क्रिएटिव्हिटी, केआॅस आणि स्टार्टअप्स
By admin | Published: October 14, 2016 02:59 PM2016-10-14T14:59:11+5:302016-10-14T15:14:51+5:30
भारतात नव्याने रुजत असलेली स्टार्टअप संस्कृती, तरुण उद्योजकांनी बदलायला घेतलेली गणिते, बाजारपेठेचे बदलते चेहरे आणि भविष्यातली आव्हाने यांची चर्चा खुद्द रतन टाटा यांच्याशी करता आली तर? - हा योग जुळून येतो आहे यावर्षीच्या दिवाळीत.
भारतात नव्याने रुजत असलेली स्टार्टअप संस्कृती, तरुण उद्योजकांनी
बदलायला घेतलेली गणिते, बाजारपेठेचे बदलते चेहरे आणि
भविष्यातली आव्हाने यांची चर्चा खुद्द रतन टाटा यांच्याशी करता आली तर?
- हा योग जुळून येतो आहे यावर्षीच्या दिवाळीत.
‘दीपोत्सव’ या लोकमत समूहाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध होत असलेल्या
रतन टाटा यांच्या लेखातला एक संपादित अंश..
सध्या प्रामुख्याने सेवा क्षेत्राशी निगडित असलेले भारतातले ‘स्टार्टअप कल्चर’ तीन शब्दांभोवती फिरते : फास्टर, बेटर, लेस एक्सपेन्सिव्ह!!
कोणतीही सेवा अधिक वेगाने, अधिक उत्तम रीतीने आणि अधिक स्वस्तात उपलब्ध कशी करता येईल? - हा प्रश्न याआधीही लोकांना पडत होताच. पण आता कम्प्युटिंग पॉवर आणि कनेक्टिव्हिटी यांमुळे या प्रश्नाच्या संभाव्य उत्तरांभोवती नव्या कंपन्या उभ्या राहताना, मूळ धरताना दिसतात. हे वीस वर्षांपूर्वी केवळ अशक्य होते.
टाटा समूहाच्या दैनंदिन कामातून निवृत्ती घेतल्यानंतर मी काही स्टार्टअप कंपन्यांमध्ये भांडवल गुंतवले. तसे पाहता ही व्यक्तिगत गुंतवणूक. ती बातमीत येणे तसे गैरलागूच होते. पण तरीही या गुंतवणुकींची चर्चा होऊ लागली आणि मला काही कळीचे प्रश्न सतत विचारले जाऊ लागले.
भविष्यात मूळ धरू शकणारी आणि बाजारपेठेत टिकू शकणारी ‘स्टार्टअप’ची ‘आयडिया’ कशी ओळखावी, हा त्यातला प्रमुख प्रश्न.
त्याचे उत्तर शोधण्यासाठी माझ्याकडे एक प्रश्न आहे. अशा आयडिया घेऊन माझ्या मार्गदर्शनासाठी येणऱ्यांना मी विचारतो : ‘हाऊ आर यू गोइंग टू मेक अ डिफरन्स?’
- आजवर लोक जे आणि जसे जगत आले आहेत, त्यातला किमान एक तरी ‘अनुभव-प्रकार’ पूर्णत: बदलण्याची ताकद या ‘बिझिनेस प्रपोजल’मध्ये आहे का?
- बदल अनेक अर्थांचा असू शकतो. गुणवत्तेचा बदल, बाजारपेठेतल्या विशिष्ट लोकसमूहाच्या जगण्याची गुणवत्ता बदलण्याची आणि सुधारण्याची शक्यता, लोक जसे जगतात-वागतात-खरेदी करतात-विचार करतात त्यात मूलभूत बदल घडवण्याची क्षमता.
डू समथिंग दॅट इज गेमचेंजर! डू समथिंग दॅट इज बेटर अॅण्ड चीपर!!
- हे ज्यांनी केले, तेच स्टार्टअप्स आजूबाजूच्या गजबजाटात टिकून राहिलेले दिसतात. ‘मी टू’ प्रकारच्या कंपन्यांचे आयुष्य नेहमीच तोकडे असणार.
पण एक नक्की, कागदावरची कल्पना आणि आकडे मला आकर्षित करू शकत नाहीत. मला आकर्षित करतो तो ती कल्पना मांडणाऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास आणि त्यामागची ‘पॅशन’! एखादी ‘गेमचेंजर’ कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता ही त्या कल्पनेहून अधिक महत्त्वाची असते.
लोक जसे जगतात, जसे वागतात, जसा विचार करतात, जसा निर्णय घेतात; त्यात मूलभूत बदल घडवण्याची शक्यता आणि क्षमता हा स्टार्टअपच्या कालसुसंगततेचा आणि मार्केट-सापेक्षतेचा पुरावा असतो.
‘स्वत:च्या गुंतवणुकीचा निर्णय करताना इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही स्टार्टअपची पारख कशी करता?’ - हा दुसरा प्रश्न.
त्याचेही उत्तर तेच. फाउंडर्सच्या हातातल्या कागदांवरचे आकडे बघून नव्हे, तर त्यांच्या मांडणीतली कळकळ, नेमकेपणा आणि आत्मविश्वास पाहून! खरेतर नवख्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करायला निघालेला इन्व्हेस्टर आणि एखाद्या म्युझिक कंपनीसाठी नवे कलाकार शोधायला निघालेला ‘स्काउट’ सारखेच असतात. आपली निवड व्हावी म्हणून जीव ओतून गाणाऱ्या-वाजवणाऱ्या कलाकारांच्या गर्दीतून कुणाचे स्वर त्या ‘स्काउट’ला आकर्षून घेतील याला काही ‘लॉजिक’ लावता येणे कठीण. तिथे ‘गट फिलिंग’ लागते. अंतरात्म्याचा आवाज लागतो.
ेमी या तरुण मुलांबरोबर काम करतो, ते केवळ पैसे गुंतवून परताव्याची वाट पाहण्यासाठी नव्हे. मला त्यांच्या कंपनीच्या प्रवासात सहभागी व्हायला आवडते. ती अवघड, कस पाहणारी वाट त्यांच्या बरोबरीने चालायला आवडते. या प्रवासात ही मुले मला खूप काही शिकवतात, हे मी आता अनुभवाने ओळखले आहे.