दादा: माझे तीर्थरुप

By Admin | Published: November 29, 2014 02:34 PM2014-11-29T14:34:49+5:302014-11-29T14:34:49+5:30

दादा धर्माधिकारी म्हणजे कुटुंबवत्सल, संसारकरू माणूस. जीवनात गुप्तता नसावी, ही त्यांची प्रांजळ भूमिका. एक चिटोरेसुद्धा खासगी म्हणून लिहिण्याची दादांना गरज वाटली नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनाला एक प्रकारचा मैदानी मोकळेपणा लाभला होता. दादांची पुण्यतिथी १ डिसेंबर रोजी आहे. त्यानिमित्ताने..

Dada: My tirtha | दादा: माझे तीर्थरुप

दादा: माझे तीर्थरुप

googlenewsNext
>
- चंद्रशेखर धर्माधिकारी
तसं पाहिलं तर दादांबद्दल लिहिणं सोपं आहे आणि फार कठीणही आहे. तख्त, तिजोरी, तलवार, अगर सत्ता, संपत्ती  आणि पदव्या यांच्यापैकी काहीही नसलेल्या सामान्य माणसाचे जीवन ते जगले. दादा म्हणजे कुटुंबवत्सल, संसारकरू माणूस. जीवनात गुप्तता नसावी, ही त्यांची प्रांजळ भूमिका. म्हणून काही रहस्यस्फोटही करण्याची सोय नाही. एक चिटोरेसुद्धा खासगी म्हणून लिहिण्याची दादांना गरज वाटली नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनाला एक प्रकारचा मैदानी मोकळेपणा लाभला होता. त्यांना येणारी खासगी पत्रे-ज्यातून लिहिणार्‍याबद्दल नको असलेली स्फोटक माहिती मिळू शकली असती. त्यांनी जपून ठेवली नाहीत. काही माझ्या हाती लागली, ती त्यांनी फाडायला लावली. मेलेल्या माणसाला कमीपणा येईल, असे चिटोरेही त्यांनी आम्हालाही ठेवू दिले नाही. त्यामुळे त्याहीबाबतीत लिहिण्यासारखे काही नाही. आपल्या मुलांकडून काहीही अपेक्षा न करता, ‘पुत्राकडूनच पित्याला अनेकदा जीवन संपन्न करणारी दौलत मिळते आणि मुलांमुळेच त्यांचे जीवन समृद्ध झाले आहे,’ असे ते मानीत. ‘ही पृथ्वी सोन्याची होवो’ असा वर ज्याने मागितला, त्याला  निर्जीव सोने मिळते; पण सोन्यासारखी माणसे अंतरतात. सोन्यासारख्या माणसाच्या सोनेरी वृत्तींनी आणि सोन्यासारख्या करणीने हे जग खरोखर सुवर्ण होऊन जीवनाला रंग व बहर येतो, असेच दादा मानीत आले. दादांना अनुयायी नाहीत, शिष्य नाहीत. कोणाचाही मार्गदर्शक अगर भगवान होण्याची त्यांची तयारी नव्हती. त्यांच्या मते, त्यांना हे ओझे झेपण्यासारखे नव्हते. ‘माणसाचे प्रेम मला परवडते. त्याची निष्ठा नाही परवडत. विश्‍वासाला पात्र ठरलो म्हणजे पुरे. स्नेहाचा व विश्‍वासाचा संग्रह अगदी निर्धास्तपणे व प्रयत्नपूर्वक करावा. ज्यांच्याशी पटत नसेल, म्हणजे मतभेद असेल, त्यांचाही स्नेह किंवा विश्‍वास गमावू नये. जुने स्नेहसंबंध न तोडता नवीन जोडणे म्हणजे योग. यालाच मी जगण्याची हातोटी किंवा जीवनातले कौशल्य मानतो,’ अशी दादांची भूमिका होती. 
सामान्य नियम असा आहे, की मुलांना वाटते, आपण जे करतो त्याला वडिलांनी पाठिंबा दिला नाही, तर  ते पित्याच्या कर्तृत्वाला चुकले. बरोबरीच्या सोबत्यांना वाटते, की पुढार्‍याने शक्ती स्वत:ची वापरावी आणि अक्कल मात्र आमच्याकडून उधार घ्यावी. दादांचा आग्रह एवढाच, की ‘मलाही माझी अक्कल थोडी थोडी वापरू द्या, म्हणजे ती वाढेल.’ दादांना माणसांचा संग्रहही जमला नाही. कार्याच्या दृष्टीने माणसे गोळा करण्याचा उद्योग दादांनी कधी केलाच नाही. त्यात त्यांना माणुसकीचा उपर्मद वाटत असे. गरजवंताच्या गरजेचा फायदा घेणेही दादांच्या माणुसकीला साधले नाही. माणसावर विश्‍वास ठेवण्याची शक्ती त्यांच्यात भरपूर होती. मुत्सद्याची सावधगिरी व हिशेबीपणा त्यांना कधी रुचला नाही. त्यामुळे जोखीम पत्करूनही दादांनी माणसांवर विश्‍वास टाकला. माणूस मित्रांशी कसा वागतो, यापेक्षा आपल्या प्रतिपक्षाशी कसा वागतो, यात त्याच्या सौजन्याची कसोटी आहे. त्यामुळे दादा जीवेभावे मैत्री करू शकले, पण मन:पूर्वक द्वेष दादांना करता आला नाही. आपण तेवढे भले आणि आपले प्रतिस्पर्धी सारे बुरे, अशी वृत्ती निर्माण न झाल्यामुळे राजकारण दादांना जमले नाही. राजकारणी माणसाचे मित्रत्व प्रखर आणि शत्रुत्व तीव्र असावे लागते. मित्रांची, मग ते कसेही वागले तरी, पाठ राखणे आणि प्रतिपक्षाला नामोहरम करणे, हा राजकारणी माणसाचा गुण मानला जातो. अशा प्रकारचा जनसंग्रह करणे त्यांना आवडले नाही. या सर्व गुणदोषांमुळे विधानसभा सदस्य, घटना समितीचे सदस्य अगर जुन्या नागपूर प्रदेशाच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहूनही दादांनी स्वत:ला राजकारणासाठी नालायक मानले, तर सज्जनांना त्यांच्या या तथाकथित पराभवात भगवंताचे दर्शन घडले. जीवनाचा एक नवीनच आयाम पाहावयास मिळाला.
लोकशाहीत सत्तेची पदे कमी असतील आणि सर्व क्षेत्रात कामे करणारी माणसे अधिक लागतील, हे उघड आहे. सारे हक्कदार जर उमेदवार झाले, तर लोकशाहीचे दिवाळे निघाल्याशिवाय राहणार नाही. याच भूमिकेतून दादांनी सत्तास्थाने स्वीकारली नाहीत. एवढेच नव्हे, तर पद्मविभूषणपासून इतर सारी आभूषणेही त्यांनी स्वीकारली नाहीत. सत्ता, संपत्ती, पदवी यापैकी काहीही हासिल न झालेल्या सामान्य नागरिकाची प्रतिष्ठा समाजात स्थापित करणे, हे दादांनी आपले जीवनकार्य मानले. कुठलेही ‘लेबल’ नसलेल्या सामान्य माणसाला प्रतिष्ठेने जगता यावे, असे वातावरण असावे, असे त्यांना वाटत असे. म्हणूनच जीवनात काही पथ्ये त्यांनी स्वीकारली आणि ती पाळता यावीत, म्हणून दादांनी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, गव्हर्नर ही पदेच नव्हेत, तर सामाजिक अगर सवरेदय संस्थांतसुद्धा कधी पदाचा स्वीकार केला नाही. नागपूर विद्यापीठाने देऊ केलेली डॉक्टरेटची पदवीसुद्धा त्यांना नाइलाजाने नाकारावी लागली. यात दंभाचा अगर विनयाचा भाग नव्हता, हे उघड आहे. अशा काहीही वैशिष्ट्ये नसलेल्या तीर्थरूपांबद्दल काय लिहावे, हेच मला कळत नाही.
इंटरच्या वर्गात असतानाच म. गांधींनी पुकारलेल्या हाकेला साथ देऊन दादांनी शिक्षण सोडले व ते राष्ट्रीय आंदोलनात सामील झाले. सुरुवातीला टिळक स्वराज्य फंडासाठी पैसे गोळा करण्यासाठी दादांनी भ्रमंती केली व नंतर टिळक राष्ट्रीय शाळेत तीस रुपये महिना पगारावर शिक्षकाची नोकरी धरली. असहयोग आंदोलनात व त्यानंतरच्या सर्वच राष्ट्रीय आंदोलनांत त्यांनी भाग घेतला. तुरुंगवासही पत्करला. वडिलांच्या मृत्यूनंतर १९३५ मध्ये जमनालालजी बजाज यांच्या आग्रहावरून दादा गांधीजींच्या सान्निध्यात वध्र्याला बजाजवाडीत राहायला गेले. दादांनी ‘सवरेदय’ मासिकाचे संपादनही  केले. आचार्य विनोबाजींसोबत भूदान आंदोलनातही दादा सामील झाले. गांधीजींच्या आदेशानुसार दादा काही काळ सांसदीय लोकशाहीच्या प्रक्रियेतही सामील झाले; पण दादांच्या मते त्यांना कधी आंदोलनात खस्ता खाव्या लागल्या नाहीत किंवा त्यागही करावा लागला नाही. तुरुंगवास वगैरे अनेकांना भोगावा लागला. त्यात विशेष असे काहीच नव्हते. त्यांच्या भाषणामुळे लोकांच्या भावना जागृत होऊन प्रक्षोभ वाढेल, चळवळीला गती येईल, म्हणून प्रत्यक्ष आंदोलनास सुरुवात होण्यापूर्वीच सरकार त्यांना अटक करीत असे. म्हणून त्यांना कधी लाठीमार, गोळीबार सहन करावा लागला नाही. त्यांनी मुलांना आपली संपत्ती मानली नाही. त्यांच्या आयुष्यावर व जीवितावर कधी अधिकार सांगितला नाही. हवा असेल तेव्हा सल्ला दिला, पण त्यांचे ऐकले पाहिजे, असा आग्रहसुद्धा धरला नाही.  याला तुलना नाही, असे मला वाटते. दादा म्हणत, ‘तुम्ही माझी मुले आहात, पण अनुयायी, शिष्य नाही. तुम्ही माझ्याशी भांडता, माझ्या मनाविरुद्ध वागता, तरी माझ्या प्रेमात अंतर येत नाही. मते बदलली म्हणजे अनुयायित्व संपते, शिष्यत्व संपुष्टात येते, पण आयुष्य संपले, तरी स्नेह संपत नाही. मित्रत्वाला जात, गोत, प्रांत, संप्रदाय इत्यादी काहीच लागत नाही.’ हीच दादांची वृत्ती व संपत्ती होती.
मी उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती व्हावे असे माझे चुलते बल्लाकाकांपासून अनेकांना वाटले. दादांना मात्र कुठलेही पद स्वीकारू नये, असेच वाटत होते. कारण शेवटी सरकारी नोकरच ना! असे त्यांना वाटे. एका अर्थाने त्यांच्या मनाविरुद्ध नव्हे, पण मताविरुद्ध हे पद मी स्वीकारले. त्या वेळी दादा बंगलोरला होते. तेथून आशीर्वादपर पत्र लिहिताना त्यांनी, ‘आज सर्वत्र न्यायाधीशांवर आर्थिक, राजकीय व सामाजिक दडपण आणण्यात सर्वच आपापली पराकाष्ठा करीत आहेत. जमावाची दहशत वाढत जाण्याचा संभव आहे. अशा वेळी धीरोदात्तपणाने प्रसंगांना तोंड देण्याची शक्ती न्यायमूर्तींना लाभावी’ हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.
‘तख्त, तिजोरी, तलवार’ - सत्ता, मत्ता व शस्त्रे यांपैकी काहीच दादांजवळ नव्हते. त्यांचे बँकेत खाते नव्हते. त्यांची काहीही संपत्ती नव्हती. त्याचमुळे त्यांच्या डेथ सर्टिफिकेटलाही अर्थ नव्हता. पण त्यांनी स्नेहयोगाची अनमोल संपत्ती आमच्यासाठी ठेवली. जिची झीज होत नाही व ती खर्चही होत नाही. उलट, दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असते. कौटुंबिक भावनेचा विस्तार व्हावा, असे त्यांना वाटत होते. त्यांच्या दृष्टीने कुटुंबात आई ही शरीराने व भावनेने सर्वांत जास्त व सर्वांत मोलाची सेवा करते. मतलब, वासना किंवा प्रभुत्व या भावना कुटुंबात नसतात. त्यात गरजेप्रमाणे उपभोग व कुवतीप्रमाणे काम करावयाचे असते. कामाचे तास नसतात किंवा मोबदल्याचे अर्थशास्त्र नसते. त्यात पारस्परिकता असते. प्रत्येकजण एकमेकांची अडचण समजून घेऊन जगत असतो. त्यामुळे कुटुंबात नाते असते. आप्तेष्टांच्या आस्थेवर व आत्मीयतेवर संपन्न, समृद्ध व उज्ज्वल असे जीवन आधारलेले असते. आत्मीयता व स्वकीयभावना हा त्यांचा स्वभाव होता. यालाच ते अध्यात्म मानीत व मैत्री हे सर्वांत श्रेष्ठ आध्यात्मिक मूल्य आहे, अशी त्यांची भावना होती. श्रमहीन ‘लक्ष्मी’ व सत्त्वहीन ‘सरस्वती’ या अधिष्ठात्री देवता असूच शकत नाहीत. त्यामुळे निर्जीव सुवर्णाचा त्यांना कधी मोहच झाला नाही. ‘प्रॉपर्टी’ ही ‘इमप्रॉपर्टी’ असते, असेच ते मानीत असत.
तरुण व स्त्रियांबद्दल दादांची आगळी-वेगळी भूमिका होती. ते तारुण्याचे तीन तकार मानीत. तेजस्विता, तपस्विता व तत्परता. क्रांती व भ्रांती यात भेद आहे. भूकंप होतो किंवा ज्वालामुखीमुळे जी उथलपुथल होते, ती क्रांती नव्हे. क्रांतीचे अंकगणित नसते. त्याची प्रतीके असतात. ज्यांची बाजारातील तत्त्वांवर किंमत आखता येत नाही, त्याला अनमोल मूल्य असते. वैरवृत्ती म्हणजे वीरवृत्ती नव्हे. कसाई रक्त सांडतो, म्हणूून क्रांतिकारी नसतो. क्रांतिकारी आदर्शवादी असतो. तो ‘लकीरचा फकीर’ नसतो. तो जगण्यासाठी साधने शोधीत नाही, तर का जगावे, यासाठी प्रयोजनाच्या शोधात असतो. यालाच ते ‘युवाशक्ती’ म्हणत. युवकांच्या संस्था व्यक्तिनिष्ठ, संस्थानिष्ठ, ग्रंथनिष्ठ नसाव्यात, तर त्या तत्त्वनिष्ठ असाव्यात, असे ते मानीत. मागच्या पिढीच्या अपूर्ण राहिलेल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवीन पिढी जन्माला येते. यामुळेच जीवन प्रवाही राहते. स्त्रीमुक्तीच्या पुढे जाऊन स्त्री-शक्तीवर त्यांचा भर होता. लोकशाहीच्या युगात लोकनीतीची व नैतिक मूल्यांची झालर लोकशाहीला तिच्याचमुळे लागेल. सर्मपण व प्रांजळपणा ही दोन व्रते सर्वस्पश्री आहेत. लोकशाहीला सभ्यतेची व शालिनतेची जोड मिळाली पाहिजे व हे प्रतिभावान स्त्री व युवकच करू शकतील, अशी त्यांची धारणा होती. तुल्यसत्त्व व समकक्ष स्त्री पुरुषांच्या सहजीवनातून संवादी मानव्याचा व सहनागरिकत्वाचा प्रादुर्भाव होईल, असे त्यांना वाटे. स्त्री-पुरुष एकमेकांचे जननी-जनक आहेत, त्यामुळे प्रत्येक मुलात मातेचे अभिनंदनीय गुण असतील, तर प्रत्येक मुलीत पित्याचे प्रशंसनीय गुण असतील व प्रत्येकजण सुपुत्र व कन्या एक पूर्णांक असेल, ही भावना मनात बाळगून तरुण पिढी जगेल, अशी आशा त्यांना वाटत होती. यातूनच स्त्री केवळ सुरक्षितच नव्हे, तर स्वरक्षित राहून नागरिकत्वाचे सारे अधिकार उपभोगू शकेल, असे ते मानीत. केवळ हक्क, आर्थिक स्वातंत्र्य स्त्रीचे प्रश्न सोडवू शकणार नाहीत. जोवर ‘स्त्री’ उपभोग्य वस्तू मानली जाईल, शरीरच तिचे धन आहे, ही भावना कायम राहील, तोवर स्त्रीमुक्ती व स्त्रीशक्ती असंभव आहे, अशी त्यांची भावना होती.
सामान्य स्त्री व पुरुष तेजस्वी, निर्भय व सार्मथ्यवान असले तरच लोकशाहीचा भक्कम पाया रचता येईल. मतदानाच्या स्वातंत्र्याचा परिपाक जर स्वायत्त व समृद्ध लोकजीवनात झाला नाही, तर कायद्याने दिलेले मताचे स्वातंत्र्य तकलादू व कुचकामाचे ठरेल. आज आपल्या देशातील भाविक व धार्मिक माणसालाही भुरळ पडली आहे. त्यामुळे तो ‘परलोकवादी’ व ‘परोक्षवादी’ झाला आहे. सामान्य नागरिकांच्या राजकीय स्वातंत्र्याची परिणती आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यात व्हावी आणि तीही लोकशाही पद्धतीने व लोकशाहीच्या संदर्भात हा आजचा यक्षप्रश्न आहे. ‘उमेदवारशाही’ म्हणजे ‘लोकशाही’ नव्हे. सत्ताकांक्षा अगर सत्ताधिकारही लोकशाही नव्हे. सत्तेची पदे शेलकी असतील, पण देश व समाजासाठी कामे करणारी माणसे अधिक लागतील.
खर्‍या अर्थाने पदावर नसलेली माणसेच समाज घडवीत असतात. गरिबीचा नायनाट म्हणजे गरीब-श्रीमंत भेदाचा नायनाट. जन्माश्रित उच्च-नीच भेदभावाचा नायनाट. जन्माश्रित प्रतिष्ठेचा म्हणजे जातीसत्तेचा नायनाट. तसेच बहुसंख्येच्या सत्तेचे नाव म्हणजे लोकशाही नव्हे. अल्पसंख्याकांचे स्वातंत्र्य व सुरक्षितता हेच लोकनीतीचे वैशिष्ट्य आहे. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे, या भूलोकात सलोख्याचे, सहजीवनाचे, संविधानाचे वातावरण टिकविण्यास उपयोगी पडणारे राज्य. त्यामुळे नव्या इतिहासाचा कर्ता पुरुष, विधाता हा सामान्य माणूसच असणार आहे. लोकशाही एकमेव तंत्र आहे, जिथे राज्याचे अधिष्ठान सत्ता, संपत्ती, शस्त्र नसून ‘संमती’ असते. ‘व्होट’ त्याचे प्रतीक आहे. आज दुर्दैवाने नागरिकाला ‘व्होट’ आहे. पण ‘मत’ नाही. त्याच्या मताची कदर नाही. तो ‘लोकशाही’चा विषय आहे. विधाते वेगळेच आहेत, हीच दादांची खंत होती; परंतु लोकशाही पद्धतीवर त्यांची गाढ श्रद्धा होती. ‘नेतृत्वा’पेक्षा सामान्य माणसाच्या कर्तृत्वावर त्यांचा अधिक विश्‍वास होता. दादांना वाटे, की शेक्सपीअरने म्हटल्याप्रमाणे, मानवी जीवनात भरतीचे व ओहोटीचे क्षण नेहमीच येत असतात. भरतीच्या क्षणांचा फायदा घेऊन मानवाने प्रयत्न केल्यास तो यशाप्रत व भाग्याप्रत पोहोचू शकतो. ज्या सामान्य नागरिकाने लोकशाहीची शिडी खालून आपल्या सशक्त हाताने पेलली आहे, तोच लोकशाहीचा विधाता आहे. कारण त्याच्या हाताची पकड ढिली झाली, तर वरचा सारा डोलारा कोलमडणार आहे. दादांना असा भारत हवा होता, जिथे कुणी कुणाला लुबाडीत नाही, राबवीत नाही. कुणी कुणाचा नोकर नाही व मालक नाही. जिथे दंडुक्याचे राज्य नाही व दंडुक्याला भिवून वागणारा कुणी नाही. जिथे प्रत्येकजण दुसर्‍याला अडचण होणार नाही व समाजव्यवस्था बिघडणार नाही याची जाणीव ठेवतो, सहकार्याची भावना नांदते व आपुलकी व पारस्परिकता यांच्या आधारावर समाजाची व राष्ट्राची उभारणी होते.
जसं जीवन होतं, तसंच दादांचं मरणही होतं. एक डिसेंबर १९८५ रोजी सेवाग्रामला दादांचा मृत्यू झाला. आप्तपंचायतनातील ज्येष्ठ अशा महात्मा गांधींच्या कर्मभूमीत दादा शेवटपर्यंत शुद्धीवर होते व सर्वांचा निरोप घेऊन व उपस्थितांना नमस्कार करून ते मरणाला शांत चित्ताने सामोरे गेले. १९८५च्या डायरीतील शेवटच्या पानावर दादांच्याच अक्षरात त्यांनी नोंद करून ठेवली होती. ती फार बोलकी आहे. त्यांच्या जीवनाचे व विचारांचे सारे सार त्यात सामावलेले आहे. दादांनी लिहून ठेवले होते-
‘जेथे माझा मृत्यू होईल, तेथेच अगर जवळपास दहनविधी व्हावा. विद्युतदाहिनीची व्यवस्था असेल, तर त्या दाहिनीतच दहन व्हावे. शव खांद्यावर वाहून नेऊ नये. प्रेताची यात्रा नसावी. प्रेताला कुठल्याही विशेष अगर विशिष्ट जागी नेऊ नये. जिथे मरण त्याच्या आसपासच दहन! कुणालाही बाहेरून बोलावू नये. शोकसभाही भरवू नयेत आणि कुठल्याही प्रकारचे स्मारक उभारू नये. ‘स्मारक नसावे’ हा दादांच्या विचारांचा प्राण होता व सर्व क्षेत्रांतील स्वातंत्र्य ही त्यांची आकांक्षा होती.
हे दादा व त्यांच्या सारख्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचे सार्मथ्य आपल्याला नसेल, तर कमीत कमी ही स्वप्ने पायदळी तुडविली जाणार नाहीत. एवढीच आजच्या युवा पिढीकडून त्यांची अपेक्षा असणार. ती पूर्ण करण्याची प्रेरणा व शक्ती भगवंताने त्यांना द्यावी, हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे.
(लेखक मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत.)
 

Web Title: Dada: My tirtha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.