डॅडी मुझसे बोला..
By Admin | Published: October 11, 2015 07:44 PM2015-10-11T19:44:11+5:302015-10-11T19:44:11+5:30
बहुतेक हिंदी चित्रपटांची कथा फुलते, तीच ‘कुटुंबा’च्या संदर्भ चौकटीत! गाण्यांमध्येही त्याचं प्रतिबिंब उमटतंच.
>विश्रम ढोले
बहुतेक हिंदी चित्रपटांची कथा फुलते, तीच ‘कुटुंबा’च्या संदर्भ चौकटीत! गाण्यांमध्येही त्याचं
प्रतिबिंब उमटतंच. पण कुटुंब व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘आई-वडील’ या नात्यालाच आजवरच्या हिंदी गाण्यांनी सर्वाधिक उचलून धरलं.
----------------------
हिं दी चित्रपटांमध्ये प्रणयी प्रेमाच्या खालोखाल जर कोणत्या संकल्पनेला महत्त्वाचे स्थान मिळत असेल तर ते म्हणजे कुटुंब किंवा घराला. अनेकदा तर प्रणयी प्रेमाची गोष्ट उलगडते तीच मुख्यत्वे कौटुंबिक नात्यांतील संघर्षांच्या संदर्भात. अर्थात घर आणि घरवाले तिथे असतातच. त्यामुळे बहुतेक हिंदी चित्रपटांसाठी कुटुंब हीच एक अदृश्य पण भक्कम अशी संदर्भ-चौकट असते. कथा फुलतात त्या याच चौकटीत आणि पात्रं वागतात ती कौटुंबिक अपेक्षांचा आधार घेऊन. आई-वडील, मुलगा-मुलगी, बहीण-भाऊ, आजी-आजोबा, मावशी-काका वगैरे नात्यांमधून ही चौकट साकारत जाते. साहजिकच हिंदी गाण्यांमध्येही त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळते. कौटुंबिक नात्यांवर बेतलेली, त्यातील अपेक्षा आणि ताणतणाव व्यक्त करणारी अनेक गाणी हिंदी चित्रपटांमधून येत असतात. अगदी आजी-नातवंडे, काका-पुतण्या, मामा-भाचे, दीर-वहिनी अशा नात्यांवरही गाणी आहेत. भावा-बहिणींच्या नात्यांवर बरीच गाणी आहेत. नवरा-बायको हे तर प्रणयी प्रेम दाखविण्याचे हक्काचे नाते. त्यामुळे त्यावरही खूप गाणी आहेत. पण कौटुंबिक नात्यांमधील सर्वाधिक गाणी येतात ती आई-वडील या नात्यावर. सा:या कौटुंबिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या या नात्याला हिंदी चित्रपट आणि गाण्यांनीही तसेच स्थान दिले आहे.
स्वाभाविकच अशी गाणी दोन प्रकारची असतात. एक म्हणजे आई-वडिलांच्या भूमिकेतून गायलेली गाणी आणि दुसरे म्हणजे आई-वडिलांना उद्देशून किंवा त्यांचा संदर्भ देणारी गाणी. आई-वडिलांनी, विशेषत: आईने गायलेल्या बहुतेक गाण्यांमधून ममता, वात्सल्य, काळजी हेच बहुधा एकमेव सूत्र असते. अपत्यांविषयी वाटणारे प्रेम, त्यांच्यामुळे जगण्याला आलेली पूर्तता, त्यांच्याविषयीची स्वप्ने वगैरे सारा अपेक्षित भावनांचा त्यात कल्लोळ असतो. ‘तेरे बचपन को जवानी की दुवा देती हूँ और दुवा देके परेशान सी हो जाती हूँ’ (मुङो जिने दो - 1963) सारख्या एखाददुस:या गाण्यामध्ये आपल्या कर्माची फळे आपल्या बाळाला भोगावी लागतील याबद्दलची भीती किंवा अपराधगंड डोकावतो. कधी कधी गरिबीतून येणारी असाह्यताही आईवडिलांची पात्रे व्यक्त करतात. प्रसंगी एखादा मोकळा बाप आपल्या वयात आलेल्या मुलाला ‘सोच समझ के अपने दिल का रास्ता चुनना’ (दिल जो भी कहे - 2005) असा प्रेमळ सल्ला देतो. पण अशी काही उदाहरणो वगळता बाकी अशा गाण्यांमधून ‘वात्सल्यरस’च दुथडी भरून वाहत असतो. बाळाला जोजविताना गायलेली ‘लोरी’गीते हा तर या रसाचा एक मोठा आणि लोकप्रिय आविष्कार.
आई-वडिलांनी गायलेल्या गाण्यांमधून एकीकडे असा ममतेला पूर आलेला असतो, तर दुसरीकडे आई- वडिलांना उद्देशून गायलेल्या गाण्यांमध्ये प्रेम, कृतज्ञता, कर्तव्य वगैरे भावना उचंबळून आलेल्या असतात. आई- वडिलांना - विशेषत: आईला - अगदी देवत्व बहाल केलेले असते. ब:याच गाण्यांमधून अशासारखी भावना व्यक्त होते. दादी माँ (1966) मधील ‘ए माँ तेरी सुरत से अलग भगवान की सुरत क्या होगी’ हे त्यातले अगदी अग्रणी आणि लोकप्रिय गाणो. तीन दशकांनंतर आलेल्या हम साथ साथ है (1999) मध्येही हीच भावना ‘ये तो सच है की भगवान है मगर फिर भी अंजान है धरती पर रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है’ या शब्दांत व्यक्त करण्यात आली आहे. इतकेच कशाला यो यो हनी सिंगचे ‘पार्टी ऑल नाईट’ सारखे ‘फुलटू दारूबाज-पार्टीबाज’ गाणो असलेल्या बॉस (2013) मध्येही ‘पिता से है नाम तेरा पिता पहचान तेरी’ असे एकदम ‘सेन्टी’ गाणो येऊन जाते. ‘ईश्वर अल्ला जितने भी रब है, नूर तेरा तुझ में ही सब है’ अशा शब्दांत हे गाणो पित्याची थोरवी गाते. माँ मुङो अपने आँचल में छुपा ले (छोटा भाई - 1966), मम्मा डियर मम्मा (साजन बिना सुहागन - 1978), मम्मी ऐसी पापा ऐसे मेरे सिवा किस को मिले (हम ना रहे हम - 1984), मेरे डॅडी कितने प्यारे है (प्यार के दो पल - 1986), ओ मदर डियर मदर (मदर - 98), मेरी माँ प्यारी मा मम्मा (दिस्वदानिया - 2008) यांसारख्या अनेक गाण्यांमधून आई-वडिलांबद्दलच्या या प्रेम, विश्वास, अभिमान, कृतज्ञता किंवा देवत्वाच्या भावनेच्या अनेक छटा पाहायला मिळतात. प्रसंगी ‘डॅडीजी मेरी मम्मी को सताना अच्छा नही’ (सगाई - 1951) किंवा ‘ओ डॅडी ये कब हुवा था’ (हम तुम पे मरते है - 1999) यांसारख्या गाण्यांमधून बापाबद्दल प्रेमळ तक्र ार किंवा चिडवाचिडवी पाहायला मिळते. मात्र, आई-वडिलांबद्दलच्या प्रेम आणि विश्वासाच्या मूळ भावनेला धक्का नाही लागत.
पण, हिंदी गाण्यांमध्ये वर्षानुवर्षे खोलवर रु जलेल्या आईवडिलांबद्दलच्या या धारणोला धक्का लावणारी दोन गाणी गेल्या दहा वर्षात येऊन गेली. दोन्हीही खूप गाजली. तारे जमीं पर (2007) मधील ‘तुङो सब पता है ना माँ. मेरी माँ’ हे गाणो त्या दृष्टीने खूप वेगळे आहे. एरवी आपण आईवर विसंबून आहोत ही मुलाची भावना गाण्यांमधून यापूर्वीही व्यक्त झालेली आहे. पण ‘तुङो सब पता है ना माँ’ सारखी अविश्वासाची, साशंकतेची किनार त्याला नाही. स्वत:संबंधी आणि नात्यासंबंधी खोलवरच्या व्यथेतून आलेल्या भीतीचे असे अस्तर याआधी गाण्यात कधी ऐकायला मिळाले नव्हते. आपल्या मुलाचा जन्मजात डिसलेक्सिया लक्षात न आल्याने त्याच्यावर सतत चिडणा:या, त्याच्या क्षमतावर सतत शंका घेणा:या आई-वडिलांकडे मुलाने केलेली ती व्यथित विनंती आहे.
भीड में न यु छोडो मुङो,
घर लौट के आ ना पाऊँ माँ
भेजना इतना दूर मुझ को तू
याद भी न तुझ को आ ना पाऊँ मॉँ
क्या इतना बुरा हुँ मै माँ
या ओळींमधून त्या लहानग्याची खोलवरची भीती आणि व्यथा व्यक्त होते. आईची ममता त्याला हवी आहे. पण ती मिळेल की नाही हा एक सुप्त अविश्वासही त्यातून डोकावतो. आईने आपल्याला समजून घ्यावे, बाबा जेव्हा घाबरवतात तेव्हा आईने येऊन धीर द्यावा, पोटाशी घ्यावे अशी त्याची अपेक्षा आहे. पण ती पूर्ण होत नसल्यामुळे येणारी असहायताच ‘तारे जमीं पर’ मधला इशान व्यक्त करीत आहे. आईच्या नात्याच्या संदर्भात भीती, अविश्वास, असहायता या भावना एरवी कोणाच्या वाटय़ाला येऊही शकतात. या भावनांचे वास्तव प्रत्यक्ष जगण्यामध्ये अनुभवायला येऊही शकते. पण हिंदी चित्रपटांनी आजवर ते कधी व्यक्त केले नव्हते. उलट कितीही अँग्री किंवा बदमाश असलेला हिंदी चित्रपटातला नायक आईच्या बाबतीत नेहमीच हळवा राहिला आहे. हळवेपणा तर याही गाण्यात आहेच. पण त्याला जोडून आलेली भीती किंवा असहायतेची अशी अभिव्यक्ती हिंदी गाण्यांसाठी खूप वेगळी आहे. प्रेमाच्या, हळवेपणाच्या आवरणात आला असला तरी हा धक्काच आहे.
‘तारे जमीं पर’ मधील गाण्याने हिंदीतल्या आईविषयक अशा पक्क्या मिथकाला दिलेला धक्का असा हळवेपणाच्या अवगुंठनात असला तरी देहली बेली (2011) मधल्या ‘डॅडी मुझसे बोला ने’ दिलेला धक्का अगदी थेट आहे. इथल्या मुलांना आपल्या बापाची आपल्याविषयी काय मते आहेत याची अगदी स्वच्छ कल्पना आहे. ‘डॅडी मुझसे बोला तू गलती है मेरी, तुझपे जिंदगानी गिल्टी है मेरी’ अशा थेट शब्दांत ते कोणताही विषाद न बाळगता ती व्यक्तही करतात. तसे हे गाणो काही बापाच्या नात्यावर नाही. इथे बापाचा उल्लेखही अनुषंगिक आहे आणि नातेही. स्वत:च्या जगण्यातील विस्कळीतपणा, स्व-केंद्रितपणा, उपभोग आणि गोंधळ असह्य झाल्याने वास्तवापासून दूर पळण्यासाठी केलेली ही आरडाओरड आहे. अर्थातून आणि सुरातूनही. अशा पद्धतीने जगणा:या मुलाला बापाने तू साबणासारखा सुंदर किंवा उपयुक्त नाही तर फेसासारखा बढाईखोर आणि निरु पयोगी आहे असे म्हणून बेदखल केलेले आहे. एका उन्मादी सुरात पण कसलीही खंत न बाळगता ‘देली बेली’ मधले ताशी, नितीन आणि अरूप बापाच्या या मताची गाण्यामध्ये फक्त ‘दखल’ घेतात. ही भावना, हा थंडपणा, डीकेबोस सारखी क्लृप्तीबाज शिवी पेरणारी शब्दरचना, संगीत अशा सा:याच पातळ्यांवर म्हणूनच हे गाणो खूप वेगळे ठरते. नवे वळण देणारे ठरते. ज्या आमीर खानने या चित्रपटाची निर्मिती केली आहे त्याच्याच कयामत से कयामत तक (1988) या चित्रपटात ‘पापा कहते है बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा’ असे गाणो होते. पण वीसेक वर्षांमध्येच आपल्याविषयी आपल्या वडिलांना काय वाटत असेल या भावनेबाबत असा 180 डिग्रीमधला फरक आलाय. ‘मुलगा पार वाया गेला आहे’ असे बापाला वाटणो आणि त्याबाबत मुलाने बेफिकीर असणो हे काही आताच घडते आहे, असे नाही. ‘पापा कहते है’च्या वेळीही ते वास्तव होतेच. पण जगण्यात असलेल्या वास्तवापैकी कशाची जाहीर अभिव्यक्ती कशा पद्धतीने होऊ द्यायची याविषयीचे संकेत किती बदलले आहेत याचे हे गाणो (आणि हा चित्रपटही) एक लक्षणीय उदाहरण आहे. हे असे संकेत बदलत जाणो हा एक मोठा सामाजिक बदल असतो. हिंदी गाण्यांनी तो सातत्याने टिपला आणि व्यक्त केला आहे. आई-वडिलांसंबंधीच्या घट्ट मिथकाला असे धक्के देणारी ‘तुझको पता है ना माँ’ आणि ‘डॅडी मुझसे बोला’ सारखी गाणी म्हणूनच एकाचवेळी लक्षणीयही ठरतात आणि बदलत्या परिस्थितीचा एक आरसाही.
(लेखक माध्यम, तंत्नज्ञान आणि संस्कृती
या विषयाचे अभ्यासक आहेत.)
vishramdhole@gmail.com