‘कोरोना’चे संकट : आपत्ती की इष्टापत्ती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 06:54 PM2020-04-18T18:54:34+5:302020-04-18T18:55:59+5:30

आपल्या करिअरबाबत, ज्ञानाबाबत आणि त्याच्या उपयोगितेबाबत विविधांगी विचार करण्याची संधीच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे.

The 'Corona' crisis: disaster or oportunity? | ‘कोरोना’चे संकट : आपत्ती की इष्टापत्ती?

‘कोरोना’चे संकट : आपत्ती की इष्टापत्ती?

googlenewsNext

सध्या देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या संकटाने जीवनातील सर्वच क्षेत्रांबाबत नव्याने विचार करायला भाग पाडले आहे. समाजातील सर्वच स्तरातील, सर्वच व्यवसायातील लोकांसमोर या संकटाने नवे प्रश्न निर्माण केले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढीसमोर देश स्वतंत्र करण्याचे ध्येय होते. वैद्यकीय सुविधा अद्ययावत नसल्याने अनेक रोगांच्या साथी त्या काळात फैलावत. देश-विदेशातही आरोग्य सेवेबाबत अशीच परिस्थिती होती. त्यानंतर देश स्वतंत्र झाला, हळूहळू देशाने मोठी प्रगती केली. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत महामारी किंवा महासंकट म्हणावे असे प्रसंग देशावर आले नाहीत. अपवाद, पाकिस्तान आणि चीन युद्धांचा आणि दुष्काळाचा; पण त्यावर देशातील जनतेने संयमाने, धैर्याने मात केली; मात्र आज उद्भवलेल्या कोरोना नामक विषाणूच्या भयाने संपूर्ण जगालाच वेठीस धरले असल्याचे चित्र आहे. त्यातही शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात कोरोनामुळे काय बदल घडेल, काय बदल घडू शकतात, विद्यार्थ्यांनी या संकटाच्या घडीला धैर्याने सामोरे कसे जावे, पालकांनी व विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी, शालेय आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याबाबत काही सूचना करण्याचा हा प्रयत्न.
कुठल्याही संकटावर धैर्याने आणि संयमाने, धीर खचू न देता कशी मात करावी, याची गुरुकिल्ली सुदैवाने आपल्याला आपल्या देशातील महामानवांच्या आयुष्यातून सहज मिळते. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे वाचन केले, तर शिवरायांच्या आयुष्यात जणू संकटांची मालिकाच पाहायला मिळते. स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यापासून ते अगदी महाप्रयाणापर्यंत छत्रपती शिवरायांनी अनंत संकटांना आपल्या समयसूचकतेने, धैर्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने परतवून लावल्याचे दिसते. तसेच, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनाही ब्रिटिशांनी राजद्रोहाच्या आरोपावरून मंडाले येथे सहा वर्षे तुरुंगवास ठोठावला होता; मात्र लोकमान्यांनी या काळाचा सदुपयोग करीत ^^‘गीतारहस्य’ हा मौलिक ग्रंथ लिहिला. इतरही अनेक ग्रंथ त्यांनी याच काळात लिहिले. दुसरे उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे. ब्रिटिशांनी त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा एकाच वेळी दिल्या. याच कालावधीत स्वा. सावरकरांनी कमला नावाचे महाकाव्य याच काळकोठडीत रचले आणि सुटका झाल्यानंतर ते त्यांनी लिहून काढले. तिसरे उदाहरण द्यायचे झाले, तर भौमर्षी विनोबा भावे यांचे देता येईल. १९३२ च्या जानेवारी ते जुलै या कालखंडात विनोबा भावे यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली; मात्र तेथील इतर कैद्यांच्या आग्रहावरून दर रविवारी विनोबांनी श्रीमद् भगवद्गीतेवर जी प्रवचने दिली, त्याचे पुढे ‘गीता प्रवचने’ हे अजरामर पुस्तक छापले गेले.
सांगायचा मुद्दा असा की, कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या, त्यांना सक्तीने घरात राहावयास लागत आहे, घरी करमत नाही अशी तक्रार विद्यार्थीच नव्हे, तर सर्वच वयोगटातील लोक करीत आहेत. त्यांना मला असे सांगावेसे वाटते की, वरील महापुरुषांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हा तुरुंगवास भोगला. कुठल्याही भौतिक सुविधा नसताना आणि जीवघेणे कष्ट करीत या महापुरुषांनी हा तुरुंगवास नुसता भोगलाच नाही, तर त्या दरम्यान त्यांनी आपल्या अजरामर साहित्यकृती निर्माण केल्या. आज आपल्यासमोर सर्वच भौतिक सुखे हात जोडून उभी आहेत, आपण आपल्याच घरात आहोत, आहार-विहाराची उत्तम सोय आपल्याला उपलब्ध आहे आणि कुठल्या संकटाच्या कारणाने का होईना, तब्बल तीन-चार आठवड्यांची सक्तीची सुटी आपल्याला मिळाली आहे. या महापुरुषांच्या जीवनाचा विचार करता आपण कितीतरी पट सुखात आहोत. विद्यार्थ्यांनी या काळाचा सदुपयोग करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे मला यानिमित्ताने सांगावेसे वाटते. म्हणजेच आज देशातील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. योग्य वेळी त्या होतीलच; पण आज या परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरबाबत एकूणच नव्याने विचार करण्याची संधीही या निमित्ताने उपलब्ध झाली आहे, असे सांगावेसे वाटते. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन करून चांगले शिक्षण घ्यायचे, पैसा मिळवायचा ही चाकोरी सोडून आज या विद्यार्थ्यांच्या करिअरच्या, म्हणजेच जीवनाच्या सुरुवातीलाच कोरोनासारखे महाभयंकर संकट उभे ठाकले आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी वा इतर उच्च अभ्यासक्रमात शिकत असताना पारंपरिक विचार न करता अशा जागतिक आपदा पुढील आयुष्यात आल्यास काय करायचे, हा मोठा विचार करण्याची संधीही आजच्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाºया विद्यार्थ्यांना यानिमित्ताने मिळाली आहे. पारंपरिक पद्धतीने अभ्यास करून जीवनात पुढे जाण्याऐवजी मी तयारी करीत असलेल्या अभ्यासक्रमाचा माझ्या समाजाला, राज्याला, राष्ट्राला आणि एकूणच मानवतेला कसा उपयोग करून देता येईल, याचा विचार करण्याची संधी आजच्या संकटाने उद्याचे सुजाण नागरिक होणाºया विद्यार्थ्यांना दिली आहे. शिक्षण कशासाठी? केवळ परीक्षा पास करण्यासाठी, फक्त ज्ञान ग्रहण करण्यासाठी की, आपले जीवन जगत असताना समाजाच्या, राज्याच्या, राष्ट्राच्या आणि जगाच्या उपयोगी पडण्यासाठी? हा फार मोठा विचार आजची परिस्थिती आजच्या विद्यार्थ्यांना देत आहे, असे आवर्जून सांगावेसे वाटते. आज शाळा, महाविद्यालये, ट्युशन बंद आहेत. एकूणच शैक्षणिक वेळापत्रक बदलले आहे. अशावेळी हातपाय न गाळता उपलब्ध साधनांच्या आधारे, इंटरनेट, ई-बुक, मोबाईल, कॉम्प्युटर, इतकेच नव्हे, तर आपण ज्या वर्गातून पुढे जाणार आहोत, त्याच वर्गाची पुस्तके परत वाचून आपले ज्ञान अद्ययावत करण्याची संधीही विद्यार्थ्यांना आहे. ‘बरेचदा पुढचे पाठ आणि मागचे सपाट’ अशी स्थिती काही विद्यार्थ्यांची असते. हे टाळण्यासाठी जुन्या अभ्यासक्रमाची रिव्हिजन विद्यार्थ्यांनी करावी. स्पर्धा परीक्षांसोबत इतर स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना अगदी इयत्ता चौथीच्या ते एम.ए. पर्यंत अभ्यासक्रमाच्या विविध विषयांची पुस्तके अभ्यासावी लागतात. या काळात खालच्या इयत्तेतील पुस्तकांचे वाचन करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता येईल. सामान्य ज्ञान आणि रोज घडणाºया घडामोडींचे टाचण विद्यार्थ्यांना तयार करता येईल. त्याचाही पुढच्या परीक्षांत फायदा होईलच. परिस्थिती कधीही सारखी राहात नाही. आजचे संकट उद्या निवारले जाईल, हेही नक्की; मात्र आजच्या संकटाच्या घडीत हतबल होण्याऐवजी, पुढच्या आव्हानांना तोंड देण्याची तयारी विद्यार्थ्यांनी करावी. मानव जातीवर एखादे संकट आल्यास संपूर्ण जगातील कर्ते-सवरते लोकही परिस्थितीपुढे हात टेकतात, हेही सगळ्यांनाच यानिमित्ताने दिसले. हे पाहता आपल्याला जे ज्ञान मिळवायचे आहे, ते कुठल्याही क्षेत्रातील असो, ते मानवजातीच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या फायद्यासाठी, निसर्गाच्या संवर्धनासाठी कसे वापरता येईल, याचा नव्याने विचार आजच्या विद्यार्थ्यांना करावाच लागणार आहे, नव्हे, ही काळाची गरज आहे. कुठल्याही परिस्थितीला धैर्याने, संयमाने सामोरे गेल्यास आपत्तीचेही इष्टापत्तीत रूपांतर करता येते, असेच महापुरुषांच्या जीवनचरित्रातून आपल्याला दिसते. आज ‘कोरोना’ नावाचे संकट मानव जातीसमोर उभे आहे. या संकटाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या परिस्थितीने एकूणच आपल्या करिअरबाबत, ज्ञानाबाबत आणि त्याच्या उपयोगितेबाबत विविधांगी विचार करण्याची संधीच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. ‘एकदा गेलेली वेळ परत येत नाही’ या म्हणीचा याचा सोदाहरण अर्थ स्पष्ट करून दाखविणारी आजची एकूण परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांनी याचा जरूर विचार करावा, आपल्या आयुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच बाजूंनी विचार करावा आणि यशस्वी व्हावे, हीच सदिच्छा!

प्रा. नितीन बाठे

 

Web Title: The 'Corona' crisis: disaster or oportunity?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.