Corona Vaccination : लसीकरणाबाबतची उदासीनता घातकच!
By किरण अग्रवाल | Published: July 4, 2021 10:49 AM2021-07-04T10:49:16+5:302021-07-04T10:51:01+5:30
Corona Vaccination: कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने लसीकरणाकडे यंत्रणांसह नागरिकांचेही दुर्लक्ष होताना दिसत आहे.
- किरण अग्रवाल
कोरोना प्रतिबंधक लसीकरणात देशामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असला तरी दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण अकोला, बुलडाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यांत खूप कमी आहे. आता तर कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने लसीकरणाकडे यंत्रणांसह नागरिकांचेही दुर्लक्ष होताना दिसत आहे. आरोग्याच्या सुरक्षिततेबाबतची काळजी वाटणे यामुळे स्वाभाविक आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोच संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली असून, त्यातच डेल्टा प्लस व्हेरिअंटने भीतीत भर घालून दिली आहे. अशात लसीकरणाशिवाय पर्याय नसताना याबाबत काहीशी उदासीनताच दिसून येत असल्याने प्रशासनाच्या नियोजनात व लसींच्या पुरवठ्यात काही अडचण आहे, की नागरिकांच्या पुढाकारात; या दृष्टीने विचार करून लसीकरण वाढविण्याबाबत विचार होणे अत्यंतिक गरजेचे आहे.
देशात लसीकरणामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे ही समाधानाचीच बाब आहे; परंतु जागोजागच्या एकूण लोकसंख्येचे आकडे पाहता त्या तुलनेत लसीकरणाचे प्रमाण अनेक ठिकाणी कमी असल्याचेच दिसून येते, त्यातही लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्यांची आकडेवारी बघता अकोल्यासारख्या जिल्ह्याची खूपच नादारी दिसून येते. बुलडाणा व वाशिम जिल्ह्याची स्थिती खूप समाधानकारक आहे अशातलाही भाग नाही, तेव्हा कोरोनाच्या आतापर्यंतच्या दोन्ही लाटेत जे नुकसान झाले ते यापुढे येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेत होऊ द्यायचे नसेल तर लसीकरण मोहिमेला वेग येणे आवश्यक आहे.
कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक नुकसानदायी ठरल्याचे आपण साऱ्यांनी अनुभवले आहे. या लाटेमुळे अकोला जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा तब्बल एक हजारापेक्षा पुढे गेला; पण आता ही लाट ओसरत आहे. नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. अकोला जिल्ह्यातील ८४४ गावांपैकी ७९३ गावांमध्ये कोरोनाबाधित होते, फक्त ५१ गावेच कोरोनापासून दूर होती; पण आता बाजी त्यांपैकी ७४७ गावे कोरोनामुक्त झाली आहेत व ज्या गावांमध्ये रुग्ण आहेत ती संख्याही शंभरच्या आसपासच आहे. गावे कोरोनामुक्त होत आहेत व बाधित संख्याही घटत आहे, ही बाब जिल्हावासीयांसाठी दिलासादायकच आहे. पण, हे होत असताना ज्या पद्धतीची बेफिकिरी अजूनही दिसून येते, ती पाहता संकटाला पुन्हा निमंत्रण मिळून गेल्याखेरीज राहू नये.
मुळात तिसऱ्या लाटेची शक्यता व त्यातच डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका पाहता अकोला, बुलडाणा व वाशिमसह राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये पुन्हा कठोर निर्बंध लागू केले गेले आहेत; परंतु जागोजागी जनता अनिर्बंधपणे वागताना व वावरताना दिसत आहे. नियमाप्रमाणे दुकाने चारपर्यंतच उघडी ठेवली जातात; परंतु त्यानंतर सायंकाळी जत्रेत फिरावे त्यापद्धतीने लोक विनामास्क रस्त्यावर फेरफटका मारताना दिसून येतात. संचारबंदी व जमावबंदीची कलमे लागू असतानाही त्याबाबत भीती बाळगली जात नाही कारण यंत्रणाही सुस्तावल्या असून, नियम मोडणाऱ्यांवर फारशी कारवाई होताना दिसत नाही. तेव्हा एक तर या निर्बंधांचे पालन कटाक्षाने होणे गरजेचे असून, कोरोनापासून बचाव होण्यासाठी लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणे अपेक्षित आहे; पण या दोन्ही आघाड्यांवर आनंदीआनंदच आहे.
अकोला जिल्ह्यात पहिल्या डोसचे लसीकरण केवळ २१ टक्के झाले असून, दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी अवघी ०.६ टक्के इतकीच आहे. बुलडाण्यात १९ टक्के लोकांना पहिला डोस देऊन झाला असून, दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या सुमारे सहा टक्के आहे, तर वाशिममध्ये पहिला डोस घेतलेले २१ व दुसरा डोस घेतलेले सहा टक्के आहेत. यात घरातील लहान मुले व कोरोना होऊन गेलेल्यांची संख्या वगळली तरी ही आकडेवारी समाधानकारक म्हणता येऊ नये. लसीकरणाचा खूप मोठा टप्पा अजून गाठायचा आहे हेच यावरून लक्षात यावे.
१८ वर्षांवरील युवकांचे लसीकरण सुरू होणार वगैरे घोषणा केल्या जातात; मात्र जिथे ४५ वर्षे वयावरील नागरिकांचे लसीकरण अजून संपलेले नाही तिथे तरुणांचा नंबर कसा लागणार हाच खरा प्रश्न आहे. एकीकडे सरकारी व्यवस्थेत तिष्ठत बसावे लागत असताना दुसरीकडे खासगी व्यवस्थेत मात्र पैसे मोजून लसीकरण पार पडत असल्याचे पाहता, खासगीवाल्यांचे खिसे भरण्यासाठी तर यंत्रणा यात दिरंगाई करीत नाही ना असा प्रश्न पडावा. पहिला डोस ज्या लसीचा घेतला आहे त्याच लसीचा दुसरा डोस घ्यावा लागतो; परंतु त्याबाबतच्या नियोजनातही गोंधळच दिसतो. याचा मनस्ताप विशेषतः ज्येष्ठांना व भगिनींना सहन करावा लागतो. याउलट काही केंद्रांवर लस उपलब्ध असताना तेथे कोणी फिरकत नसल्याचेही आढळून येते; तेव्हा नेमका गोंधळ पुरवठ्यात आहे की नागरिकांच्या पुढाकारात, याचा शोध बारकाईने घेतला जाणे गरजेचे आहे. अन्यथा तिसरी लाट थोपविणे दूर, उलट तिला लवकर येण्याचे निमंत्रण मिळून गेल्याशिवाय राहणार नाही.