कोरोना ‘वारी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 06:02 AM2020-07-05T06:02:00+5:302020-07-05T06:05:04+5:30
दत्ताप्पाकडून घेतलेले हात उसने पैसे द्यावे लागू नयेत म्हणून सदाभाऊंनी कोरोनाचा आधार घेतला; पण ही थाप त्यांच्या चांगलीच अंगाशी आली!
- रा. रं. बोराडे
सदा कोरडेनं दत्ताप्पा आव्हाळेकडून 1 हजार रुपये हात उसने घेतलेले होते. आज परत करतो, उद्या परत करतो, अशा त्यानं चाळवण्या लावल्या होत्या. दत्ताप्पाचा जीव अगदी रंजीस आला होता.
आज कोणत्याही हालतीत सदाकडनं रक्कम वसूल करायची, असं ठरवून दत्ताप्पा आव्हाळे सदाकडं निघणार एवढय़ात त्याच्या पत्नीनं त्याला हटकलं. म्हणाली,
‘‘काहो, कुठं निघालात?’’
आपण कुठे निघालो हे दत्ताप्पानं बायकोला-कांचनला सांगितलं. कपाळावर हात ठेवीत कांचन म्हणाली,
‘‘आता काय म्हणू तुम्हाला? वेळ कोणती, काळ कोणता हे तरी लक्षात घ्या. कोरोनानं, जगभर थैमान मांडलंय, कोरोनाबाधितांची, मरणारांची संख्या वाढत ंचाललीय, घराबाहेर जाऊ नका म्हणून सरकारनं बजावलंय..’’
तिला पुरतं न बोलू देता दत्ताप्पा म्हणाला, ‘‘लगेच जातो, की लगेच येतो. तू नको फिकीर करू.’’
दत्ताप्पा सदा कोरडेच्या दारात आला. त्यानं त्याला हाक दिली.
‘‘सदा, घरातच आहेस ना? मी तुला भेटायला आलोय?’’
सदानं मानं वळवून बाहेर पाहिलं. दत्ताप्पाला बघताच तो घाबरला. सदाच्या पत्नीनं, सारिकानं त्याला विचारलं.
‘‘का वं, दत्ताप्पाची हात उसनी घेतलेली रक्कम परत केली नाही काहो.’’
‘‘नाही जमलं.’’
‘‘आता बरं आहे का. माझी हात उसनी रक्कम टाक, नसता मी तुझ्या दारातनं हलत नाही म्हणाला, तर तुम्ही काय करणार राव?’’
‘‘कायतरी करावं लागंल. दत्ताप्पाला पळवून लावावं लागंल.’’
असं म्हणून सदानं स्वत:च स्वत:च्या हातानं आपल्या डोक्याचे केस विस्कटले, डोक्याला मफलर गुंडाळली. अंगावर चादर लपेटली, सारिकानं विचारलं,
‘‘हे काय असलं ध्यान करायलाव?’’
‘‘तू बघ तर खरं, दत्ताप्पाला नाही मी पळवून लावलं, तर नावाचा सदा कारेडे नाही.’’
सदा कण्हत कण्हत बाहेर आला. त्याला बघताच दत्ताप्पा हबकला. म्हणाला.
‘‘सदा, तू आजारी आहेस वाटतं.’’
सदा जास्तच कण्हत म्हणाला
‘‘होय हो.’’
‘‘काय होतंय?’’
‘‘आता काय, एक सांगू का? डोकं दुखतंय, घसा खवखव करतोय.’’
दत्ताराम मनाशी म्हणाला, ही तर कोरोनाची लक्षणं आहेत. याला कोरोनाची लागण तर झाली नसंल?
दत्ताराम एक मीटर मागं सरकला. सदा मनातल्या मनात हसला.
‘‘अजून काय होतंय?’’
‘‘कोरडा खोकला येतोय.’’
असं म्हणून सदा खोकू लागला. दत्ताप्पानं खिशातला हातरूमाल काढून नाकाला लावला. सदाचं मनातलं हसणं आणिकच वाढलं.
‘‘एवढंच का अजून काही होतंय?’’
‘‘श्वास घ्यायला फार त्रास होतोय.’’
‘‘याचाच अर्थ तुला कोरोना हा संसर्गजन्य रोग झालाय.’’
‘‘मलाही असंच वाटायलंय.’’
असं म्हणून सदानं शिंक आल्याचा बहाणा केला. दत्ताप्पा पिसाळलेलं कुत्रं मागं लागावं तसा पळत सुटला. कसंबसं हसू आवरीत सदा घरात येताचा सदा पोट धरू-धरू हसू लागला.
सारिका त्याला म्हणाली, ‘‘असा कसा तुमचा स्वभाव आहे. किती घाबरं केलं तुम्ही त्याला. त्याचे पैसे तुम्ही हात उसने घेतलेत. कवाना कवा तरी तुम्हाला ते परत करावे लागतीलच की.’’
‘‘हा कोरोना हाय तवर तर फिकीर नाही. पुढचं पुढं बघू.’’ ही घटना घडून अर्धा तास झाला न् झाला एवढय़ात एक गाडी व तिच्या पाठोपाठ एक रुग्णवाहिका सदाच्या घरासमोरच्या रस्त्यावर वेगानं येऊन गचकन थांबली.
सदा व सारिका त्या गाड्यांकडं बघत राहिले. या गाड्या आपल्या घरासमोरच्या रस्त्यावर का थांबल्या, हे त्यांच्या लक्षात येईना. रुग्णवाहिकेसोबत आलेल्या गाडीतून एका पोलिसासह दोन रुग्णसेवक झटपट खाली उतरले. भराभरा चालत सदाच्या दारात आले.
सदाला म्हणाले, ‘‘सदा कोरडे तुम्हीच का?’’
सदा बिचकत - घाबरत म्हणाला,
‘‘हो.’’
‘‘चला पटकन. गाडीत बसा. तुम्ही कोरोनाबाधित असल्याची आमच्याकडं माहिती आलीय.’’
‘‘त्या दत्ताप्पा आव्हाळ्यानं तुम्हाला ही माहिती दिलेली दिसतेय, मी कोरोनाबाधित नाही. मी त्याच्या देखत तसा बहाणा केला.’’
‘‘का?’’
‘‘उगच. त्याची थट्टा करावी म्हणून..’’
‘‘असं का, ज्या कोरोनामुळं सारं जग हवालदिल झालेलं आहे. लोक किडा-मुंगीसारखी मरायला लागलेत, त्या कोरोनाची तुम्ही थट्टा करता?’’
‘‘मी कोरोनाची थट्टा केली नाही, साहेब, मी कोरोनाबाधित असल्याचा बहाणा करून दत्ताप्पा आव्हाळेची थट्टा केली.’’
‘‘थट्टा करायला दुसरे आजार नव्हते का?’’
‘‘कोरोनाची अशी थट्टा केल्यास काय शिक्षा आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का? तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा आहे.’’
‘‘माफ करा साहेब मला. पुन्हा माझ्याकडून अशी गलती होणार नाही.’’
‘‘ते आम्हाला नका सांगू. आमच्या डॉक्टर साहेबांना सांगा. आम्ही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार. तिथं तुमची कोरोनाची चाचणी होणार. तुम्ही कोरोनाबाधित आहात असं निदान झालं, तर तुम्हाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये अँडमिट करावं लागंल. तुम्ही कोरोनाबाधित नाही, असं स्पष्ट झालं, तर तुम्हाला तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार.’’
सदा नखशिखान्त हादरला. त्याचा चेहरा पांढराफटक पडला.
सदा रडकुंडीला आला. हात जोडीत गयावया करीत म्हणाला, ‘‘साहेब चुकलं माझं. पुन्हा नाही असं करणार. एवढी बार माफ करा.’’
सारिका हात जोडीत, गयावया करीत म्हणाली.
‘‘साहेब, कसंबी करा. मी हात जोडते, पाया पडते. यांचा एवढा अपराध पोटात घाला.’’
‘‘तुम्ही कोण यांच्या?’’
‘‘मी यांची पत्नी आहे साहेब.’’
‘‘मग तुम्हीही चला. बसा गाडीत.’
‘‘मी? का?’’
‘‘कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. तुम्ही यांच्या सतत संपर्कात आहात. म्हणजे तुम्हाला कोरोना असू शकतो. त्यामुळं तुम्हालाही तपासावं लागंल.’’
एवढा वेळ पोलीस हे सारं बघत, ऐकत होता. हातातली लाठी सावरीत, धमकावीत म्हणाला,
‘‘आता लई गमज्या करू नका. गपचिप त्या गाडीत बसा.’’
सदा व सारिका रडत, कर्माला दोष देत रुग्णवाहिकेकडे चालू लागले. एवढा वेळ खिडकीत दबा धरून उभं राहून हे सारं बघत-ऐकत असलेले सदाचे शेजारी खिडकीतून बाजूला झाले !
(लेखक प्रसिद्ध साहित्यिक आहेत.)
चित्र : रवींद्र जाधव, पुणे