अक्षर जोडून सुंदर शिल्प निर्मिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 09:25 AM2018-12-30T09:25:00+5:302018-12-30T09:25:01+5:30
सखी माझी : या जगात ईश्वराने स्त्रीच्या रूपात करोडो सुंदर शिल्पेनिर्मिली आहेत; परंतु त्याने निर्मिलेल्या माझ्या सखीच्या हुरुपाचा ताजमहाल हा एकमेव आहे.
- कवी योगिराज माने
रोज पहाटे फिरायला जाताना अंगावर स्वेटर अन् कानाला मफलर गुंडाळून कुडकुडतच माझी स्वारी घराबाहेर पडते. कमालीचा गारठा आहे, सध्या हवेत. सुरुवातीला खूप थंडी जाणवते; परंतु जसजसा चालण्याचा वेग वाढेल, तसतशी शरीरात ऊर्जा निर्माण झाल्याने हळूहळू थंडी सुसह्य होऊ लागते. एव्हाना नित्यनेमाने फिरायला जाणाऱ्यांची रस्त्याच्या दुतर्फा वर्दळ सुरू होते. प्रत्येक जण आपापल्या तंद्रीत व स्वाभाविक वेगात चालत असतो. माझे कविमन नकळत सखीकडे धावू लागते. मी चालत-चालत माझ्या लडिवाळ सखीला शब्दांमध्ये गुंफण्याचा प्रयत्न करू लागतो. विचार करता-करता आम्हा दोघांच्या गुलाबी नात्यातील गुलाबी वीण अधिकच घट्ट होऊ लागते. पहाटेचा गार वारा माझ्या अंगाला स्पर्शून जणू माझ्या सखीची खुशाली मला सांगू लागतो. माझे कविमन सखीमय होते. हाय, गुड मॉर्निंग.
माझ्या सखीचा गोड आवाज वाऱ्याच्या शीत लहरींवर उमटून माझ्या हृदयाचे दार वाजवतो. मी व्हेरी गुड मॉर्निंग, असे म्हणत पुटपुटतच प्रत्युत्तर देतो. आम्हा दोघांचा मूकसंवाद सुरू होतो. आता पाखरांची वस्ती जागी झालेली असते. चिमण्यांची चिवचिव झाडावर ऐकू येते. एक चिमणी भुर्रकन उडत माझ्या डोक्यावरून जाते. माझ्या सखीचा निरोप देण्यासाठीच ही चिमणी माझ्या जवळून गेली, असे मला वाटते. माझे कविमन उतावीळ होऊन सखीकडे धाव घेत असते. तिचा लोभस व सुंदर मुखडा माझ्या डोळ्यांसमोर तरळू लागतो. सखीचे सालंकृत रूप मला वेडावून टाकते. अंगावर घातलेल्या दागिन्यांमुळे स्त्रियांच्या सौंदर्यात वाढ होते, हे सत्य आहे; परंतु माझी सखी याला अपवाद आहे. माझ्या सखीच्या अलौकिक सौंदर्यामुळे तिने घातलेल्या दागिन्यांच्या सौंदर्यात वाढ होऊन ते दागिने उजळून निघतात व अधिक शोभिवंत दिसू लागतात.
माझ्या ध्यासात, भासात अन् श्वासातही सखीने अढळ स्थान काबीज केले आहे. या जगात ईश्वराने स्त्रीच्या रूपात करोडो सुंदर शिल्पेनिर्मिली आहेत; परंतु त्याने निर्मिलेल्या माझ्या सखीच्या हुरुपाचा ताजमहाल हा एकमेव आहे. माझी सखी लाखों में एक नव्हे, तर करोडों में एक आहे. माझ्या लेखणीतून पाझरणारे, प्रकटणारे सारे शब्दवैभव मी माझ्या निरागस, निर्मळ, नितळ व निर्मोही सखीला मनोभावे अर्पण करतो.
‘वारा आला दरवळ घेऊन आज सखीचा,
मला कळाला गोड नवा अंदाज सखीचा,
समीप येऊन चिमणी चिवचिव करू लागली,
ऐकू आला मला जणू आवाज सखीचा...
लाख पाहिले, सुंदर मुखडे सभोवताली,
त्या साऱ्यांहून किती निराळा बाज सखीचा...
तिलाच अर्पण लेखणीतले सारे वैभव,
फक्त सखीला खरा शोभतो बाज सखीचा...
अक्षर अक्षर जोडून सुंदर शिल्प निर्मिले,
हृदयामध्ये कसा बांधला ताज सखीचा...