनियन, मानवी अधिकार संघटना, वकील संघटना आणि उद्योगी संघटनांची परिषद यांचा समावेश आहे. या चौकडीनं दहशतवाद आणि यादवी या दुहेरी संकटात सापडलेला टय़ुनिशिया मोठय़ा कष्टानं लोकशाही आणि संवादाच्या दिशेनं नेला. एकमेकांच्या गळ्याचे घोट घेणा:या संघटनांना एकत्र बसवून टय़ुनिशियासाठी एक राज्यघटना करायला या चौकडीनं भाग पाडलं. राज्यघटनेप्रमाणं निवडणुका घ्यायला लावल्या.
हे सारं आश्चर्यचकित करणारं आहे.
2क्11 च्या डिसेंबरमधे टय़ुनिशियात लोकशाही क्रांतीची ठिणगी पडली. महंमद बुआङिाझी या तरुणानं स्वत:ला जाळून घेतलं. बेन अली या झोटिंगशहानं, क्रूरकम्र्यानं, भ्रष्ट राज्यकत्र्यानं टय़ुनिशिया हा देश, त्यातली माणसं मिळून एक छळछावणी केली होती. बुआङिाझीनं स्वत:ला जाळून घेतल्याची घटना टय़ुनिशियातल्या तरुणांच्या मनात रुतली. गाणी आणि व्हिडीओ क्लिप्सचा वापर करून त्यांनी बेन अलीला उघडं पाडलं. तुरुंग, छळ आणि गोळ्यांचा सामना करत. बेन अली किती लोकांना तुरुंगात पाठवणार, किती लोकांना मारणार. बेन अलीची पाशवी शक्ती शेवटी अपुरी ठरली. तरुण आणि नागरिकांनी बेन अलीला हाकलून लावलं.
टय़ुनिशियाच्या आसपासचे अरब देश जागे झाले. टय़ुनिशियापाठोपाठ इजिप्त, येमेन, सीरिया, लिबिया इत्यादि देशांतले तरुण आणि सामान्य रस्त्यावर उतरले. अरब प्रदेशानं मारलेल्या उसळीनं तिथले हुकूमशहा क्रूरकर्मा राज्यकर्ते हादरले. परंतु यथावकाश अरब उसळी थंड झाल्या, बंडोबा थंडोबा झाले. लिबीयात गद्दाफी गेला पण गोंधळ आणि यादवी माजली. येमेनमधे अजूनही यादवीच आहे. सीरियात अजूनही बशर असद लाखो लोकांची कत्तल घडवतोय आणि इजिप्तमधे अल सिसी हा लष्करशहा पुन्हा सिंहासनावर बसलाय. नागरिकांना हूं का चूं करू देत नाहिये.
टिकला तो केवळ टय़ुनिशिया.
टय़ुनिशियातही संकटं येत राहिली. तरुणांचा उत्साह ओसरल्यानंतर मोकळ्या झालेल्या मैदानात टय़ुनिशियातले प्रस्थापित राजकीय खेळाडू उतरले. नहादा ही मुस्लीम ब्रदरहुडमधून जन्मलेली इस्लामी पार्टी निवडणुकीत उतरली. तिच्या विरोधात विविध डाव्या आणि उदारमतवादी संघटनांचं कडबोळं - निदा टय़ुनिस - मैदानात उतरलं. नहादा ही सलाफी विचारांची पार्टी. लोकशाही आणि स्वातंत्र्य या कल्पना त्यांना मान्य नाहीत. त्यांचा भार कालबाह्य इस्लामी कल्पनांवर. बेन अलीनं त्यांना जाम छळलं असल्यानं लोकांनी त्यांना पाठिंबा दिला होता. दुसरीकडे डावे आणि उदारमतवादी गट कामगार आणि मध्यमवर्गात सक्रिय होते. हे लोकशाहीवादी होते, आपल्या परीनं बेन अलीशी लढा देत होते. त्यांनाही लोकांचा पाठिंबा होता. परंतु हे दोन्ही पक्ष म्हणा किंवा गट म्हणा विळ्या- भोपळ्यासारखे होते. बेन अली गेल्यानंतर झालेल्या निवडणुकात ते एकमेकांविरोधात लढत राहिले. कोणालाही बहुमत नाही. लोकमताच्या रेटय़ाखाली त्यांनी संयुक्त सरकारं तयार केली. वर्षभराच्या काळात तीन वेळा निवडणुका झाल्या. स्थिर सरकार तयार होईना, देशाची घटना तयार होईना. नाहदा हा इस्लामी पक्ष लोकशाही स्वातंत्र्य, स्त्रियांचं स्वातंत्र्य मानायला तयार नव्हता. त्यांना शरीया हवा होता. निदा टय़ुनिसना तर लोकशाही आणि स्त्री स्वातंत्र्य हवं होतं.
दोन वेळा सरकारं बनली. टय़ुनिशियाची अर्थव्यवस्था वळणावर येत नव्हती. भ्रष्टाचार कायम होता. बेन अलीनी उभी करून ठेवलेली भ्रष्ट यंत्रणाच सरकार चालवत होती. निदा टय़ुनिसचे लोक नाराज होते, ते रस्त्यावर येऊन निदर्शनं करीत. टय़ुनिशियन पोलीस त्यांच्यावर गोळ्या झाडत, त्यांना तुरुंगात ढकलत. लोक म्हणत तुरुंगातच जायचं होतं तर मग बेन अलीला का घालवलं. निदा टय़ुनिसच्या काही नेत्यांचे खून झाले. खून करणारे लोक जिहादी होते. खुनी सापडले नाहीत, कायदेशीर कारवाई नाही. लोक म्हणाले की नहादा हा इस्लामी पक्ष संयुक्त सरकारात असल्यानंच खुनी पकडले जात नाहीत, खुनींना सरकारचं संरक्षण आहे.
संयुक्त सरकारातले घटक पक्ष आपसात भांडत होते. लोकशाहीचा खातमा होणार आणि पुन्हा बेन अलीच परतणार अशी स्थिती निर्माण झाली होती.
नेमक्या या स्थितीत संवाद चौकडी कामाला लागली. एकमेकांची तोंडंही पाहायला तयार नसलेल्या राजकीय गटांच्या भेटी घेऊन त्यांचं मन वळवू लागली. एकीकडं ज्यांनी गुन्हे करून लोकांना दडपलं होतं त्या लोकांना शिक्षा व्हायला हव्या होत्या. त्यासाठी द. आफ्रिकेतल्यासारखा हा सत्य आणि सलोखा आयोग स्थापन झाला होता. हा आयोग टय़ुनिशियाच्या सरकार आणि विविध संस्थांमधे लपून बसलेल्या गुन्हेगारांना शोधत होता. सरकारी यंत्रणा या आयोगाला काम करू देत नव्हती. 16क्क्क् गुन्ह्यांच्या तपासाला गेलेल्या आयोगाच्या सदस्यांना सरकारनं कधीकधी तुरुंगातही टाकलं.
पती-पत्नी, भावडं जेव्हा भांडतात तेव्हा मध्यस्थाची फार पंचाईत असते. पती-पत्नी आणि भावंडांना एकमेकांबद्दल खूप तपशीलवार आणि किचकट माहिती आणि आरोप असतात. ते व्यक्तिगत असल्यानं त्यातून वाटही निघत नाही. अशा वेळी मध्यस्थाजवळ फार चिकाटी लागते. व्यक्तींमध्ये न गुंतता गाठी सोडवत मध्यस्थाला पुढं सरकावं लागतं. फार कठीण काम. अगदी लोकशाहीसारखंच. नाना प्रकारच्या कोटय़वधी माणसांना बरोबर घेऊन शांततेनं गाडा चालवणं लोकशाहीत किती कठीण असतं ते सारं जग अनुभवत आहे. काही दिवसांपूर्वी गुप्तचर अजित दुलाट यांनी काश्मीरप्रश्नी झालेल्या प्रयत्नांची माहिती दिली आहे. हुरियत, जिहादी इत्यादि टोकाची मतं आणि उद्योग असणा:या लोकांसोबत दुलाट आणि त्यांचे सहकारी विसेक वर्षे वाटाघाटी करत राहिले. दुसरी वाटच नव्हती. मारामारीनं प्रश्न सुटत नसतात.
काश्मीरचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. टय़ुनिशियाचंही तसंच आहे. चौकडीनं अथक परिश्रम करून विळ्या-भोपळ्याला एकत्र बसवलं. परंतु प्रश्न जैसे थे आहेत. चौकडीला नोबेल मिळालं त्याच्या आदल्याच दिवशी सूस या गावात एका खासदारावर गोळीबार झाला. दिवसाढवळ्या. खासदार वाचला, त्याच्या गाडीची चाळण झाली. चौकडीचे निकराचे प्रयत्न चालले असतानाच बाडरे म्युङिायममध्ये तीन अतिरेकी घुसले. गोळीबार केला. एक पोलीस आणि 21 पर्यटक ठार झाले. सूस या समुद्रकिना:यावरच्या गावातल्या एका हॉटेलवर अतिरेक्यांनी हल्ला केला आणि 38 माणसं मारली. टय़ुनिशियाची अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारलेली आहे. देशाच्या उत्पन्नात दहा टक्के पैसे परदेशी पर्यटकांमुळं येतात. हज्जारो माणसं पर्यटनावर जगतात.
गेल्या वर्षी तीनेक हजार तरुण आयसिस या अतिरेकी संघटनेत सामील झाले. लोकांचं म्हणणं आहे की नहादा हा सत्ताधारी आघाडीतला पक्ष इस्लामी असल्यानंच या सा:या गोष्टी घडत आहेत.
चौकडी अजूनही प्रयत्नशील आहे. चौकडी म्हणजे टय़ुनिशियातलं सरकार नव्हे. चौकडीकडं ना पैसे आहेत, ना पोलीस, ना सैन्य, ना न्यायालय. टय़ुनिशियाची अर्थव्यवस्था सुधारणं किंवा लोकशाही संस्था उभारणं ही चौकडीची कामंच नव्हेत. तसा अधिकार त्यांना नाही, त्यासाठी लागणारी संसाधनं त्यांच्याजवळ नाहीत. तहानलेल्यांसाठी तलाव उभारणं हे काम चौकडी करू शकत नाही. तहानलेल्यांना बाबा पुता करून पाणवठय़ाजवळ नेणं एवढंच काम चौकडी करू शकते.
चौकडीच्या प्रयत्नांमुळे टय़ुनिशियाचा इजिप्त, सीरिया, लिबिया झाला नाही. एक चांगला लोकशाही देश होणं अजूनही बाकी आहे. जे घडलेलं नाही त्याबद्दल खंत व्यक्त करत असताना जे घडलं त्यावरून भविष्यात काही तरी घडू शकेल अशी आशा करायला हरकत नाही.
स्त्री स्वातंत्र्याचा विषय पुढे नेला म्हणून
मलालाला मिळाला पुरस्कार
टय़ुनिशियाच्या चौकडीला नोबेल शांतता पारितोषिक देण्याचा निर्णय नोबेल कमिटीच्या घाडसी निर्णयाच्या परंपरेतलाच आहे. शांतता स्थापन करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिक देण्यात आलं, शांतता स्थापन झालेली नसताना. मलाला युसुफझाईला गेल्या वर्षी पारितोषिक मिळालं. तिनं तसं काय केलं होतं? एक व्यक्ती म्हणून तिनं निकराचा, धाडसाचा लढा दिला. त्यानंतर ती ब्रिटिश संरक्षणात वावरते आणि तिकडं पाकिस्तान-अफगाणिस्तानात स्त्रियांना सर्रास अमानुष वागणूक मिळतेच आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तानातली परिस्थिती भले ‘जैसे थे’ असो. पण स्त्रीचं स्वातंत्र्य हा विषय मलालानं पुढं नेला. पुढं जाणा:या इतरांना त्यातून प्रोत्साहन मिळालं.
ओबामा, पेरेस, राबिन, अराफत. यांना का दिला गेला नोबेल?
ओबामा यांना नोबेल दिलं तेव्हा त्यांच्या प्रगती पुस्तकात एकाही परीक्षेतल्या मार्काची नोंद नव्हती. इराक आणि अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेणार, तिथं शांतता प्रस्थापित करणार असं भाषण ओबामांनी केलं होतं. बस. तेवढंच. त्यानंतर आज पुन्हा अमेरिकन सैन्य इराकमधे जातंय, अफगाणिस्तानातला अमेरिकन सैन्याचा मुक्कामही वाढतोय आणि सीरियातला अमेरिकेचा हस्तक्षेप वाढतोय. मग कशाला दिलं ओबामांना बक्षीस, असा प्रश्न लोक विचारत आहेत. बक्षीस दिलं तेव्हाही हा प्रश्न लोकांनी विचारला होता.
नोबेल कमिटीचं म्हणणं होतं की अशा प्रयत्नांचं महत्त्व ठसणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं महत्त्वाचं असतं. पेरेस, राबिन आणि अराफत यांनाही शांततेसाठी नोबेल दिलं गेलं. शांतता प्रयत्नांसाठी. त्या नोबेलनंतर आज वीसेक र्वष पॅलेस्टाईन प्रश्न लोंबकळत पडला आहे. तिथं हिंसा अजूनही होतेय. नोबेल कमिटीच्या निर्णयाचा परिणाम झालेला दिसत नाही. कमिटीचा प्रयत्न ही एक खेळी होती, एक प्रयत्न होता. हवं तर एक जुगार होता म्हणा. खेळीचा उपयोग झाला नाही एवढंच.
(लेखक ख्यातनाम लेखक आणि मुक्त पत्रकार आहेत.)
damlenilkanth@gmail.com