कुडोपीतील अभिरुचीसंपन्नता
By admin | Published: May 6, 2014 04:26 PM2014-05-06T16:26:17+5:302014-05-06T16:26:17+5:30
मालवणमधील कुडोपी या गावातील प्रस्तर चित्रे लोहयुगातील असल्याची शक्यता आहे. ही चित्रे कोणत्याही कालखंडातली असली तरी ती आपल्या पूर्वजांची जीवनशैली, कला आणि संस्कृतीच्या अभिरुचीचे दर्शन घडवणारी असल्याने त्यांचे संवर्धन आणि संरक्षण होणे गरजेचे आहे.
-राजेंद्र केरकर
मालवणमधील कुडोपी या गावातील प्रस्तर चित्रे लोहयुगातील असल्याची शक्यता आहे. ही चित्रे कोणत्याही कालखंडातली असली तरी ती आपल्या पूर्वजांची जीवनशैली, कला आणि संस्कृतीच्या अभिरुचीचे दर्शन घडवणारी असल्याने त्यांचे संवर्धन आणि संरक्षण होणे गरजेचे आहे.
इतिहासपूर्व काळातील आदिमानवाचे जीवन त्याच्या परिसरातील निसर्ग आणि पर्यावरणावर अवलंबून होते. दर्याखोर्यात, माळरानावर अन्नपाण्यासाठी भटकंती करणार्या आदिमानवाचे जगणे त्याच्या परिसरात आढळणार्या वृक्षवेली, पशुपक्षी यांनी प्रभावित केले होते. भारतात अश्मयुग नेमके केव्हा सुरू झाले, यासंबंधी तज्ज्ञांचे अजून एकमत झालेले नाही. नवाश्मयुगाचा भारतातील कालखंड इ.स.च्या २000 वर्षांपूर्वीच्या आसपास असावा. या काळात शेती करून स्थिर जीवन जगण्याकडे माणसाचा कल वाढला. दगडी हत्यारे घोटून गुळगुळीत व धारदार केलेली असत. मातीची भांडी बनविणे व वस्त्र विणणे या कला त्याला अवगत झाल्या. शेतीला उपयुक्त अशी जनावरे तो पाळू लागला आणि अन्नपदार्थांचे उत्पादन करू लागला. स्थिर जीवनामुळे वस्तुसंचय व व्यापार सुरू झाला. अन्नाचा प्रारंभी चाललेला संघर्ष, शेतीमुळे क्षीण होत गेल्याने मानवी समाजात कलांची प्रगती होत गेली आणि त्यातून शिलाखंडावर चित्रे रेखाटण्याची माणसाला प्रेरणा मिळाली नसती तर नवलच मानावे लागेल. मध्य प्रदेशातील भीम बेटकासारख्या गुंफांत नैसर्गिक रंगाद्वारे आदिमानवांनी चित्रांचे रेखाटन केले, तर काही ठिकाणी अणकुचीदार आणि तीक्ष्ण दगडी हत्यारांद्वारे त्यांनी दगडावर नानाविविध चित्रांचे रेखाटन केले.
देशाच्या विविध भागांत आदिमानवांनी काढलेली प्रस्तर चित्रे नदीकिनारी शिलाखंडावर, नैसर्गिक गुंफेतील दगडांवर, माळरानावर आढळणार्या दगडावर पाहायला मिळतात. महाराष्ट्रात अश्मयुगातील आदिमानवांची हत्यारे, भांडीकुंडी, दफनभूमी आढळलेल्या असून, त्याचप्रमाणे नद्यांच्या काठी तत्कालीन प्राण्यांच्या अश्मास्थींचे अवशेषही सापडले आहेत. महाराष्ट्रात गोदावरी, प्रवरा, मुळा, तापी, नर्मदा आदी नद्यांच्या खोर्यात अश्मयुगीन मानवाचा वावर होता; परंतु पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या कोकणातही अश्मयुगीन, ताम्रकालीन आणि लोहयुगातील मानवाचे वास्तव्य होते, याचे पुरावे प्रकर्षाने आढळू लागलेले आहेत. सह्याद्री आणि अरबी सागराच्या कुशीत वसलेली कोकणची भूमी आदिम काळातील मानवाला शिकारीसाठी जंगली श्वापदांनी युक्त होती. त्याचप्रमाणे कंदमुळे, पिण्याचे पाणी यांनी समृद्ध होती. छ. शिवाजी महाराजांच्या जलदुर्गासाठी म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी ख्यात असलेल्या मालवण तालुक्यातील कुडोपी या सह्याद्रीतील वसलेल्या गावात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे विशेष जनसंपर्क अधिकारी असलेल्या सतीश लळित यांनी सुमारे ३0-४0 प्रस्तर चित्रांचा समृद्ध वारसा प्रकाशात आणण्याची कामगिरी केली. नोव्हेंबर २0१२ मध्ये त्यांनी भारतीय प्रस्तर चित्रकला सोसायटीच्या राष्ट्रीय परिषदेत कुडोपी येथील प्रस्थर चित्रांचे या परिसरातल्या इतिहास आणि संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्व विशद करत असताना अभ्यासाच्या दृष्टीने त्यांचे स्थान अधोरेखित केले. लळित हे गोव्याच्या सीमेजवळ असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील आडाळी गावचे. सरकारी यंत्रणेत काम करत असताना त्यांनी आपल्यातील साहित्य, कला आणि संस्कृती यांची अभिरुची सजीव ठेवली आणि त्यामुळे विस्मृतीच्या उंबरठय़ावर असलेल्या या प्रस्तर रेखाचित्रांचे दालन त्यांनी प्रकाशात आणले. कुडोपीबरोबर मालवण तालुक्यातील हिवाळी, राजापूरजवळील निवळी, खानावली, गुहागरजवळील पालशेत येथील प्रस्तर चित्रांचाही त्यांनी अभ्यास केला. यापूर्वीच गोव्यातल्या सांगे तालुक्यातील कोळंब-धांदोळे येथील फणसायमळ कुशावती नदीच्या उजव्या तीरी आढळलेल्या जांभ्या दगडावर कोरलेल्या प्रस्तर चित्रांचा, त्याचप्रमाणे केपेतील काजूर, सत्तरीतील म्हाऊस आणि दोडामार्ग-विर्डीतील काळ्या पाषाणावर कोरलेल्या प्रस्तर चित्रांतली साम्यस्थळे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
कुडोपी हे मालवण तालुक्यातील गाव. गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग १७ पासून काही अंतरावर वसलेले आहे. कणकवलीहून ३0 कि.मी. अंतरावर आचरामार्गे चिंदर ओलांडल्यावर कुडोपी गाव असून, तेथील २८0 फूट उंचावरच्या ‘बावल्यांचा टेंब’ येथील जांभ्या दगडाच्या पठारावर सहसा लक्षात न येण्याच्या जागी ही प्रस्तर रेखाचित्रे कोरलेली आहेत. कुंभा, करवंद, अंजनी, पिंपळी अशा झुडपांनी युक्त असलेल्या पठारावर श्रावण-भाद्रपदातले पठारावरच्या जंगल पुष्पांचे वैविध्यपूर्ण लावण्य न्याहाळत जाणे हा सुखद अनुभव. पावसानंतर हे पठार गवताने भरलेले असल्याने त्याच्यावरची प्रस्तर चित्रे पडवळ, घाडी, पावसकर मंडळींच्या मदतीशिवाय शोधणे बरेच कठीण. बुधवळे- कुडोपी ग्रामपंचायत क्षेत्रात येणारे ‘बावल्यांचा टेंब’ टेकडीवरचे हे पठार अरबी सागरापासून सुमारे १२ कि.मी. अंतरावर असून, गावाला पूर्वीच्या काळी आचर्याच्या बंदराचा प्रभावीपणे उपयोग व्हायचा. गांगेश्वर, विठ्ठलाई या लोकदैवतावर श्रद्धा ठेवून वावरणार्या इथल्या कष्टकर्यांना शेकडो वर्षांपासून जांभ्या दगडावर कोरलेल्या रेखाचित्रांचे ज्ञान होते.
महाभारतातील पांडव वनवासाच्या काळात कुडोपी येथे आले आणि त्यांनी ही चित्रे कोरलेली आहेत, अशी त्यांची श्रद्धा आहे. तीन बोटे आणि महाकाय पायासारखी रेखाचित्रात असलेली आकृती त्याचमुळे त्यांना भीमाचा पाय भासतो. जांभ्या कातळावरच्या अन्य चित्रांचा त्यांना अर्थ सूचित न झाल्याने गुरे चरायला घेऊन येणार्या इथल्या कष्टकर्यांना यातली काही चित्रे बाहुलींची भासली आणि त्यामुळे महेश पावसकर यांचे हे पठार ‘बावल्यांचे टेंब’ म्हणून नावारूपास आले.
जांभ्या कातळावर ३0-४0च्या आसपास कोरलेल्या या चित्रांत प्रामुख्याने निश्चित अर्थबोध न होणार्या मानवसदृश आकृत्या, मासे, पक्ष्यांच्या पायांचे ठसे, गोलाकार वतरुळे, भूमितीशी नाते सांगणार्या प्रतिकृती आहेत. यापैकी १५ फुटांचे एक चित्र मातृदेवतेचे असल्याचे प्रतिपादन लळित यांनी केलेले आहे. खरंतर अश्मयुगात स्त्री हीच कुलप्रमुख मानली जात होती. त्या काळातील मानवाला भूमातेचे महत्त्व पटले होते. पृथ्वीच्या मातृत्वाबरोबर तिच्या धारिणी व कराल अशा अभय रूपांची प्रचीती मानवाला आली असली पाहिजे. ही प्रस्तर रेखाचित्रे नवाश्मयुगातील असावी आणि जादूटोणा करणार्या मांत्रिकांशी संबंधित असावी, असे लळित यांचे मत आहे. भारतीय नाणेशास्त्र संशोधन संस्था, नाशिक येथील पुरातत्त्व संशोधक डॉ. रिझा अब्बास यांच्या मते ही रेखाचित्रे देशातील वैशिष्ट्यपूर्ण असा पुरातत्त्वीय वारसा असून, त्यांची कालनिश्चिती करणे सहज शक्य नाही. गोव्यातील चौगुले महाविद्यालयातील पुरातत्त्वशास्त्राचे प्रा. वरद सबनीस यांनी ही प्रस्तर चित्रे लोहयुगातील असल्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. ही चित्रे कोणत्याही कालखंडातली असली तरी ती आपल्या पूर्वजांची जीवनशैली, कला आणि संस्कृतीच्या अभिरुचीचे दर्शन घडवणारी असल्याने त्यांचे संवर्धन आणि संरक्षण होणे गरजेचे आहे.
(लेखक पर्यावरण कार्यकर्ते आहेत.)