गोविंदा नावाचा ‘कल्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 06:02 AM2021-01-03T06:02:00+5:302021-01-03T06:05:06+5:30

डेविड धवनचा कुलदीपक कसा काय होऊ शकतो ‘कुली नंबर वन’? तो फारच फार तर ‘कुली नंबर सतराशे साठ’ होऊ शकेल.... गोविंदाची बरोबरी करायला बघतो म्हणजे काय?

A cult called Govinda | गोविंदा नावाचा ‘कल्ट’

गोविंदा नावाचा ‘कल्ट’

Next
ठळक मुद्देगोविंदा आला आणि अजिबातच न चाचपडता, फारच झटक्यात त्याने आपलं बस्तान बसवलं. वयाच्या एकविसाव्या वर्षी काम शोधण्यासाठी रोज विरारहून मुंबईत लोकलने येणाऱ्या या मुलाने वयाच्या बाविसाव्या वर्षी तब्बल पंचाहत्तर सिनेमे स्वीकारलेले होते.

- बालाजी सुतार

आधुनिक तंत्रप्रधान जगाची, त्यातल्या लखलखाटाची ओळख जास्त जोरकसपणे गावाला झाली, ती व्हिडीओ गावात आला, तेव्हा त्या आधीचं महाराष्ट्राच्या गावखेड्यातलं जग हजारो वर्षांत अगदीच न बदलेलं होतं. तेच ते रान शिवार, तसाच्या तसाच बाकीचा सगळा गावगाडा. वर्षानुवर्षे खाण्यापिण्याच्या आणि कपड्यालत्याच्या त्याच तऱ्हा. मुंबई-पुणे-कोल्हापुरात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणच्या एखाद्या ‘टाकी’मध्ये किंवा जत्रेबित्रेतल्या तंबू टाकीमध्ये सिनेमा बघून लोकं थोडी-फार ‘सुधारली’ असतील, पण तो सिनेमा म्हणजे ‘संत तुकाराम’किंवा तसंच काही. पुढे दादा कोंडके आले, पण त्यांच्या सिनेमातलं जग आणि प्रत्यक्षातलं खेड्यांतलं जग यात काहीही वेगळं नव्हतं. दादांचं कायम द्वयर्थी बोलणंसुद्धा लोकांना आवडायचं. त्याचं कारण गावातली माणसं एरवीही त्याच भाषेत बोलत.

व्हिडीओ आला आणि हळूहळू लोकांना हिंदी चित्रपटांचा झगमगाट पाहायला मिळायला लागला. रुपयाभराच्या तिकिटात राजेश खन्ना सेवेला हजर होई, पण राजेश खन्ना ही गावातल्या लोकांची ‘टाईप’ नव्हती. पुढे अमिताभ बच्चनची तुफान फायटिंग आली. ती लोकांना आवडत होती, पण ते ‘आपलं’ नव्हे, हेही लोकांना कळत असे.

- आणि मग गोविंदा आला. दादा कोंडकेंचा किंचित सभ्य हिंदी अवतार.

गोविंदा आला आणि अजिबातच न चाचपडता, फारच झटक्यात त्याने आपलं बस्तान बसवलं. वयाच्या एकविसाव्या वर्षी काम शोधण्यासाठी रोज विरारहून मुंबईत लोकलने येणाऱ्या या मुलाने वयाच्या बाविसाव्या वर्षी तब्बल पंचाहत्तर सिनेमे स्वीकारलेले होते. चित्रपट उद्योग वेड्यासारखा गोविंदाच्या मागे धावत होता. गोविंदा लोकांना इतका आवडला, त्याचं कारण त्याचं देखणेपण, त्याचं असामान्य नृत्यकौशल्य, त्याचा प्रचंड उत्स्फूर्त आणि कमालीचा लवचिक कायिक-वाचिक अभिनय या गोष्टी होत्याच, पण मुख्य गोष्ट होती, त्याचं हिंदी चित्रपटातला ‘दादा कोंडके’ असणं. एखाद्या कसलेल्या लोककलावंतासारखा तो कमालीचा ‘मासी’ होता.

क्लास आणि मास यांच्यातली हिशेबी दरी आपल्याकडे सर्वच क्षेत्रात असतेच आधीपासून. उदाहरणार्थ, सलमान खानच्या प्रत्यक्ष आयुष्याबद्दल काहीही प्रवाद असले, तरी पडद्यावर ‘व्हल्गर’ न वागण्याची, घरातल्या सगळ्या सदस्यांना आपले सिनेमे बघताना संकोच वाटू नये, याची तो दर चित्रपटात काळजी घेतो. शाहरुख खानही एकदा म्हणाला होता, ‘ मैं मेरी टर्म्स पे काम करुंगा, मुझसे खटिया नही सरकायी जाएगी.’

गोविंदा असलं काही म्हणत नव्हता. ‘उसको ‘किस’ किया? तो क्या गलत किया? यार इतने सॉफ्टसॉफ्ट लिप्स है मेरे..’ असं (पडद्यावर) नायिकेचं जबरदस्तीने चुंबन घेऊन तो बिनधास्तपणे म्हणाला होता आणि शाहरुखला पसंत नसलेली खटियाही त्याने अत्यंत उन्मादक शैलीत सरकवली होती. ‘अ आ ई.. उ ऊ ओ..’ असली निरर्थक शब्दरचना असलेली गाणी त्याने कमाल प्रेक्षणीय करून टाकली. लाल सदरा आणि पिवळी प्यांट वगैरे चमत्कारिक कपड्यांमध्ये तो कधी अवघडला नाही. त्याला फार ‘क्लासी’ होण्यात कधी रस नव्हता. अर्थात, याने त्याचं नुकसानही झालं. पहिल्याच वर्षी त्याने जे पाउणशे सिनेमे स्वीकारले होतें, त्यातले पंचवीसेक त्याने सोडून दिले, तरी पन्नासभर सिनेमे तो एकाच वेळी करत होता. तो एका सेटवरून दुसऱ्या सेटवर जाताना गाडीतल्या गाडीतच झोपायचा आणि चोवीस तास काम करायचा. त्याने आपल्याला सांगून आलेल्या चित्रपटाची कथा वाचण्याचेही कष्ट त्याने कधी घेतले नाहीत, असं तो स्वत:च सांगतो. परिणामी, अत्यंत एकसारखी कथा असलेले त्याचे अनेक चित्रपट आले. ठरलेल्या साच्यातली कथा आणि ठरलेला नटच. नेहमीचे यशस्वी कलाकार आणि अभिजात वगैरे भानगडीत न पडणारा विनोद हा गोविंदाच्या सिनेमांचा तुफान यशस्वी फॉर्म्युला होता. त्या चौकटीत त्याने डझनावारी हिट सिनेमे दिले.

विनोदाची त्याला असलेली अफलातून जाण आणि त्याचं नृत्यकौशल्य ही त्याची शक्तिस्थळे होती आणि उत्तर काळात याच त्याच्या मर्यादा होऊन बसल्या. ‘हत्या’सारखे भूमिकांच्या संदर्भातले काही (किंचित) वेगळे प्रयोग तो टप्प्याटप्प्यावर करत राहिला असता, तरी त्याची कारकीर्द उतरणीला लागली नसती. ज्या गोविंदाने आपल्यासोबत काम करावे, म्हणून खुद्द अमिताभ बच्चनने त्याची मनधरणी केली, त्याच गोविंदाला काम मिळविण्यासाठी धडपड करावी लागणं, ही त्याच्या चाहत्यांना कमालीचं दुखावणारी गोष्ट आहे.

काही असो, आज त्याचे सिनेमे येत नसले किंवा आले तर चालत नसले, तरीही गोविंदाचं ‘स्टार स्टेटस’ तिळमात्रही उणावलेलं नाहीय.

आजही तो तितकाच लोकप्रिय आहे. त्याच्याइतका जातिवंत नट दुसरा कुणी क्वचितच सापडेल.

‘कुली नं. वन’? हा ‘गोविंदाचा’ सिनेमा डेविड धवनने स्वत:च्या पोराला घेऊन पुन्हा बनवला. आता डेविड धवनचा कारटा कसा काय? होऊ शकतो ‘कुली नंबर वन’? तो फारच फार तर ‘कुली नंबर सतराशे साठ’ होऊ शकेल. तेही त्याचा स्वतःचा हिज ओन बाप डैरेक्टर आहे म्हणून!... गोविंदाची बरोबरी करायला बघतो म्हणजे काय?

गोविंदा म्हणजे गोविंदा! पण हे लक्षात न घेतल्याने नुसत्या धवन पितापुत्रांनाच नव्हे, तर सिनेमा ज्यांनी दाखवला त्या अमेझॉन प्राइम या ओटीटी वाहिनीलाही तुफान शिव्या खाव्या लागल्या. हे गोविंदाचं ‘लोकलावंत’ असणं आहे...इतका उत्स्फूर्त. इतका लवचिक. इतका हरहुन्नरी. नखशिखांत ''''नट''''.

- गोविंदा भारतीय चित्रपटाला एक निर्विवाद ‘कल्ट’ आहे.

(लेखक, साहित्यिक)

majhegaane@gmail.com

Web Title: A cult called Govinda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.