समुद्रातील जीवघेणा करंट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 12:53 PM2023-01-29T12:53:38+5:302023-01-29T12:55:02+5:30
समुद्र किनारी फिरण्यास सर्वांना आवडते. किनाऱ्यावर क्षणाक्षणाला उसळणाऱ्या लाटा, पाण्यावर उमटणारे तरंग... भरती- ओहोटी बघून आपण विस्मित होऊन जातो; पण समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेल्यावर अनेक धोके संभवतात.
- डॉ. बाळासाहेब कुलकर्णी,
(संचालक (निवृत्त), इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स)
समुद्र किनारी फिरण्यास सर्वांना आवडते. किनाऱ्यावर क्षणाक्षणाला उसळणाऱ्या लाटा, पाण्यावर उमटणारे तरंग... भरती- ओहोटी बघून आपण विस्मित होऊन जातो; पण समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेल्यावर अनेक धोके संभवतात. समुद्र किनाऱ्यालगतच्या पाण्यात ओहोटीच्या वेळी गेल्यास कित्येकांना भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात अडकून पडतात, तर कोणी बुडतात. याशिवाय पावसाळ्यात किनाऱ्यालगत येणाऱ्या मोठमोठ्या लाटांबरोबर लोक समुद्रात वाहून जाण्याच्या घटना घडतात. गणपतीपुळेसारख्या समुद्रकिनारी पर्यटक उत्साहाने पोहण्यासाठी उतरतात; पण पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातात.
किनाऱ्यावरून समुद्रात लांबवर बघितल्यास समुद्र वरवर शांत, संथ दिसतो; पण समुद्राचे पाणी अस्थिर असून, ते सारखे फिरतच राहते. त्यामुळेच बोट किनाऱ्याला लावल्यावर बळकट दोरखंडाने बांधून म्हणजे नांगरून ठेवावी लागते, नाहीतर बोट समुद्रातील प्रवाहाबरोबर समुद्रात आत जाईल. समुद्राच्या पृष्ठभागालगत आणि आत खोलवर पाण्याचे प्रवाह फिरत असतात. असे अनेक प्रवाह ज्यांना समुद्रातील नद्या म्हणतात, एक प्रकारे समुद्राला उपकारक असतात. या प्रवाहामुळे तापमान संतुलित राहण्यास मदत होते.
मुंबईतील बँडस्टँडवरून बेपत्ता झालेल्या स्वदिच्छा सानेची हत्या केल्याची कबुली जीवरक्षक मिथ्थू सिंह याने दिली. समुद्राच्या करंटची माहिती असलेल्या मिथ्थूने मृतदेह परत किनाऱ्यावर येणार नाही, अशा पद्धतीने समुद्रात फेकून दिला. तरन्नूम अन्सारी ही विद्यार्थिनी २०१६ मध्ये बँडस्टँडवर फिरताना समुद्रात पडली आणि पाण्याच्या विचित्र करंटमुळे आत ओढली गेली. तिचाही मृतदेह अजून सापडलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर समुद्रातील जीवघेणा करंट म्हणजे काय? या करंटच्या परिसरात दरवर्षी जगभरात हजारो माणसे बुडतात. ती जातात कुठे? अशा गूढ प्रश्नांची केलेली ही उकल.
समुद्रातील करंटमध्ये अडकून मृत्यू
महासागरात असलेल्या अनेक प्रवाहांपैकी किनाऱ्यालगतच्या पाण्यात लाटा आपटून तयार होणारे ‘रिप प्रवाह’ (करंट) खूप धोकादायक असतात. जगभरात समुद्रकिनारी अशा करंटमध्ये अडकून जीव गमावल्याच्या घटना नेहमी घडतात.
करंट माणसाला खाली ओढतो का?
लोक समुद्रात घाबरून खाली जाऊ लागतात आणि त्यांना वाटते की, प्रवाह त्यांना खाली खेचत आहे; परंतु कोणताही प्रवाह समुद्रात खाली खेचत नाही.
समुद्रात किनाऱ्यालगत फुटणाऱ्या लाटांमुळे तयार होणारे धोकादायक करंट सहजासहजी ओळखता येत नसल्याने पर्यटक त्यात अडकून समुद्रात ओढले जातात.
...तेव्हा अधिक धोकादायक
ओहोटीच्या वेळी जेव्हा किनाऱ्यालगतचे पाणी आत समुद्रात ओढले जाते, तेव्हा करंट सर्वांत जास्त धोकादायक ठरतात. पूर्वी, करंटला कधीकधी रिप भरती म्हटले जायचे. जे चूक होते, असे वैज्ञानिक म्हणतात. करंटची गती आणि शक्तीमुळे दरवर्षी अमेरिकेत समुद्रकिनारी १०० पेक्षा जास्त लोक समुद्रात बेपत्ता होतात.
१०० वर्षांपासून करंटचा अभ्यास
शास्त्रज्ञ १०० वर्षांहून अधिक काळ समुद्रातील करंटचा अभ्यास करीत असून, गेल्या दशकात, मापन तंत्रातील प्रगतीने हे प्रवाह कसे कार्य करतात, याबद्दल अनेक प्रकारची नवीन माहिती मिळाली आहे.
कसा ओळखतात?
करंट म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरून मोकळ्या समुद्रात वाहणारा पाण्याचा जोरदार प्रवाह.