Crime News: पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल जाताे कुठे? अशी आहे प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 11:17 AM2022-04-10T11:17:59+5:302022-04-10T11:18:21+5:30

Crime News: गुन्हा घडल्यानंतर आरोपीला जेरबंद करण्यासोबतच गुन्ह्याशी संबंधित मुद्देमालही पोलीस जप्त करतात. प्रत्येकवेळी हा मुद्देमाल शस्त्रेच असतो, असे नाही

Crime News: Where do the items seized by the police go? That is the process | Crime News: पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल जाताे कुठे? अशी आहे प्रक्रिया

Crime News: पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल जाताे कुठे? अशी आहे प्रक्रिया

Next

- मनोज गडनीस 

गुन्हा घडल्यानंतर आरोपीला जेरबंद करण्यासोबतच गुन्ह्याशी संबंधित मुद्देमालही पोलीस जप्त करतात. प्रत्येकवेळी हा मुद्देमाल शस्त्रेच असतो, असे नाही तर यामध्ये कधी गाड्या,  तस्करीतून पडकलेला इम्पोर्टेड माल, ड्रग्ज, उच्च श्रेणीचे मद्य, आलिशान घर, फर्निचर अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. हा मुद्देमाल का जप्त केला जातो आणि त्याचे पुढे काय होते, या प्रश्नांचा हा सारांश! 

जप्त मुद्देमालाचा सर्वप्रथम साक्षीदारांच्या उपस्थितीत पंचनामा होतो आणि त्याची प्रत संबंधित व्यक्तीस दिली जाते. जप्त झालेल्या वस्तू संबंधित पोलीस स्टेशनमध्ये ‘मालखाना’ या विभागात ठेवल्या जातात. ज्यावेळी न्यायालयासमोर सुनावणीसाठी संबंधित केस येते, त्यावेळी या वस्तू कोर्टात सादर केल्या जातात आणि न्यायालयाच्या आदेशानुसार या वस्तू न्यायालयाच्या मालखान्यामध्ये जमा केल्या जातात. 
संबंधित आरोपीला जामीन झाला तर, त्याच्या गुन्ह्याच्या स्वरूपानुसार जी वस्तू जमा करण्यात आलेली आहे, त्याचा स्वतंत्र जामीन घ्यावा लागतो. उदाहरणार्थ, एखाद्या केसमध्ये जर गाडी जप्त झालेली असेल, तर गाडीचाही जामीन त्याला घ्यावा लागतो. हत्या, चोरी आदी गुन्ह्यांतील साहित्य नष्ट केले जाते. 
आर्थिक फसवणूक झाली असेल, तर जप्त मुद्देमालाच्या विक्रीतून फसवणूक झालेल्या लोकांची देणी देण्याचे आदेशही न्यायालय देते. विजय मल्ल्याच्या प्रकरणात त्याची स्थावर मालमत्ता जप्त केल्यानंतर त्याची विक्री करून आलेल्या पैशांतून देणी फेडण्यात आली.
कोणत्याही प्रकारचा माल जप्त करण्यासाठी पोलिसांना न्यायालयाची परवानगी घ्यावीच लागते. त्यांना त्याची परस्पर विल्हेवाट लावता येत नाही. 

माल क्लेमच झाला नाही, तर त्याचे काय होते ? 
- जप्त मुद्देमाल घेण्यासाठी कुणी पुढे आलेच नाही, तर, त्या मालाच्या प्रकारानुसार त्याचा लिलाव केला जातो. 
- या लिलावामध्ये जप्त झालेले घर, फार्म हाऊस, फर्निचर, गाडी अशा वस्तूंचा समावेश असतो. याची जाहिरात प्रसिद्ध होते आणि सामान्य नागरिकांना यात सहभागी होऊन त्या विकत घेता येतात.

मद्य, ड्रग्ज, शस्त्रे पकडली तर...
मद्य जप्त झाल्यानंतर ते सांडपाण्यात ओतून दिले जाते. बाटल्या फोडून टाकल्या जातात. 
ड्रग्ज जप्त झाल्यानंतर ते प्रामुख्याने जाळले जाते. पोलिसांमधील उपायुक्त दर्जाचा अधिकारी, प्रदूषण मंडळाचे अधिकारी यांच्या संमतीने निश्चित केलेल्या प्रकारांतर्गत हे अंमली पदार्थ जाळले जातात. 
शस्त्र जप्त झाल्यानंतर त्याची फायरिंग पिन काढून ते प्रथम निकामी केले जाते आणि त्यानंतर, शस्त्र भट्टीत टाकून वितळवले जाते. 
बनावट सीडी वगैरे बुलडोझरखाली चिरडल्या जातात. 

 

Web Title: Crime News: Where do the items seized by the police go? That is the process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.