"ऐकलं ते खरं का रे? तुमच्या बिल्डिंगमध्ये एक जण पॉझिटिव्ह आला म्हणे"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 06:04 AM2020-09-06T06:04:00+5:302020-09-06T11:38:57+5:30
एक दिवस महानगरपालिकेतून एक आरोग्य कर्मचारी बाई आणि एका लॅबोरेटरीचा कर्मचारी हे चंद्रावरून आत्ताच आल्याप्रमाणे दिसणारा पीपीई किट घालून मधल्या चौकात हजर झाले.
- मुकेश माचकर
‘ऐकलं ते खरं का रे? तुमच्या बिल्डिंगमध्ये एक जण पॉझिटिव्ह आला म्हणे,’ नाना चोंबडे फोनवर विचारत होते. नाना हे सासर्यांच्या मित्राच्या भावाच्या आतेबहिणीचे सावत्र चुलतभाऊ. कधीतरी पाच वर्षांपूर्वी एका लग्नात भेटले होते, तेव्हापासून आतापर्यंत ते जिवंत आहेत की नाहीत हेही मला माहिती नव्हतं. पण, आमच्या जयराम नगरातल्या ‘पुनर्वसु हाइट्स’मध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला ही बातमी चक्क कोंबडीपाड्यात त्यांच्यापर्यंत पोहोचली होती आणि त्यांनी ‘काळजीने’ फोन केला होता.
ङ्घहा दोन तासातला त्रेपन्नावा फोन होता. माझं इंगळहळ्ळीकर हे आडनाव कधीही पूर्ण न उच्चारता इंगळ्या म्हणणार्या माझ्या शाळेतल्या एका शिक्षकांपासून ते आता मी शिकवतो त्या कॉलेजात मी जॉइन होण्याच्या आधी विद्यार्थी असलेल्यांपर्यंत असंख्य अनोळखी लोकांचे फोन येऊन गेले होते ‘काळजी’चे.
मी म्हणजे प्रा. अविनाश इंगळहळ्ळीकर, माझी बायको वसुधा आणि आमचा दहावीतला मुलगा अथर्व असं हे आमचं त्रिकोणी कुटुंब. आम्ही तिघांनीही दुपारी फोन बंद केले आपापले. तिघांनाही आपापल्या वतरुळातून हेच आणि एवढंच ऐकायला मिळत होतं.ङ्घ
इमारतीत वेगळीच तर्हा. सकाळी कचरा नेणार्या बिंदियाने मजल्यावरच्या सगळ्यांना सांगितलं, ‘आजपासून तुमचा कचरा तुमच्या हातांनी तुम्ही डब्यात टाकायचा. मी हात लावणार नाही. खालच्या सहाही मजल्यांवरच्या लोकांनी सांगितलंय, तिकडे हात लावून आमच्या कचर्याच्या डब्यांना हात लावायचा नाही.’ लिफ्टमध्ये एरव्ही भेटल्यावर ओळखीचं हसणारे लोक आता ‘यांच्या मजल्यावर पेशंट सापडलाय आणि हे गाव उंडारताहेत,’ अशा नजरेने पाहायला लागले. तिसर्या मजल्यावरचे मधुकर खोत एकदा लिफ्टसाठी थांबले होते. आत मला पाहताच ‘अरे देवा, काहीतरी विसरलो वाटतं घरी’ असं म्हणून परत वळले आणि जिन्याने उतरले. सहाव्या मजल्यावरच्या जयसुखलाल जैनांना आमच्या प्रकृतीची फार चिंता वाटायला लागली. दोन-तीन वेळा ऐकून घेतल्यावर एकदा त्यांना ‘काहीही झालेलं नाहीये हो मला, फक्त थोडा घसा खवखवतोय आणि मध्येमध्ये ताप येतोय,’ असं खोटा खोकला काढत सांगितलं. त्यांनी हाय खाऊन स्वत:च्या घरातून बाहेर पडणंच बंद केलं!
आणि एक दिवस महानगरपालिकेतून एक आरोग्य कर्मचारी बाई आणि एका लॅबोरेटरीचा कर्मचारी हे चंद्रावरून आत्ताच आल्याप्रमाणे दिसणारा पीपीई किट घालून मधल्या चौकात हजर झाले. त्यांनी सांगितलं, ‘तुमच्या मजल्यावर कोरोना पेशंट सापडलेला असल्यामुळे पालिकेच्या नियमाप्रमाणे मजल्यावरच्या सर्वांची कोरोना टेस्ट करणं बंधनकारक आहे. कोण कोण करणार आहे टेस्ट?’
ताबडतोब सगळे मजलेकरी घरांच्या आत गेले आणि सेफ्टी डोअरच्या जाळीतूनच बोलू लागले, ‘आम्हाला काही त्रास नाही. लक्षणं नाहीत. नकोच ती चाचणी. उगाच पॉझिटिव्ह आलो तर कोण ती झंझटमारी करील?’
पेशंटचे कुटुंबीय (त्यांना चॉइस नव्हता) आणि आमचं कुटुंब टेस्टला तयार झालं. तो ‘चांद्रवीर’ घरात आला. नाकात, घशात काड्या घालून स्वॅब घेऊन गेला. आणि नवाच अध्याय सुरू झाला.
सकाळी लिफ्टसाठी थांबलो, तर सहाव्या मजल्यापर्यंतच लिफ्ट चालू. सातव्या मजल्यावर (15 दिवसांपूर्वी अँडमिट झालेल्या) पेशंटच्या दारात लिफ्ट थांबते म्हणून आणि इंगळहळ्ळीकरांनी टेस्ट केल्यात म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असणार म्हणून सहाव्या मजल्यावरच लिफ्ट थांबवण्यात यायला लागली. ङ्घ
ङ्घटेस्टनंतर दोन दिवसांनी रिपोर्ट येतील असं सांगितलं गेलं होतं. तिसरा दिवस उजाडला तरी रिपोर्ट आला नाही. अखेर पाचव्या दिवशी फोन वाजला, ‘इंगळहन्नीकर का? किती अवघड आडनाव आहे तुमचं. बरं झालं तुम्ही कुणी पॉझिटिव्ह नाही आलात, तुमच्यावर उपचार करता करता जिभेला व्यायामच झाला असता आमच्या,’ अशा शब्दांत शुभवर्तमान मिळालं.
टेस्ट झाल्याच्या दिवसापासून चौकातून एक पाऊल पुढे न आलेल्या, साधं ओळखीचं न हसलेल्या भावनाभाभी चक्क घरात आल्या आणि ‘बहोत अच्छा किया आपने, हम लोग तो डर गये थे,’ वगैरे गोड आणि गोल गप्पा मारू लागल्या. मी मास्क शोधून तो घातला आणि दुसरा वसुधाला देत, तिला तो परिधान करण्याची खूण करत भाभींना म्हणालो, ‘भाभी, आम्ही टेस्ट केली आणि निगेटिव्हही आलो. म्हणजे आता मजल्यावर फक्त आम्हीच सेफ आहोत. बाकी घरांमध्ये कोणीही पॉझिटिव्ह असू शकतो, हो की नाही? तुम्ही कुणी टेस्टच न केल्यामुळे कळणार कसं? तेव्हा यापुढे कुणाच्याही घरी जाताना जरा जपूनच जा!’
भाभींचा चेहरा मास्कच्या आतही साफ पडला हो!
mamnji@gmail.com
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)
चित्र : गोपीनाथ भोसले