संकट दाराशी, सावधानता गरजेची
By किरण अग्रवाल | Published: January 9, 2022 11:15 AM2022-01-09T11:15:10+5:302022-01-09T11:15:31+5:30
Corona crisis At the door: लसीकरण व मास्कचा अनिवार्यपणे वापर हेच त्यासाठी अपेक्षित आहे, ते स्वयंस्फूर्तीनेच व्हायला हवे.
- किरण अग्रवाल
कोरोनाला घाबरून न जाता नवीन वर्षाच्या सुरुवातीस दिसून आलेले उत्साहाचे व सकारात्मकतेचे वातावरण यापुढेही कायम ठेवण्यासाठी सावधानता बाळगणे गरजेचे बनले आहे. लसीकरण व मास्कचा अनिवार्यपणे वापर हेच त्यासाठी अपेक्षित आहे, ते स्वयंस्फूर्तीनेच व्हायला हवे.
स्वतःच्याही जिवाची काळजी न घेण्याबद्दलची बेफिकिरी आपल्याकडे वाढीस लागलेली असल्याने पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. नाही नाही म्हणता तिसरी लाट उंबरठ्यापर्यंत आल्याचे संकेत आहेत. घाबरून जाण्याचे कारण नसले तरी आपल्या वर्तनात सुरक्षिततेची खबरदारी आढळून येत नाही हे दुर्दैवीच म्हटले पाहिजे. अशा स्थितीत हे संकट रोखायचे तर त्यासंबंधीचे निर्बंध लावणाऱ्या यंत्रणांनी सक्त होणे गैर ठरू नये.
अकोला, बुलडाणा, वाशिम या वऱ्हाड प्रांतातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुंबई, पुणे आदी ठिकाणी यासंबंधीचे ट्रेलर बघावयास मिळाले आहे, तरी आपल्याकडे सावधानता बाळगली गेली नाही. गेल्या वर्षीच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरमध्ये शून्यावर असलेली कोरोना रुग्णांची संख्या या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच वऱ्हाडात अडीचशेवर पोहोचली आहे. यात अकोला जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दीडशेवर आहे. सुदैवाने आपल्याकडे ‘ओमायक्रॉन’चा फैलाव अजून तितकासा नाही, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. अर्थात तिसऱ्या लाटेतील कोरोना धोकादायक नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असले तरी यातील संक्रमणाचा वेग चिंता वाढविणारा आहे. विशेषतः लक्षणेरहित रुग्णांपासून सावधान राहण्याची गरज आहे. तेच होत नसून रुग्ण स्वतःच साध्या सर्दी पडशाचे व तापाचे निदान करून कोरोना चाचणी करण्याचे टाळताना दिसतात; हे धोक्याचे आहे.
गेली दिवाळी अतिशय चांगली राहिली, त्यानंतर या नवीन वर्षात पाऊल ठेवताना काहीसे चांगले वातावरण आकारास आले. सोयाबीन, कापसाला चांगला भाव मिळत आहे, हरभरा चांगला आला आहे. इतरही आघाड्यांवर काहीसे समाधानाचे वातावरण आहे. शाळाही अलीकडेच सुरू झाल्या होत्या. मुलं उत्साहाने व आनंदाने शाळेची पायरी चढले होते. तेव्हा हे सर्व कायम ठेवून तिसऱ्या लाटेची आपत्ती टाळायची तर खबरदारी घ्यायला हवी; पण दुर्दैवाने तेच होताना दिसत नाही. सध्यातरी यावर प्रतिबंधासाठी लसीकरणाखेरीज दुसरा उपाय नाही, पण अकोला जिल्ह्याचे उदाहरण बघितले तर अद्याप तीन लाख लोक लसीविना आहेत. मुलांचे लसीकरण सुरू झाल्याने त्यांचा लसीकरणासाठी उत्साह दिसून येत आहे; परंतु शहाणी माणसे का याकडे गांभीर्याने बघत नाहीत, हेच आश्चर्याचे आहे.
महत्त्वाचे म्हणजे कोरोनाचा या लाटेतील फैलावाचा वेग पाहता मास्कचा नियमित वापर गरजेचा बनला आहे; पण अजूनही बाजारातील गर्दीत असंख्य चेहरे मास्कविना दिसतात. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळा असे शासन, प्रशासनाकडून घसा कोरडा करून सांगितले जात आहे; परंतु अनावश्यकरीत्या अनेक ठिकाणी गर्दी उसळलेली बघावयास मिळते. सार्वजनिक वाहतुकीचा विचार केला तर वाहनांमध्ये बिनदिक्कत प्रवासी कोंबले जातात. सध्या एसटी बंद असल्याने नाइलाजातून हे घडून येते, हे खरे; परंतु म्हणून नियम धाब्यावर बसवून सारे सुखेनैव चालणार असेल तर कोणी त्याकडे लक्ष पुरविणार आहे की नाही? लग्नादी समारंभांसाठी उपस्थितीची मर्यादाही निश्चित केली आहे; पण तिकडेही कानाडोळाच होताना दिसतो.
प्रशासनाने संध्याकाळनंतर जमावबंदीचे निर्बंध लागू केले आहेत; पण ते पाळले जात आहेत की नाही याबाबत यंत्रणा काळजी वाहताना दिसत नाहीत. मास्क न वापरणाऱ्यांसाठी दंडाची घोषणाही केली गेली आहे. वाहतुकीचा नियम मोडणाऱ्यास अडविले जाते; परंतु मास्क न वापरणाऱ्यांकडे दुर्लक्ष होते; तेव्हा सार्वजनिक स्वास्थ्याचा विचार करता यंत्रणांनीही याबाबत सक्तीची भूमिका घ्यायला हवी. उद्योग व्यवसाय आता कुठे गेल्या दिवाळीपासून सुरू झाले आहेत. हे आर्थिक चलनवलन असेच सुरू ठेवायचे तर प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तपणे निर्बंधांचे पालन करून खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र, ते होत नसेल तर यंत्रणांनी आपली भूमिका बजवायला हवी. काही लोकांच्या बिनधास्तपणापायी इतर लोक संकटात सापडणार असतील तर संबंधितांना शिस्त लावावी लागेल, इतकेच.