अभयारण्ये धोक्यात
By admin | Published: November 22, 2014 06:11 PM2014-11-22T18:11:09+5:302014-11-22T18:11:09+5:30
जैवविविधतेच्या समृद्धतेच्या दृष्टीने भारत अत्यंत समृद्ध; परंतु ही जैवविविधता आणि पक्ष्यांचे अधिवास जपण्याबाबतच्या आपल्या सजगतेबाबतचे काय? त्या बाबतीतील अक्षम्य हेळसांड आणि दुर्लक्ष अधोरेखित करणारे सर्वेक्षण बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने नुकतेच जाहीर केले आहे. या वस्तुस्थितीनंतर आता तरी आपले डोळे उघडतील का?
Next
डॉ. राजू कसंबे
जगभरात आजमितीस ९,000 पक्षिप्रजातींची नोंद करण्यात आली असून, भारतात त्यांपैकी किमान १,३00 प्रजाती आढळतात. संपूर्ण जैवविविधतेच्या संवर्धनाच्या दृष्टीने भारताचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.
निसर्ग संवर्धन आणि संशोधनाच्या क्षेत्रात कार्य करणारी भारतातील अग्रगण्य संस्था बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बी.एन.एच.एस.) विशेषत: भारतात आढळणार्या पक्ष्यांच्या अधिवासांबाबत महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. जागतिक स्तरावर पक्ष्यांसाठी कार्य करणार्या बर्डलाइफ इंटरनॅशनल या संस्थेच्या सहयोगाने बी.एन.एच.एस.ने २00४मध्ये भारतातील पक्ष्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे ४६६ अधिवास शोधून काढले. बर्डलाइफ इंटरनॅशनल आणि त्यांच्या सहयोगी संस्थांनी जागतिक स्तरावर असे १२,000 पक्षी अधिवास नोंदविले आहेत.
बी.एन.एच.एस.ने घोषित केलेली भारतातील अर्धीअधिक महत्त्वपूर्ण पक्षिक्षेत्रे ही दुर्दैवाने शासनाच्या कुठल्याही संरक्षणाच्या कवचाखाली अंतभरूत नाहीत. उरलेली अर्धी अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यान वा इतर संरक्षित अधिवासात अंतभरूत आहेत. पण, ती अधिकृतरीत्या संरक्षित आहेत, याचा अर्थ सर्व काही आलबेल आहे, असा निश्चितच होत नाही. त्यांपैकी १0 अधिवास तर नजीकच्या भविष्यात नष्ट होतील, अशी परिस्थिती आहे. या दहांमध्ये कच्छ (गुजरात)मधील लाखो रोहित पक्ष्यांचे घर फ्लेमिंगो सिटी, महाराष्ट्रातील माळढोक अभयारण्य, मुंबईची माहूल-शिवडीची खाडी, मध्य प्रदेशातील सैलाना खरमोर अभयारण्य, दिहैला झील व सरदारपूर खरमोर अभयारण्य, कर्नाटकातील राणी बेन्नूर काळवीट अभयारण्य, हरियाणातील बसाई तलाव आणि तिलंगचोंग बेट (अंदमान व निकोबार बेटे) या महत्त्वपूर्ण पक्षिक्षेत्रांचा समावेश आहे.
दर वर्षी प्रसारित होणार्या भारतातील (तसेच पृथ्वीतलावरील) संकटग्रस्त पक्ष्यांची यादी हळूहळू वाढतच चालली आहे. भारतात आढळणार्या १,३00 पक्षिप्रजातींपैकी १७१ (१३ टक्के) प्रजाती या यादीत जाऊन बसल्या आहेत. निकटच्या भविष्यात ही यादी कमी होईल, असे काही वाटत नाही. इतर वन्यजीवांच्या संवर्धनाची परिस्थितीसुद्धा फार काही आशाजनक नाही.
माळढोक : माळरानावारचा सर्वांत राजबिंडा पक्षी असलेला माळढोक (ग्रेट इंडिअन बस्टर्ड) आता केवळ भारत आणि पाकिस्तानात स्वत:चे अस्तित्व टिकवून आहे. एके काळी पश्चिम भारतातील बहुतेक राज्यांतून प्रसार पावलेला माळढोक आज केवळ राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या चार राज्यांत तग धरून आहे. असे मानले जाते, की आता २00पेक्षा कमी माळढोक शिल्लक राहिले असावेत. इ. स. २00६मध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळढोक अभयारण्यात २७ माळढोक होते. तिथे आज केवळ ३ माळढोक दिसत असून, अनेक वर्षांपासून त्यांचे प्रजनन झालेले नाही. आता ही संख्या वाढण्याची आशा मावळत चालली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा परिसरात थोडे माळढोक शेतांमध्ये तग धरून आहेत. इथे त्यांना कुठल्याही अभयारण्याचे संरक्षण नाही. कर्नाटकातील राणी बेन्नूर माळढोक अभयारण्यातून माळढोक कधीचाच लुप्त झालाय. मध्य प्रदेशातील करेरा अभयारण्य तर माळढोक पक्षी आता येथे दिसत नाहीत, या सबबीखाली ‘डीनोटीफाय’ करण्यात यावे म्हणून पावले उचलली जात आहेत. असे झाल्यास माळढोकांच्या जिवावर उठलेल्या लोकांना आणखीनच चेव येईल.
तणमोर (लेसर फ्लोरीकन) : हा सुंदर पक्षी असून आज त्याची संख्या झपाट्याने घटत चालली आहे. पूर्वी फार विस्तृत प्रदेशात आढळणारा तणमोर आता मोजक्याच ठिकाणी फार कमी संख्येत आढळून येतो. महाराष्ट्रात याच्या फार कमी नोंदी असून, त्याची मुख्य संख्या मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थानात आढळते. विदभार्तील अकोला-वाशीम-यवतमाळ परिसरात याची थोडीफार संख्या असल्याचे आढळले आहे. माळरानांवर शेतीसाठी होत असलेले अतिक्रमण त्याचा अधिवास हिरावून घेत आहे. अनेकदा तर वन विभागच गवताळ माळरानांवर झाडे लावून वनीकरण करतो, असे आढळून आले आहे!
उदाहरण म्हणून मध्य प्रदेशातील सैलाना खरमोर (तणमोर) अभयारण्याची गोष्ट बघू. १९८३मध्ये केवळ तणमोरांचे संवर्धन करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले हे अभयारण्य आज अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. शेतीचा विस्तार, गुरांची अनियंत्रित चराई आणि मानवी हस्तक्षेपामुळे मागील वर्षी येथे केवळ १२ तणमोर दिसले. या परिसरात सोयाबीनचे पीक घेतले जाते आणि त्यावर कीटकनाशकांचा प्रयोग केला जातो. विषारी औषधांनी मेलेल्या कीटकांना खाऊन त्याचा तणमोरांवर परिणाम होत असावा, असे मानले जात आहे. मध्य प्रदेशातील सरदारपूर खरमोर अभयारण्यसुद्धा असेच आणखी एक उदाहरण. थोर पक्षितज्ज्ञ डॉ. सालीम अलींच्या प्रयत्नांनी घोषित करण्यात आलेल्या या अभयारण्यात मागील वर्षी एकसुद्धा तणमोर दिसला नाही.
रानपिंगळा (फॉरेस्ट आऊलेट) : केवळ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात आढळणारा हा दिवाचर (दिवसा वावरणारा) छोटा घुबड नष्ट झाला, म्हणून आपण एक शतक त्याच्याकडे दुर्लक्ष केले. गेल्या एक शतकात त्याचा अधिवास असलेली ओडिशा-छत्तीसगढ राज्यातील जंगले दिसेनासी झाली. तिथे जंगले होती, याचा मागमूससुद्धा आता मिळत नाही. केवळ मध्य भारतातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये आढळणार्या या दुर्मिळ घुबडाला पुन्हा अंधारात ढकलून त्याचे संवर्धन साधता येणार नाही, हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. त्याचा पुनशरेध लागल्यानंतर ज्या ठिकाणी त्याच्या नोंदी घेण्यात आल्या होत्या, त्यांपैकी जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्याच्या फार मोठय़ा भागावर अतिक्रमण झाले असून, त्या ठिकाणी रानपिंगळा लुप्त झाल्यातच जमा आहे. या ठिकाणी मध्य प्रदेशातून आलेल्या लोकांनी अतिक्रमणे करून अभयारण्याचा फार मोठा भाग साफ करून शेती करायला सुरुवात केली आहे.
रानपिंगळ्यांची एकूण जागतिक संख्या २00पेक्षा कमी असून, केवळ मेळघाटात तो सुरक्षित आहे, असे मानले जाते.
माहूल-शिवडीची खाडी : मुंबई महानगराच्या शहरी भागात असलेली ही खाडी नोव्हेंबरपासून मे महिन्यापयर्ंत हजारो रोहित पक्ष्यांचे घर बनून जाते. पावसाळ्यात रुक्ष वाटणारी खाडी हिवाळा-उन्हाळ्यात गुलाबी छटा धारण करते. रोहित पक्ष्यांसोबातच हजारो चिखलपायटे पक्षी इथे हिवाळा व्यतीत करण्यासाठी पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातून मुक्कामी येतात.
महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा २२ किलोमीटर लांबीचा प्रस्तावित पूल शिवडीच्या दलदलीतून निघून नवी मुंबईला न्हावा शेवापयर्ंत जाणार आहे; पण त्यामुळे शिवडीच्या दलदलीचा फार मोठा भाग नष्ट होईल. या पुलाला सरसकट विरोध न करता बी.एन.एच.एस.ने हा पूल ६00 मीटर दक्षिणेला सरकवावा, अशी रास्त मागणी केली आणि तसा प्रस्ताव संबंधित मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला दिला. दुर्दैवाने बी.एन.एच.एस.द्वारे केली गेलेली मागणी संबंधित प्राधिकरणाने अजून तरी स्वीकारलेली नाही. विकासाच्या नावाखाली जवळपास ५0 हजार पक्ष्यांचा अधिवास नष्ट करणे जरुरी आहे का?
भारतातील महत्त्वाच्या पक्षी अधिवासांना मुख्यत्वे शेतीसाठी होत असलेली अतिक्रमणे, नैसर्गिक उपजांचा अशाश्वत उपसा (शिकार, मासेमारी), खाणींसाठी (खनिजे, कोळसा, तेल, मुरूम इ.) जंगलतोड, अनियंत्रित गुरचराई, बेकायदेशीर वृक्षतोड, वनहक्क कायद्याच्या नावाखाली होणारी जंगलतोड अशा एक ना अनेक समस्या आहेत. वेगाने होत असलेले शहरीकरण, नवीन घरांसाठी बुजवले जात असलेले तलाव, खाड्या, औद्योगिकीकरण आणि त्यामुळे वेगाने वाढत असलेले प्रदूषण, वाढती लोकसंख्या व त्यांच्या गरजा भागविण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीवर पडत असलेला एकंदरीत दबाव अनेक प्रकारच्या अधिवासांना प्रचंड हानी पोहोचवीत आहे. आपल्याला आपली पक्षी-संपदा, वन्य संपदा वाचविण्यासाठी आणखी खूप संघर्ष करायचा आहे.
(लेखक बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्र कार्यक्रमाचे प्रकल्पप्रमुख आहेत.)