‘क्रिकेट मायग्रेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 06:01 AM2019-07-07T06:01:00+5:302019-07-07T06:05:03+5:30
अंबाती रायडूने निवृत्ती घोषित करताच आइसलॅण्डच्या क्रिकेट बोर्डाने त्याला आपल्यासाठी खेळण्याचं जाहीर आमंत्रण ट्विटरवर दिलं, ही घटना क्रिकेटमधल्या एका नव्या परिवर्तनाची नांदी आहे. क्रिकेटर्स आपापला देश सोडून ‘संधी’च्या दिशेने स्थलांतरित होत आहेत!
- मेघना ढोके
अंबाती रायडूने तडकाफडकी क्रिकेट निवृत्ती जाहीर केली, आणि लगोलग आइसलॅण्ड क्रिकेटने ‘आमच्या क्रिकेट बोर्डाकडून खेळ’, असं त्याला जगजाहीर आवतन दिलं. तेही ट्विटरवर. आमंत्रणासोबत आइसलॅण्डच्या नागरिकत्वाचा फॉर्मही ट्विट करून टाकला.
एखाद्या गुणी खेळाडूला कुठल्या दुसर्या देशाच्या बोर्डानं आपल्याकडून खेळण्याचं आमंत्रण असं जाहीरपणे द्यावं याचाच अनेकांना धक्का बसला. मात्र खरा धक्का तर पुढंच आहे.
भारतातल्या अनेक हौशा-गवश्या आणि नवश्या क्रिकेटप्रेमींनी टॅग करकरून आइसलॅण्ड क्रिकेट बोर्डाला विनंती केली की, मीपण चांगलं खेळतो, मला व्हिसा द्या, मला संधी द्या ! त्यांचा ट्विटरचा मेसेजबॉक्स या तमाम विनंतीपत्रांनी तुंबला. इमेल्स जाम झाल्या. शेवटी आइसलॅण्डने आणखी एक ट्विट केलं. जे म्हटलं तर सरळ होतं, म्हटलं तर वाकड्यात शिरणारं. त्यात ते म्हणतात,
‘बाबांनो, कृपया आम्हाला मेल्स पाठवू नका. आमचं स्वत:चं देशांतर्गत क्रिकेट निवड मंडळ आहे. जे आइसलॅण्डचे रहिवाशी आहेत, त्यांतूनच आम्ही निवडतो. त्यापेक्षा इंग्लिश काउण्टी क्रिकेटशी संपर्क करा, ते काय कुणालाही घेतात !’
- कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना असं हे ट्विट होतं. त्यांनी मुद्दाम ब्रिटिश क्रिकेटला डिवचायचं काय कारण होतं? कारण असं की आइसलॅण्डचा, आर्यलॅण्ड आणि ब्रिटिशांचा कायम छत्तीसचा आकडा. परस्परांना कमी लेखण्यात ते कायम पुढे. त्यात आता इंग्लंड संघाची अवस्था अशी की त्या संघात मूळ ब्रिटिश खेळाडू कमी आणि बाहेरच्या देशातले, रंगावंशाचे खेळाडू जास्त. सध्या इंग्लंड संघाचा कॅप्टन असलेला इऑन मॉर्गनही मूळचा आयरिश. जोफ्रा आर्चरच्या बॉलिंगवर आज इंग्लिश संघाची मदार असली तरी तो मूळचा वेस्ट इंडियन. या संघात बाहेरच्या देशातून आयात केलेल्या खेळाडूंचाच भरणा अधिक दिसतो. दक्षिण आफ्रिकी खेळाडू ओलिव्हरने यॉर्कशायर काउण्टीकडून खेळण्यावरून तर अलीकडेच मोठा वाद झाला. ओलिव्हरने आपला संघ झिडकारून काउण्टीत खेळणं पत्करलं आणि भविष्यात ब्रिटिश संघाकडून खेळणं आवडेल असं म्हणत सूचक विधान केलं याचा मोठा गदारोळ झाला होता. इतर देशांचे चांगले खेळाडू (पैशाच्या जोरावर) पळवून आपला संघ तगडा करता येईल का, असे सवालही ब्रिटिश मीडियाने उपस्थित केले.
‘गार्डियन’ या वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत प्रसिद्ध क्रिकेट इतिहासतज्ज्ञ अँण्ड्रे ओडिंदाल म्हणतात, ‘दक्षिण आफ्रिकी किंवा वेस्ट इंडियन खेळाडूंच्या जोरावर समजा इंग्लंडने प्रत्येक सामना जिंकला तरी तो पहायला जाणार कोण? टीव्ही राइट्स तरी कोण घेणार मग? स्थानिकांनी आपला संघ म्हणून कसा इंग्लंडचा सामना पहायचा?’ - देशाचा संघ म्हणून ‘आपली’ ओळखच हे क्रिकेट स्थलांतर पुसून टाकेल असं त्यांच्यासह इंग्लंडमध्ये अनेकांना वाटतं. ज्या देशातून हे खेळाडू येतील त्या देशांच्या क्रिकेटचं काय होईल, असाही प्रश्न उपस्थित होतो.
खरं तर तो प्रश्न आजच्या घडीला भारतीय उपखंडातील क्रिकेटला पडू नये. कारण या उपखंडात क्रिकेटनं असं काही मूळ धरलं आहे की गुणी क्रिकेटपटूंची मोठी पैदास होते. मात्र राष्ट्रीय संघात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचतात फक्त 15 खेळाडू. उरलेले आता आयपीएलच्या जिवावर तग धरतात.
मात्र उद्या स्थलांतराची संधी मिळालीच तर हे गुणी खेळाडू परदेशी जाणार नाहीत कशावरून? देशासाठी खेळणं की क्रिकेट खेळणं यापैकी ते काय निवडतील?
आयरिश तरुण इंग्लंडचा कप्तान होतो आणि इंग्लंडचा नागरिक म्हणून आयरिश संघाशी भिडतो ते दृश्य पाहून दोन्ही देशातले कोमल हृदयाचे अनेकजण हळहळले. अस्मिता फुरफुरल्या. मात्र मॉर्गनला इंग्लंडकडून क्रिकेट खेळणं कदाचित जास्त संधी देणारं वाटलं असेल.
मोठय़ा संधीसाठी क्रिकेटमध्ये आता अशी स्थलांतरं होऊ लागली आहेत. त्यापैकी सध्या गाजत असलेली नावं म्हणजे जोफ्रा आर्चर, इमरान ताहीर.
जोफ्रा आर्चर. बार्बाडोसचा. विंडीजच्या फास्ट बॉलिंगची परंपरा सांगणारा वेगवान बॉलर. त्याचे वडील ब्रिटिश होते. जन्मानं त्याच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. मात्र वयाच्या 18व्या वर्षापर्यंत त्यानं इंग्लंड पाहिलंही नव्हतं. त्याच्याकडे उघड उघड दोन पर्याय होते - वेस्ट इंडिजकडून खेळायचं की इंग्लंडकडून? त्यानं इंग्लंड निवडलं. खरं तर इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या नियमानुसार देशात 7 वर्षे क्रिकेट खेळल्याशिवाय खेळाडूला राष्ट्रीय संघात खेळता येत नाही. मात्र इसीबीने कायदाच बदलून टाकला आणि 3 वर्षे खेळूनही संघाकडून खेळता येईल म्हणत या वल्र्डकपमध्येच जोफ्राला त्यांनी संघात स्थान दिलं. त्यानंही इयान बॉथमचं रेकॉर्ड मोडत विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारा ब्रिटिश खेळाडू म्हणून नाव कमावलं. मात्र पदार्पणापूर्वी त्याच्या नागरिकत्वाविषयी बरीच चर्चा झाली. खुलासा युद्ध झालं. मात्र तरीही गोर्या ब्रिटिश संघात आज आर्चर आणि इऑन मॉर्गन खेळत आहेतच. सध्या इंग्लंड संघाचा उपकर्णधार असलेला बेन स्टोक्सही जन्मानं न्यूझीलंडचा आहे. वयाच्या 12व्या वर्षी तो इंग्लंडला आला आणि मग क्रिकेट शिकला. तेच जेसन रॉयचंही. तोही जन्माला आलाय दक्षिण आफ्रिकेत. म्हणजे मुद्दा काय तर आजचे इंग्लंडचे बिनीचे शिलेदार मूळचे ब्रिटिश नाहीत. दुसरीकडे काउण्टी क्रिकेटमध्येही आशियाई वंशाचे अनेक खेळाडू हुकूमत गाजवत आहेतच. पुढे ते ब्रिटिश संघाचं दार वाजवणार हे उघड आहे.
इंग्लंड संघात असा जगभरातल्या खेळाडूंचा भरणा असल्याने अलीकडेच सुनील गावसकरनेही ब्रिटिश संघाला ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड’ म्हणजे शेषविश्वसंघ म्हणत चिमटा काढला होता. तेच आइसलॅण्डनेही केलं. मात्र ते करताना आइसलॅण्ड बोर्ड हे विसरलं की आपल्या संघाचा उपकर्णधार भारतीय आहे. अभिषेक राय चौहान. हा अभिषेक मूळचा दिल्लीचा. दिल्लीत तो क्रिकेट खेळायचा. आता त्याच्याकडे आइसलॅण्डचं नागरिकत्व आहे, तो बारटेंडरचं काम करतो आणि तिथंच क्रिकेटमध्येही आपलं नशीब आजमावतो आहे.
उस्मान ख्वाजा हा पाकिस्तानी; पण ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा, इश सोधी लुधियानाचा; पण न्यूझीलंडकडून खेळतो, अर्थात ते लहान असतानाच त्यांचे पालक परदेशी स्थिरावले ही गोष्ट वेगळी. आता मात्र काळानं कूस बदलत ‘क्रिकेट मायग्रेशन’ नावाची एक नवी वीट क्रिकेटपटूंच्या दिशेनं फेकली आहे. देशांतर्गतच नाही तर जागतिक क्रिकेटमध्ये आणि क्रिकेट खेळू पाहणार्या देशांमध्येही स्पर्धा वाढतेय, त्या स्पर्धेचा फायदा आहे तसा तोटाही.
क्रिकेट आयडेण्टिटीचेच नाही तर देशाच्या आयडेण्टिटीचेही आणि अस्मितांचे नवे प्रश्न हे स्थलांतर उभे करणारच आहे. मात्र त्यासोबतच ज्यांना राष्ट्राहून संधी मोठी वाटते ते जाणारच देश सोडून, जे सर्व क्षेत्रात घडतं त्याला क्रिकेट अपवाद कसं ठरेल?
दरम्यान, भारतीयांनी उगीच कॉलर ताठ करून क्रिकेट हेच देशप्रेम असं म्हणू नये, किंवा म्हणण्यापूर्वी आइसलॅण्ड क्रिकेटकडे व्हिसा आणि संधी मागणार्या गर्दीवर एकदा नजर घालावी आणि उद्या गेलाच एखादा संधी हुकलेला अंबाती रायडू परदेशी तर त्याला ‘गद्दार’ ठरवू नये इतकंच.
पाकिस्तानी ताहीर दक्षिण आफ्रिकेकडून
‘आयपीएल’ खेळतो, तेव्हा..
लाहोरचा इमरान ताहीर. यंदाच्या आयपीएलमध्ये तो आणि त्याची स्टाइल तमाम भारतीयांच्या परिचयाची झाली. पाकिस्तानी खेळाडूला भारतीय भूमीवर खेळू देणार नाही अशी काही नारेबाजीही झाली नाही. कारण ताहीर पाकिस्तानकडून नाही तर आता दक्षिण आफ्रिकेकडून क्रिकेट खेळतो. स्पीनर होण्याचं स्वप्न पाहत लाहोरच्या गल्लीत खेळणारा ताहीर. एका शॉपिंग मॉलमध्ये सेल्समन म्हणून काम करायचा. क्रिकेटचं वेड. पाकिस्तानच्या अण्डर नाइण्टीन क्रिकेट टीमपर्यंतही तो पोहोचला. मात्र त्यापुढे मुख्य संघाचं दार काही त्याला उघडलं नाही. त्या स्पर्धेत तो टिकला नाही. दरम्यान, तो इंग्लंडमध्ये काउण्टी क्रिकेट खेळला आणि तिकडून थेट दक्षिणेत आफ्रिकेत गेला. तिथं तीन वर्षे डोमेस्टिक खेळला आणि मग त्याच्यासाठी दक्षिण आफ्रिकन संघाचं दार उघडलं. त्यानं दक्षिण आफ्रिकी मुलीशीच लग्न केलं आणि तो तिकडेच स्थिरावला. जी संधी त्याला पाकिस्तान क्रिकेटने दिली नाही ती दक्षिण आफ्रिकन क्रिकेटने दिली, उलट जास्त मोठी कवाडं त्याच्यासाठी जगभर आणि भारतातही खुली झाली.
meghana.dhoke@lokmat.com
(लेखिका लोकमत वृत्तपत्रसमूहात मुख्य
उपसंपादक आहेत.)