सहकारातील विचार
By admin | Published: October 25, 2014 01:56 PM2014-10-25T13:56:26+5:302014-10-25T13:56:26+5:30
आपल्या देशातील सहकार चळवळ ही सर्वांत जुनी आणि सातत्याने कार्यरत असणारी रचनात्मक चळवळ म्हणून ओळखली जाते. या चळवळीत मानाचे स्थान असलेली आणि दीपस्तंभासारखी आदर्शवत असणारी संस्था म्हणजे वारणा उद्योग समूह. या समूहाचे संस्थापक तात्यासाहेब कोरे यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे, त्या निमित्ताने..
Next
- प्रा. दिनेश पाटील
देशात १२0 वर्षांपूर्वी सुरू झालेली आणि आजही कार्यरत असणारी तसेच इतका दीर्घ काळ सातत्यपूर्ण काम करणारी आपल्या देशातील बहुधा एकमेव ‘रचनात्मक चळवळ’ म्हणून सहकार चळवळीची आज नोंद घ्यावी लागते; परंतु दुर्दैवाने १९७४मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमुळे सहकाराला ‘स्वाहाकार’ म्हणण्याची फॅशन तथाकथित शहरी विद्वानांनी रूढ केली. दुसर्या बाजूला १९१५मध्ये त्र्यंबक नारायण अत्रे यांनी त्यांच्या ‘गावगाडा’ पुस्तकात ग्रामीण विकासाचे सर्वांत प्रभावी साधन म्हणजे ‘सहकार’, असा निष्कर्ष काढला होता. या पार्श्वभूमीवर, १९५0च्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा नदीच्या खोर्यात सहकारी साखर कारखान्याच्या रूपाने रचनात्मक परिवर्तनाची पायाभरणी झाली. तात्यासाहेब कोरे यांच्या रूपाने वारणा परिसराचा भाग्योदय करणारे नवे नेतृत्व उदयाला आले. १४ ऑक्टोबर १९१४ रोजी जन्मलेल्या तात्यासाहेब कोरेंचे हे जन्मशताब्दी वर्ष.
‘नवा माणूस’ घडविण्याचा संकल्प करून तो सहकाराच्या माध्यमातून साकारण्यासाठी त्यांनी सहकारी तत्त्वावर अनेक नवे उपक्रम सुरू केले. आज हा समूह वारणा सहकारी उद्योग आणि शिक्षण समूह म्हणून अधिक जोमाने वाटचाल करतो आहे. वारणा सहकाराची ख्याती फकत देशातच नाही, तर जगभर झाली आहे. कारण, सहकाराच्या आर्थिक स्थैर्यासाठी इतरत्र त्याचा उपयोग केला गेला; परंतु येथे मात्र तात्यासाहेबांनी फक्त आर्थिक समृद्धी एवढेच उद्दिष्ट ठेवले नाही. १ नोव्हेंबर १९५९ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम सुरू झाला. त्यानंतर सहकारी तत्त्वावर कुक्कुटपालन, दूध प्रक्रिया उद्योग, बँक, शिक्षण मंडळ, महिला गृह उद्योग, ग्राहक भांडार, महात्मा गांधी हॉस्पिटल, कागद कारखाना, फळ प्रक्रिया, सहकारी तत्त्वावर जलविद्युत प्रकल्प यासारखे नवेनवे संकल्प साकारत गेले. विशेष म्हणजे, पहिल्या गळीत हंगामाप्रसंगी यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीने तात्यासाहेबांनी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णयच वारणा परिसरातील परिवर्तनाची नांदी होती.
शेतकर्यांच्या आर्थिक विकासाबरोबर त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला त्यांनी अग्रकम दिला. ‘जे करेन ते नंबर वन करेन,’ हा त्यांचा विचार वारणेच्या ‘सहकार चळवळी’चा पाया आहे. त्यामुळेच वारणा सहकाराला ‘सहकारातील मानदंड’ म्हणून जगभर ओळखले जाते. आज जागतिकीकरणाच्या युगात ज्या गुणवत्तेचा आग्रह धरला जातो, त्याची सहकारात सुरुवात तात्यासाहेबांनी ५0 वर्षांपूर्वी केली. हाच नवा विचार वारणा सहकाराच्या गुणवत्तापूर्वक वाटचालीस प्रेरक ठरला. तात्यासाहेबांनी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक गुणवत्तेचा ध्यास धरला. याच गुणवत्ता धोरणामुळे वारणा परिसरातील ७0हून अधिक गावांतील शेतकरी, अल्पभूधारक, भूमिहीन, दलित, महिला यांची सर्वांगीण प्रगती वेगाने झाली. संघर्ष हे तात्यासाहेबांचे दुसरे नाव आहे, असे म्हणता येईल. वारणा कारखाना स्थापनेचा पहिला प्रयत्न फसल्यानंतर तात्यासाहेब आणि या चळवळीतील त्यांचे सहकारी थांबले नाहीत. दुसर्या प्रयत्नात साखर कारखाना स्थापन करण्याचा संकल्प साकार झाला. त्या वेळचे सामाजिक पर्यावरण विचारात घेता, शेतकर्यांना या कारखान्याचे महत्त्व पटवून देणे, त्यांचा आर्थिक सहभाग निर्माण करणे केवळ अशक्य होते. त्या वेळी एक वर्ष घरदार सोडून ७0 गावांत पायी फिरून त्यांनी लोकांना या चळवळीत सहभागी केले. विशेष म्हणजे, त्या वेळी बहुतांशी शेतकर्यांची शेअर सर्टिफिकेट तात्यासाहेबांनी स्वत: लिहिली होती. फक्तकारखाना स्थापन झाला म्हणजे विकास होतो, असे नाही, तर त्यानंतर नवे प्रश्न जन्म घेतात. मग तो उसाचा असो वा पाण्याचा, अखंडपणे नव्या-नव्या प्रश्नांचा सामना करीत ही चळवळ जिवंत ठेवणे म्हणजे खडकावर रोपटे जगविण्यासारखा प्रकार होता. म्हणूनच हा संघर्ष वारणा समूहाला अखंड ताकद देत राहिला. लढण्याची नवी ऊर्मी आणि विकासाची भव्य स्वप्ने ही तात्यासाहेबांची सहकाराला एक मोठी देणगी आहे.
या सहकार चळवळीत १९६८मध्ये जेव्हा दूध संघाची स्थापना झाली, तेव्हा नव्या आव्हानांनीच त्यांचे स्वागत झाले. जवळजवळ १५ वर्षे भूमिहीन शेतकर्यांच्या जीवनात सुखाची पहाट आणणारा हा प्रकल्प झगडत होता. आज हाच प्रकल्प देशातील अग्रगण्य प्रकल्प म्हणून दिमाखाने वाटचाल करीत आहे. प्रत्येक संस्थेची सुरुवात खडतर; परंतु वाटचाल यशस्वी, असेच सूत्र सर्व संस्थांमध्ये दिसते. वारणेच्या पाण्याची करामतच अशी काही आहे, की ते अपयश पाहत नाही, याचे कारण तात्यासाहेबांची विचारसरणी होय. त्यामुळेच तात्यासाहेबांनी सुरू केलेल्या प्रत्येक उपक्रमाची दखल जगभर घेतली गेली. १९७४मध्ये शेतकर्यांच्या पिकाला पाणी मिळावे म्हणून स्वनिधीतून ३0 लाखांचे शिगाव धरण कारखान्याने बांधले. देशाच्या इतिहासात हा सुवर्णाक्षरात नोंदवून ठेवावा, असा क्षण होता. ज्या वेळी ‘गाव तेथे अंगणवाडी’ योजना शासन स्तरावरही चर्चेत नव्हती, त्या वेळी वारणा कारखान्याने ‘गाव तेथे अंगणवाडी’ योजना कारखाना कार्यक्षेत्रात राबविली. कारखान्याच्या स्थापनेपासूनच कार्यक्षेत्रातील सर्व गावांमध्ये ग्रंथालयांना अनुदान, शाळा इमारतीला मदत, कच्च्या रस्त्यांचे नूतनीकरण असे अनेक उपक्रम राबविले. तात्यासाहेब विकासाचा किती व्यापक विचार करीत होते, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे बालवाद्यवृंद हा सर्जनशील उपक्रम. या वाद्यवृंदात लहान मुलांना मोफत संगीत शिकण्याची संधी मिळते. या बालवाद्यवृंदाने संपूर्ण देशभर तसेच मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, युगोस्लाव्हिया आदी देशांमध्ये कार्यक्रम सादर केले. तात्यासाहेबांनी केलेल्या सर्व कामांचा विचार केला, तर एक सूत्र त्या कामात दिसते. कारखाना सुरू झाल्यानंतर त्या कारखान्याच्या सहकार्याने इतर संस्थांची स्थापना करणे आणि लोकांच्या सर्व गरजा भागविणारी संस्थात्मक यंत्रणा उभी करणे, हे सूत्र तात्यासाहेबांच्या सहकारातून ग्रामीण विकासाच्या विचाराचे अधिष्ठान होते. महात्मा गांधींनी मांडलेल्या स्वयंपूर्ण खेड्याच्या संकल्पनेचा प्रभाव या सूत्रात आपल्याला सापडतो.
ऊसउत्पादक सभासदांना सर्वाधिक ऊसदर देण्यामध्ये कारखाना स्थापनेपासूनच आघाडीवर आहे. सभासदांच्या बिलातून टनामागे अगदी छोटीशी रक्कम घेऊन त्यातून शाळा-महाविद्यालयांची इमारत, सर्व उपचार एका छताखाली देणारे महात्मा गांधी हॉस्पिटल यासारखे उपक्रम लक्षवेधी ठरावेत. १९७0च्या दशकात ‘गुरुकुल’ पद्धतीची ग्रामीण परिसरातील पहिली शाळा त्यांनी वारणानगर येथे सुरू केली. अल्पावधीतच महाराष्ट्राच्या विविध विभागांतून तसेच पुणे-मुंबईसारख्या शहरांतील मुलेही या शाळेत येऊ लागली. सहकारातून क्रांती घडू शकते, याचे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवणार्या तात्यासाहेबांची विचारसरणीच यामध्ये प्रमुख होती. ते जेथे जात तेथून गुणी, विद्वान मंडळी, नवीन कल्पना, नवे प्रकल्प घेऊन येणे हे त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. सहकारी संस्थासुद्धा व्यापारी तत्त्वाने चालवून सहकारी आर्थिक व्यवस्थापनाचा एक नमुनाच त्यांनी निर्माण केला. म्हणूनच नोबेल पुरस्कारविजेते अर्थशास्त्रज्ञ महंमद युनूस यांनी १९८0च्या दशकात वारणा समूहाला जेव्हा भेट दिली, तेव्हा ‘ग्रामीण विकासाचा हा नमुना आम्ही आमच्या देशात घेऊन जात आहोत,’ असे उद्गार काढले. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांनी ‘कृषी-औद्योगिक’ समाजरचनेचे ध्येय ठेवून सहकार चळवळीला पाठबळ दिले. यशवंतराव आणि तात्यासाहेब स्वातंत्र्य चळवळीपासूनचे मित्र होते. यशवंतरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा ‘कृषी-औद्योगिक पुनर्रचने’चा मानाचा पुरस्कार सर्वप्रथम वारणा समूहाला मिळाला. यावरून आधुनिक महाराष्ट्रातील ग्रामीण विकासात तात्यासाहेब आणि वारणा सहकार समूहाचे असणारे योगदान अधोरेखित होते. ‘माझ्या परिसरातील एकही कुटुंब दारिद्रय़रेषेखाली ठेवणार नाही,’ असा निर्धार करून स्वत:चा अमृत महोत्सव साजरा करणार्या तात्यासाहेब कोरे या भूमिपुत्राचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. आज एकूणच रचनात्मक कामाची समाजाला असणारी गरज पाहता आणि दुसर्या बाजूला जागतिकीकरणाच्या त्सुनामीत सहकार चळवळ अतिदक्षता विभागात असताना ‘वारणा सहकार समूह’ एक प्रेरक शक्ती म्हणून ग्रामीण महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरू शकतो.
होय, हे शक्य आहे! असा दुर्दम्य आशावाद देणार्या या ऊर्जादायी महापुरुषाच्या विचार आणि कार्याचा जागरच विकासाच्या शाश्वत मूल्यांना जिवंत ठेवू शकतो. म्हणूनच या वर्षात विविध उपक्रमांद्वारे सहकारातून सुंदर सहजीवन बहरू शकते. या चैतन्यदायी विचारांची पेरणी करणे, हेच या भूमिपुत्राला विनम्र अभिवादन ठरू शकते.
(लेखक प्राध्यापक असून,
ग्रामीण विकासप्रक्रियेचे अभ्यासक आहेत.)