एका आदर्श शिक्षकाचे योगदान

By admin | Published: November 14, 2014 10:20 PM2014-11-14T22:20:20+5:302014-11-14T22:20:20+5:30

या नवजात बाळाने जन्मत:च असा काही टाहो फोडला, की त्याच्या मातापित्याला त्याचे गुण एका क्षणात लक्षात आले, म्हणून त्यांनी या आपल्या बाळाचे नाव गुणवंत ठेवून टाकले.

Contribution of an ideal teacher | एका आदर्श शिक्षकाचे योगदान

एका आदर्श शिक्षकाचे योगदान

Next

 प्रा.डॉ.द.ता.भोसले (लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती 

यांचे ज्येष्ठ अभ्यासक व नवृत्त प्राचार्य आहेत.) - 
या नवजात बाळाने जन्मत:च असा काही टाहो फोडला, की त्याच्या मातापित्याला त्याचे गुण एका क्षणात लक्षात आले, म्हणून त्यांनी या आपल्या बाळाचे नाव गुणवंत ठेवून टाकले. हे गुणवंत पाटील प्रत्येक वर्गाला ठेचा खात-खात एकदाचे एस.एस.सी.च्या मांडवाखालून बाहेर पडले. काहीच करता येत नाही म्हणून डी.एड. झाले आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत वडिलांच्या पुण्याईमुळे शिक्षक झाले. ‘ज्ञानाइतकी दुसरी कोणतीच गोष्ट पवित्र नाही,’ या संस्कृत वचनाचा आदर्श समोर ठेवून या क्षेत्रात स्थिरावले. या वचनातील ‘ज्ञान’ हा शब्द ज्ञानदान आणि ज्ञानोपासना या दोन्ही अर्थाने वापरलेला असला, तरी या आमच्या गुणवंतरावांना या दोन्ही गोष्टी फारशा महत्त्वाच्या वाटत नाहीत, म्हणूनच त्यांचा जितका वेळ शाळेत जातो, तितकाच किंवा थोडासा अधिकच वेळ शाळेबाहेर जातो.
शाळेची वेळ साडेसातची असल्याने ते सात वाजताच घर सोडतात. पण शाळेला जातानाच ‘काय गंगूबाई, काय चाललंय? म्हैस व्याली का तुमची?’, ‘काय रंगूबाय, सून घरात असताना तू कशाला अंगण झाडतेस? बैस जरा; चहा घेऊ दोघंजण’, ‘काय मंदाताई, चहा ठेव की ताज्या दुधाचा; किती दिवसांत तुझ्या हातचा चहा घेतला नाही. तसा आताच दिला रंगूबाईनं; पण शेवटपर्यंत आपण चहा पितोय का उकळलेलं गढूळ पाणी पितोय हे समजलं नाही. तुझ्या चहाशिवाय तोंडाला चव येणार नाही,’ असं म्हणून मंदाताईच्या ओसरीवरच हे ठाण मांडून बसणार. चहा होईपर्यंत मग त्यांचं बत्तीस दात आणि दोन ओठांचं वाद्य सुरू होतं. ‘धाकटी सून कामाला बरी आहे का? थोरल्या सुनेशी पटतं का? नातवाचं जावळ कधी करणार? जावळाला दोन बोकडांचा बेत झाला झाला पाहिजे. चार दिवस आपण तर मटण खाणार बघ. तुझ्या दिराचा पोरगा फारच पिऊ लागलाय.’ अशा हजार निर्थक चौकशा आणि माहिती देत-घेत ते चहा संपवितात. मग शाळेकडे निघाले असतानाच रामाकडून तंबाखू घेतील, तर दामाकडून चुना घेऊन एक झकास तंबाखूचा लाडू गालफाडात ठेवून ‘उशीर झालाय शाळेला गेलं पाहिजे. नाहीतर शाळेचा सासरा दोन्ही मनगटावर रॉकेल ओतून बोंब मारत बसेल,’ असं म्हणून सटकतील. शाळेच्या रस्त्यावरून ते जात असतानाच नदीवरून पाण्याची घागर घेऊन येणारा भीमराव त्यांना दिसतो. त्याच्याशी चार शब्द बोलल्याशिवाय गुणवंतरावांना पुढे जाणे बरे वाटत नाही. तो जवळ येताच म्हणतील, ‘तुझ्या त्या वास्तुशांतीचं मिळमिळीत जेवण आम्हाला आवडलं नाही बघ. खास बेत करून बोलव बाबा एकदा. अरे, गुरुजींना खाऊ घालणं म्हणजे एकदम पुण्याचं काम असतं बाबा. त्यासाठी मी सांगतोय.’ तो मानेनंच होकार देतो. शाळेच्या पायर्‍या चढून वर जाताच त्यांना दोन्ही वर्ग एकत्र करून पोरांचा कोंडवाडा सांभाळणारा प्रभाकर गुरुजी दिसतो. त्याच्या जवळ जाऊन ते म्हणतात, ‘सासूबाई ओरडल्या नाहीत ना? असू दे. माझाही वर्ग तुझ्याकडेच असू दे. नंतर मी तुला सांभाळीन.’ आता लगेच हेडमास्तरांच्या गुहेत जाऊन मस्टरवर सही करायची म्हटली, तर आपण उशिरा आल्याचे त्यांच्या लक्षात येईल, या विचाराने ते तसेच माघारी वळतात आणि देवळाच्या ओट्यावर बसलेल्या गावकर्‍यांच्या गप्पांत सामील होतात. मग तिथे त्यांचे समाजकार्य सुरू होते. एकाला वास्तुशांतीचा मुहूर्त सांगतील, दुसर्‍याला अमावस्या केव्हा ते सांगतील, तिसर्‍याला पोरीच्या लग्नासाठी स्थळ सुचवतील; तो विवाह जुळवून देण्याची हमी देतील. गावातल्या मुला-मुलींची लग्ने जमविण्याचे त्यांना भारी वेड. जणू त्यांचा हा दुसरा व्यवसायच. मुलीचं वर्णन करताना उपमा-उत्प्रेक्षांचा जणू पाऊस पडतो. ‘आमची मुलगी अप्सरेला लाजवील अशी आहे. उर्वशीच्या थोबाडीत मारील एवढी देखणी आहे.’ अशा भाषेत त्यांचा वाग्विलास पाझरतो. जनावरांच्या खरेदी-विक्रीतही ते निष्णात आहेत. हीच विशेषणे वापरून पांडा सुताराची म्हैस ग्राहकाच्या गळ्यात बांधतात. या व्यवहारात दलाल म्हणून त्यांना चांगली प्राप्ती होते. अनेकदा तर शाळेला अर्धी रजा टाकून किंवा शाळेचेच एखादे काम काढून ते आठवडी बाजारी जातात आणि वांझ गायीपासून तो लाथ झाडणार्‍या म्हशींपर्यंत सार्‍यांची मोठय़ा हिकमतीने विक्री-खरेदी करतात. त्यामुळे त्यांना शासनाने दिली नसली, तरी व्यापार्‍यांनी ‘हेड्या’ अशी पदवी बहाल केलेली आहे. हेड्या म्हणजे दलाल.
रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे त्यांचा हा दिवसच सर्वांत बिझी असतो. ते सकाळी भाजी घेण्यासाठी मंडईला जातात खरे; पण तिथेच ते दलाली करून शे-दोनशे रुपये कमावतात. मंडईच्या तोंडावरच उभे राहून भाजी विकायला आलेल्या शेतकर्‍यांना अडवतात आणि त्यांचा भाजीपाला तिथेच खरेदी करतात आणि हाच भाजीपाला आत मंडईला आणून दीडपट किमतीला विकून मोकळे होतात. एखादी ओळखीची बाई भाजीपाला विकताना दिसली, तर तिच्या नापास पोराचे इतके तोंड भरून कौतुक करतात, की त्या माऊलीचं तोंड कमळासारखं फुलतं आणि ती मोठय़ा खुशीत गुणवंतरावांच्या पिशवीत भाजी भरते. खिशात पैसे नसताना उगीचच खिशात हात घालून भाजीचे पैसे देण्याचे ते नाटक करतात. ती घेणार नसते हे त्यांना ठाऊक असतेच. त्यानंतर ते ‘कशी दिली वांगी? कसा दिला दोडका? कसे किलो टोमॅटो?’ असा प्रश्न प्रत्येक भाजीविक्रेत्याला विचारतात. विचारत असताना, त्यांना दाखवण्यासाठी ते हातात एक वांगे, एक दोडका एखादा टोमॅटो घेतात आणि दराची घासाघीस करीत असतानाच ते वांगं, दोडका आपल्या पिशवीत टाकून ‘परत येताना घेतो भाजी’ असे म्हणून पुढे जातात. असे सहा-सात विक्रेत्यांकडे चौकशी करण्याच्या निमित्ताने चांगली अर्धा-अर्धा किलो भाजी गोळा करतात. पिशवीचे तोंड भरल्यावरच त्यांची ही खरेदी थांबते.
आमच्या या गुणमंडित गुणवंतरावांची आणखी दोन वैशिष्ट्ये सांगितली पाहिजेत. त्यातले एक म्हणजे गावातल्या आणि शेजारच्या गावातल्या अनेक विवाहांसाठी ते गेयपूर्ण मंगलाष्टके तयार करून देतात. त्यासाठी ते पैसे घेत नाहीत; पण त्यांनी केलेला आहेर मात्र स्वीकारतात. तीन-चार प्रकारची मंगलाष्टके त्यांनी आधीच तयार केलेली आहेत. त्यात जो नव्याने मागायला येईल; त्यांच्या वधूवरांची नावे त्यात घालून ते देतात. बाकीचा मजकूर तोच असतो. अनेकदा ती स्वत:च म्हणून दाखवतात. भुकेने व्याकूळ झालेल्या रेडकाने ओरडावे तसा त्यांचा आवाज असला तरी त्यांचे कौतुक करावे लागतेच. एखाद्या अधिकार्‍याने अथवा मान्यवराने भेट दिली, तर त्यांच्या स्वागतासाठी त्यांचेच स्वागतगीत असते. ‘तुम्ही किती मोठे तुम्ही किती मोठे। तुलना नाही कोठे।’ या पात्रतेचे ते गीत असते. गावातल्या लोकांची कामे करीत असल्याने त्यांची बदली होऊ नये, यासाठी गावकरीच पुढाकार घेतात. शिवाय आमचे हे गुरुजी शिक्षण खात्यातील वरच्या मंडळींना भेटतात. त्यांना तृप्त मेजवानी देतात. त्यांना भेटवस्तूही देतात. मग असा तृप्त झालेला तो अधिकारी लिहितो, की ‘समाजसेवा, ज्ञानसेवा, ग्रामसेवा यांच्यासाठी झटणार्‍या या थोर ज्ञानोपासकाचा शासनाने आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अग्रक्रमाने 
विचार करावा.’
 

Web Title: Contribution of an ideal teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.