क्राईम थ्रीलर... शिडीवरून गाठला सोन्याचा स्वर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 10:21 AM2023-07-16T10:21:18+5:302023-07-16T10:21:42+5:30
ग्राहक असल्याचे भासवत विनोद सिंग रूबाबात भल्यामोठ्या सराफी पेढीत प्रवेश करायचा. कुणाचे लक्ष नाही, असे पाहून पोटमाळ्यासारख्या जागेत लपायचे. ...
ग्राहक असल्याचे भासवत विनोद सिंग रूबाबात भल्यामोठ्या सराफी पेढीत प्रवेश करायचा. कुणाचे लक्ष नाही, असे पाहून पोटमाळ्यासारख्या जागेत लपायचे. संधी मिळताच दागिने लुटायचे, ही त्याची अजब मोड्स ऑपरेंडी. याच पद्धतीने अनेक पेढ्या लुटून पोलिसांना त्याने चांगलेच जेरीस आणले होते.
रवींद्र राऊळ, वृत्तसंपादक
दुपारचा एक वाजला तसा कांदिवलीच्या (मुंबई) गजबजलेल्या मथुरादास रोडवरील नूतन ज्वेलर्स या पेढीच्या मालक - कर्मचाऱ्यांची जेवणाची वेळ झाली. एक वाजता पेढीचे शटर कुलूपबंद करून जेवायला जायचे आणि तीन वाजता परतून पेढी उघडायची, हा त्यांचा शिरस्ता. त्या दिवशीही सारे बाहेर पडल्यावर कर्मचाऱ्याने पेढी बंद करून चाव्या मालकाच्या स्वाधीन केल्या. दोन तासाने मालक - कर्मचारी परतले आणि आत पाऊल टाकताच सारे हादरून गेले. पेढीतील शोकेसमधील सोन्याचे लाखोंचे दागिने त्या दोन तासांत गायब झाले होते.
पोलिसांनी पेढीची कसून तपासणी केली, तेव्हा दुकानाच्या पाठीमागील बाजूच्या लोखंडी जाळीच्या खिडकीचे खिळे काढून खिडकी नावापुरती भिंतीवर बसवलेली आढळली. त्याचवेळी पेढीच्या मागच्या भिंतीबाहेरून खिडकीलगतच एक मध्यम आकाराची शिडी होती. पोलिसांना खिडकीच्या जाळीचे स्क्रू दुकानाच्या आतील बाजूनेच काढल्याचे आढळल्याने आरोपी पेढीत मुख्य प्रवेशद्वारातून आल्याचे आणि जाताना खिडकीतून बाहेर पडल्याचे दिसत होते. पण पेढीचे शटर तर कर्मचाऱ्यांनी बंद केले होते. ती कुलपेही तशीच होती. मग दुकानफोड्या आत शिरला कसा?
इन्स्पेक्टर जयवंत हरगुडे यांनी त्या शिडीला तपासाच्या केंद्रस्थानी ठेवले. बऱ्याच मंडप डेकोरेटरकडे शोध घेतला असता, एकाने आपणच ती एका व्यक्तीला भाड्याने दिल्याचे कबूल केले. त्याने केलेल्या वर्णनावरून काढण्यात आलेले रेखाचित्र नूतन ज्वेलर्सच्या मालकांना दाखवले. तेव्हा मालक म्हणाले, ‘अरे, हा तर आमचा ग्राहक. नुकतीच त्याने एक अंगठी आमच्या पेढीतून खरेदी केलीय.’
पोलिसांनी रेखाचित्रातील घरफोड्याला शोधण्यासाठी दिवस-रात्र एक केला. इन्स्पेक्टर हरगुडे यांना त्यांच्या खबऱ्याने रेखाचित्रातील संशयित घरफोड्या विनोद सिंग असावा, असा अंदाज व्यक्त केला. महत्प्रयासाने हरगुडे यांना विनोद सिंगच्या दिल्लीतील एका नातेवाईकाची माहिती मिळाली. पोलिसांची एक टीम दिल्लीला रवाना झाली. त्यांनी चौकशी केली, तेव्हा घाबरलेल्या त्या नातेवाईकाने नुकतेच विनोद सिंगने दिल्लीत एक घर खरेदी केल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी दिल्लीतील त्या घरातून विनोद सिंगची उचलबांगडी केली. चौकशीत त्याने एकामागोमाग एक धक्के दिले. ती पेढी लुटण्यासाठी त्याने कित्येक महिने खर्च केले होते. अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने पेढीतही चकरा मारल्या. पेढीच्या मागच्या बाजूला एक पोटमाळा होता आणि त्यावर कागदी खोके रचून ठेवले होते. एकेदिवशी विनोद सिंग लघुशंकेच्या बहाण्याने मागील बाजूस जाऊन थेट पोटमाळ्यावर लपून बसला. रात्री शोकेसमधील सारे दागिने तिजोरीत बंदिस्त करत सारे निघून गेले. तेव्हाही विनोद सिंग पोटमाळ्यावरच होता. पण दागिने तिजोरीत असल्याने ती फोडणे शक्य होणार नव्हते. रात्री पोटमाळ्यावरून खाली उतरून मागील लोखंडी जाळीचे सारे स्क्रू काढून ती जाळी तशीच वरच्यावर लावून ठेवली आणि पुन्हा पोटमाळ्यावर लपला. सकाळी पेढी उघडल्यावर नित्याचे व्यवहार सुरू झाले. दुपारी पेढी जेवणासाठी बंद होताच विनोद सिंग पोटमाळ्यावरून खाली उतरला. शोकेसमधील चार किलोंचे सोन्याचे दागिने घेत लोखंडी जाळीच्या खिडकीतून खाली उतरत आधीच बाहेर ठेवलेल्या शिडीवरून उतरत आरामात पसार झाला.