कोरोना काळानं अधांतरी लटकवलं होतं..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 06:03 AM2021-07-18T06:03:00+5:302021-07-18T06:05:09+5:30
कोरोना महामारीदरम्यान चिराग मोठ्या कालावधीनंतर घरी आमच्यासोबत होता. तो काळ अत्यंत कठीण आणि अधांतरी होता, पण चिराग सोबत असल्याचा आनंदही होता. चिरागही कुटुंबासोबत राहून फ्रेश झाला. आईच्या हातचं साऊथ इंडियन फूड त्यानं चांगलं एन्जॉय केलं.
- सुजाता व चंद्रशेखर शेट्टी (मुंबई)
(चिरागचे पालक)
मी (चंद्रशेखर) गोरेगाव स्पोर्ट्स क्लबचा सदस्य आहे. मी खूप पूर्वीपासून तिथे स्क्वॅश खेळायला जातो. चिराग लहान होता, तेव्हापासून माझ्यासोबत खेळायला यायचा. पण तिथे बॅडमिंटन खेळणाऱ्या खेळाडूंनी त्याचं लक्ष वेधलं. तो तेव्हा ६-७ वर्षांचा होता. तेव्हापासून तो बॅडमिंटन खेळायला लागला.
चिराग जसजसं बॅडमिंटन खेळू लागला, तसतसं त्याची आवड आणि खेळातील ज्ञानही वाढत गेलं. त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची माहिती होत गेली. ऑलिम्पिकची माहिती मिळाल्यानंतर या सर्वोच्च स्पर्धेत खेळणं आणि भारताचं प्रतिनिधित्व करणं हेच त्याचं स्वप्न बनलं. त्याचा खेळही चांगला होत गेला. अनेक स्पर्धांमध्ये त्यानं छाप पाडली आणि ऑलिम्पिक खेळण्याचं लक्ष्य बाळगलं. भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोन यांचा आदर्श चिरागनं बाळगला आहे. पदुकोन यांची कामगिरी पाहून त्याला प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्यासारखीच देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करण्यासाठी चिरागने कंबर कसली आहे.
खेळ आणि अभ्यास या दोन्हीबाबतीत चिरागनं लहानपणापासूनच समन्वय राखला आहे.
खेळणं बस्स झालं, करिअरकडे लक्ष दे आता, असं कधीच चिरागला सांगावं लागलं नाही. चिराग स्वत: आपल्या अभ्यासाकडे लक्ष देऊन होता. भविष्यात आपल्याला काय बनायचं आहे, हे त्यानं ठरवलेलं होतं. दहावीला असतानाही परीक्षेच्या अखेरच्या महिन्यापर्यंत तो खेळत होता. तरीही त्यानं दहावीला ८८ टक्के मिळविले. दहावीनंतर आम्ही त्याच्याशी करिअरविषयी चर्चा केली. बॅडमिंटनबाबत तो गंभीर असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा दिला आणि त्यानं स्वत:ही आपल्या खेळाच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी स्वत:ला झोकून दिलं. त्याचीच परिणिती म्हणजे ऑलिम्पिकसाठी झालेली त्याची निवड.
तो सतत त्याच्या खेळासाठी बाहेर असतो. आमची आणि त्याची फारशी भेटही होत नाही. कोरोना महामारीदरम्यान चिराग मोठ्या कालावधीनंतर घरी आमच्यासोबत होता. तो काळ अत्यंत कठीण आणि अधांतरी होता, पण चिराग सोबत असल्याचा आनंदही होता. चिरागही कुटुंबासोबत राहून फ्रेश झाला. आईच्या हातचं साऊथ इंडियन फूड त्यानं चांगलं एन्जॉय केलं. लॉकडाऊन संपल्यानंतर मात्र तो घरी थांबला नाही. सरावासाठी पुन्हा निघून गेला. ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करून तो पुन्हा केव्हा घरी येतो, याकडे आता आमचं लक्ष लागलं आहे.
शब्दांकन - रोहित नाईक (मुंबई, लोकमत)
कॅप्शन- आई-वडील व बहीण आर्यासह चिराग.