दाकिरी : खाद्यसंस्कृतीतून उलगडत जाणारा क्यूबा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 04:32 PM2018-01-06T16:32:58+5:302018-01-07T07:29:22+5:30
काही तरी हटके अनुभव हवा होता म्हणून मी क्यूबाला जायचं ठरवलं. क्यूबानंही मला निराश केलं नाही.
- अनघा दातार
काही तरी हटके अनुभव हवा होता म्हणून मी क्यूबाला जायचं ठरवलं. क्यूबानंही मला निराश केलं नाही. आजवर अनेक देशांत मी भटकंती केली. अर्थातच प्रत्येक देशाचा अनुभव वेगळा होता. पण त्यातही क्यूबाने सारेच आडाखे चुकवले. एकाच वेळी अनेक रूपं त्यात बघायला मिळतात. कडक शिस्तीचा, तरीही प्रेमळ, बंदिस्त असलेला, तरीही एक प्रकारचं सांस्कृतिक मूल्यं जपणारा असा हा देश.
क्यूबा हा तसा गरीब देश. इथले सगळे उद्योगधंदे सरकारच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सगळ्यांना पगारही सारखाच. सरासरी मासिक उत्पन्न ३० ते ३५ डॉलर! इथे इंटरनेटही लिमिटेड आहे. सगळ्यांना त्याचा अॅक्सेस नाही. त्याऐवजी काही सार्वजनिक ठिकाणी वायफाय झोन्स आहेत. तिथूनच साºयांनी एकमेकांशी कनेक्ट व्हायचं.
कोणाला स्वत:चा एखादा उद्योगधंदा करायचा असेल तर त्यासाठी सरकारची परवानगी लागते. सरकारनं काही मोजकीच क्षेत्रं खुली केली आहेत, त्याच क्षेत्रात तुम्ही व्यवसाय करू शकता; परंतु याबाबतचं धोरण आता सरकार हळूहळू शिथिल करतंय. क्यूबाची खाद्यसंस्कृतीही आपल्याला बरंच काही सांगून जाते. त्यातूनही हा देश आपल्याला कळत जातो; पण त्यासाठीचे आपले पूर्वापार ग्रह मात्र थोडा वेळा बाजूला ठेवावे लागतील. क्यूबा जर खरंच अनुभवायचा असेल तर कुठल्याही मोठ्या हॉटेलपासून थोडं दूरच राहावं. त्याऐवजी एखाद्या कासा पर्टिक्युलरमध्ये रहावे. थोडक्यात ब्रेड अॅण्ड ब्रेकफास्टसारखाच हा प्रकार. क्यूबन लोक आपल्या घरातील काही खोल्या टुरिस्टना भाड्याने देतात. फारच सुंदर अनुभव असतो तो. मीपण माझ्या सगळ्या टुरमध्ये अशाच घरात राहिले. सगळेच होस्ट अतिशय छान होते. खूप प्रेमाने रोज सकाळी आम्हाला मस्त क्यूबन ब्रेकफास्ट करून द्यायचे. ब्रेकफास्टमध्ये रोज फ्रेश फळांचा काप केलेली डिश, फ्रेश फळांचा ज्युस, क्यूबन कॉफी, ब्रेड, घरी बनवलेला एखाद्या फळाचा जॅम, अंडी असा मोठा ब्रेकफास्ट असायचा. मी त्याचा भरपूर आस्वाद घेतला. सध्या क्यूबात बºयाच शहरात आणि गावांमध्ये आॅरगॅनिक फार्म्स आहेत. हे मुख्यत्वे टुरिस्टसाठी असते. बºयाच टुर्समध्ये अशा एखाद्या आॅरगॅनिक क्यूबन फार्ममध्ये टुरिस्टना जेवायला नेतात. १०-१२ सीयूसी किंवा १०-१२ युरोमध्ये खुप मस्त भाज्या, सलाड्स, डेझर्ट्स असा मस्त मेनू असतो. क्यूबन कॉकटेल्सबद्दल सांगितल्याशिवाय क्यूबन खाद्यसंस्कृती पूर्ण होणार नाही. जास्त करून रम बेस्ड कॉकटेल्स् हे क्यूबाचं वैशिष्ट आहे. दाकिरी, मोखितो, पीनाकोलाडा अशी फेमस कॉकटेल्स क्यूबात मिळतात. हवानातील अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक फिश रेस्टॉरण्ट आणि बार म्हणजे एल फ्लोरीदीटा. प्रसिद्ध अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे हा या बारमध्ये नेहमी यायचा. दाकिरी हे या बारमधील प्रसिद्ध कॉकटेल आहे. सर्व टुरिस्ट एकदा तरी या बारमध्ये विविध प्रकारच्या दाकिरी टेस्ट करायला येतातच. हवानातील अजून एक प्रसिद्ध बार म्हणजे ला बोडेगीता देल मेडिओ. इथले प्रसिद्ध कॉकटेल म्हणजे मोखितो. या बारच्या म्हणण्यानुसार हे मोखितोचे जन्मस्थान आहे. पण याबद्दल लोकांचं एकमत नाही. मात्र टुरिस्टसाठी हे एक नक्कीच आकर्षण आहे. ५ सीयूसी किंवा साधारण ५ युरोला मोखितो इथे मिळते. प्रसिद्ध लेखक, कलावंत, सेलिब्रेटीज हे या बारमधले रेग्युलर कस्टमर होते. विन्यालेसमधील एका टोबॅको फार्ममध्ये एक छोटा बार आहे. तिथे एक वेगळीच गंमत अनुभवायला मिळाली. तिकडे प्रथम सर्वांना एक नॉन अल्कोहोलिक कॉकटेल देतात आणि त्याबरोबर एक रमची बाटली! प्रत्येक जण स्वत:ला आवडेल तितकी रम त्यात ओतून आपल्या चवीचे स्ट्राँग किंवा कमी स्ट्राँग कॉकटेल बनवून घेतात. आम्हाला सर्वांना ही आयडिया फारच आवडली.
तसंच त्रिनिदादमध्ये गेलात तर तिथले फेमस कॉकटेल कंचनचरा प्यायला विसरू नका. हे कॉकटेल त्रिनिदादचे वैशिष्ट्य आहे आणि क्यूबात इतर ठिकाणी फारसे मिळत नाही. पारंपरिक पद्धतीनं हे कॉकटेल मातीच्या एका छोट्या भांड्यात दिले जाते. पण बार किंवा क्लब्समध्ये काचेच्या/ प्लॅस्टिकच्या ग्लासात दिले जाते.
आणखी एक गोष्ट क्यूबात मला प्रकर्षानं जाणवली. क्यूबात कुठेही मला टेकअवे आॅप्शन मिळाला नाही. कॉफी टू गो, फूड टू गो नाही, तसेच बर्गर किंग, मॅकडीसारख्या अमेरिकन फूड चेनपण नाही! कोकाकोला वगैरेसारखी पेयं तिथे दिसली नाहीत; पण त्यासारखे लोकल ड्रिंक मिळते आणि माझ्या मते ते इतर ब्रॅँडेड शीतपेयांपेक्षा जास्त चांगले लागते. विक्रीसंदर्भात अनेक बंधनं असली तरी कुठेतरी कोकाकोला लपूनछपून मिळतोच.
मी स्वत: बीअर फॅन नाही, पण क्यूबातील बुकानेरो आणि क्रिस्टाल या दोन बीअर मात्र मला आवडल्या. क्यूबात कॉकटेलप्रमाणे अतिशय उत्तम प्रतीच्या ड्रॉट बीअरपण मिळतात. एखाद्या संध्याकाळी मध्यवर्ती चौकातील एखाद्या बारमध्ये बसून क्यूबन रम किंवा कॉकटेल, सीगार आणि लाइव्ह म्युझिक याचा आस्वाद घेत एक मस्त संध्याकाळ घालवणे म्हणजे इथल्या लोकांसाठी आणि पर्यटकांसाठीही आनंदाची पर्वणीच असते.
(लेखिका संगणक अभियंता आणि जर्मनीत हायडलबर्ग येथे वास्तव्याला आहेत. anagha.datar@gmail.com)