जट्रोफाची पुराणकथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 07:20 AM2018-09-16T07:20:00+5:302018-09-16T07:20:00+5:30
जट्रोफाचे तेल पर्यायी इंधन म्हणून वापरता येते, वापरले जाते आहे; पण पीक म्हणून शेतकर्यांना सध्या तरी ते फायद्याचे नाही. जट्रोफाला निश्चित मागणी आणि उत्पादन खर्चापेक्षा अधिक भाव मिळेल, अशी व्यवस्था अजून तरी नाही.
-विनायक पाटील
जट्रोफाची खासगी शेतात पीक म्हणून लागवड झाली ती 1986 साली. 1992 ते 1995 या काळात या लागवडींनी टप्पा गाठला अकरा हजार एकरांचा. अँग्रो फॉरेस्ट्री फेडरेशन या सहकारी संस्थेने प्रक्रिया केलेल्या बियाणांची अधिकृत विक्री अकरा हजारापेक्षा अधिक आहे. शेतातील प्रत्यक्ष अनुभवानंतर मात्र लागवडी कमी कमी होत गेल्या. संस्थाही शेतकर्यांना लागवडी थांबवा, असा सल्ला देऊ लागली. शेवटची दोन एकर लागवड ओझर (मिग) येथील शेतकरी प्रवीण जयवंतराव गायकवाड यांच्या शेतावर झाली. त्यांच्या लागवडीच्या उत्पन्नाचे आकडे आणि इतर नोंदी घेतल्या आणि जट्रोफा तोडून टाकला. (निरीक्षणासाठी आणि निष्कर्षाप्रत येण्यासाठी आणखी काही वर्षे जट्रोफा ठेवायचा असल्यास माझी तयारी आहे, असे प्रवीण गायकवाड यांनी सुचविले होते.) म्हणजे शून्य ते अडीच एकर आणि अडीच एकर ते दहा हजार एकरांपेक्षा जास्त आणि पुन्हा शून्य असा जट्रोफा शेतीचा प्रवास झाला. हा प्रवास आहे एकूण सतरा वर्षांचा. हजारो एकरांवर आणि काही हजार शेतक-याच्या आणि संशोधन संस्थांच्या प्रत्यक्षदर्शी अनुभवावरून संस्थेने काही निरीक्षणे नोंदविली आहेत ती खालीलप्रमाणे -
जट्रोफा तेलापासून डिझल निर्माण होऊ शकते हा शोध नवीन नाही. 1900 साली म्हणजे 118
वर्षांपूर्वी डिझल (हे आडनाव आहे) नावाच्या शास्त्रज्ञाने कोणत्याही वनस्पतीजन्य तेलातून स्ट्रॅण्डर्ड (त्या त्या काळात वापरात असलेले) डिझल तयार करता येते असे सिद्ध केले आहे. कोणत्याही वनस्पतीजन्य तेलामध्ये जट्रोफाही आले.
गृहीत आणि तफावत -
1) गृहीत -
झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर दरवर्षी दर एकरी चार ते पाच हजार किलो बी (सुकवलेले) मिळते.
अनुभव : कोणत्याही शेतात आणि शेतकर्याला पूर्ण वाढ झाल्यानंतर एकरी चारशे ते पाचशे किलोपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले नाही.
2) गृहीत -
* लागवडीतील अंतर 6 फूट बाय 6 फूट ठेवावे.
* छाटणीची गरज नाही.
* उत्पन्न दुस-या वर्षीपासून सुरू होते आणि झाडाची पूर्ण वाढ पाचव्या वर्षी होते.
अनुभव :
* जट्रोफा हे प्रखर सूर्यप्रकाशाची गरज असणारे झाड आहे त्यामुळे जिरायतातसुद्धा कमीत कमी 9 फूट बाय 9 फूट अंतर ठेवावे लागते.
* जट्रोफाला छाटणीची आवश्यकता असते. छाटणी केल्यास चौथ्या वर्षीपासून उत्पन्न सुरू होते. झाडाची पूर्ण वाढ सात वर्षांनी होऊन उत्पन्न स्थिरावते.
3) गृहीत -
बागायत जमिनीत नियमित पाणी देऊन आणि खते घालून आपण उत्पन्न वाढवू शकतो.
अनुभव -
कितीही उत्तम जमिनीत लागवड केली आणि
नियमित खते, पाणी दिले तरीही जट्रोफाची व्हेजिटेटीव्ह ग्रोथ होते. उत्पन्न वाढत नाही. (उत्पन्नवाढीला त्या वनस्पतीच्या अंगभूत र्मयादा आहेत. चांगली जमीन आणि पाणी असेल तर जट्रोफाच्या कैक पटीत उत्पन्न देणारी इतर अनेक पिके आहेत. जिरायत जमिनीतसुद्धा आपल्या पारंपरिक पिकापेक्षा अधिक आर्थिक मिळकत असेल तरच लागवड करावी. अजून तशी अवस्था नाही.)
4) गृहीत -
अखाद्य तेलाचा तुटवडा असल्याने प्रचंड मागणी आहे.
अनुभव -
उत्पादन खर्चापेक्षा अधिक भावाने खरेदी भाव मिळत नाही. किंबहुना असा भाव देणारी निश्चित मागणी असलेली व्यवस्थाच नाही.
सल्ला -
विमानासाठी इतर पर्यायी इंधन आहे. उपग्रह सोडतानासुद्धा ते वापरले जाते. याच्या वापराने हवेतील प्रदूषण कमी होते, अशा बातम्या आपण वाचतो.
जट्रोफाच्या वापराच्या (एंड यूज) उदात्तीकरणाला हुरळून जाऊ नका. वापराच्या कारणापेक्षा आपल्याला मिळणारा नफा-तोटा महत्त्वाचा आहे. जोपर्यंत शेतक-याना त्यांच्या पारंपरिक पिकांपेक्षा अधिक पैसा मिळत नाही तोपर्यंत जट्रोफाच्या लागवडी न करणे हेच जास्त श्रेयस्कर आहे.
जट्रोफाच का?
1) खाद्य तेलांचा अनेक देशात तुटवडा आहे. म्हणून अखाद्य तेलापासून इंधन बनवावे हा हेतू.
2) जट्रोफाची पाने जनावरे खात नाहीत आणि त्याचे बी पक्षीदेखील खात नाहीत. त्यामुळे कुंपणाची गरज नाही आणि पक्षांपासून राखण्याचे काम नाही.
3) प्रतिकूल परिस्थितीतही जट्रोफा टिकाव धरून रहातो. इतर पिके येत नाहीत अशा जमिनीतही जट्रोफाचे पीक येते. अशा लक्षावधी हेक्टर जमिनी भारतात आहेत म्हणून भारत सरकारने या लागवडीत रस दाखवला होता. तसेच भूगर्भातील नैसर्गिक तेलसाठे संपणार आहेत, त्यापूर्वीच पर्यायी इंधन विकसित झाले पाहिजे हाही महत्त्वाचा हेतू.
जट्रोफाच्या लागवडी सुरू करण्यापूर्वी यासंदर्भात पूर्वीचे जगभरातील संशोधन आणि आकडे गृहीत धरले गेले होते. मात्र गृहीत आणि प्रत्यक्ष अनुभव यात बराच फरक होता.
(समाप्त)
(साहित्य-कला आणि शेतीसह अनेक विषयांमध्ये सखोल जाण असलेले लेखक महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत.)
vinayakpatilnsk@gmail.com